साधना तिप्पनाकजे

चोरगाव, अळेगाव आणि मामला या गावांमध्ये अंतर खूप आणि कोणत्या तरी एका गावात रेशनचं दुकान अशी परिस्थिती होती. सविताताईंनी सर्वात आधी अळेगावला रेशन दुकान सुरू केलं. काही दिवसांत मामला गावातही रेशन दुकान सुरू होणार आहे. गावांमध्ये पाण्याची समस्याही भीषण होती. विहिरी आणि हातपंपांमधून आता घरांमध्ये पाणी आणले जाते. आता गावांकरिता स्वतंत्र नळ योजना मंजूर झाली आहे. सौरऊर्जेचा प्रकल्पही ग्रामपंचायतीकडून राबवण्यात आला. चोरगाव, अळेगाव आणि मामला गावच्या गट-ग्रामपंचायत सरपंच सविताताई वाडगुरे यांच्याविषयी..

kolhapur, bjp mp milind deora
संजय मंडलिकांचा विजय मोदीजींच्या बलशाली भारतासाठी आवश्यक – खासदार मिलिंद देवरा
Engineer bribe Dhule district
धुळे जिल्ह्यात ग्रामसेविकेसह अभियंता लाच स्वीकारताना जाळ्यात
kolhapur, crematorium
कोल्हापूरकरांचे असेही दातृत्व; स्मशानभुमी दानपेटीत २ लाखांवर देणगी जमा
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष

चंद्रपूर जिल्ह्य़ातली चोरगाव, अळेगाव आणि मामला ही गावं ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येतात. यावरून इथल्या नागरी वस्ती आणि जंगलाच्या मत्रीची कल्पना येईल. चंद्रपूरपासून चोरगाव १८ किलोमीटर अंतरावर आहे. मूळच्या चंद्रपूरच्याच असणाऱ्या सविताताई वाडगुरेचं दहावीपर्यंत शिक्षण झालं होतं. त्यानंतर त्यांनी शिवणकामाचं शिक्षण घेतलं आणि वर्षभरात म्हणजेच २००२ मध्ये त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर त्या चोरगावात आल्या. चोरगावात शिवणकाम करणारं कोणीच नव्हतं. त्यामुळे काहीही शिवायचं असलं तरी थेट चंद्रपूर गाठावं लागायचं. त्यातही दिवसातून एकदाच गावात बस यायची. त्यामुळे शिवणकाम सफाईदाररीत्या करता येणे ही गावाची गरज होती.

सविताताईंना शिवणकाम यायचं; पण सराव नसल्याने कामात सफाईदारपणा नव्हता. पण ते करणे गरजेचे आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी मुलगा दोन वर्षांचा झाल्यावर शिवणकामाचा सराव करायचं ठरवलं. त्यासाठी त्या दोन महिने माहेरी जाऊन राहिल्या. त्यात बऱ्यापैकी प्रगती झाल्यावर त्या घरी परतल्या. धुणी धुण्याकरिता गावातल्या स्त्रिया तलावावर जमायच्या. त्या वेळी होणाऱ्या हितगुजातून आपल्या कामाबद्दल त्यांनी सांगायला सुरुवात केली. त्यांना शिवणाची कामे मिळू लागली. शिवणकामाच्या निमित्ताने सविताताईंकडे स्त्रिया जमू लागल्या. रोजच्या रहाटगाडग्यातून चार निवांत क्षण इथे स्त्रिया घालवू लागल्या. सविताताईंच्या शिवणकामामुळे स्त्रियांची गावात सोय झाली. सविताताईंच्या हातातही घरबसल्या मिळकत येऊ लागली. गावातल्या स्त्रियांमध्ये सविताताईंकरिता आदर निर्माण होऊ लागला.

दरम्यान, विदर्भात कार्यरत असणाऱ्या ‘प्रकृती रिसोर्स सेंटर फॉर वुमेन अँड डेव्हलपमेंट’ यांच्यातर्फे गावात ‘संजीवनी आरोग्यसखी प्रशिक्षणा’करिता शोध सुरू होता. या पट्टय़ात कमी लोकवस्तीमुळे प्राथमिक आरोग्य केंद्र नाही. जंगलातील गावं, दोन गावांमधील जास्त अंतर यामुळे तातडीने प्रथमोपचार मिळण्यात खूप अडचणी येतात. लोकांना प्रथमोपचार मिळावेत, किमान औषधं मिळावीत, स्त्री आरोग्यसाक्षर बनावी, कुपोषणावर मात करता यावी यासाठी ‘प्रकृती संस्था संजीवनी’ आरोग्यसखी प्रशिक्षण राबवते. प्रत्येक गावात किमान एक तरी ‘संजीवनी आरोग्यसखी’ असावी याकरिता ‘प्रकृती’ संस्था प्रयत्न करते.

