हास्य हे प्रभावी औषध आहे, ज्याच्या आयुष्यात हास्य आहे तो असतो आनंदी, उत्साही आणि प्रेमळही! म्हणूनच रोजच्या जगण्यातल्या ताण-तणावांवर मात करण्यासाठी हास्याचं टॉनिक घ्यायलाच हवं. उद्या (३ मे) जागतिक हास्य दिन. त्यानिमित्ताने खास दोन लेख. हसायला लावणारे आणि हसण्याची
गरज सांगणारे..

‘‘अहोऽऽ ऐकलंत का?’’ पूर्वी घराघरांतून हा प्रश्न ऐकू यायचा. मग ते ‘अहो’ कानात प्राण आणून ‘अगं’ काय म्हणते ते ऐकायला सिद्ध व्हायचे. त्या ऐकवण्यामध्ये ‘कुंदाला यंदा बरंसं स्थळ पाहायला हवं’ पासून ‘बाजारात लोणच्याच्या कैऱ्या आल्यात बरं का’ ते ‘माझी आई चार दिवस हवापालट म्हणून येणार आहे’पर्यंत कोणत्याही गोष्टी असायच्या. ज्या घरात ४०/५०च्या दशकातली मंडळी आहेत, त्यांच्याकडे अजूनही पती-पत्नींमधील संवादाची सुरुवात साधारण अशीच होते..
  आमच्या शेजारी राहणाऱ्या देशपांडे आजी-आजोबा यांच्यातला संवाद म्हणजे गमतीशीर प्रकारच असतो. आजोबांच्या कानांनी जरा दगा दिलाय आणि आजींची नजर अंमळ कमीच काम करते. बरेचदा सक्काळी सक्काळी आजी स्वयंपाकघरातून हॉलमध्ये आजोबांची काठी जिथे ठेवलेली असते, त्या दिशेकडे बघून ‘‘अहो, ऐकलं का? लवकर या बरं फिरून, मित्रांबरोबर साखरेचा चहा पीत बसू नका हाटेलात, आणि येताना देवासाठी फूलपुडी आणायला विसरू नका’’ अशा प्रेमळ सूचना देतात आणि आजोबा बेडरूममधून जामानिमा करून आणि लेकानं अमेरिकेहून आणलेले स्पोर्टस् शूज घालून फिरायला जायला सिद्ध होतात..  आणि त्यांनी प्रतिक्रिया न देता जाताना खाड्कन लावलेल्या दाराचा आवाज तेवढा आज्जींच्या त्याच कानात रेंगाळत राहातो.. आणि मग देशपांडय़ांच्या एकूणच घराण्याचा उद्धार होतो. आमच्यासाठी हा रोजचा ‘संवाद’ सकाळ प्रसन्न करून टाकतो..  
 दुसऱ्या टोकाला खालच्या मजल्यावर राहणारे सुमती वहिनी आणि माधवदादा. त्यांच्यात वेगळाच   संवाद असतो, ‘अहो ऐकलं का? तुम्हाला आवडते, म्हणून रसाची भेंडीची भाजी केलीये, कशी झालीये?’ वहिनी विचारतात आणि मिस्कीलपणे दादा म्हणतात, ‘भाजी उत्तमच झालीये, पण अजून थोडी भेंडी चालली असती त्यात.’
 ‘म्हणजे?’ वहिनी धास्तावून.
 ‘काही नाही गं, ज्या मानाने तू मीठ घातलंयस भाजीत, त्या अंदाजाने अजून आत पाव किलो भेंडी सहज खपली असती.’
 ‘हो का? अगं बाई, चिरल्यावर भेंडीच्या काचऱ्यांना मीठ लावून ठेवलं होतं, हे माझ्या लक्षातच नाही राहिलं’ इति वहिनी.
‘जाऊ दे गं, संध्याकाळी भाजीत बिलकूल मीठच घालू नकोस’ म्हणजे सगळं ‘बॅलन्स’ होऊन जाईल.’ माधवदादा हसत हसत वातावरण ‘टेस्टी’ करून टाकतात.
