* ॐकार उच्चारताना तोंड अल्प उघडावे. तोंड अल्प उघडणे म्हणजे तोंड उघडून दोन्ही दातांच्या मधे आपले पहिले बोट ठेवावे, नंतर बोट तेथून काढून टाकावे. जी तोंडाची उघडलेली स्थिती राहील ती स्थिती म्हणजे अल्प तोंड उघडल्याची स्थिती होय. ही स्थिती कंठ खुला राहण्याची स्थिती आहे. या अल्प उघडलेल्या स्थितीतच ॐकार उच्चार करावा. अल्प तोंड उघडण्याची दुसरी पद्धती म्हणजे अल् या शब्दाचा उच्चार करून तोंड उघडावे. टाळूच्या मूध्रेकडील भागाला चिकटलेली जीभ अलगद खाली आणावी. अशा रीतीने तोंडाची उघडलेली स्थिती व आकार राहील ती म्हणजे तोंडाची अल्प उघडलेली स्थिती होय.
* ॐकार साधनेत जिभेचा कोठेही संबंध येत नाही आणि तसा येऊ देऊ नये. साधनेत जिभेचे स्थान स्वस्थ अवस्थेतील जिभेच्या स्थानाप्रमाणे असावे. स्वस्थ अवस्थेत जिभेचे टोक खालील दातांच्या हिरडीच्या थोडेसे पाठीमागे असते व जीभ स्थिर असते. हे स्थान निश्चित जाणून घेण्यासाठी तोंड मिटून आपण स्वस्थ बसावे व आपल्या या स्वस्थ अवस्थेतील जिभेच्या स्थानाकडे लक्ष द्यावे म्हणजे ॐकार साधनेच्या वेळेस जीभ कशी स्थिर राहिली पाहिजे हे साधकाच्या निश्चित लक्षात येईल.
* ॐकाराचा उच्चार घशाच्या पाठीमागील बाजूकडून म्हणजेच कंठातूनच झाला पाहिजे. पाठीमागील बाजू म्हणजे आपण कंठातून पाणी जेथून गिळतो किंवा आवंढा जेथून गिळतो ती जागा होय. हाच तो कंठ म्हणजे सामान्य भाषेत घसा. ॐकारच्या वाचिक जपाचे स्थान हेच आहे. हे स्थान समजण्यासाठी तोंडात थोडे पाणी घेऊन लक्षपूर्वक गिळून पाहावे किंवा आवंढा लक्षपूर्वक गिळून पाहावा. हनुवटी व गळा जेथे मिळतो ते हे कंठाचे स्थान आहे. मानवी कंठ तीन भागांत विभागला आहे- १. ब्रह्मकंठ, २. विष्णुकंठ व ३. शिवकंठ. ॐकारातील अकारमात्रेचा उच्चार ब्रह्मकंठातून, उकार मात्रेचा उच्चार विष्णुकंठातून व म्कार मात्रेचा उच्चार शिवकंठातून झाला पहिजे, तरच ॐकाराची अपेक्षित सुयोग्य स्पंदने मिळतील. तो कसा व का, याबद्दलची माहिती पुढे येईलच.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2015 3:11 am