|| शुभदा दादरकर

‘‘मी बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या संगीत आणि कला अकादमीच्या प्राचार्यपदासाठी अर्ज केला होता. मी अण्णांना विचारले, ‘‘तुम्ही माझ्या या पदासाठी आयुक्तांना एक फोन कराल का?’’  अण्णा म्हणाले, ‘‘हे बघ, तुला माहीत आहे की आजपर्यंत मी एका तत्त्वाने वागत आलो आहे. आता आयुष्याच्या या टप्प्यावर मला तत्त्व सोडून वागायला लावू नकोस. आणि ऐक, उद्या मुलाखत दिल्यावर निवड झाली तर ठीक आहे, पण नाही झाली तरी वाईट वाटून घेऊ नकोस. आपली घरची अकादमी, ‘रंगशारदा’ आहे ना. तिचं काम कर.’’  पण मला प्राचार्यपद मिळाले. या पदाच्या खुर्चीवर बसलेल्या मला पाहायला अण्णा केबिनमध्ये आले होते, माझ्यासाठी याहून दुसरी आनंदाची गोष्ट नव्हती.’’ सांगताहेत शुभदा दादरकर आपले पिता विद्याधर गोखले यांच्याविषयी..

पत्रकार, नाटककार, साहित्यिक, वक्ते, शिक्षक, खासदार – आमचे अण्णा, विद्याधर गोखले म्हणजे एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व, ज्यांच्यावर महाराष्ट्राच्या जनतेने अलोट प्रेम केले. आज त्यांच्या निधनानंतर बावीस वर्षांनीही याची प्रचीती येते. मला वाटतं त्याचं कारण एकच, आमच्या अण्णांचं आयुष्यावरचं जबरदस्त प्रेम! रसरसून आयुष्य जगले ते. आणि म्हणूनच पत्रकारांत पत्रकार, नाटय़कर्मीमध्ये नाटय़कर्मी, साहित्यिकांत साहित्यिक असे असूनही अण्णांचं व्यक्तिमत्त्व ‘रंग माझा वेगळा’ असेच होते. यातल्या प्रत्येक रंगात रंगलेले आमचे अण्णा मला कसे उमजत गेले? मला कधी आणि कशी जाणीव होत गेली या गुणवैशिष्टय़ांची, याचा विचार मी करू लागले आणि एखादा चित्रपट पाहावा तसा सारा जीवनपटच माझ्या डोळ्यासमोर आला..

आठवले ते मी चार-पाच वर्षांची असतानाचे चेंबूरचे घर! या घरात राहात असताना अण्णांनी आम्हा बहिणींचे खूप फोटो काढले. ते उत्तम फोटोग्राफी करत हे मोठे झाल्यावर कळले. पण माझ्या लक्षात आहेत ते गळ्यात कॅमेरा अडकवून चेंबूरच्या घराच्या ओसरीवर, अंगणात, बागेत फोटो काढणारे अण्णा! माझा जन्म झाला आणि अण्णांना ‘प्रमोशन’ मिळालं म्हणून ‘शुभ देणारी ती शुभदा’ असं माझं नामकरण झालं. मला लाडानं ते ‘खुशबू’ही म्हणत. लहानपणीच्या आठवणींमधले अजून प्रकर्षांने आठवतात ते पतंग उडवणारे अण्णा! चेंबूरला घराशेजारील माळावर जाऊन आणि त्यानंतर वडय़ाळाला राहात असताना गच्चीवर जाऊन ते आम्हाला पतंग उडवून दाखवत. अगदी दादरला राहायला आल्यावरही काही वेळा अण्णा पतंग उडवत असताना मी त्यांच्यामागे फिरकी धरून उभी राहिल्याचे मला आठवते. इतकंच नाही तर त्यांच्या लहानपणी ते पतंग कसा तयार करत, काचा कुटून मांजा कसा तयार करत हे अगदी रंगवून सांगत असत. लहानपणी आम्हाला गोष्टीही सांगत असत. काही वेळा तर एकेक तास त्यांची गोष्ट चाले. मला वाटतं गप्पांमध्ये गुंगवून ठेवण्याची कलाही तेव्हापासूनचीच. मी पाचवीत आणि बहीण सातवीत असताना शाळेच्या संगीत स्पर्धेत अण्णांच्या ‘पंडितराज जगन्नाथ’ नाटकातलं ‘जय गंगे भगिरथी’ हे एकच पद वेगवेगळ्या चालींमध्ये म्हटलं होतं. आम्हा दोघींना प्रथम आणि द्वितीय पारितोषिक मिळालं. सर्व शिक्षिका एकमेकांना सांगत होत्या, ‘‘या विद्याधर गोखल्यांच्या मुली बरं का!’’ तेव्हा सर्वप्रथम जाणीव झाली, की आपले वडील कुणीतरी खूप मोठे आणि लोकप्रिय आहेत.

