09-pratisadशाळेचे महत्त्व वादातीत 
यांच्या ‘घरच्या घरी शाळा’ पर्यायी मार्ग (१३ सप्टें) या लेखात उल्लेख असणारे कमलाकर इंदुलकर सर खरे तर माझे सहाध्यायी. त्यांच्याशी या विषयावर बऱ्याच वेळा चर्चा झाली. त्यांची काही मते पटली, की हल्ली लहान मुलांना अभ्यासाचा ताण फार येतो. विषय खूप असतात. लहान मुले त्यांचे बालपण हरवून बसतात इत्यादी, इत्यादी. परंतु दर वेळेस मी त्यांना सांगत असे शाळा खूप चांगली असते. अगदी लहानपणी मुलांना कदाचित शाळा आवडत नसेल, पण नंतर म्हणजे पौगंडावस्थेत शाळा, शिक्षक, मित्र-मैत्रिणी हे मुलांचे विश्व असते. ते या विश्वात पूर्णपणे रमून जातात. म्हणून शाळा या संस्थेची गरज आहे, आणि हे असे मला का वाटते? तर लहान मुलांचे विश्व खूप छोटे व मर्यादित असतं. आई-वडील, भावंडे, आजी-आजोबा, यानंतर थोडे मोठे झाल्यावर त्यांचे जग नातलग, शेजारी इथपर्यंत विस्तारते. परंतु तरीही हे विश्व ओळखीच्या लोकांचेच असते व तिथे मुलांचे कोडकौतुकच होत असते. माझ्या मते मुलांना समवयस्कांमध्ये, अनोळखी लोकांमध्ये मिसळण्याची संधी शाळेमुळे मिळते.
शाळेमध्ये वेळापत्रक, परीक्षा, गृहपाठ हे सर्व असतेच, पण त्यामुळे मुलांना एक प्रकारची शिस्त लागते. वेळच्या वेळी उठणे, आपले दप्तर आवरणे व भरणे, अभ्यास ठरलेल्या वेळी पूर्ण करणे वगैरे. या शिस्तीचा पुढील आयुष्यात खूप उपयोग होतो. शिस्तीला दुसरा पर्याय नाही. शालेय जीवनात काही शिक्षक मुलांचे ‘रोल मॉडेल’ असतात. लेखात म्हटले आहे प्राचीन काळी मुले गुरुकुल पद्धतीमध्ये गुरूंच्या घरीच शिकायला जात. बरोबर आहे, पण या गुरुगृहीसुद्धा शिस्त असे. तिथे मुलांना लवकर उठणे, गुरूंची सेवा करणे, गुरुपत्नींना कामात मदत करणे, गुरू जे शिकवतील त्याचेच अध्ययन करणे या गोष्टी कराव्या लागत. काहीजण मुद्दा काढतील की हल्लीचे शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये तर-तम भाव करतात म्हणून काही मुले मागे पडतात. तर तसेही सरसकटपणे म्हणता येणार नाही. शाळेमध्ये निबंध, वक्तृत्व, चित्रकला अशा वेगवेगळ्या स्पर्धा असतात. स्नेहसंमेलने असतात. विज्ञान प्रदर्शने भरवली जातात. सहली असतात. या सर्व गोष्टींमुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. चार लोकांसमोर कसे वागावे, बोलावे हे समजते. सभाधीटपणा येतो. नेतृत्वगुणाची वाढ होते. मुले आपापल्या आवडीप्रमाणे या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात. या सर्व उपक्रमांचा पुढील आयुष्यात नोकरी मिळविताना, मुलाखतीला सामोरे जाताना उपयोग होतो. हल्ली इंजिनीयिरग कॉलेजमध्ये ग्रुप डिस्कशन्स असतात, त्याचा उपयोग हाच आहे.
खरे सांगायचे झाले तर शाळेचे जीवन खूप छान असते. त्या काळात झालेली मैत्री ही नि:स्वार्थ मैत्री असते. निव्र्याज्य, निरागस प्रेम या मैत्रीतून मिळते व पुढच्या स्पर्धेच्या, कटकटीच्या धावपळीच्या युगात ही मैत्री वाळंवटातील हिरवळीप्रमाणे मदत करू शकते. शाळेमध्ये मधल्या सुट्टीत एकमेकांच्या डब्यातला खाऊ, कधीतरी झालेले भांडण, कट्टी, बट्टी हा सर्व अनुभव शाळेत गेल्याशिवाय कसा हो येणार आपल्या मुलांना?
