21 August 2019

News Flash

पोलिओमुक्त भारत

जागतिक आरोग्य संघटनेने १९९८ सालापासून ‘पल्स पोलिओ’ची मोहीम सुरू केली. दरवर्षी जानेवारी व फेब्रुवारीत ‘पोलिओ रविवार’ साजरे केले गेले.

| October 18, 2014 01:01 am

जागतिक आरोग्य संघटनेने १९९८ सालापासून ‘पल्स पोलिओ’ची मोहीम  सुरू केली. दरवर्षी जानेवारी व फेब्रुवारीत ‘पोलिओ रविवार’ साजरे केले गेले. लोकांच्या घरोघर जाऊन ‘पोलिओ रविवार’च्या नंतरच्या आठवडय़ात ५ वर्षांखालील मुलांना पोलिओ डोस पाजले गेले. अमिताभ बच्चन, महम्मद कैफ इत्यादी व्यक्तींना हाताशी धरून दूरचित्रवाणीच्या माध्यमातून लोकांना भावनिक आवाहन केले गेले आणि लोकजागृती सुरू ठेवली. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार आफ्रिका खंडही पोलिओ निर्मूलनाच्या मार्गावर आहे. याचमुळे जगातून पोलिओ हटवण्याचा सोनियाचा दिस दूर नाही.