माझ्या शालेय जीवनात आंतरशालेय स्पर्धामध्ये नाटय़ाभिनय, वक्तृत्व अशा स्पर्धेत मी भाग घेत असे. तेव्हाचा अनुभव म्हणजे शाळेतील शिक्षिका मला भाषण लिहून देत नसत. त्या म्हणायच्या, ‘‘तुला काय तुझे वडील लिहून देतील. त्यांच्यापुढे आम्ही काय लिहिणार?’’ अण्णा म्हणत, ‘‘मी भाषण लिहून देणार नाही. मुद्दे सांगेन. त्या अनुषंगाने तुझे तुला बोलता आले पाहिजे.’’ मला तेव्हा खूप वाईट वाटे, पण त्यामुळे उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत मात्र मला हमखास बक्षीस मिळत असे. एकपात्री नाटय़ाभिनयासाठी त्यांनी कित्येक वेळा वैशिष्टय़पूर्ण उतारे लिहून दिले. आम्हा भावंडांचा शाळा-कॉलेजमध्ये असताना त्यांनी कधी अभ्यास वगैरे घेतला नाही. इतकंच काय आम्ही कुठल्या वर्षांला शिकत आहोत हेही त्यांना नीट माहीत नसायचे. पण कधी वेळ मिळालाच आणि मी अभ्यासात असलेली काही अडचण विचारली तर ते इतके छान समजावून सांगायचे की आता तो धडा अथवा ती कविता कधीच विसरणं शक्य नाही. एक गोष्ट समजून सांगायला ते वेगवेगळ्या क्षेत्रांतील दहा उदाहरणं सांगायचे. त्यामुळे शिकवलेले चांगले लक्षात राहात असे.

त्यांच्या बाहेरील अनंत व्यापामुळे घराकडे त्यांना तितकेसे लक्ष देता आले नाही तरी आम्हा मुलांना (आम्ही चार भावंडं – मोठी बहीण सुनंदा नंतर मी आणि धाकटे भाऊ संजय, विजय) शिस्तीचे जे धडे त्यांनी दिले ते विसरताच येणार नाहीत. रात्री झोपायला कितीही उशीर झाला तरी सकाळी सहा-सव्वासहाला उठलेच पाहिजे हा दंडकच होता. त्यानंतर जर कुणी अंथरुणात लोळताना दिसले तर मोठय़ा आवाजात ते ओरडत, ‘‘अरे झोपून कसले राहता? विद्यार्थीदशा आहे ना तुमची? चला उठा लगेच.’’  आणि उठल्यावर सांगत ‘‘अरे या वयात वाचलेलं, मनन केलेलं चांगलं लक्षात राहतं. चांगलं काही वाचत जा. पहाटेच्या वेळी अभ्यास करत जा. सकाळी बारा सूर्यनमस्कार घातलेच पाहिजेत. जेवताना पानात काहीही टाकायचे नाही. पानात वाढलेले सर्व संपवलेच पाहिजे. ‘अन्न हे पूर्ण ब्रह्म’ म्हणून खाल्ले पाहिजे.’’ संध्याकाळी खेळून आल्यावर हातपाय धुऊन शुभंकरोती, रामरक्षा म्हटलीच पाहिजे. ही घरातली शिस्तच होती. एकदा ‘मी आजच्या दिवस नाही म्हटली रामरक्षा तर काय बिघडले?’ असे म्हणून आईकडे रामरक्षा न म्हणण्यासाठी हट्ट धरून बसले होते. अण्णांनी ते ऐकले आणि त्यांनी आम्हा सर्वच भावंडांना सांगितले, ‘‘अरे शुभंकरोती किंवा रामरक्षा फक्त परमेश्वरासाठीच म्हणायची असते असं नाही. रामरक्षा म्हटल्याने तुमचे शब्दोच्चार स्पष्ट होतील. रोज रामरक्षा म्हणायचा कंटाळा येत असेल तर मोठमोठय़ा कवींची चांगली काव्यं पाठ करा, ती म्हणा. त्यामुळे तुमची पाठांतरशक्ती वाढेल. एवढं सांगून ते थांबले नाहीत तर कवी चंद्रशेखर यांचे ‘गोदागौरव काव्य’ त्यांनी आमच्याकडून पाठ करवून घेतले आणि एका लयीत, एका चालीत कसे म्हणायचे ते दाखवले. ते आम्ही संध्याकाळी म्हणत असू.

