२६ सप्टेंबरच्या पुरवणीमधील पुष्पा भावे यांच्या ‘अंधारे कोपरे’ या लेखाने मनाला खूप यातना दिल्या. पण त्यामुळे एका नवीन पुस्तकाची माहितीही मिळाली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. खरं तर अशा घटना घडत असाव्यात याबद्दल थोडा अंदाज होता, पण पुस्तकामुळे त्यावर शिक्कामोर्तब झालं एवढंच.
आता तरी आपण सगळे मिळून जात-धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा, तरच पुढील पिढीला भविष्यात एक नवीन भारत आणि जग पाहायला मिळेल.
– नंदकिशोर भिंगारदिवे
अभ्यासपूर्ण लेख
२९ ऑगस्टच्या पुरवणीतील ‘यत्र तत्र सर्वत्र’ या सदरातील ‘स्थलांतरित’ हा लेख वाचला. लेख अत्यंत अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी आहे. वेगवेगळ्या देशांतील स्त्रिया अपार कष्ट करून स्थलांतरित असल्या तरीही अमेरिकेसारख्या देशात आपले नाव मुद्रांकित करीत आहेत हे खरंच कौतुकास्पद आहे.
आजच्या तरुण मुली व व्यावसायिक स्त्रिया यांनी अशा माननीय स्त्रियांचा आदर्श नक्कीच डोळ्यापुढे ठेवला पाहिजे असे वाटते. भारतात ४८ टक्के स्त्रिया आहेत हीच खरी शक्ती असून ती खूप काही करू शकते. त्यांना अशा प्रकारची माहिती नक्कीच प्रेरणादायी ठरू शकते यात शंकाच नाही. आपण थोडक्यात, पण महत्त्वाच्या प्रत्येक स्त्रीशक्तीची ओळख करून दिलीत तरी अनेक पुरुषांचे डोळे उघडतील.
– डॉ. रमेश देशमुख
महत्त्वाची माहिती देणारा लेख
२६ सप्टेंबरच्या अंकातील प्रज्ञा शिदोरे यांचा ‘अर्थसाक्षरता ते अर्थतज्ज्ञ’ हा लेख वाचला. खूप नवी आणि रंजक माहिती मिळाली आणि अनेक नवीन शब्द कळले. उदा. ‘होमो इकॉनॉमिक्स.’ या लेखातील अनेक संदर्भसुद्धा पहिल्यांदा वाचनात आले. प्रसारमाध्यमांकडून इला पटनाईकचा आवाज सपशेल दाबला गेला त्यामुळे त्यांचा ओझरता उल्लेखसुद्धा प्रभाव पाडतो. असे लेख वाचून ‘फेमिनिझम’ची भीती न वाटता जिव्हाळा वाढत जाईल असे वाटते.
– अॅड. अक्षय काशिद, खारघर, नवी मुंबई</strong>