भा रतीय आरोग्य क्षेत्राच्या दृष्टीने सुवर्णक्षरांनी लिहिण्याचा दिवस म्हणजे २७ मार्च २०११ हा दिवस. याच दिवशी जागतिक आरोग्य संघटनेने दक्षिण आशिया  विभागाला ै(भारत, नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंका, ब्रह्मदेश) पोलिओमुक्त झाल्याचं प्रशस्तिपत्रक प्रदान केले.
पोलिओ निर्मूलनासाठी संशोधन करणारे रोलँड सटर, जेकब जॉन बहल, मोहम्मद अहमद व जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य डॉ. नाता या सर्वानी एक दृष्टी ठेवून त्या दिशेने संशोधन केले व या संशोधनाच्या जोरावर  काही निर्णय घेतले. त्यातूनच हा सुवर्ण दिवस उजाडला
१९९८ सालापासून ‘पल्स पोलिओ’ची मोहीम जागतिक आरोग्य संघटनेने सुरू केली. दरवर्षी जानेवारी व फेब्रुवारीत ‘पोलिओ रविवार’ साजरे केले गेले. प्रथमत: सर्वानी उत्साहाने भाग घेतला मात्र ३-४ वर्षांनंतर लोकांनी अनुत्साह दाखवत घरीच बसणे पसंत केले. नागरिक घरातून बाहेर पडत नाहीत, हे पाहून आरोग्य क्षेत्रांत काम करणारे लोक हिरमुसले नाहीत. लोकांच्या घरोघर जाऊन ‘पोलिओ रविवार’च्या नंतरच्या आठवडय़ात ५ वर्षांखालील मुलांना पोलिओ डोस पाजले. परंतु वर्षांनुवर्षे हे करणे खूपच कष्टप्रद होते. एक वेळ अशी आली की याचा काही उपयोग होणार आहे का? असा प्रश्न निर्माण झाला. शिवाय काही झारीतल्या शुक्राचार्याचाही अपप्रचार होताच. बुद्धिभेद करणेही चालूच होते. मात्र अमिताभ बच्चन, महम्मद कैफ इत्यादी व्यक्तींना हाताशी धरून दूरचित्रवाणीच्या माध्यमातून लोकांना भावनिक आवाहन केले गेले आणि लोकजागृती सुरू ठेवली, एखाद्ये व्रत घ्यावे त्याप्रमाणे.
१९९९ मध्ये पोलिओच्या ३ विषाणूंपैकी, दुसऱ्या प्रकारच्या जंगली विषाणू नाहीसा झाला, मात्र पहिल्या प्रकारचा आणि तिसऱ्या प्रकारचा जंगली विषाणू अजूनही कार्यरत होता. विशेषत: उत्तर प्रदेश व बिहार या राज्यात अस्वच्छ वा दूषित पिण्याच्या पाण्यामुळे जुलाब उलटय़ांचे आजार अधिक प्रमाणात असल्याने, पोलिओची तोंडावाटे दिली जाणारी लस उपयुक्त ठरत नव्हती. त्रिगुणी लसीचा फायदा होत नव्हता. तेव्हा वैद्यकीय संशोधकांनी मुरादाबाद या गावात पोलिओची एकगुणी (मोनोव्हॅलन्ट) लस म्हणजे १, २, ३ विषाणूंची लस वेगवेगळी प्रत्येक जन्मलेल्या बाळाला दिली. मोठय़ा स्तरावर (१०,००० मुलांना) असा उपक्रम राबविणे खूपच अवघड होते. परंतु ते यशस्वीपणे राबविले गेले. २००२-२००३ मध्ये या संशोधनातून असे लक्षात आले की ही ‘एक गुणी’ लस अतिशय उपयुक्त आहे. अगदी ९५-९९ टक्के फायदेकारक.
या संशोधनातून असे लक्षात आले की त्रिगुणी लसीपेक्षा ‘एक गुणी’ लस जास्त उपयुक्त आहे. मात्र देशभरात सगळय़ा बाळांपर्यंत असा कार्यक्रम राबविणे अशक्यप्राय होते. त्यानंतर २००७ मध्ये ‘पंच गट पोलिओ कार्यक्रम’ हा अभ्यास नियोजित केला गेला. पण इंदौर व चेन्नई या तीन ठिकाणी ९०० बाळांना या अभ्यासात सामील केले गेले. त्यांचे ५ गट केले व त्यांना एक गुणी, द्विगुणी व त्रिगुणी पोलिओची लस दिली. त्याचे परिणाम अभ्यासले असता असे दिसले की सर्वात गुणकारी लस एक गुणी (मोनोव्हॅलन्ट) आहे. द्विगुणी लस तितकीच कार्यक्षम आहे व या दोन्ही लसी त्रिगुणी लसीपेक्षा जास्त कार्यक्षम आहे. या संशोधनाचे परीक्षण जिनीव्हा येथे जागतिक आरोग्य संघटनेतर्फे डॉ. रोलॅन्डसटर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यानंतर द्विगुणी लस भारतात वापरायचे ठरले व त्याचा वापर २००८  मध्ये ‘नॅशनल इम्युनायझेशन डे’ (S.N.I.D) ‘प्रांतिक पोलिओ रविवार’ मध्ये उत्तरप्रदेश व बिहार या राज्यात केला गेला. व १ वर्षांत पोलिओचे प्रमाण ८५ टक्क्याने कमी झाले. या अनुभवातून स्फूर्ती घेऊन आपला पोलिओविरुद्धचा लढा अंतिम स्थितीत