चोरगावातल्या स्त्रियांनी सविताताईंचं नाव पुढे केलं. एव्हाना सविताताईंनाही आपण काही तरी करावं असं वाटतं होतंच. ही संधी चालून आल्यावर त्यांनी लगेचच होकार भरला. २०१० मध्ये तीन-तीन महिन्यांच्या अंतरानं वध्र्याला दोन आणि नागपुरात दोन अशा एकूण चार निवासी प्रशिक्षणात सविताताई सहभागी झाल्या. या प्रशिक्षणात त्यांना स्त्रीआरोग्य, वैयक्तिक स्वच्छता, कुपोषण, लसीकरण या गोष्टींवर मार्गदर्शन मिळालं. या सर्वाकरिता लागणारा औषधांचा संचही ‘प्रकृती’तर्फे पुरवण्यात येतो. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सविताताई गावात ‘संजीवनी आरोग्यसखी’ म्हणून काम करू लागल्या. या कामाकरिता कोणतंही मानधन दिलं जात नाही. त्यामुळे तुमच्यातला सेवाभाव खूप महत्त्वाचा असतो.

या कामाच्या निमित्ताने सविताताई नियमितपणे गावातल्या स्त्रियांच्या बठका घेऊ लागल्या. त्यांना आरोग्यविषयक माहितीही द्यायच्या. सोबत बचतगट आणि स्वयंरोजगारासंबंधीही माहिती देऊ लागल्या. त्यांच्यात आत्मविश्वास जागवू लागल्या. गावात संजीवनी आल्यानं स्त्रिया आणि मुलींना खूप मोठी मदत झाली. पाळीसंबंधीच्या गोष्टी, रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण या स्त्रीआरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या पण दुर्लक्षित बाबींविषयी गावातल्या स्त्री-वर्गात जागरूकता येऊ लागली. स्त्रियांना सरकारी दवाखान्यात जाण्याकरिता त्या सांगू लागल्या. ताप, सर्दी, खोकला यावरची प्राथमिक औषधं देणं आणि लघवीतलं साखरेचं प्रमाण तपासणं या गोष्टी सविताताई करायच्या. आजूबाजूच्या गावांमध्येही सविताताईंना बोलावलं जायचं. सविताताईंचं आरोग्यसखीच्या कामासोबत शिवणकामही सुरू होतंच.

ऑक्टोबर २०१७ मध्ये गावात ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. चोरगाव, अळेगाव आणि मामला ही गावं मिळून गट ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीचं कार्यालय चोरगावमध्ये आहे. जंगलातल्या कच्च्या रस्त्याने या गावातले लोक एकमेकांच्या गावात ये-जा करतात. जंगलवाटेने चोरगावपासून अळेगाव ७ किलोमीटर, तर मामला ५ किलोमीटर अंतरावर आहे; पण पावसाळ्यात जंगलवाटेचा वापर अजिबात करता येत नाही. चोरगावपासून मुख्य रस्त्याने अळेगाव २५ किलोमीटर आहे आणि मामला ३० किलोमीटरवर आहे. इथली भौगोलिक परिस्थिती आणि आव्हानं तुमच्या लक्षात आली असतील.

तर गावात ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली. महिला सरपंचपद ओबीसी प्रवर्गातील स्त्रीकरिता राखीव होतं. गावातल्या दोन पुरस्कृत आघाडय़ांनी उमेदवार उभे केले; पण शिक्षित स्त्रीला सदस्य पदाकरिता आणि अशिक्षित स्त्रीला सरपंचपदाकरिता उभं केलं. सरिताताईंना राजकारणात यायची इच्छा नव्हती; पण उमेदवारी देताना आघाडय़ांनी जाणूनबुजून केलेली ही गोष्ट त्यांना स्वस्थ बसू देईना. कारण याआधीही आरक्षणामुळे सरपंचपदी आलेली व्यक्ती केवळ नामधारीच होती. गावकारभाराला काहीच गती मिळाली नाही. सविताताईंनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. सविताताईंनी तीनही गावात फिरून लोकांच्या भेटी घेतल्या. सुशिक्षित लोकप्रतिनिधी असल्यास गावाला त्याचा कसा फायदा होईल, याबाबत त्या लोकांशी प्रचारादरम्यान संवाद साधायच्या. अळेगावात उडीयाटोला समुदायातील लोकांचं प्रमाण जास्त आहे. त्यांची भाषाही सविताताईंना कळत नव्हती; पण या लोकांना मराठी कळतं असं समजताच सविताताईंनी मराठीतच त्यांच्याशी संवाद साधयला सुरुवात केली. ‘निवडणुकीपूर्वी प्याल्याच्या नादी लागून तुम्ही आपलं मत योग्य व्यक्तीला देत नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर तुमच्या तोंडाला पानं पुसली जातात,’ असं सविताताईंनी या लोकांना थेट सांगत खडसावलं. परिणामस्वरूप गावकऱ्यांनी सविताताईंना सरपंचपदी निवडून दिलं.