शालेय जीवनातील शिस्तीच्या पायावरच जाणत्या वयात अण्णांचं मोठेपण, त्यांच्यातला प्रेमळ, प्रत्येक गोष्ट समजावून सांगणारा पिता मला भावत गेला. आता हेच पाहा ना, मी महाविद्यालयीन शिक्षणाची सुरुवात करणार होते तेव्हाचा प्रसंग, ‘‘बाई गं, कॉलेजात जाणार आहेस. आता मोठी झाली आहेस. कुणाच्या प्रेमातबिमात पडलीस, लग्न वगैरे जुळवलं तर जरा डोळसपणे प्रेम कर. केवळ बाहेरच्या रुबाबाला भुलून जाऊ नकोस. मग माझा जातीचा काहीच अट्टहास नाही.’’ इतकं योग्य मार्गदर्शन वयात आलेल्या मुलीला करणारा पिता महद्भाग्यानेच लाभतो. आणि खरंच जेव्हा मी श्रीकांत दादरकर यांच्यावरील माझ्या प्रेमाबद्दल घरी सांगितलं तेव्हा लगेचच ते म्हणाले, ‘‘हो, आम्ही ओळखतो त्याला. चांगला मुलगा आहे तो. सुसंस्कृत आहे. माणिक वर्माचा भाऊ आहे. आमची काहीच ना नाही. पण तुझा विचार पक्का आहे ना? प्रेम वगैरे ठीक आहे, पण लग्न म्हणजे प्रेमातून उदयाला आलेला केवळ दोघांचा संसार नव्हे तर दोन कुटुंबांतील घरोबा असतो.’’ आणि मग त्यांनी आमचं यथाशक्ती थाटामाटात लग्न करून दिलं. पण त्याच वेळी बजावलं, ‘‘प्रेमविवाह केला आहेस. तुम्हाला काही अडचण आली तर दोन महिने इथे येऊन राहिलात तरी चालेल. पण भांडण करून आलीस तर दोन दिवसही इथे ठेवून घेणार नाही.’’ आपोआप जबाबदारीची जाणीव झाली. पण त्याचबरोबर आपल्याला जावई गाणारा, नाटकात काम करू शकणारा मिळाला याचा अण्णांना आनंदच झाला होता.