आला व १० जानेवारी २०११ मध्ये पश्चिम बंगालमध्ये बरद्वान येथे ‘जंगली पोलिओ’ची शेवटची केस आढळली. बस्स अजून काय हवं होतं.. पुढील ३ वर्षांत केवळ एकही जंगली पोलिओचा रुग्ण सापडून चालणार नव्हतं. सांडपाण्यातील विषाणूदेखील जंगली नसावा, या गोष्टीवरही आपली आरोग्य यंत्रणा बारीक लक्ष ठेवून होती. जानेवारी २०१४ पर्यंत लसीकरण तसेच चालू ठेवले गेले. ‘पोलिओ रविवार’ अखंडित चालू राहिले. पोलिओच्या केसेसचे सर्वेक्षण चालू राहिले. अखेर ११ जाने २०१४ ला ‘WHO India’ ने सुटकेचा श्वास सोडला व दोन महिन्यांच्या कडक परीक्षणानंतर २७ मार्च २०१४ रोजी अधिकृतपणे भारत पोलिओमुक्त झाला. मात्र पाकिस्तान, अफगाणिस्तान, नायजेरिया, सिरिया या देशात P1 व P3 च्या केसेस अजूनही चालू आहेत. यातील दोन देश आपले शेजारीच असल्याने सीमेवरून चोरटय़ा पावलांनी पोलिओ आपल्या देशात शिरू शकतो. यासाठी डोळ्यांत तेल घालून, जागरूक राहण्याची गरज आहे. पी२ विषाणू गेल्या १५ वर्षांत जगात कोठेही आढळला नसल्याने त्याचे तोंडावाटे लसीकरण करण्याची गरज नाही. त्यामुळे पुढील कार्यक्रमाची रूपरेखा करण्यासाठी त्रिगुणी लसीला पर्याय द्विगुणी लस की पोलिओचं इंजेक्शन वापरात यावे, यासाठी केलेले संशोधन नुकतेच पूर्ण झाले व त्याच्या अनुमानाचा अहवाल वॉशिंग्टन येथे गेल्या महिन्यात अभ्यासला गेला व आता भारतातील लसीकरण तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या द्विगुणी लसीने करावे व याशिवाय पोलिओ लसीसाठी इंजेक्शनचा वापर करावा. इथपर्यंत संशोधक मंडळी आली आहेत. मात्र २०१७ पर्यंत आपल्याला आपले कार्य अखंड चालू ठेवावे लागेल. पोलिओग्रस्त देशातून येणाऱ्या लोकांना पोलिओ लसीकरण अनिवार्य करावे लागेल व अमेरिकेप्रमाणेच तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या लसींऐवजी इंजेक्शन पोलिओ वापरावे लागेल. परंतु या ठिकाणी एक गोष्ट वाचकांच्या निदर्शनास आणावी लागेल. तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या ६५ लाख डोसांमागे एका व्यक्तीला लसीमधील विषाणूमध्ये गुणात्मक बदलामुळे पॅरालिसीस होऊ शकते. त्यामुळे अनेक वर्षांनी विषाणूंमुळे होणारा पोलिओ निसर्गातून हटेल मात्र लसीच्या विषाणूच्या गुणधर्मात बदल होऊन, अगदी अत्यल्प प्रमाणात पॅरालिसिस होऊ शकतो ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल व त्यासाठी पोलिओचे इंजेक्शन वापरात आणावे लागेल. परंतु तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या लसीमुळे आतडय़ात पोलिओच्या विषाणूंना अटकाव करणारी प्रतिकारशक्ती तयार होते, जी इंजेक्शन पोलिओपासून मिळत नाही. मात्र ‘जंगली विषाणू’ ड्रेनेजमध्ये सापडतो. त्यामुळे पूर्णत: पोलिओ इंजेक्शन वापरण्याची वेळ अजून आली नाही. कदाचित २०२० नंतर भारतात ती वेळ येऊ शकते. इस्त्राइलसारख्या देशात पोलिओ इंजेक्शन वापरले जाते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार आफ्रिका खंडही पोलिओ निर्मूलनाच्या मार्गावर आहे. सिरिया, अफगाणिस्तान व पाकिस्तानातील वझिरिस्तान प्रांतातही पल्स पोलिओचे कार्य चालू आहे व जगातून पोलिओ हटवण्याचा सोनियाचा दिस दूर नाही. कारण पोलिओचा विषाणू मनुष्याच्या शरीराबाहेर जगूच शकत नाही. चला पोलिओमुक्त जगाचे स्वप्न प्रत्यक्षात येण्याची वेळ दूर नाही.
या लेखाचा समारोप करताना एक संशोधक म्हणून या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वाना माझे त्रिवार वंदन.
(लेखक डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज/संशोधन संस्था, पिंपरी, पुणे येथे बालरोग विभागप्रमुख आहेत.)

First Published on October 18, 2014 1:01 am

Web Title: polio free india
टॅग Polio