मायक्रोबायोलॉजी या विषयात १९८४ साली एम.एस्सी. झाले. त्या वेळी शिवाजी विद्यापीठातून पहिली आले होते. बी.एस्सी.लाही मी विद्यापीठात पहिली होते. एवढेच नव्हे तर कॉलेजच्या पहिल्या वर्षांपासून ते शेवटपर्यंत मी पहिला नंबर कधी सोडलाच नव्हता. अभ्यासाबरोबर वक्तृत्व, अभिनय, निबंधलेखन इ. स्पर्धातही मला नेहमी बक्षिसे मिळायची. त्यामुळे मी रिचर्स वगैरे करणार याची माझ्याबरोबरच्या सर्वानाच, अगदी प्राध्यापकांनादेखील खात्री होती. प्राध्यापक होणे व सूक्ष्मजीवशास्त्र या विषयात संशोधन करणे हे माझे स्वप्न होते. त्याप्रमाणे मी यूजीसीच्या आयआरएफची परीक्षा दिली व उत्तीर्णही झाले. दरम्यान, सोलापूरच्या दयानंद कॉलेजमध्ये मला लेक्चरर म्हणून नोकरीही मिळाली. आता फक्त नोकरीवर रुजू होणे व यथावकाश संशोधन करणे तेवढेच बाकी होते.
  पण जे इतर सर्व मुलींच्या बाबत होते तेच माझ्याही बाबतीत झाले. माझे लग्न झाले आणि माझ्या प्रगतीला ब्रेक लागला. माझ्या स्वप्नाला पूरक म्हणून मी प्राध्यापकच माझा सहचर म्हणून निवडला होता. तरीही मला प्राध्यापक होता आले नाही व रिसर्चकडेही वळता आले नाही. परिस्थितीला शरण न जाता मी डेक्कन शुगर इन्स्टिटय़ूटला अर्ज केला. ज्युनिअर सायंटिस्ट म्हणून तेथे रुजू झाले. बायोगॅस फ्रॉम स्पेन्टवॉश या प्रकल्पावर मी काम करत होते. त्यावर डीएसटीएच्या कन्व्हेन्शनमध्ये मी संशोधन पेपर सादर केला. मला वाटले आता माझे स्वप्न पूर्ण होणार, पण कसले काय? मला महाराष्ट्रभर दौरे सुरू झाले. क्वालिटी कंट्रोलचे जबाबदारीचे काम होते. त्या वेळी माझी मुलगी दीड वर्षांची होती. तिला मी पाळणाघरात ठेवत होते. या दौऱ्यांसाठी काही वेळा तीन-तीन दिवस तिला तिथे ठेवायची वेळ यायला लागली. त्यातच माझ्या पतीला पीएच.डी. करायची इच्छा झाली. त्याच्या पेशाची ती गरजही होती. तो दौंडच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक असल्याने त्याला अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून आम्ही दौंडला राहायला आलो. डीएसआयला मला रामराम करावा लागला.
दौंडला आल्यावर सुरुवातीला घरीच होते; पण इथे येतानाच काय करायचे ते ठरवून त्याप्रमाणे प्रशिक्षण घेऊनच आले होते. म्हणून तीन-चार वर्षांत स्वत:ची पॅथोलॉजी लॅब सुरू केली. तरीही माझ्यातली ऊर्जा मला स्वस्थ बसू देत नव्हती. दोन्ही मुली शाळेत जायला लागल्या होत्या. हाताशी वेळ होता म्हणून मग इथल्याच कॉलेजमध्ये एम.ए. मराठीला प्रवेश घेतला पुणे विद्यापीठातून डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झाले. पुणे विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्राचा ‘स्त्रिया आणि विकास’ हा अभ्यासक्रमही केला. आम्ही मैत्रिणींनी मिळून ‘अस्मिता मंच’ नावाच्या विचार मंचाची स्थापना केली. त्याद्वारे आम्ही विविध उपक्रम, व्याख्याने, चर्चासत्रे राबवत असतो.
दरम्यान माझी मोठी मुलगी बी.एस्सी. एम.बी.ए. झाली आणि तिने एल. एल. बी. ला प्रवेश घेतला. गतवर्षीच आम्ही दोघीही सोबतच उत्तीर्ण झालो. माझी धाकटी मुलगीही इंजिनीअर झाली व उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला गेली. पतीदेवांची पीएच.डी. पूर्ण झाली. मोठय़ा मुलीचे लग्न झाले.
माझे प्राध्यापक होण्याचे व रिसर्च करण्याचे स्वप्न अपुरे राहिले तरी आज मी माझ्या मुलींना मनाजोगते घडवू शकले, त्यांना वेळ देऊ शकले. त्याचबरोबर आई-वडील, सासू, सासरे यांची त्यांच्या आजारपणात, वृद्धापकाळात सेवा करू शकले. त्याचबरोबर एम. ए. , एल.एल.बी. सारख्या पदव्यापण घेतल्या याचे मला निश्चितच समाधान आहे.
सुषमा इंगळे, दौंड