त्याकाळी अण्णांच्या गप्पांच्या मैफिलीत मुख्यत: सहभागी होणारे होते नटश्रेष्ठ केशवराव दाते, भालचंद्र पेंढारकर, मामा पेंडसे, वामनराव सडोलीकर, छोटा गंधर्व,  राम मराठे, नीळकंठबुवा अभ्यंकर, गोविंदराव पटवर्धन आदी साहजिकच नाटक आणि संगीत यांची आवड माझ्यामध्ये निर्माण झाली आणि कळत-नकळत तसे संस्कार होत गेले. अण्णांच्या कितीतरी नाटकांचे वाचन, त्यातील गाण्यांच्या चाली, त्या नाटकावरची चर्चा आमच्या घरी चालत असे. कित्येक थोर कलाकारांच्या जीवनावरील नाटय़पूर्ण संहितांचे लेखनही अण्णा भालचंद्र पेंढारकरांना वाचून दाखवत. हे सर्व ऐकायला मला अतिशय आवडत असे. ‘स्वरसम्राज्ञी’ हे नाटक ‘फेअर’ करण्याचं काम मी केलं. कित्येक वेळा घरी चालणाऱ्या गाण्यांच्या तालमीला मी तबल्यावर ठेका धरत असे. साहजिकच तालात शब्द कसे टाकायचे याचे ज्ञान होत गेले.

नीळकंठबुवा तसेच पेंढारकर अण्णा नाटय़पदे अर्थवाही होण्यासाठी कशी सादर करावयाची असतात हे इतरेजनांना शिकवत असताना अनुभवायला मिळाले. तसेच प्रसंगपरत्वे प्रत्यक्ष शिकताही आले. या सर्वाचा उपयोग झाला तो ‘विद्याधर गोखले संगीत नाटय़ प्रतिष्ठान’तर्फे चालवण्यात येणाऱ्या नाटय़संगीत पदविका वर्गात शिकवताना, त्यांचे विविध कार्यक्रम सादर करताना. अण्णांकडे येणाऱ्या मान्यवरांबरोबरच अनेकजण आपल्या वैयक्तिक अडचणीही घेऊन येत. बहुतेक वेळा त्या अडचणींशी अण्णांचा संबंधही नसे. पण तरीही त्या अडचणी अण्णा शांतचित्ताने ऐकून घेत. जमेल तेवढी मदत करत. योग्य  मार्गदर्शन करत.

कधी कधी आई (सरस्वती गोखले) त्यांना म्हणे, ‘लष्कराच्या भाकरी भाजण्यात तुम्ही एवढा का वेळ वाया घालवता?’ पण अण्णा सांगत, ‘‘केवळ माझ्याकडे अडचणींचा पाढा वाचून जर लोकांना हलकं वाटत असेल, त्यांचा ताण हलकाहोत असेल आणि मी माझा थोडा वेळ त्यांना देऊन जर मानसिक समाधान देऊन शकत असेन तर काय हरकत आहे?’’ हे सारे काम ते नि:स्वार्थ बुद्धीने करत. सतत कार्यरत असलेल्या अण्णांचं खाण्यावर, जेवण्यावर अत्यंत प्रेम. खवैयाच होते म्हणा ना ते. अगदी हॉटेलमध्येसुद्धा खाताना एखादा पदार्थ त्यांना आवडला तर थेट तिथल्या रसोईघरात जाऊन तो पदार्थ बनवणाऱ्याला शाबासकी देत आणि तो पदार्थ बनवण्याची पद्धत विचारत. घरात विविध तऱ्हेचे पदार्थ बनवण्याची त्यांची फर्माईश असे. पण क्वचित एखादा पदार्थ बिघडला तर त्यांनी कधीही टिंगल केली नाही, उलट त्या बिघडलेल्या पदार्थाला एखादे नवीन नाव सुचवायचे. त्यांचे खास मित्र ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर आणि पत्रकार पु. वि. गाडगीळ या दोघांच्याही मुलांची मुंज एकाच दिवशी होती. आम्ही सारे कुटुंबीय दोन्हीकडे मुंजीला गेलो होतो. पण साळगांवकरांकडे मुंजीचे जेवण जेवल्यावर थोडय़ाच वेळात गाडगीळांकडे पुन्हा जेवायची आमची कुणाचीही हिंमत झाली नाही. पण अण्णा मात्र गाडगीळकाकांना वाईट वाटू नये म्हणून पुन्हा आग्रहाचे जेवण जेवले.

