अपर्णा देशपांडे

बहुतांशी पालकांचं संपूर्ण आयुष्य त्यांच्या मुलांच्या विश्वाशी जोडलं गेलेलं आपण आजूबाजूला  पाहतो. जणू पालकांचं स्वत:चं काही जगच नाही! अशा वेळी जेव्हा मुलं मोठी होतात, घरटं सोडून स्वतंत्र उडायचा प्रयत्न करतात तेव्हा अनेकदा पालकांना ती गोष्ट पचवणं जड जातं. मुलांशिवाय जगण्याची कल्पना करणं, त्यांच्या आयुष्यातून लक्ष काढून घेणं अवघड होऊन बसतं. मुलं पालकांच्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग असतो हे मान्य! पण तो एक ‘भाग’ असतो हे विसरून कसं चालेल?  बदललेल्या आजच्या जगात योग्य त्या वेळी त्यांचे मार्गदर्शक होणं न थांबवता आपण त्यांना मोकळं सोडू शकू  का? 

‘‘बाबा, मी ही टुर्नामेंट जिंकलो! आता मला राव सरांच्या बंगळूरुच्या बॅडमिंटन अकॅडमीमध्ये प्रवेश मिळणार.’’ मुलगा फोनवरून आपल्या यशाबद्दल सांगत होता.

‘‘शाब्बास बेटा! चिंता नको करूस. तुझी आई तुझ्यासोबत राहणार आहे पूर्ण सहा महिने. ठरलंय तसं आमचं.’’

‘‘बाबा, आईचा जॉब आहे ना.. ती का म्हणून राहील इथे सहा महिने?’’

‘‘अरे, घेईल  ती बिनपगारी रजा. आता आमचं सारं आयुष्य तुमच्यासाठीच तर आहे!’’

‘‘आईला फोन देता का जरा? ..  आई , तुमचं ‘सारं आयुष्य’ म्हणजे आम्ही कसं असू शकतो?’’

‘‘तुझी काळजी म्हणून ते असं म्हणाले रे.’’

‘‘ते ठीकच गं, पण आई, तुला आणि बाबांना आपलं स्वत:चं असं एक आयुष्य, तुमचे ‘गोल्स’ आहेत. आमचं यश ही तुमच्यासाठी अत्यानंदाची बाब आहे, तुम्हीही त्यासाठी खूप प्रयत्न करता, हे मान्य. पण त्यापलीकडे तुमचं करिअर, तुमचा आनंद, तुमच्या इच्छा आहेत, याचं भान दे तू बाबांना! आणि तूही जरा स्वत:कडे लक्ष दे आता. मी मोठा झालोय, माझी काळजी करू नका. पुढच्या आठवडय़ात येतोय घरी, तेव्हा सगळं सामान घेऊन जाईन मी तिकडे.’’

दुसरा कामतांचा अनुभव बघू.

‘‘सर, आम्ही दोघंही मुलाच्या शिक्षणासाठी कोटय़ालाच शिफ्ट होतोय.’’ कामत पतीपत्नींनी सांगितलं आणि सरांना खूप आश्चर्य वाटलं.

‘‘काय म्हणता अथर्वचे बाबा? तुमचा केवढा मोठा व्यवसाय आहे इथे!’’

‘‘मुलापेक्षा व्यवसाय मोठा नाही ना सर? आमचं सगळं आयुष्यच तर त्याच्यासाठी आहे.’’

सरांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण मुलापासून दूर राहाण्याची कल्पनाच कामत दाम्पत्यास असह्य़ होत होती. दोन वर्ष सेकंद काटय़ावर त्यांनी मुलाचं वेळापत्रक पाळलं. अथर्वनंही प्रचंड मेहनत घेतली,    दिवस-रात्र एक केली. त्याला उत्तम गुण मिळाले, पण ‘आय.आय.टी.’ला प्रवेश मिळाला नाही. त्या दोन वर्षांच्या कालावधीत कामतांच्या व्यवसायाची अपरिमित हानी झाली. त्यांच्या निर्णयानं झालेल्या वाताहतीचं खापर मात्र मुलावर फोडलं गेलं. अथर्व बिचारा अपराधीपणाच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून गेला होता. त्याचं सुंदर यश झाकोळलं गेलं होतं.