 नात्यांचं हे असं असतं. जसं जसं लग्नाची वर्षे वाढत जातात तसं तसं तुमच्यातल्या वैवाहिक आयुष्यातही तोचतोचपणा वाढायला लागतो. रोजचं रुटीन आयुष्य जगता जगता जगणं बेचव, निरस होऊ लागतं. पण जर तुमच्यात विनोदबुद्धी असेल तर मात्र त्याच निरस आयुष्याला तुम्ही प्रसन्न, खेळकर करू शकता.
   वातावरणात हास्याचा शिडकावा मन प्रसन्न करतो आणि म्हणूनच जाणीवपूर्वक तुमचा ह्य़ूमर सेन्स वा विनोदाची वृत्ती वाढवली पाहिजे. विनोदी लेख, कथा, चित्रपट, टीव्हीवरचे शो पाहून त्यातले काही मार्मिक किस्से लक्षात ठेवून मध्ये मध्ये त्याची देवाणघेवाण करण्यानेही तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात हास्याची कारंजी फुलवू शकता. त्याने फायदा हा होतो की वातावरण तर खेळीमेळीचं राहतंच, पण तुमची तब्येतही ठणठणीत राहाते. आणि तुमचं एखादं छोटंसं खुसखुशीत, पण मार्मिक वाक्यही प्रसंगातला अवघडपणा कमी करू शकतं. माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीच्या बाबतीत नुकतीच घडलेली गोष्ट. तिचा शेंडेफळ मुलगा इयत्ता दुसरीमध्ये आहे (खरं तर होता.) निकालाचा दिवस. बाईसाहेब लेकासमवेत शाळेत गेल्या आणि अनीशचे ७५ टक्के मार्कस् पाहून अगदी शोकमग्न (?) झाल्या. तणतणतच घरी आल्या, तिचा पडलेला चेहरा पाहून सासूबाईंनीही चेहरा पाडला, सासरे चिंताग्रस्त का कायशा चेहऱ्यानं कोचावर बसले. यथावकाश पतीराज आंघोळ करून बाहेर आले. वातावरणाच्या गांभीर्याची त्यांना झटक्यात कल्पना आली. (या प्रकरणाचा हिरो अनीश मात्र निरागसपणे इकडे-तिकडे बागडत होता)
‘काय झालं?’ दबक्या आवाजात त्यांनी विचारायचीच खोटी,
‘‘तुमच्या लेकानं, काय दिवे लावलेत परीक्षेत माहितीये? फक्त ७५ टक्के मिळालेत त्याला. अहो मैत्रिणींमध्ये तोंड दाखवायची सोय नाही उरली मला, फक्त ७५ टक्के’’ मैत्रीण गरजली.
 सासू-सासऱ्यांनी सुनेच्या नकळत नि:श्वास सोडला, ‘चला, पोरगं अगदीच नापास नाही झालेलं. हिचा अवतार बघून असं वाटलं की..’ एवढय़ात त्यांच्या लेकानं म्हणजे मुलाच्या बाबानं प्रगती पुस्तकावर नजर फिरवली आणि गंभीरपणे विचारलं, ‘पासिंग कितीला असतं गं?’
‘‘३५ टक्के’’ मुलाची आई फिस्कारली.
 ‘बाप रेऽऽ म्हणजे अनीशला फक्त ४० टक्केच जास्त मार्कस् पडलेत नाही? नेमकं परीक्षेच्या काळात आलेलं त्याचं आजारपण बघता फक्त   ४० टक्के म्हणजे जरा जास्तच होतात नाही का?
हे ऐकताच बघता बघता मैत्रिणीचा चेहरा सैलावला आणि तिच्या चेहऱ्यावर हसू फुटलं.
‘जाऊ देऽऽ, माझ्या या लाडोबाकडून पुढल्या वर्षी एवढा अभ्यास करून घेईन की ९० टक्के पडलेच पाहिजेत, बघा तुम्ही.’