व्यवस्थितपणा तर त्यांच्या अंगी इतका होता की घरी यायला त्यांना कितीही उशीर झाला तरी त्यांचे कपडे व्यवस्थित हँगरला लावलेलेच आढळणार. त्यांच्या कपाटातील तसेच टेबलावरील पुस्तकेही इतकी व्यवस्थित लावलेली असायची, की आम्ही कोणीही अलगद एखादे पुस्तक वाचायला घेतले तरी त्यांच्या ते ताबडतोब लक्षात येई. ‘आज माझ्या टेबलाला कुणीतरी हात लावलेला दिसतोय.’ असं ते म्हणणारच. साधं पान-तंबाखूचं तबकही व्यवस्थित लावून ठेवलेलं असायचं. त्यांचं कुठलंही लिखाण अतिशय सुबक आणि सुंदर अक्षरात लिहिलेलं असायचं.

सकाळी उठल्याबरोबर दिवसभराच्या कामांची ते लेखी नोंद करून ठेवत. त्यांना कुठलेही काम घाईगडबडीत कसेतरी केलेले चालत नसे. घरात आणि घराबाहेरही ते अत्यंत तत्त्वनिष्ठ राहून वागले. कोणत्याही कारणाने त्यांनी स्वत:च्या तत्त्वांशी तडजोड केली नाही. माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर ज्या वेळी मी बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या संगीत आणि कला अकादमीच्या प्राचार्यपदासाठी अर्ज केला होता. ‘संगीत विभागप्रमुख’ असे ते पद असल्याने मी मुलाखतीसाठी भरपूर तयारी केली होती. मुलाखतीच्या आदल्या दिवशी एका उमेदवारासाठी एका नामवंत कलाकाराचा फोन शिक्षणाधिकाऱ्यांना आल्याचे मला समजले. त्या रात्री अण्णांच्या घरी गेले असताना मी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही माझ्यासाठी आयुक्तांना एक फोन कराल का?’’  अण्णा म्हणाले, ‘‘हे बघ, तुला माहीत आहे की आजपर्यंत मी एका तत्त्वाने वागत आलो आहे. आता आयुष्याच्या या टप्प्यावर मला तत्त्व सोडून वागायला लावू नकोस. आणि ऐक, उद्या मुलाखत दिल्यावर निवड झाली तर ठीक आहे, पण नाही झाली तरी वाईट वाटून घेऊ नकोस. आपली घरची अकादमी, ‘रंगशारदा’ आहे ना! तिचं काम कर.’’  पुढे त्यांच्या पुण्याईने आणि आशीर्वादाने मला प्राचार्यपद मिळाले. या पदाच्या खुर्चीवर बसलेल्या मला पाहायला अण्णा केबिनमध्ये आले होते. माझ्यासाठी याहून दुसरी आनंदाची गोष्ट नव्हती.

‘पैसा हे साधन आहे साध्य नव्हे’, असा उपदेश भाषणांतून, लेखनातून करणारे अनेक आहेत. पण त्या तत्त्वानुसार वागणारे फारच थोडे. अण्णा अशा या थोडय़ा लोकांपैकी होते. पैसा जमवण्यापेक्षा त्यांनी त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारी माणसं जमवली. त्यांना वेगवेगळ्या प्रसंगी मिळालेली रक्कम क्षणभरही विचार न करता वेगवेगळ्या गरजू संस्थांना दिली.

त्यांनी लिहिलेल्या नाटकांचे शेकडो प्रयोग झाले. पण लेखक म्हणून त्यांना जेवढय़ा प्रयोगांचे मानधन मिळाले त्यापेक्षा मानधन न मिळालेल्या प्रयोगांची संख्याच जास्त होती. एकदा तर आई त्राग्याने त्यांना म्हणाली, ‘‘अहो तुमचे अमुक अमुक नाटकाचे रॉयल्टीचे पैसे मागून घ्या ना. तुमचे हक्काचे तर पैसे आहेत. आपण काही दुसऱ्याचे मागत नाही ना?’’ अण्णा लगेच म्हणाले,  ‘‘हे बघ घरात दहीभातही खायला मिळेनासा झाला तर मी पैसे मागेन. सध्या संगीत रंगभूमीला चांगले दिवस नाहीत अशा वेळी पैसे मागणं मला प्रशस्त वाटत नाही.’’ पुढे शिवसेना-भाजप युतीचे खासदार असताना कुठल्याही प्रलोभनांना ते बळी पडले नाहीत तर काळाच्या ओघात एक एकनिष्ठ, प्रामाणिक खासदार अशीच त्यांची प्रतिमा राहिली.

