News Flash

गर्भावस्थेतील आहार

सर्वंकष आहार

(संग्रहित छायाचित्र)

गायत्री कशेळकर

जर गर्भावस्थेत उत्तम प्रतीचे उष्मांक घेतले तर त्याचा उपयोग गर्भाच्या शारीरिक वाढीकरिता होतो, तसेच जसजसा गर्भाचा आकार वाढू लागतो, तसे पुढे आईला तेवढे वजन पेलवण्याकरिता पुरेसे उष्मांक मिळणे गरजेचे असते. त्याकरिता आहारात गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, फळे व भाज्या यांचा समावेश करणे गरजेचे आहे. गर्भावस्थेतील आहार

याविषयीचा हा भाग – १.

गर्भावस्था अत्यंत नाजूक स्थिती मानली जाते, मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ाही! गर्भावस्थेत आहार सांभाळणे हे अत्यंत गरजेचे आहे कारण संपूर्ण नऊ महिने गर्भ आईच्या पोषणावर अवलंबून असतो.

आईने गर्भावस्थेत पौष्टिक व संतुलित आहार घेतल्याने बाळाची गर्भातच शारीरिक व मानसिक वाढ उत्तम होते. दुर्लक्ष केले तर त्याचा परिणाम वाढणाऱ्या गर्भावर होऊ शकतो, तसेच तिच्या तब्येतीमध्येदेखील गुंतागुंत होऊ शकते. म्हणजेच गर्भपात, बाळाचे पोटात दगावणे, बाळामध्ये दोष उद्भवणे असेही होऊ शकते. अनेक संशोधनांतून असे सिद्ध झालेले आहे की, आईने गर्भावस्थेत पौष्टिक व पुरेसा आहार न घेतल्यास बाळाचे वजन २५०० ग्रॅमपेक्षा कमी भरते. असे कमी वजनाचे बाळ जन्मल्यास त्याच्या पुढील वाढीवरदेखील त्याचा परिणाम होतो. यालाच ‘लो बर्थ वेट बेबी’ म्हणतात.

गर्भावस्थेत होणारे बदल

गर्भावस्थेत आईच्या शरीरात रक्ताभिसरण चांगले राहणे गरजेचे आहे. गर्भावस्थेतील शेवटच्या काही महिन्यांमध्ये रक्ताची घनता (व्हॉल्युम) ५० टक्क्यांनी वाढते. त्यामुळे हिमोग्लोबीन, सीरम अल्ब्युमिन, प्रथिने, जीवनसत्त्वे यांच्या पातळीत घट होते. त्यामुळे बऱ्याचदा पायांवर सूज येते. आईच्या शरीरात पुरेसे अन्नघटक मिळाले नाहीत तर त्याचा परिणाम गर्भावर होतो. या अवस्थेमध्ये बऱ्याचदा खूप मीठ खावेसे वाटते. पहिल्या तीन महिन्यांमध्ये मळमळ, उलटी, बद्धकोष्ठता, काहीही खावेसे न वाटणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. बऱ्याचदा काही गर्भवती स्त्रियांना माती, खडू, बर्फ, कागद, जळलेल्या काडय़ा, दगड, बेकिंग सोडा खाण्याची इच्छा होते. त्या काळात अति स्टार्चयुक्त खाल्ल्याने स्थूलपणा/ लठ्ठपणा होण्याची शक्यता असते. तसेच काही अशा पदार्थामधून विषारी द्रव्ये पोटात गेल्याने लोह शोषून घेण्यावर त्याचा परिणाम होतो. माती, दगड खाल्ल्याने पोटाचे विकार होतात. जर आहारात पुरेशा प्रमाणात उष्मांक, प्रथिनं, लोह, कॅल्शियम नसेल तर अशी लक्षणे दिसून येतात. यालाच ‘पीका’ असेही म्हणतात.