याशिवाय सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘घरच्या घरी शाळा’ हा पर्याय मूठभर लोक की जे शिकलेले आहेत, मुलांचा अभ्यास घेऊ शकतात अशा शहरी व निमशहरी लोकांसाठी होऊ शकतो. खेडय़ातील अथवा अशिक्षित पालकांसाठी हा पर्याय होऊ शकत नाही.
दुसरा मुद्दा असा की, शाळा वाईट नाही. परंतु अभ्यास किती द्यायचा, विषय रंजक करून कसा शिकवायचा, हे सर्व शिक्षकांच्या हातात आहे. शिक्षकांनी योग्य पद्धत वापरली तर शालेय जीवन आनंदी होऊ शकते. आजचे पालक सर्वात जास्त दोषी आहेत. पालकांची महत्त्वाकांक्षा व म्हणून ते आपल्या मुलांना ढीगभर क्लासेसना पाठवतात व यात मुलांचे स्वछंदी, फुलपाखरांप्रमाणे असणारे बालपण हरवून जाते. दोष मात्र दिला जातो शाळेला. सरतेशेवटी मला असे वाटते की पालकांनी आपल्या मुलांची आवड, कल व त्याचबरोबर कुवत ओळखून त्याला प्रोत्साहन द्यावे, त्याचा उपयोग मुलांचे भावी आयुष्य सुखी, समाधानी, आनंदी व यशस्वी होण्यास मदत होईल.
ललिता घोटीकर

दुसऱ्याच्या संवेदना महत्त्वाच्याच
‘स्वत:च्या संवेदना’ (११ ऑक्टोबर) हा महेंद्र कानिटकर यांचा लेख वाचल्यावर जाणवतं की यशाकडे नेणारी वाट प्रत्येकाला स्वत:ची स्वत:च निर्माण करावी लागते. त्यामुळे स्वत:ला कधीच गौण लेखू नये हे या भूतलावरचे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. पण त्याच वेळी प्रतिस्पध्र्याची ताकदही कमी मानू नये हेही तितकेच खरे! यासाठी दुसऱ्याच्या संवेदना ओळखण्याची सहनशीलता हवी. एखादी घटना आपल्या मनाविरुद्ध घडली की त्रास होतो. प्रत्यक्षात त्रास होतो तो त्या घटनेमुळे नव्हे तर घटना घडून गेल्यानंतर आपण केलेल्या स्वगत विचारांमुळेच. इथे महत्त्वपूर्ण ठरतात स्वत:च्या संवेदना, इतरांच्या नव्हेत.
पण अनेकदा दुसऱ्याच्या संवेदना अधिक प्रभावित झाल्या की आपल्याशी गप्प बसणे हाच पर्याय उरतो. मी अनुभवलेला एक प्रसंग. १९९२ साली भारतीय स्टेट बँकेच्या बीड शाखेत मी कार्यरत होतो. पत्नी व मुले मुंबईला असल्यामुळे त्यांची
खुशाली एसटीडी फोनवरच समजायची. मी शक्यतो रात्री १० नंतरच फोन करायचो कारण त्यावेळी दर कमी असायचा. असाच मी एकदा घरी फोन केला. फोन उचलताच परेलच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये शिक्षिका असलेल्या पत्नीने त्या दिवशी शाळेत झालेल्या सेमिनारचे वर्णन करायला सुरुवात केली. त्या सेमिनारमध्ये तिने भाग घेतला असल्यामुळे तिच्या स्वत:च्या संवेदना इतक्या जागृत झाल्या होत्या की मी खुशालीसाठी फोन केला आहे हे ती पूर्ण विसरली होती. माझे लक्ष वाढणाऱ्या मीटरकडे होते पण तिचे ऐकण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. पती-पत्नीमधील संवेदनांचा हा खेळ जोवर असाच चालू असतो तोवरच संसारात खरी मजा असते. खरे म्हणजे सप्तपदीच्या पहिल्या फेरीत संवेदनांचे मी पण गळून पडते आणि शेवटच्या फेरीत दोन अविभक्त संवेदनांचा ‘साक व’ तयार होतो ज्यावर वैवाहिक जीवनाचा पुढील सुखकर प्रवास सुरू होतो. त्यामुळे त्याचे भान हवेच.
सूर्यकांत भोसले, मुलुंड 

what is learning disorder marathi, learning disorder marathi article
Health Special: अध्ययन अक्षमता म्हणजे काय ? अशा मुलांसाठी काय करायचं?
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…