‘चला पुढल्या वर्षांच्या निकालापर्यंत ‘पॅरोलवर’ सुटका!’ म्हणत बाबा आणि सासू-सासऱ्यांनी मनातल्या मनात हुश्श्य केलं.
  नवरे नावाचे समस्त पुरुष तर बायको हा विनोदाचाच विषय आहे, याच मन:स्थितीत असतात. त्यातही बहुतेक स्त्रियांच्या बाबतीत लग्नाआधी असलेले केस (अगदी गुडघ्यापर्यंत आणि जाडजूड) आणि तेव्हाची अंगकाठी (चवळीची नाहीतर निदान घेवडय़ाची शेंग) हे हळवे कोपरे असतात. मग नवरे त्याचा गैरफायदा न घेतील तरच नवल. आमचे एक व्यवसायाने अर्थसल्लागार असलेले स्नेही त्यांच्या बायकोच्या बाबतीत म्हणतात, त्यावेळी (म्हणजे लग्नाआधी) सीमाच्या केसांचा शेपटा म्हणजे
घोडय़ाची शेपूट होती हो, तशी आताही शेपूटच आहे, फक्त कालपरत्वे घोडय़ाचा उंदीर झालाय इतकंच! ’’ इथे समस्त नवरेमंडळी आपल्या बायकोला आपल्या बोलण्याचं वाईट वाटेल, ती दुखावेल याची सुतराम तमा बाळगत नाही हा भाग अलाहिदा! पण मग कधी तरी बायकोही नवऱ्याच्या टक्कलाचा आणि सुटलेल्या पोटाचा समाचार घ्यायला मागे पुढे पाहात नाही. मात्र या देवाणघेवाणीच्या मस्करीची कुस्करी होणार नाही, याची मात्र काळजी घेतली पाहिजे, नाही तर घरात अबोला आणि त्याची शिक्षा भांडय़ांना अशी वेळ यायची.
नात्यामध्ये मोकळेपणा आणि आनंद आणायचा असेल तर जोडीदाराच्या आयुष्यात काय चाललंय. आपल्या जोडीदाराला असलेले ताणतणाव याचीही जाणीव असणं आवश्यक आहे. जर तुम्ही त्या ताणाला हलकं करू शकलात तर एखादं खुसखुशीत वाक्यंही काम करून जातं. मूड बदलवून टाकतं आणि त्याने मुख्य फायदा हा होतो की नात्याची वीणही तितकीच घट्ट होऊन जाते.
     स्मिता एका एन.जी.ओ.मध्ये काम करते. वंचित मुलांना खेळ, गोष्टीची पुस्तकं, खाऊ मिळवून देण्यासाठी तसंच शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तिची संस्था काम करते. स्मिताचं मुख्य काम पेपरवर्क करणं, नोंदी ठेवणं, हिशेब सांभाळणं इत्यादी. एकदा खेळघरातल्या ५०/६० मुलांसाठी दिवसभराची ‘गंमत-शाळा’ घेण्याचं ठरलं. त्या संदर्भातले फोन, ई-मेल करणं स्मितानं चोखपणं केलं, पण अगदी आयत्या वेळेस कार्यशाळा घेणाऱ्या दोन ताईंपैकी एकीच्या घरी काही गंभीर अडचण आल्यानं, त्या येऊ शकणार नाहीत असा निरोप आदल्या दिवशी आला. आयत्या वेळी काय करावं या निर्णयात स्मिताचंच नावं पुढे आलं. व्यवस्थापकांनी स्मिताने वर्कशॉप घ्यायला सुरुवात करावी आणि दुसऱ्या ताई दोन तासांनी तिला सोबत करतील, असं सांगितलं. स्मिता एकदम टेन्शनमध्ये आली. तिने यापूर्वी कधीही असं वर्कशॉप एकटीने घेतलेलं नव्हतं. आपण करू शकू का या शंकेमुळे ती अस्वस्थ झाली आणि घरी आली तीच रडवेली होऊन. विश्वासला, तिच्या नवऱ्याला म्हणाली, ‘मला शक्य नाही रे! मुलांसमोर उभं राहून काही करण्याची आणि करवून घेण्याची कल्पनाच अशक्य कोटीतली वाटते.’ त्यापेक्षा १० पानी पत्रं लिहिणं सोपं! मुलं असली म्हणून काय झालं, कोणासमोर उभं राहून बोलणं या विचारानेच थरकाप होतोय माझा. विश्वासनं तिला आधी शांत बसायला लावलं. पंखा चालू केला. माठातलं थंडगार पाणी प्यायला दिलं. काही वेळ जाऊ दिला आणि मग एक वही पेन घेऊन तो तिच्या समोर बसला. मुलांना साधारणपणे काय अॅक्टिव्हिटिज देता येतील याची तिच्याशी चर्चा करून एक यादी बनवली. छानसा फ्लोचार्ट काढून दिला. कंसात बारीकसारीक तपशीलही लिहिले. स्मिताचा आत्मविश्वास वाढवला. दुसऱ्या दिवशी स्मिता  क्रीडांगणावर (किरणांगणावर?) दाखल झाली तीच संमिश्र भावनेनं. साहित्याची जमवाजमव चालू असतानाच मोबाइलचा मेसेज टोन वाजला. तिने फोन बाहेर काढला तर विश्वासचा मेसेज होता. दोघांच्या नावावर कोटी करत त्यानं लिहिलं होतं, ‘मी तुझ्या आत्म्याला व्यापून उरलेला विश्वास आहे, तुझा ‘आत्मविश्वास’ आहे. आणि आत्ता या क्षणी मला स्मिताकडून एका स्मिताची अपेक्षा आहे.’ हे वाचताना तिच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटली आणि वेगळ्याच आत्मविश्वासाने ती पुढे सरसावली. आणि बघता बघता तिने ती कार्यशाळा आणि त्यातल्या मुलांनाही जिंकलं.
  ताणतणावांमध्ये घरातल्या माणसांची अशी शाब्दिक साथही मोलाचं काम करून जाते. नात्यात शब्दच खूप मोलाचं काम करतात. तेच दुखावतातही आणि सुखावतातही. आपल्या माणसाला तणावाच्या विचारांच्या आवर्तनातून बाहेर काढायचं असेल तर विनोदासारखा उत्तम मित्र नाही. तो आशावादीही असतो आणि एखाद्या घटनेकडे वेगळ्या नजरेने बघण्याची ताकदही त्यात असते. कैवल्यला लहानपणापासून गाण्याची आवड. सुदैवाने गळाही लवचीक म्हणावा असा. खूप मेहनतीनं त्यानं आपलं गाणं जपलं/ जोपासलं. गाण्यातच  करिअर करणाऱ्या त्याच्या निर्णयाला देविकाबाईंचा, त्याच्या आईचा पूर्ण पाठिंबा होता. स्पर्धेचा रेटा तर याही क्षेत्रात असतोच. आपले गाणे चार ‘कानसेनांपर्यंत’ पोचण्यासाठी कैवल्यला नेहमीच खूप धडपड करावी लागते. आणि त्यासाठी मानधनामधला ना ‘मान’ मिळतो ना ‘धन!’ मग निराशा यायला लागते. त्याची ही मन:स्थिती बघून एक दिवस देविकाबाई त्याला म्हणाल्या, ‘अरे गाण्यात वैविध्य तर हवंच, एकच राग सतत गाऊन कसं चालेल? सध्या तुझा ‘भूप’ चालू आहे. नंतर ‘यमन’ गाशीलच की आईचे शब्द ऐकून कैवल्यला खूप बरं वाटलं, त्याच्या आशेला नवी पालवी फुटली. तो गाण्यात मुरलेला असल्याने भूप म्हणजे ‘म’ आणि ‘नी’ वज्र्य असलेला राग म्हणजे ‘नो मनी’ आणि यमन म्हणजे शुद्ध आणि तीव्र ‘म-नी’ वाला राग. हे त्याला लगेच लक्षात आलं, आणि तो वेगळ्याच उत्साहाने मैफिलींना सामोरं जाऊ लागला.

