ते नुसतेच निराधार नाहीत तर ते आहेत रस्त्यावरच राहणारे, उपाशीपोटी वृद्ध. कधी घरातून हकलून दिलेले, काही नोकरी-धंदा नसल्याने पळून आलेले, तर काही आजारी, काही मानसिक रुग्ण. अशा वृद्धांना स्वच्छ करून त्यांना रुग्णालयात भरती करून त्यांच्या घरी पोहोचवण्याचं काम करतात संदीप परब आणि त्यांचे सहकारी. असंख्य निराधार वृद्धांना मानाचं आयुष्य जगायला देणाऱ्या त्यांच्या संस्थेविषयी..
भर दुपारची वेळ. एका भल्या मोठय़ा शेतात माहेरी परतून आलेली बालविधवा, आंधळी सरुआजी काम करत होती. तिचं काम संपलं. आता घराकडे परतावं, असा विचार करून हातात काठी घेतली आणि सरुआजी चाचपडत चालू लागली. तिच्या थोडंसं पाठीमागे काठीने शेरड हाकीत एक बारा-तेरा वर्षांचा मुलगा उडय़ा मारीत चालला होता. सरू आजीच्या वाटेत एक मोठा खड्डा होता. पण तिच्या अंध नजरेला तो दिसलाच नाही. ती त्या खड्डय़ात पडणार एवढय़ात मुलगा चपळाईने पुढे झाला. त्याने पटकन सरू आजीला मागे ओढलं. सरू आजी त्या खोल खड्डय़ात पडता पडता वाचली. भयाण भविष्याच्या गर्तेत ढकलल्या गेलेल्या वृद्ध जीवांना जीवदान देणं हा संदीप परबच्या भावी आयुष्यातल्या कार्याचा जणू हा जणू ईश्वरी संकेत होता.
  वडील मिलकामगार. घरची परिस्थिती बेताची. तरीही शाळेत कोणी गरीब मुलगा उपाशीपोटी येत असेल तर आई त्यालाही जेवणाचा डबा देते. गडी माणसांना जेवू घालते. गावकुसाबाहेरच्या दलितांना अन्न, औषधं, चादरी, कपडे पुरवते हे पाहतच लहानगा संदीप मोठा होत गेला. आईचे संस्कार मनात रुजले आणि मोठेपणी समाजसेवेलाच वाहून घ्यायचं हा निर्णय पक्का झाला. एकदा लोकसत्तामध्ये ‘सोशल सर्व्हिस लीग’मार्फत घेतल्या जाणाऱ्या समाजसेवेच्या प्रशिक्षणाची बातमी आली. संदीप परबने लगेच त्या कोर्सला नाव घातलं.
‘‘श्रीनिवास सावंत हे समाजसेवक तिथे आम्हाला शिकवायला होते. त्यांनी मार्ग दाखवला. सुरुवातीची सात वर्षे मी रस्त्यावरच्या मुलांसाठी काम केलं. तेव्हा असं लक्षात आलं की रस्त्यावरच्या निराधार वृद्धांसाठी कोणीच काम करत नाही. अन्न नाही, वस्त्र नाही. गलितगात्र अवस्थेतले हे वृद्ध हालाखीत मरतात. मेले की पोलीस येऊन बॉडी फरफटत घेऊन जातात. मला ते बघवेना. मी ठरवलं, अशा रस्त्यावरच्या बेघर निराधार वृद्धांसाठीच काम करायचं. सुरुवातीला मी एकटाच अशा वृद्धांना शोधून सरकारी रुग्णालयात भरती करायला नेत असे. पण मग माझीच चौकशी सुरू व्हायची. तुम्ही कोण? या माणसाशी तुमचा काय संबंध? तुमची कुठली ओळख? वगैरे वगैरे. शेवटी ठरवलं, हे टाळायचं असेल तर संस्थेला पर्याय नाही. म्हणून ‘जीवन आधार संस्था’ सुरू केली.’’