अण्णांच्या एकसष्टीला डिसिल्वा हायस्कूलच्या पटांगणात खूप गर्दी जमली होती. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते रसिकांनी जमवलेल्या मोठय़ा रकमेची थैली अण्णांना अर्पण करण्यात आली. त्या रोख रकमेच्या थैलीतील एक रुपया काढून ‘‘हा मी रसिकांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून स्वीकारत आहे. आणि उर्वरित रकमेतून नाटय़ आणि संगीतविषयक शैक्षणिक कार्य करण्यासाठी ‘विद्याधर गोखले संगीत नाटय़ प्रतिष्ठान’ची स्थापना करण्यात येईल’’, असे त्यांनी जाहीर केले. ‘रंगशारदा प्रतिष्ठान’ म्हणजे अण्णांचा एकखांबी तंबू होता. प्रतिष्ठानच्या सर्व कार्यात मी अण्णांना मदत करत असे. पण ‘विद्याधर गोखले प्रतिष्ठान’ची स्थापना झाल्यावर या ट्रस्टतर्फे सुरू करण्यात आलेल्या नाटय़संगीत वर्गास अण्णांनी मला मार्गदर्शन करण्यास सांगितले.

मला स्वत:ला नाटकात अभिनय करण्यात अधिक रस होता. नाटकात काम करावे, विशेषत: विनोदी ढंगाच्या भूमिका कराव्यात आणि नाव मिळावे असे वाटे. पण लग्नानंतर सांसारिक जबाबदाऱ्यांमुळे ते शक्य होत नव्हते. माझी खूप चिडचिड होत असे. तेव्हा अण्णांनी समजावले, ‘‘अगं तुझ्या अंगी जे अभिनयाचे गुण आहेत त्यासाठी तू स्वत:च नाटकात काम केले पाहिजेस असे नाही. तू जिथे नोकरी करते आहेस तिथल्या मुलांना नाटय़ हा विषय शिकव. त्यांची लहान-मोठी नाटके बसवून घे.’’ आणि खरंच महापालिकेत असताना मी बसवलेले कार्यक्रम, नाटके स्पर्धामधून पारितोषिकप्राप्त ठरली. इतकंच काय, पुढे ‘रंगशारदा’, आणि ‘संगीत कला अकादमी’तर्फेसुद्धा मी दिग्दर्शित केलेली नाटके ‘महाराष्ट्र राज्य संगीत नाटक स्पर्धे’त पारितोषिकप्राप्त ठरली.

