26 January 2020

News Flash

विनाचौकट जगण्याचे प्रयोग

आपल्याला आपलीच वेगळी ओळख होत जाते, तसं आयुष्याच्या या प्रवासात मलाही मी काहीशी कळत गेले.

|| रश्मी साळवी

आपल्याला आपलीच वेगळी ओळख होत जाते, तसं आयुष्याच्या या प्रवासात मलाही मी काहीशी कळत गेले. बाविशीत लग्न, पंचविशीत मुलं, तिशी-पस्तिशीनंतर ‘तुझं काय माझं काय’च्या चाकोरीबद्ध जगण्यात अडकणारी मी नाही. मी अशी कोणत्याही ठरावीक पद्धतीने, एकाच पठडीमध्ये जगू शकत नाही. मला भटकायला प्रचंड आवडतं. मी एसटीचा पास काढून उगाचच एकटीने प्रवास केलाय, चित्रपट पाहायला एकटीनं जाणं हे आता माझ्यासाठी नवीन नाहीच. पण यातूनच मी मला सापडत जाते.

पुण्यावरून मुंबईला येताना बसमध्ये स्कार्फ गुंडाळून बसले होते आणि शेजारच्या सीटवर दोघे जण त्यांच्या मोबाइल फोनवर ‘गावाकडच्या गोष्टी’मधला मासिक पाळीचा एपिसोड बघत होते. त्यांना माहीत नव्हतं, त्यातली ‘सुरकी’ त्यांच्या शेजारीच बसलीय.. मधेच गाडी जेवायला थांबली आणि मी स्कार्फ काढला तेव्हा मात्र त्यांनी मला ओळखलं. मग बाकीच्या खूप लोकांनी भेटण्यासाठी गर्दी केली. माझ्यासारखी एक साधीसुधी मुलगी ‘सेलिब्रिटी’ बनते तेव्हा स्वत:कडेच नव्यानं बघायला शिकते. माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासात माझ्यातली मी अशी थोडी थोडी सापडत गेलीय..

नुकताच आमचा ‘संतुर्की- गोष्ट संत्या सुरकीची’ हा वेबसिनेमा प्रदर्शित झाला. त्यात मी प्रमुख भूमिका केलीय. लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलेल्या मराठीतल्या या पहिल्या गाजणाऱ्या वेबसिरीजमधली, ‘गावाकडच्या गोष्टी’मधली मी एक व्यक्तिरेखा. गोष्टी जरी गावाकडच्या असल्या तरी माझा आणि गावाचा तसा फारसा संबंध नाही आला. पण सुरकीचा अभिनय बघितल्यावर लोक मला शहरी मानायलाच तयार होत नाहीत. ‘सुरकी’ साकारण्याआधी बरीच वर्षे मी या क्षेत्रात काम करते आहे. नाटकं, आकाशवाणी, थिएटर, हिंदी-मराठी शॉर्ट फिल्म्स, मराठी फीचर फिल्म्समधून अभिनय करतेय. काही फिल्म्ससाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं. पण ‘सुरकी’ने घराघरांत पोहोचवलं. पण नाटकात जी झिंग आहे ती इतर कशातच नाहीये. ‘लाइव्ह परफॉर्मन्स’ आणि प्रेक्षकांकडून मिळणारा तितकाच जिवंत प्रतिसाद ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्याचं सुख अनोखं आहे.

बालाजी सुतार यांनी लिहिलेल्या ‘गावकथा’ या एकाच नाटकात मी ४-५ वेगवेगळ्या भूमिका करते. एक शाळकरी मुलगी, तरुणी, मध्यमवयीन बाई आणि वृद्ध महिला. औरंगाबादच्या एका प्रयोगाला तर नाटकानंतर ग्रीनरूममध्ये येऊन एका बाईंनी मला घट्ट मिठी मारली, भरल्या डोळ्यांनी माझा मुकाच घेतला. नाटकात मी सादर करत असलेल्या ‘सुन्नाट दुपारी’ आणि ‘छायडाबाई’ या बाईच्या अवघड जगण्याबद्दल बोलणाऱ्या कविता, त्यांच्या सादरीकरणात पुरुषांचीही खूप दाद मिळते. स्त्रियांचे हुंदके खूप काही सांगून जातात.