संस्था सुरू केल्यावर संदीप परब यांना त्यांच्या प्रशिक्षणवर्गातले सहाध्यायी मित्र भेटले. अतिशय सेवाभावी मुलांची टिम तयार झाली. पंधरा वर्षांपूर्वी रस्त्यावरच्या मुलांबरोबर काम करताना, व्हाईटनर पिणाऱ्या मुलांचा अभ्यास करताना त्यांच्याशी मैत्री झाली होती. आज हीच मुलं संदीपच्या कार्याला मोठा हातभार लावतात. हे सर्व जण फुटपाथ, बसस्टॉप, मंदिर, मस्जीद, रेल्वे स्टेशन्स, रेल्वे ब्रिज अशा ठिकाणी फिरून असे रस्त्याकडेला पडलेले वृद्ध शोधून काढतात. रस्त्यात अशी वृद्ध व्यक्ती बसलेली आढळली की हल्ली बरेच वेळा लोकच फोन करून कळवतात. संस्थेची माणसं स्वत: तिथे जाऊन त्यांचे प्रथम केस कापतात. पुरुष असतील तर दाढी करतात. मग जवळच्या सार्वजनिक नळावर नेऊन त्यांना आंघोळ घालतात. जुने पण स्वच्छ कपडे चढवतात. त्यांना जेवायला घालतात. त्यानंतरच अशा स्वच्छ केलेल्या वृद्धाला पोलिसांच्या मदतीने सरकारी रुग्णालयात भरती केलं जातं.
अर्थात ‘जीवन आधार’ संस्थेच्या समाजसेवकांचं काम इथे संपत नाही. रुग्णालयात भरती झालेल्या वृद्धांची शस्त्रक्रिया करावी लागली  तर कधी पैशांची, रक्ताच्या बाटल्यांची सोय करावी लागते. रक्त, लघवी, थुंकीच्या तपासणीसाठी पॅथोलॉजी लॅबमध्ये रुग्णाला न्यायचं, एक माणसानं त्याला दिवसरात्र सोबत करायची, त्याची सर्वतोपरी काळजी घ्यायची हे सर्व करावं लागतंच. शिवाय हे काम करत असतानाच त्याच्याशी प्रेमाने बोलत, संवाद साधत त्याचा पत्ता मिळवायचा. त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून रुग्णालयातून रजा मिळाल्यानंतर त्याला सुखरूप घरी नेऊन सोडायचं अशा प्रकारे वृद्धांना घरी पोहोचवल्यावर त्यांच्या नातेवाईकांचे फोन येतात. पत्र येतात.
जळगाव इथली रेणुबाई हिरामण गोसावी ही आजी अशीच संदीपच्या कार्यकर्त्यांना सापडली. तिला धड मराठीही बोलता येत नव्हतं. तरीही तिचा पत्ता शोधून तिच्या खेडेगावात तिला पोहोचती केल्यावर घरच्यांचे डोळे भरून आले. त्यांनी आपल्या आभारपत्रातून संदीपचं आणि त्यांच्या टिमचं अतिशय मनापासून कौतुक केलं. एकदा संदीपला एक कुष्ठरोगी रस्त्यावर पडलेला आढळला. तो अत्यंत दयनीय अवस्थेत होता. त्याची बोटं झडलेली होती. पायाच्या जखमा तर इतक्या चिघळलेल्या होत्या की त्याच्या पायांतून संदीपने ११० कीडे काढले. त्याला वडाळ्याच्या कुष्ठरोग्याच्या संस्थेत नेऊन उपचार केले. सहा महिन्यांत तो पूर्ण बरा झाला. तो पश्चिम बंगालमधला होता. त्याला त्याच्या गावातला पत्ता शोधून पाठवून देण्यात आलं. त्याच्या भावाचा नंतर संदीपला फोन आला. तो फोनवर ढसाढसा रडत होता. बारा वर्षांनी या भावाभावांची भेट झाली होती. पण काही वेळा बरोबर या उलट परिस्थिती असते. घरची माणसं या निराधार वृद्धांना आसरा द्यायला स्पष्ट नकार देतात. दारूच्या नशेत त्यांनी बायकोमुलांना मारहाण केलेली असते. त्यामुळे घरच्यांनीच त्यांना घरांतून हाकललेलं असतं. त्यामुळे त्यांना हे वृद्ध नकोच असतात. काहींचं वृद्धावस्थेमुळे अथवा शारीरिक व्याधींमुळे काम सुटलेलं असतं. तेही रस्त्यावर येतात. खेडय़ातले काही जण कामाच्या शोधात मुंबईत येतात आणि पुढे या महामुंबईत हरवून जातात. सुरुवातीला बरेचसे मिल कामगार असे बेघर अवस्थेत रस्त्यावर सापडत. हल्ली मात्र संपत्तीच्या वादातून मुलांनी रस्त्यावर हाकललेल्या वृद्धांची संख्या वाढत चाललीय. या सर्वाचा भूतकाळ भिन्न असला तरी वर्तमानकाळ सारखाच विदारक असतो. सुदैवाने असे ज्येष्ट संदीप परबच्या कार्यकर्त्यांच्या हाती लागले तर किमान त्यांचा भविष्यकाळ सुखावह होतो. कोणत्याही वृद्धाला पुन्हा रस्त्यावर निराधार अवस्थेत येऊ द्यायचं नाही या निष्ठेतून त्यांची ‘सेवा डे केअर सेंटर’ किंवा कुडाळ इथल्या ‘आनंद आश्रम’ या संस्थांमध्ये सोय केली जाते. परंतु भाडय़ाच्या जागेतल्या या सेवाकेंद्रांमध्ये या निराधार बांधवांचा सांभाळ करणं ही संदीप परब यांच्यासाठी मोठीच तारेवरची कसरत आहे. कारण त्यांना सरकारी मदत मिळत नाही. खासगी दानशुर व्यक्तींकडे पोहोचण्याची क्षमता नाही. रुग्णांची ऑपरेशन्स किंवा मोठा औषधोपचारांचा खर्च मात्र गरवारे चॅरिटेबल ट्रस्ट, आनंद नायर यांचा रामानुग्रह ट्रस्ट, सरसोळी धाम इथून काही प्रमाणात मिळतो. एका गुजराथी वृद्धाच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेचा खर्च महालक्ष्मी ट्रस्टकडून मिळाला. पण निराधार वृद्धांचा चरितार्थ चालवण्यासाठी फारशी मदत मिळत नसल्याने संदीप परब अनेकदा खांद्यावर झोळी अडकवून हातात डबा घेऊन स्वत: जागोजागी फिरून पैसे गोळा करतात. ते म्हणतात, ‘सरकारी पातळीवर खूप उदासीनता आहे. अनेकदा सरकारी रुग्णालयांत भरती करताना अशा निराधारांकडे अ‍ॅड्रेस प्रूफ किंवा ओळखपत्रं मागितली जातात. अनेकदा वैद्यकीय खर्चात सूट मिळत नाही. मग तोही खर्च आम्हालाच करावा लागतो. मात्र पोलिसांची आम्हाला खूपच मदत होते. तसंच सायन, शिवडी, कुपर रुग्णालयांतल्या समाजसेवकांची टिम खूप चांगलं काम करते.
 एकदा मुंबईतल्या एका इस्पितळात आम्ही एक रुग्ण भरती करायला गेलो. तिथे आणखी काही निराधार वृद्ध रुग्ण भेटले. आम्ही सर्वानी त्यांची दाढी केली. त्यांना स्पंज बाथ दिला. त्यांचे डायपर बदलले. त्यांच्या बेडशीटस्, पांघरूणं बदलली. एकाच्या पाठीवर बेडसोअर्स झाले होते. त्याला मुंग्या लागल्या होत्या. ते स्वच्छ करून त्यावर मलम लावलं. त्यांना चहा बिस्किटं खाऊ घातली. त्या रुग्णांना इतकं बरं वाटलं! त्यातल्या एका मुस्लीम रुग्णाने तोंड भरून हसत माझ्या गालावरून प्रेमाने हात फिरवला. खरा आनंद आणखी कशात असतो? त्या दिवसापासून ठरवलं, रोज दोन-तीन तरी रुग्णांची आपल्या हातून सेवा झालीच पाहिजे. निराधार वृद्ध नाही भेटले तर मी मुद्दाम सरकारी इस्पितळात जाऊन गरीब रुग्णांची ही कामं करून देतो. काही वेळा अगदी मरणाच्या दारात असणारे वृद्धही भेटतात. अशा दहा-बारा वृद्धांनी इस्पितळात नेत असताना माझ्या हातात प्राण सोडलाय. त्यांचे त्यांच्या धर्मानुसार मी अंत्यसंस्कारही केले आहेत.
हे काम करत असतानाच मला मनोरुग्ण ज्येष्ठांची समस्या तीव्रतेने जाणवली. वृद्धापकाळातील डिमेंशिया, अल्झायमर, स्किझोफ्रेनीया या व्याधींचे अनेक रुग्ण रस्त्यावर आढळतात. त्यांच्यासाठी ‘संहिता आश्रम’ स्थापन केलाय. तिथे त्यांना आसरा दिला जातो. पण संदीप खिन्नपणे सांगतात, ‘मला समाजाची उदासिनता पाहून खूप वाईट वाटतं. महिला दिन आपण मोठा वाजतगाजत साजरा करतो. त्याच दिवशीची घटना. दादर स्टेशनवर दोन मनोरुग्ण वृद्धा विवस्त्रावस्थेत मला सापडल्या. तिथून जाणाऱ्या किती तरी स्त्रियांना या वृद्धांना कपडे चढवायला मला मदत करा म्हणून काकुळतीने विनंती करत होतो. पण कोणीही पुढे झालं नाही. शेवटी आई समजून मीच त्यांना स्वच्छ केलं. कपडे चढवले. स्त्रियांना स्त्रियांची कणव येत नसेल तर ‘वुमन्स डे’ला काय अर्थ?