मनमोकळं आणि खळखळून हसणं तुमच्या शरीरातले स्नायू रिलॅक्स करतं,

तणावाच्या जगण्यात स्ट्रेस बस्टरचं काम करतं त्यामुळे स्वाभाविकच तुमच्या हृदयालाही संरक्षण मिळतं.
 विनोद वा हास्य तुम्हाला प्रसन्न करतं, तुमच्यातील सकारात्मक दृष्टी वाढवतं आणि कठीण परिस्थितीत, निराश मनस्थितीवर मात करण्याचा अवधी देतं.

Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…

अलीकडे निरोगी-निरामय आयुष्यासाठी ठिकठिकाणी ‘हास्य-क्लब’ सुरू झालेले दिसतात. दिवसातला तेवढा एक तास कृत्रिम हसून निरोगी आयुष्य लाभेल या आशेवर राहण्यापेक्षा जमेल तेव्हा जमेल तसे हसून आणि हसवून आपले आणि इतरांचेही आयुष्य त्यातले नातेसंबंध समृद्ध करता येईल का? सोचनेवाली बात है! म्हणून काही वेळा जाणीवपूर्वक तर काही वेळा अजाणतेपणे घडलेल्या विनोदाचा आस्वाद घ्यायला हवा. अर्थात महत्त्वाचं काय तर वातावरण प्रसन्न होणं. माझी एक मावस जाऊ शिल्पा, हुबळीची. बऱ्यापैकी कानडी बोलणारी, आणि मराठीसुद्धा कानडी हेलकाव्यासकट बोलणारी. ती पहिल्यांदा जेव्हा आमच्याकडे आली तेव्हा माझा मुलगा समोर दीड/दोन वर्षांचा होता. आमचं चहापाणी चाललं होतं आणि आमच्या समीरला नवीन काकूला नवीन खेळणं दाखवायची घाई झाली होती. त्या सगळय़ा धडपडीत त्याच्या खेळण्याच्या टोपल्यातल्या एका बँडवाल्याच्या तुटलेल्या तुतारीचं टोक त्याच्या पायाला लागलं आणि रक्ताची धार लागली. शिल्पा ओरडली ‘अय्योऽऽ वहिनी, पाऽऽपू बघा कि हो! पाऽऽपूच्या पाऽऽयातून रक्त कि येतयं हो, अय्यो पाऽऽप हो (म्हणजे बिच्चारा) तिच्या त्या पापू, पाय, पाप या पच्या बाराखडीची इतकी मजेदार सरमिसळ झाली की समीर रडणं विसरून आणि आम्ही त्याची ती जखम बघून घाबरणंही विसरलो. नंतर दिवसभर तिच्या कानडी हेलकाव्यासकटच घरातले सगळे संवाद घडले, हे सांगायला नकोच.