एकदा वृत्तपत्रामध्ये बातमी वाचली. परजातीतील मुलावर प्रेम केलं म्हणून एका मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना जातपंचायतीकडून ५० हजार रुपयांचा दंड केला गेला. आणि तो भरणं शक्य नाही म्हणून तिला शिक्षा सुनावण्यात आली ती १३ लोकांकडून सामूहिक बलात्काराची. याची अंमलबजावणी करणाऱ्यांमध्ये जातपंचायतीचे पंचदेखील सामील होते. ते वाचून मनात कोलाहल उठला. त्यातूनच एक नाटक लिहिलं. त्याचं दिग्दर्शनही केलं. ‘एका शेवटाची सुरुवात’. ४० ते ५० कलाकार. बरेच प्रयोग झाले. एका प्रयोगाला ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे कार्यकत्रे आले होते. त्यांना प्रयोग आवडला आणि आम्हाला थेट महाडला प्रयोगासाठी निमंत्रित केलं. अविनाश पाटील, मुक्ता दाभोलकर यांच्यासमवेत मोठा प्रेक्षकवर्ग, ज्यांनी या जातपंचायतीचा जाच प्रत्यक्षात सहन केला असे असंख्य लोक. त्यांच्यासमोर त्यांच्याच व्यथा मांडणं म्हणजे कठीण जबाबदारी होती. प्रयोग संपला आणि ‘स्टँडिंग ओवेशन’ मिळालं. त्या वेळी डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूत आनंद आणि दु:ख दोन्ही होतं.

सातारा हे माझं जन्मगाव. २०१२ मध्ये मी साताऱ्यात ‘सातारा शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’ या लघुचित्रपट महोत्सवाचं आयोजन केलं होतं. ‘वन वुमन आर्मी’ असं सगळं संयोजन. दादासाहेब फाळक्यांचे नातू किरण फाळके, दिग्दर्शक परेश मोकाशी, बिपिन नाडकर्णी, अनिल झनकर अशी दिग्गज मंडळी या फेस्टिव्हलला माझ्या एका फोनवर आली. हे सगळं एका प्रयोगशाळेत नवाच प्रयोग करून बघण्यासारखं होतं. माझ्यातली एक वेगळी मी मला सापडले त्यानिमित्ताने!

आपल्याला आपलीच वेगळी ओळख होत जाते, तसं आयुष्याच्या या प्रवासात मला मी काहीशी कळतही गेले. बाविशीत लग्न, पंचविशीत मुलं, तिशी-पस्तिशीनंतर ‘तुझं काय माझं काय’च्या चाकोरीबद्ध जगण्यात अडकणारी मी नाही. मी अशी कोणत्याही ठरावीक पद्धतीने, एकाच एक पठडीमध्ये जगू शकत नाही. मला भटकायला प्रचंड आवडतं. आयुष्यात जास्तीत जास्त फिरण्याची इच्छा आहे. अगदी बेलगामपणे! मी एसटीचा चार दिवसांचा पास काढून उगाचच एकटीने प्रवास केलाय, चित्रपट पाहायला एकटीनं जाणं हे आता माझ्यासाठी नवीन नाहीच. मला असंच आवडतं स्वच्छंदी, विनाचौकट जगायला. आणि हे सगळं घरच्यांच्या संमतीनं, हे विशेष! अनोळखी लोकांना भेटणं, त्यांचे अनुभव ऐकणं. कित्येक शहरांतील रिक्षावाल्यांचेदेखील मोबाइल नंबर माझ्याकडे आहेत,अशी मी सतत वेगवेगळ्या लोकांना भेटत असते.