कॅलरीज (उष्मांक)- बऱ्याचदा गर्भवती स्त्रिया मला नेहमी प्रश्न विचारतात, ‘‘काय हो, आता जेवण वाढवलं पाहिजे ना? दुप्पट करू का जेवण? पण कसं करू दुप्पट? सध्या काही खावंसंच वाटत नाहीये.’’ त्यांना मी सांगते, की बाळाच्या/ गर्भाच्या उत्तम वाढीकरिता नेहमीच्या उष्मांकापेक्षा जास्त ३००-३५० कॅलरीज घेणे गरजेचे आहे. म्हणजेच उष्मांकाचा तोल राखण्याकरिता उत्तम प्रतीची कबरेदके + प्रथिनं + उत्तम स्निग्ध पदार्थ + जीवनसत्त्वं + खनिजं घेणे गरजेचे आहे. जेवण वाढवण्याऐवजी त्याची गुणवत्ता वाढवणे गरजेचे आहे.

उदा. सकाळी नाष्टय़ाला जर फक्त चहा-चपाती खायची सवय असेल तर त्याऐवजी भाज्यांचा पराठा व दूध जास्त उत्तम. त्यातून इतर अन्नघटक मिळू शकतात. जर गर्भावस्थेत आईने जंक फूड, बाहेरील पॅकबंद खाण्याचे पदार्थ अतिप्रमाणात खाल्ले तर त्यामुळे अतिरिक्त वजन वाढून गर्भावस्थेत गुंतागुंत होऊ शकते. तसेच गर्भावस्थेत मधुमेह (गेस्टेशनस डायबिटिज मेलिटस) होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जर गर्भावस्थेत उत्तम प्रतीचे उष्मांक घेतले तर त्याचा उपयोग गर्भाच्या शारीरिक वाढीकरिता होतो, तसेच जसजसा गर्भाचा आकार वाढू लागतो, तसे पुढे आईला तेवढे वजन पेलवण्याकरिता पुरेसे उष्मांक मिळणे गरजेचे आहे. त्याकरिता आहारात गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, फळे व भाज्या यांचा समावेश करणे गरजेचे आहे. अनेक गर्भवती स्त्रियांमध्ये बद्धकोष्ठतेचा त्रास होताना दिसतो. त्यामुळे (फायबर) तंतुमय पदार्थ घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्याकरिता अख्ख्या सालीच्या डाळी, फळे, भाज्यायुक्त सूप्स, सॅलड, कोशिंबीर घेणे गरजेचे आहे. फळांचा रस घेण्याऐवजी अख्ख्या सालींची फळे घ्यावीत. मदा व मद्याचे पदार्थ पूर्णपणे बंद करावेत व पाण्याचे प्रमाण वाढवावे.

प्रथिने – गर्भावस्थेत नेहमीच्या गरजेपेक्षा जास्तीची १५ ग्रॅमपर्यंत प्रथिने घेणे गरजेचे आहे. गर्भाची वाढ, गर्भाशयाच्या वाढत्या आकाराकरिता (गर्भावस्थेत वाढणारा आकार) आणि गर्भावस्थेत रक्ताभिसरणाचे कार्य चांगले होण्याकरिता प्रथिनांची गरज आहे. प्रथिनांची कमतरता असली तर गर्भवती स्त्रियांच्या पायावर सूज येणे, पोटातील पाणी (अ‍ॅमनिओटिक फ्लुइड) कमी होणे, बाळाची वाढ खुंटणे यांसारखी लक्षणे दिसून येतात.

कॅल्शियम – गर्भावस्थेत दिवसाला १२०० मिलिग्रॅम कॅल्शियम मिळणे गरजेचे आहे. म्हणजेच ते नेहमीपेक्षा दुप्पट असावे. गर्भावस्थेत वाढणारा गर्भ हा आईच्या शरीरातूनच हाडांच्या व दातांच्या वाढीकरिता कॅल्शियम घेत असतो. त्यामुळे जर आईच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर त्याचा परिणाम वाढणाऱ्या गर्भावर होतो. परिणामी हाडांची वाढ व दातांची वाढ पुरेशी होत नाही. त्याचप्रमाणे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आईची हाडे ठिसूळ होऊ शकतात.