हास्यानं मनही होतं प्रसन्न –
* जगणं उत्साहाचं आणि
   आनंदाचं होऊन जातं
* भीती आणि काळजी कोसो दूर पळते
* विनोद वाढतो उर्जा
* हास्य सहज आणि फुकट उपलब्ध आहे
स्त्रीवर्गाला विनोदबुद्धी नसतेच असा एक सरसकट (गैर) समज असतो. पण त्यात फार काही तथ्य नाही, कारण कित्येक बायका अंगच्या विनोदबुद्धीच्या जोरावर संसाराच्या रणरणत्या वाळवंटात ‘ओअॅसिस’ उभं करतात. विनोदाचा प्रसन्न शिडकावा ज्या घरात असतो, ते घर कायम टवटवीत दिसतं. (मग तिथे महागडा नेरोलॅक पेंट लावलेला नसला तरी) भले/बुरे प्रसंग आयुष्यात येतच असतात. पण काही ‘वेळा’ हसून साजऱ्या केल्या, तर निभावून नेता येतं, सासू-सुनेचं, नणंद-भावजयीचं किंवा जावा-जावांचं नातं म्हणलं तर अवघड जागीचं दुखणं! पण थोडा हजरजबाबीपणा असेल तर आयुष्यात ही नाती सजा न वाटता, मजाच आणतात. ‘जावा-जावा उभा दावा’ अशी एक म्हण, आपल्याकडे आहे. माझी एक चुलत जाऊ मला नेहमी म्हणते, ‘आपल्यात मात्र जावा-जावा-आडवा धागा मैत्रीचा’ असं आहे. हाच मैत्रीचा धागा विणत आयुष्य जगण्यात मजा आहे. त्यासाठी दुसऱ्याने केलेली चेष्टा मस्करी तितक्याच खिलाडूपणे स्वीकारता यावी लागते. कधी कधी ती मस्तरी थेट अंगावर न घेता शिंगावरून परतवण्याचं कसब लागतं. काही लोकं स्वत:च स्वत:ची चेष्टा करतात आणि आजूबाजूच्या मंडळींना हसवतात, याला खरं म्हणजे धैर्य लागतं. माझी मैत्रीण रमा स्वत:च्या जाडेपणाची मन:पूत टिंगल टवाळी करते, स्वत: हसते आणि आम्हालाही हसवते. कधीतरी धूमकेतूसारखी अचानक घरी अवतीर्ण होते, मग मी विचारते, ‘रमा अचानक कशी काय आलीस?’ तर म्हणते, ‘‘काही नाही गं सक्काळी सक्काळीच तुझी आठवण आली खूप. मग मी म्हटलं स्वत:ला, ‘चल रे भोपळय़ाऽऽ टुणूक टुणूक. आणि आले टुणकन तुझ्याकडे’ पण टुणटुण चालत नाही हो आले, रिक्षानेच आले.’’

हास्याचे सामाजिक फायदे
* हास्य हे संसर्गजन्य आहे.
* हास्य द्या, हास्य घ्या. हास्य सांघिक
  भाव देतं.
*नात्याची वीण घट्ट करतात.

‘टवाळा आवडे विनोद’ असं रामदास स्वामींनी खूप पूर्वी म्हणून ठेवलं आहे. पण आजच्या ताणतणावाच्या जगात त्यांनी पुन्हा अवतार घेतला, तर ‘मनुष्यप्राण्या आवश्यक विनोद’ असं ते म्हणतील याची मला खात्री वाटते.

हास्याचे शारीरिक फायदे –
* हसून तर पहा, तुमच्या ताणतणावाच्या    हार्मोन्सची पातळी एकदम कमी होऊन जाईल
* हसलात की वेदना एकदम गायब!
* स्नायूंना आराम देणारं हास्य
* आणि हो, हृदयाचे आरोग्यही राहते चांगले

मानसशास्त्राच्या शाखेमध्ये नव्यानेच उदयाला आलेल्या ‘पॉझिटिव्ह सायकॉलॉजी’ शाखेचं मर्मस्थान हेच आहे, की टोकाच्या निराशाग्रस्त मन:स्थितीत एखादी हास्याची झुळूक जादूसारखे काम करते. लगेच व्यक्तीला त्यातून बाहेर काढते असं नाही, पण निदान बाहेर पडण्याच्या अनेक पर्यायांचा विचार करण्याइतकच स्वास्थ्य लाभते.
श्रेष्ठ कवी गुलजार हेही हेच तर सांगतात,
जो होगा वह होकर रहेगा
तू कल कि फिक्र में अपनी आज कि हँसी बरबाद ना कर।
रिश्ते तो यँूही निभाने पडते ही है
क्यू ना हँसी मजाकसे इन्हे गले लगाले हम।    
शुभांगी पटवर्धन -Patwardhanshuhangi22@gmail.com