हे सगळं वाचवता आलं नसतं का? पालक आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत मुलांच्या ‘पाठीशी’ असतात. फक्त भावनिक आणि व्यावहारिक पातळीवर योग्य त्या वळणावर रस्ते वेगळे होणार, याचं भान आवश्यक आहे. आपलं सगळं आयुष्य  फक्त ‘मुलांसाठीच’ म्हणणं कितपत योग्य आहे?

आजच्या मुलांसमोरील जग हे प्रचंड वेगानं बदलतंय. त्या जगात त्यांना आपल्याशी बांधून घेऊन आपल्या आकांक्षा आणि आपल्या स्वप्नांची गाठोडी त्यांच्या मानेवर ठेवून जमणार नाही. त्यांची स्वप्नं ती स्वतंत्रपणे घेऊन आलेली असतात. मुलं घडत असताना त्यांना यश-अपयशाच्या मानकांवर न मोजता त्यांच्या वाढीचा प्रवास ‘एन्जॉय’ करता आला पाहिजे. हे तेव्हाच सोपं होतं जेव्हा आपण त्यांचा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून त्यांच्या क्षमता आणि त्रुटींसह स्वीकार करू.

आपल्या अमेरिकेला जाणाऱ्या मुलीला विमानतळावरून निरोप देऊन, मनात प्रचंड पोकळी निर्माण झालेल्या अवस्थेत सुदेश आणि रीमा घरी आले. मुलं उच्च शिक्षणासाठी परदेशी गेली किंवा मुलीचं लग्न होऊन ती सासरी गेली की एक भकास रिक्तपणा जाणवायला लागतो. गेला बराच मोठा काळ ज्या गोष्टींकडे डोळे लावून सगळं पणाला लावलेलं असतं, ती गोष्ट घडून गेलेली असते आणि मन उदासीन होतं. पण ती भावना त्या काळापुरतीच मर्यादित असते.. किंबहुना असायला हवी. सुदेश-रीमाचंही तसंच काहीसं झालं होतं. पण त्यांच्यासाठी ती भावना तात्पुरती नव्हती. दोन आठवडे उलटले तरीही ते त्या पोकळीतून बाहेर येऊ शकले नव्हते. दोघांचंही काम संपलं की उरलेल्या वेळात काय करायचं हा प्रश्न पडू लागला. कारण त्यांचं स्वत:चं जगणं त्यांनी पूर्णपणे आपल्या मुलीच्या विश्वाशी जोडून टाकलं होतं. तिच्या विश्वापल्याड आपलंही एक आयुष्य आहे, याचं भानच राहिलं नाही त्यांना.

राधावहिनी सर्वस्व हरवल्यासारखी एकटी अंधारात बसली होती. हेमानं दिवा लावला आणि तिची आस्थेनं चौकशी केली. राधाच्या मुलीला तिच्या ऑफिसमधील एका हुशार, कर्तबगार, पण परजातीय मुलाशी लग्न करायचं होतं आणि तिच्या या निर्णयानं राधा कोलमडली होती. ‘‘माझी मुलगी म्हणजेच माझं आयुष्य ना? सगळं लक्ष तिच्यावरच केंद्रित केलं गं मी. तिचा आहार, तिचे कपडे, तिच्या वेळा सांभाळणं, तिची खोली आवरणं, तिच्या मित्रपरिवाराला खाऊपिऊ घालणं.. काय नाही केलं मी? माझं स्वत:चं जगणं विसरून तिच्यासाठी काय महत्त्वाचं तेच करत गेले. तीदेखील माझं सगळं सगळं ऐकायची, माझ्या नियमानुसार वागायची. हा कोण कुठला मुलगा भेटला तिला.. की लगेच.. तिनं असं काही करणं माझ्यासाठी खूपच अनपेक्षित आहे. मी आज सगळ्या बाजूंनी अपयशी ठरले. माझ्या मुलीनं माझ्या सगळ्या इच्छा धुळीला मिळवल्या. जगण्यातला सगळा रस हरवल्यासारखं वाटतंय.’’ हे सांगताना वहिनींना आतून उन्मळून येत होतं. आत्तापर्यंत आपल्या म्हणण्यानुसार वागणाऱ्या आपल्या मुलीनं स्वतंत्रपणे काही निर्णय घेतलाय हेच मुळात त्यांच्या पचनी पडत नव्हतं. वास्तविक पाहाता मुलगी उत्तम शिकलेली, उत्कृष्ट नोकरी असलेली होती. म्हणजे व्यावहारिक भाषेत ज्याला यश म्हणतात ते मिळवून झालं होतं. फक्त  स्वत:च्या लग्नाचा निर्णय तिनं स्वत: घेतला इतकंच! आम्ही वाढलो आणि जगलो त्याच पद्धतीनं तुम्हीदेखील आमच्या सर्व जुन्या नियमांची चौकट न मोडता जगावं हा हट्ट आताच्या स्वतंत्र मतं असलेल्या मुलांसमोर करणं बरोबर ठरणार नाही.