अशा प्रसंगांतून हताश न होता संदीप यांचं काम जोमाने चालू राहतं. आपला मित्र प्रसाद परब याच्या आग्रहास्तव सिंधुदुर्ग इथल्या निराधार वृद्धांसाठी त्यांनी आता काम सुरू केलंय. अत्यंत दुर्गम भागांतल्या या वृद्धांची अवस्था अति बिकट आहे. तिथे वैद्यकीय सोयी नाहीत. रस्ते, पाणी, वीज नाही. अशा आडबाजूच्या रस्त्यांमधील एकाकी वृद्धांना शोधून त्यांना महिन्याचं रेशन देणं, त्यांना औषधं पुरवणं, पावसात त्यांच्या घराची डागडुजी करणं, थंडीच्या दिवसात ब्लँकेटस्, गरम कपडे पुरवणं, गरज भासल्यास आजारी वृद्धांना रुग्णालयात भरती करणं अशी अनेक कामं, रस्त्यावरच्या बेघर मुलांच्या सहकार्याने त्यांच्यासाठी केली जातात. आर्थिक पाठबळ मिळाल्यास हे काम अधिक जोमाने करण्याची संदीप परबची इच्छा आहे. त्यासाठीच त्यांनी अलीकडे ‘जीवन आनंद सेवा संस्थे’ची स्थापना केली आहे.
या कामासाठी उमेद देणारेही प्रसंग प्रत्यही घडतात. गौरीनगर चाळीतली पार्वती. तिच्या दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झाले होते. तिला दोन्ही डोळ्यांनी नीट दिसत नव्हतं. एकदा ती स्टोव्ह पेटवत असताना खूप रॉकेल बाहेर आलेलं तिला कळलं नाही. ती काडी लावणार तेवढय़ात संदीपसोबत काम करणाऱ्या एका मुलीने ते पाहिलं आणि तिला झटकन मागे खेचलं. ती वाचली. मग संदीपने तिच्या दोन्ही डोळ्यांची ऑपरेशन्स करून घेतली. आता ती उत्तम आयुष्य जगतेय. अशाच एका क्षयरोगी वृद्धेला चांगले औषधोपचार, सकस अन्न पुरवून आज ती आनंदाने जीवन जगत आहे.
संदीप परब यांनी मुंबई बॉम्बस्फोटाच्या वेळी आणि २६ जुलैच्या प्रलयकाळात दिवसभर काम करून मृतदेहांचे विविध अवयव गोळा केलेत. मृतदेह ओळखायला मदत केली. त्यांच्या या अतुलनीय कार्यासाठी ‘लढवय्या मुंबईकर’ पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं. सिल्व्हर इंनिंग्जने ‘कर्मवीर चक्र’ बहाल केलंय, तर संवर्धन सन्मान पुरस्कारही त्यांना लाभलाय! त्यावर त्यांचं भाष्य! ‘पुरस्कार खूप मिळतात हो. पण कामांपुढे ते घ्यायला जायचीही सवड मिळत नाही.’
‘तुम्हाला जंतुसंसर्गाची भीती वाटत नाही का,’ या प्रश्नावर संदीप चटकन उद्गरतात, ‘‘अहो, युद्धावर निघालेल्या सैनिकाला मरणाची कसली भीती? उलट या कामातून मला सेवेचा इतका आनंद मिळतो की, ज्यादिवशी अशा एखाद्या वृद्धाची सेवा हातून झाली नाही तर तो दिवस वाईट जातो.    

संदीप परब यांच्या या कामासाठी ज्यांना आर्थिक वा इतर मदत द्यायची असेल त्यांच्यासाठी संपर्क
जीवन आनंद सेवा संस्था
न्यू बी. एम.सी. कॉलनी
दुसरी हसवाबाद लेन,खार (पश्चिम) मुंबई-४०००५२
मो. ९८२०२३७६५७ ,९२२०४७३४५७

article about elon musk india visit elon musk investment in india
अन्यथा : जगी ज्यास कोणी नाही, त्यास..
children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
puberty starting earlier and why it matters health experts Said About signs caution and care You Must Know About
कमी वयात पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे कोणती? त्यावर काही उपचार आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला…
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?

तुम्हाला माहीत आहेत का तुमच्या परिसरातील अशा संस्था ज्या वृद्धांना मानाचं जगणं, आयुष्य देत आहेत. त्यांच्यासाठी काही वेगळे उपक्रम राबवीत आहेत़  आम्हाला कळवा त्यांची माहिती. ‘लोकसत्ता चतुरंग’, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई, ४००७१० किंवा  ईमेल करा.  chaturang@expressindia.com