आणखी एक माझीच मला जाणवलेली गोष्ट म्हणजे, मला वृद्धांबद्दल जरा विशेष आत्मीयता आहे. वाटतं, आणखी काही वर्षांनी किंवा काही पिढय़ांनंतर आजच्या एवढी नितळ माणसं नसतीलच आपल्यात. काही वृद्धाश्रमांमध्ये, केअर सेंटर्समध्ये मी वरचेवर जाते. त्यांना इतर गोष्टींसह माझा वेळ देते. अशाच एका केंद्रातल्या  आजींशी माझी घट्ट मत्री झाली. त्यांना काय हवं, नको ते सगळं मी पाहायची. केअर सेंटरच्याच नव्हे तर सगळ्यांनाच मी त्यांची नातच आहे असं वाटायला लागलं होतं. आजींच्या घरचे त्यांना क्वचितच भेटायला यायचे. आजींना सतत विस्मरण व्हायचं. त्यातूनच त्याही मलाच नात समजू लागल्या होत्या. त्यामुळे माझ्याजवळ सतत तगादा लावायच्या की, ‘घरी केव्हा नेणार मला?’ तेव्हा खरंच वाटायचं घेऊन जाऊ यांना आपल्या घरी. एक दिवस आजींना भेटायला गेले तेव्हा कळलं की, आजी रडत बसल्या आहेत. त्यांना मटण खायचं होतं, पण त्यांच्या घरून कोणीच आणून दिलं नव्हतं. मग मी शाकाहारी असूनही आमच्या घरी मांसाहारी जेवण बनवलं आणि आजींसाठी मटणाचं जेवण घेऊन गेले. पण अर्धा तास उशीर झाला. त्याआधीच त्या केअर सेंटरने आजींच्या घरी फोन करून ‘तुमची नात जेवण घेऊन येणार आहे ना, लवकर डबा घेऊन या. आजी वाट पाहत आहेत,’ असं सांगितलं. मी डबा घेऊन पोहोचायच्या आधी त्या आजींची सून केअर सेंटरमध्ये येऊन आजींना बरंच काही सुनावून गेली होती. मी पोहोचले. मला पाहिलं आणि आजी म्हणाल्या, ‘‘तू मला फसवलंस, तू नात नाहीयेस माझी.’’ जमीनच सरकली माझ्या पायाखालची! हळूहळू आजी निवळली. या अनुभवातून मला माणसं आणि माणसांना जपण्या-सांभाळण्याचं मोल नीट कळलं.

मी अशी का आहे, याचं उत्तर काही प्रमाणात माझ्या कुटुंबीयांकडे जातं. माझे आई-वडील, आजोबा आणि भाऊ यांच्या प्रचंड विश्वासाच्या बळावर मी मनमोकळं आयुष्य उपभोगते आहे. घरात सगळे सुशिक्षित आणि पहिल्यापासूनच मोकळं वातावरण, पुढारलेले विचार त्यामुळे कोणतंही बंधन कधीच नव्हतं. मी तर म्हणेन वेगळे विचार करण्याची क्षमता मला घरातूनच मिळाली. माझे आजोबा ‘रयत शिक्षण संस्थे’मध्ये होते. त्यांचं लिखाण खासच होतं. आजी रोज न चुकता वर्तमानपत्र वाचायची. त्यामुळे अनुकरणातून ‘वाचन’ हा शब्द लहानपणीच आयुष्यात आला. माझ्या आईच्या माहेरी आजोबांचा व्यवसाय होता. आईने तो वारसा चालवत व्यवसाय सुरूच ठेवला. माझ्या पप्पांनाही नोकरी कधीच आवडली नाही. त्यांची ट्रान्सपोर्ट कंपनी होती. पप्पांना सिनेक्षेत्र आवडायचं. लहानपणी आम्हाला ते शूटिंग पाहायला घेऊन जायचे आणि आवड म्हणून साताऱ्याच्या राजलक्ष्मी थिएटरमध्ये पप्पा फिल्म प्रोजेक्शनसाठी जायचे. एवढंच काय, तर माझ्या आई-वडिलांचं लग्नच एका सिनेमागृहात झालं. फुलऑन फिल्मी! माझ्यात व्यावसायिक गुण आईकडून आणि अभिनय क्षेत्रातील रस पप्पांकडून आला असावा.. परिस्थिती काहीही असो, हार नाही मानायची हे आईनं शिकवलं.

माझ्या भावाचाही माझ्या घडण्यात विशेष वाटा आहे. फिल्म फेस्टिव्हल आयोजित केला तेव्हा भया माझ्या अपरोक्ष मम्मीला म्हणाला होता, ‘‘तिला काहीही काम सांगू नकोस, ती आधीच खूप मोठ्ठं काम करतेय.’’ ..एक दिवस तर सकाळी-सकाळी मी अंथरुणातच होते तर डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, ‘‘तुझ्यासोबत कुणी नसलं तरी तुझा भाऊ नेहमीच असेल. टेन्शन नको घेऊ, फेस्टिव्हल नीट पार पडेल.’’ त्याची जागा खास आहे माझ्या जगण्यात.