आता आणखी एक उदाहरण. ‘‘अभिनंदन सुरेश राव. मुलानं काय मोठं यश मिळवलं. वा! इतक्या मोठय़ा आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश मिळवला. आता पेढे द्या बुवा.’’ एका परिचितांनी त्यांचं मनापासून अभिनंदन केलं होतं. पण सुरेशराव खूश होते का? तर नाही!

‘‘कशाचे पेढे हो! ‘एम.बी.बी.एस.’ला थोडाच प्रवेश मिळालाय त्याला? गेल्या       पाच-सहा वर्षांपासून फक्त मेडिकलचाच ध्यास घेतला होता आम्ही नवराबायकोनं. आमचं सगळं रुटीन मुलाच्या गरजेनुसार आखलं, कुठल्याही सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमाला गेली चार वर्ष आम्ही गेलेलो नाही. आता काय तोंड दाखवू जगाला? मी तर गेला पूर्ण आठवडा सुट्टी काढून घरीच आहे. हरलो हो आम्ही!’’

‘‘पण परीक्षा तर मुलाची होती ना? तुम्ही का स्वत:ला जगापासून तोडलंत? आणि तोंड न दाखवण्यासारखं काय त्यात? इतकं मोठं यश मिळालं तर आनंदानं त्याला डोक्यावर घ्यायला पाहिजे होतं तुम्ही. बरं. असू द्या. माझ्या मुलाच्या यशाचे पेढे घ्या. सातवीपासून प्रत्येक वर्षी चढता आलेख आहे त्याचा ही फार समाधानाची गोष्ट आहे आमच्यासाठी. ५० टक्क्यांवरून प्रगती करत दहावीला ६५ टक्के  मिळवले आमच्या मुलानं. बक्षीस म्हणून हिमालयाच्या ट्रेकला पाठवलं त्याला त्याच्या इच्छेनुसार.’’ अतिशय खूश होऊन त्या स्नेह्य़ांनी सुरेशरावांच्या हातावर पेढे ठेवले.

या उदाहरणांसारखी कितीतरी उदाहरणं इथे देता येतील, ज्यात पालकांच्या नैराश्याची/ हतबलतेची कारणंच मुळात पार चुकीची आहेत. आपल्या मुलांचं आयुष्य आपल्यासोबत कायमचं बांधून घेणं म्हणजे पालकत्व निभावणं, या पालकत्वाच्या चुकीच्या भूमिकेतून ओढवून घेतलेलं हे दुखणं आहे. एका विशिष्ट वयापर्यंतच आपण मुलांबरोबर त्यांचं बोट पकडून राहू शकतो. त्यानंतर त्यांच्या सर्वागीण वाढीसाठी आवश्यक ते सगळं पुरवू शकतो, त्यांच्या आयुष्यात काही वाईट वळण येणार नाही, अथवा अमंगलाची छाया पडणार नाही याची काळजी घेऊ शकतो. इथपर्यंत आपली प्राथमिकता आपली मुलं असणं ठीक आहे. पण एकदा मुलं मोठी झाली की आपणही आपल्या प्राथमिकता बदलायला हव्यात. सुप्रसिद्ध मनोविश्लेषक  कार्ल युंगनं सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या बदलत्या वयानुसार जगण्याची उद्दिष्टं बदलणं गरजेचं असतं. कलत्या वयात जुन्या उद्दिष्टांना उराशी कवटाळून कसं चालेल? नाहीतर मग वरच्या एका गोष्टीतल्या सुदेश आणि रीमासारखी गत होते. मुलांना तेजोमय भविष्य देण्यासाठी, नवे पंख देण्यासाठी पालक जीवाचं रान करतात. पण तीच मुलं करिअर किंवा नोकरीनिमित्त आपल्यापासून उडून दूर गेल्यावर आपलं आयुष्य कसं असेल याची जाणीवपूर्वक आखणी का नाही करत?

एका आयुष्यात आपण कितीतरी भूमिका आणि पर्यायानं त्यामागील जबाबदाऱ्या पार पाडत असतो. त्या जबाबदारीचा एक मोठा हिस्सा मुलांप्रती निश्चितच असतो. पण त्यापलीकडे आपलंही एक जग आहे हे विसरून कसं चालेल?

राधाच्या गोष्टीत तिच्या मुलीनं करिअरमध्ये उत्तम यश मिळवलं, पण आयुष्याचा जोडीदार स्वत:च्या मतानं निवडला, तर ते राधाचं अपयश कसं ठरू शकतं? मुळात मुलाचं यशअपयश हे त्याच्या जडणघडणीचा भाग आहे. ते पालकांचं यशअपयश कसं होऊ शकतं?

आपली मुलं आपल्या आयुष्याचा फार मोठा, जिव्हाळ्याचा, सहजपणे वेगळा न करता येण्यासारखा भाग आहे, पण आपलं सारं आयुष्य नव्हे. हो! आपली मुलं म्हणजे आपलं सारं आयुष्य नव्हे, तर आयुष्याच्या इतर अनेक भागांप्रमाणे तोही एक मोठा  आणि महत्त्वाचा असला तरी एक भाग आहे. त्यांचं स्वत:चं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यांचा विकास, त्यांच्या आकांक्षा, त्यांची स्वप्नं त्यांनी आपल्या चष्म्यातूनच बघावीत असा अट्टाहास करणं चूक ठरेल. वयाच्या एका विशिष्ट टप्प्यापर्यंत आपण त्यांच्या वाढीस पोषक खतपाणी घालण्याचं काम करत असतो. त्यांच्या विकासप्रक्रियेचा डोळस साक्षीदार आणि मार्गदर्शक असतो, पण त्यानंतर आपल्या अपेक्षांच्या सुईनं दिशा बदलणं आवश्यक आहे. तिचं टोक आपल्या दिशेनं वळवावं. जी वानप्रस्थाश्रमाच्या दिशेनं मानसिकता तयार करण्याची सुरुवात आहे. (वानप्रस्थाश्रम म्हणजे लगेच सगळं सोडून जंगलात जाऊन राहाणं नव्हे!) आपल्या निवांतपणाचा कितीतरी विधायक कामासाठी वापर करता येतो. आपल्या राहिलेल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करता येतात. आपला समविचारी, समवयस्क मंडळींचा गट असावा. त्यांच्यात रमता येतं. राहून गेलेली कला शिकता येते, चारचाकी चालवण्याचा सराव, काही आवश्यक नवीन तंत्रज्ञान शिकून घेणं, जुने बाजूला पडलेले छंद जोपासणं, भरपूर भटकंती करत जग फिरणं, सेवाभावी संस्थांशी संलग्न होणं, भरपूर वाचन करणं, अशी मोठी यादी करता येईल. आपली ‘बकेट लिस्ट’ पूर्ण करता करता जेव्हा मुलांना गरज पडेल तेव्हा त्यांच्या मदतीला जाऊ शकतोच की आपण.

आपलं आयुष्य आनंदानं जगणं म्हणजे मुलांकडे दुर्लक्ष करणं असं अजिबात नाही. विवेकनिष्ठ जगण्याचं भान आपल्या मुलांना आपणच दिलंय ना? मग आपलीच शिकवण आपण विसरून कसं चालेल हो?

adaparnadeshpande@gmail.com