१० जुलैच्या अंकातील सारिका कुलकर्णी यांचा ‘ज्याच्या त्याच्या कॉफी बीन्स’ हा लेख वाचून लक्षात आलं, की हल्लीचा काळ खूप वेगळा आहे. मागल्या पिढीतल्या, नोकरी न करणाऱ्या, चूल आणि मूल या चौकटीत ओढग्रस्तीचं आयुष्य वेचणाऱ्या, बाळंतपणं आणि दिवसभर रांधा, वाढा, उष्टी काढा करत करत झिजणाऱ्या स्त्रियांना रोजच्या धबडग्यातून अल्पकाळ का असेना, पण बाहेर काढणारे चैत्रापासून फाल्गुनापर्यंतचे सणवार होते. व्रतवैकल्यं,लग्नसमारंभ,गणपती, नवरात्री, हळदीकुंकू, मंगळागौरीचे खेळ, भोंडला, हादगा, आवळी भोजनं, डोहाळजेवणं या सगळ्या त्यांच्यासाठी ‘कॉफी बीन्स’च होत्या!

– सुभाष जोशी, ठाणे</strong>

नोकरीव्यतिरिक्तच्या वेळाचे काय करावे?

ज्याच्या त्याच्या ‘कॉफी बीन्स’ या सारिका कुलकर्णी यांच्या लेखातून अनेक नवीन विचार मिळाले. माझी मुलगी पुण्याला नोकरी करत असून सध्या तिचं ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे. ‘नोकरीव्यतिरिक्तच्या वेळेत काय करावं?’, हा प्रश्न या लेखानं सुटला असं वाटतं. तीही आपला रिकामा वेळ नवीन ऑनलाइन कोर्सेस, बागकाम व वाचन यात योग्य प्रकारे गुंतवत होतीच. सद्यस्थितीत करोनामुळे परिस्थिती कठीण होत असताना मदतीची सद्भावना जोपासणं आवश्यक आहे. ‘चतुरंग’मधील लेख कालसुसंगत असतात, त्याबद्दल धन्यवाद.

– प्रफुल्लचंद्र काळे, नाशिक

आजची शाब्दिक हार्डडिस्क ‘करप्ट’च

आपली भाषा खूप समृद्ध आहे. त्यात माणसानं भर घातलेले अपशब्द आणि शिव्यादेखील आहेतच, पण त्याचा वापर कुठे आणि कसा करायचा याला मर्यादाही आहेत. अशी कोणतीच मर्यादा न पाळणारी आजची तरुणाई खरंच सवंग भाषा वापरते याची अपर्णा देशपांडे यांच्या ‘करप्ट शाब्दिक हार्डडिस्क’ (१० जुलै) या लेखामुळे तीव्रतेनं जाणीव झाली. देशपांडे यांचं ‘जगणं बदलताना’ हे सदर नवीन विषयांवर ऊहापोह करणारं उत्तम सदर आहे.

मनीषा धामणेरकर , पुणे</strong>