लहानपणापासूनच मी मनोरंजनाच्या क्षेत्रात जायचं ठरवलं होतंच. हळूहळू कळलं, आपल्याला ‘अभिनय’ करायचाय. मग वर्तमानपत्रात येणाऱ्या ‘अभिनयविषयक’ जाहिराती जशाच्या तशा माझ्या डायरीमध्ये लिहून काढायचे. तेव्हा हिंमतच व्हायची नाही तिथं दिलेल्या दूरध्वनीवर बोलायची. कारण ‘न्यूनगंड’. आपण पात्र नाही त्यासाठी, आपल्याला कोणी चित्रपटात नाही घेणार, वगरे वगरे. कारण ‘अभिनेत्री’ म्हटल्यावर जशी व्यक्ती डोळ्यासमोर उभी राहते तशी मी नाही, हेच डोक्यात होतं. इथंच पहिला न्यूनगंड तयार झाला. पण आता मागे वळून बघताना वाटतं, कसब, जिद्द आणि चिकाटी महत्त्वाची. ती पोहोचवतेच तुम्हाला हवं तिथं.

माझी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. खरं तर एका साध्या मुलीने अशी एखादी कंपनी सुरू करावी आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळावा ही खूप चांगली गोष्ट आहे. पण त्यासाठी नऊ वर्षे लागली. या काळात सुरुवातीला नवीन व वय लहान होतं म्हणून क्लाएंट्सना माझ्यावर विश्वासही बसायचा नाही. पण काही काळानं अगदी मला कधीही न पाहिलेल्या लोकांनी फक्त माझ्या कामाची तारीफ ऐकून, माझ्या खात्यात सगळी रक्कम आगावू जमा करण्यापर्यंतचा प्रवास मी अनुभवला.. सुरुवातीला टीम लहान म्हणून येणारा ताणही अनुभवला. आणि आता अगदी शंभरेक जणांची टीम घेऊन कामही करतेय. आता मोठमोठय़ा कंपन्याचे कार्यक्रम असो की घरगुती समारंभ, महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही माझं काम सुरू आहे. ‘वेडिंग मॅनेजमेंट’मध्ये आमच्याकडून फोटो कॉर्नर ही एक थीम दिली जाते. सध्या त्यातल्या खास फोटो कॉर्नरवर फोटो काढण्यापेक्षा लोक माझ्यासोबतच जास्त फोटो काढून घेतात, हे मात्र शक्य झालंय ते माझ्या अभिनयामुळे.

एक स्त्री म्हणून ही दोन्ही क्षेत्रं माझ्यासाठी खूप आव्हानात्मक आहेत. स्वत:वरचा विश्वास, कामातली चपळता कायम वाढवत न्यायचीय. आजूबाजूला जेव्हा पाहते तेव्हा वाटतं, अनुभवापेक्षा मोठा गुरूच नाही. या सगळ्या अनुभवांतून मी घडत गेले, समृद्ध होत गेले. व्यवसायाच्या निमित्ताने हजारो लोक भेटतात, त्यांची निरीक्षणं मला माझ्या अभिनयात उपयोगी पडतात, दिग्दर्शक म्हणून जे काही करते ते मला व्यवस्थापनाच्या कामात ‘लीडर’ म्हणून उपयोगी पडतं. आई-वडील, आजोबा, माझा भाऊ या सगळ्यांकडून मी जे शिकलेय ते मला माणूस म्हणून जगायला उपयोगी पडतं. माझे पाय जमिनीवर ठेवायला उपयोगी पडतं. कारण प्रसिद्धी, पसा, हे सगळं क्षणिक असल्याचं मनाला पक्कं माहिती आहे.

अजून खूप वेगवेगळ्या भूमिका करायच्यात. माझ्या कंपनीच्या ‘नतिक’ या नावाला जागत सत्कृत्यं करत राहायचीत, भरपूर फिरायचं, सॉरी, उंडगायचं आहे.. तशी माझ्यातल्या ‘मी’ची पुरती ओळख अजून व्हायची आहे. मी कोण आहे हे समजायला कदाचित सगळं आयुष्य कमी पडेल. पण माझ्यातली मी कोणत्याही चौकटीतल्या जगण्यात अडकून पडणार नाही, हे मात्र नक्की.

rashsalvi@gmail.com

chaturang@expressindia.com

 

First Published on August 10, 2019 12:08 am

Web Title: rashmi salvi mpg 94
Next Stories
1 शिक्षांतर जगणं शिकवणारी ‘वारी’
2 वेदनेचा उगम
3 शोध वनस्पतींचा वारसा विज्ञानाचा!
Just Now!
X