सरपंचपद आपल्या ताब्यात राहावं याकरिता दोन्ही आघाडय़ा सविताताईंवर दबाव टाकू लागल्या. आघाडय़ांमध्ये सामील होण्याकरिता लालूच दाखवणं सुरू झालं; पण सविताताईंना या कोणत्याही आघाडीत सामील व्हायचं नव्हतं. अपक्ष उमेदवार म्हणून लोकांनी निवडून दिलेलं आहे. आपण कोणत्याही आघाडीत सामील होणं म्हणजे मतदारांशी बेइमानी ठरेल, अशी स्पष्टता त्यांच्या विचारात होती. निवडणुकीपुरताच पक्ष किंवा आघाडय़ा असतात. निवडून आल्यावर एक टीम म्हणून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं पाहिजे असं सविताताईंचं म्हणणं होतं. त्यामुळे त्यांनी या आघाडय़ांना नकार दिला. त्यांनी गावातल्या सुशिक्षित आणि स्वतंत्र विचाराच्या लोकांशी संपर्क साधला. आपले विचार सविताताईंनी या लोकांनाही सांगितले. गावच्या विकासाकरिता आपण एकजुटीने एकत्र आलं पाहिजे, ही बाब सविताताईंनी पटवून दिली.

सरपंच धरून एकूण दहा सदस्यांच्या या गट ग्रामपंचायतीत नऊ जणच निवडून आले. तांत्रिक कारणांमुळे दहाव्या जागेची निवडणूक सहा महिन्यांनी झाली. या जागेवर सविताताईंनी एका स्त्रीलाच निवडून आणले आणि तिला उपसरपंचपदी निवडून आणण्याकरितासुद्धा प्रयत्न केले. गट ग्रामपंचायत असल्याने ‘या बाई इतर दोन गावांत येणार नाही’ अशा अफवाही काही लोकांकडून पसरवल्या जात होत्या; पण सविताताईंनी सुरुवातीपासूनच तीनही गावांमध्ये भेटी द्यायला सुरू केल्या. आपल्या दुचाकीवरून त्या तीनही गावांत जाऊ लागल्या. गावकऱ्यांना कोणत्या समस्या आहेत, तातडीने कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, याची त्या माहिती घेऊ लागल्या. सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन कामाचे आराखडे तयार करू लागल्या. प्रत्येक सरकारी कागदाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याची सक्त ताकीद त्यांनी सुरुवातीलाच ग्रामसेवकाला दिली. आपल्या प्रत्येक गावभेटीवेळी त्या ग्रामसेवकालाही सोबत नेतात.

‘प्रकृती संस्थे’कडून त्यांना महिला सरपंच प्रशिक्षण साहित्यही मिळालं. त्यांनी याचा सविस्तर अभ्यास केला. त्यामुळे त्यांना प्रशासनातूनही सहकार्य मिळू लागलं. या गावांमध्ये रेशनचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. गावांमध्ये अंतर खूप आणि कोणत्या तरी एका गावात रेशनचं दुकान अशी परिस्थिती होती. सविताताईंनी सर्वात आधी अळेगावला रेशन दुकान सुरू केलं. काही दिवसांत मामला गावातही रेशन दुकान सुरू होणार आहे. गावांमध्ये पाण्याची समस्याही भीषण होती. विहिरी आणि हातपंपांमधून आता घरांमध्ये पाणी आणले जाते. गावांकरिता स्वतंत्र नळ योजना मंजूर झालीय. सौरऊर्जेचा प्रकल्पही ग्रामपंचायतीकडून राबवण्यात आला. पूर्वी ग्रामसभेआधी एक तास महिला सभा बोलावून गुंडाळली जात असे. आता ग्रामसभेच्या एक दिवस आधी महिला सभा होतात. स्त्रिया आता मोकळेपणाने बोलू लागल्यात.

महिला निधी आता स्त्रियांकरिताच खर्च होत आहे. आरोग्य शिबिरं नियमितपणे आयोजित केली जातात. दिव्यांगांनाही त्यांच्याकरिता असणाऱ्या योजनांचा लाभ मिळवून दिला जातोय. आज संपूर्ण गाव एकत्र बांधण्यात सविताताईंना यश आलं आहे. आघाडीचा आग्रह करणाऱ्या लोकांनाही त्यांनी सोबत घेतलंय. एका सामान्य स्त्रीने स्वत:बरोबर गावातल्यांसाठी शिवणकाम शिकण्यासाठी केलेली धडपड, त्यातून आलेला आत्मविश्वास आणि जंगलातल्या लोकांना प्राथमिक आरोग्य साहाय्य मिळावं याकरिता झटणारी स्वयंसेविका, सरकारी सेवा आणि आरोग्य केंद्रावर विश्वास असणारे नागरिक, गावाकरिता राजकीय जीवनात प्रवेश, या टप्प्यांमध्ये सविताताई घडल्या. त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली; पण या सर्वाचा फायदा तीन गावांना मिळू लागला.

आज मोठमोठे राजकारणी स्वार्थापायी लोकमताचा अनादर करत असताना, जंगलातल्या एका खेडेगावात राहणारी स्त्री, कोणतीही राजकीय पाश्र्वभूमी नसताना नागरिकशास्त्राचा पाठ उत्तमपणे अंमलात आणते आहे. सविताताईंचा सेवाभावी स्वभाव, सर्वसमावेशक कारभार आणि जनमताशी प्रामाणिकपणा यामुळे चोरगाव-अळेगाव-मामला या गावांचा विकास होणार हे नक्की.

sadhanarrao@gmail.com

chaturang@expressindia.com