कॅल्शियमकरिता दूध, दही, पनीर, ताक, तीळ, कोथिंबीर आहारात असणे गरजेचे आहे. आहारात चहा, कॉफी, चॉकलेट यांचे प्रमाण कमी ठेवावे. कारण त्यामुळे कॅल्शियमच्या कार्यात अडथळा येऊ शकतो. गर्भावस्थेत आईच्या आहारात पुरेसे कॅल्शियम असेल तर त्याचा उपयोग पुढे स्तन्यपानाच्या वेळीदेखील होतो. तसेच प्रसूतीनंतर केस गळणे, हाडे दुखणे, पाठदुखी यांसारख्या आजारांपासून संरक्षण मिळते.

लोह – गर्भावस्थेत ३५ मिलिग्रॅम लोह दिवसाला असणे गरजेचे आहे. कारण गर्भामध्ये हिमोग्लोबीनची पातळी राखण्याकरिता लोह गरजेचे आहे. लोहाच्या कमतरतेमुळे अ‍ॅनिमिया होण्याची शक्यता आहे. गर्भवती स्त्रियांमध्ये अ‍ॅनिमिया असेल तर त्याचा परिणाम म्हणून गर्भपात होणे, गर्भाची वाढ खुंटणे, गर्भामध्ये जन्मजात दोष निर्माण होणे, कमी वजनाचे बाळ जन्माला येणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. हे टाळण्याकरिता आहारात चिकन, अंडी, मासे, खजूर, अळीव घेणे गरजेचे आहे. स्वयंपाक करण्याकरिता लोखंडाची भांडी वापरावीत.

झिंक – गर्भावस्थेत झिंकच्या कमतरतेमुळे गर्भ पोटात दगावणे, वाढ खुंटणे, गर्भाच्या मेंदूवाढीवर परिणाम होणे, कमी वजनाचे बाळ जन्माला येणे, वेळेच्या आधी प्रसूती होणे (७ महिन्यांआधी) हे दिसून येते. त्यामुळे दिवसाला १२ मिलिग्रॅम झिंक घेणे गरजेचे आहे.

फॉलिक अ‍ॅसिड – दिवसाला ५०० मिलिग्रॅम फॉलेट घेणे गरजेचे आहे. फॉलिक अ‍ॅसिड आपणास हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा, दूध, अंडी यांतून मिळते. गर्भातील डीएनए, आरएनएच्या निर्मितीकरिता, तसेच हिमोग्लोबीनची पातळी वाढण्याकरिता गरजेचे आहे. फॉलिक अ‍ॅसिडची कमतरता झाली तर गर्भामध्ये मज्जातंतू नसणे (अबसेन्स ऑफ स्पाइन), बाळाची गर्भात वाढ खुंटणे अशी लक्षणे दिसून येतात.

गर्भवती स्त्रियांनी घ्यावयाची काळजी

१ मळमळ, उलटी यांसारखी लक्षणे असल्यास खाण्यात कोरडय़ा कबरेदकांचे प्रमाण म्हणजेच खाकरा, मुरमुरे, एखादे फळ यांचे प्रमाण वाढवावे. रिकाम्या पोटी चहा, कॉफी टाळावे.

२ अतिप्रमाणात उलटय़ांचा त्रास असल्यास पाणी, नारळपाणी, लिंबू सरबत, कोकम, सूप्स घ्यावीत.

३ जळजळ, अ‍ॅसिडिटी (आम्लपित्त) असल्यास – थोडय़ाथोडय़ा वेळाने हलका आहार घ्यावा. मसालेदार, तेलकट पदार्थ टाळावे.

४ बद्धकोष्ठता असल्यास – आहारात तंतुमय पदार्थ व पाण्याचे प्रमाण वाढवावे.

५लचक भरणे किंवा शरीरात वेदना असल्यास – आहारात अतिखारट प्रमाण कमी करून मॅग्नेशियम व कॅल्शियमयुक्त गोष्टी घ्याव्यात.

gkashelkar@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 12:13 am

Web Title: sarvkash aahar article by gayatri kheschalkar 5
Next Stories
1 हा भारत माझा (?)
2 स्वत:मधला माणूस शोधताना
3 शिक्षकांविना चालणारी शाळा सच की पाठशाला
Just Now!
X