‘रंगशारदे’च्या नाटकात ‘कमी तिथे आम्ही’ या न्यायाने मी आणि श्रीकांत कुणाची काही अडचण आली तर ती-ती भूमिका करून वेळ निभावून नेत होतो. अपवादात्मक एखाददुसरी भूमिका मात्र तालीम करून करायला मिळाली. आजच्या घडीला विचार करताना जाणवतं, की अण्णांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वातला प्रामुख्याने शिक्षकी वारसा, थोडय़ाबहुत प्रमाणात काव्यलेखन आणि वक्तृत्वाचा वारसा मला लाभला असावा. अण्णांचा खरा पिंड हा कवीचा आणि आध्यात्मिक होता. त्यांनी नाटकातल्या गीतांबरोबरच अन्य कविताही खूप लिहिल्या. मला सर्वाधिक भावला तो अण्णांचा काव्यलेखनाचा गुण. जीवनातली कितीतरी शाश्वत मूल्ये त्यांनी कवितेतून सहजगत्या मांडली आणि म्हणूनच मनात विचार येत होता अण्णांनी लिहिलेल्या पदांमधील काव्यसौंदर्य उलगडून ती गीते सादर करणारा एखादा कार्यक्रम करावा. आणि मग तसं मी अण्णांना विचारलं. मी कार्यक्रमाचे निवेदन करायचं नक्की झालं, गाणी नक्की केली आणि या कार्यक्रमाची, बांधणी करत असताना कार्यक्रमाचं नाव नक्की झालं ‘जय शंकरा! विद्याधरा! अर्थात विद्याधर गीत सौंदर्य’ अण्णा म्हणाले, ‘‘कार्यक्रमाचे नाव जाहीर करताना ‘विद्याधर गीत सौंदर्य’ नीट म्हण. चुकून ‘विद्याधर सौंदर्य गीत’ म्हणालीस तर पंचाईत व्हायची.’’ मी म्हटलं, ‘‘हे हो काय अण्णा?’’ ‘‘अगं वेडाबाई, एखादा शब्द उलटापालटा झाला तरी कसा विनोद निर्माण होतो आणि सुरुवातीलाच विनोदाच्या अंगाने निवेदन कसे रंगवायचे ते तुला सांगत होतो.’’ या कार्यक्रमाच्याच अनुषंगाने व्याख्यानाची, भाषणाची तयारी कशी करावी हेही शिकायला मिळाले. भाषणात वाक्य प्रश्नार्थक केल्याने कशी टाळी येते. भाषणात मध्ये मध्ये विनोदप्रचुर बोलणे कसे आवश्यक आहे हे समजले. अण्णा सांगत, ‘‘नटामध्ये वक्त्याचे गुण नसले तरी चालतील, पण वक्त्यामध्ये नटाचे गुण असलेच पाहिजेत तरच ते भाषण रंगते.’’

तसंच काव्यलेखनातही नुसते यमक जुळवून चालत नाही तर ते काव्य नेमकं, सुबोध आणि प्रासादिक कशामुळे होतं, काव्यात नादमयता कशामुळे येते, या सर्व बाबी ‘जय शंकरा! विद्याधरा!’ कार्यक्रमाच्या निमित्ताने शिकता आल्या. या कार्यक्रमाचा शेवटचा मुद्दा तर पूर्णपणे आध्यात्मिक होता. जेव्हा हा मुद्दा मी व्यवस्थित मांडलेला अण्णांनी ऐकला तेव्हा ते म्हणाले, ‘‘छान बोललीस! आता मला काळजी नाही!’’ कार्यक्रम चांगला झाला. पण या कार्यक्रमानंतर वर्षभरातच अण्णांचं निधन झालं आणि तेही लखनौला. विदर्भ ही अण्णांची जन्मभूमी, मुंबई ही कर्मभूमी पण त्यांची अखेर झाली ती गंगेच्या परिसरात..

‘‘नको नको सुखवैभव रे! या गंगेच्या मातीचा कण। माझी वणवण शमवील रे’’ असं अण्णांनी ‘पंडितराज जगन्नाथ’मध्ये लिहिले होते. नियतीने जणू ते खरंच ठरवलं. पण आता त्यांनीच अधोरेखित केलेल्या मार्गावरून मार्गक्रमण करीत असताना आज पदोपदी त्यांची आठवण येते. विशेषत: जागतिक संगीत नाटकांच्या महोत्सवात नेदरलँड येथे ‘संगीत आणि कला अकादमी’तर्फे ‘संगीत संशयकल्लोळ’ नाटक करण्याची संधी प्राप्त झाली तेव्हा त्यांची प्रकर्षांने आठवण झाली. डच प्रेक्षकांसमोर महाराष्ट्राचे अभिजात संगीत नाटक मी सादर केले. याचा त्यांना खूप अभिमान वाटला असता. नाटय़संगीताचे प्रशिक्षण तर ते हयात असतानाही मी देतच होते. पण नाटय़संगीताचा पद्धतशीर अभ्यासक्रम तयार करून, दोन वर्षांचा पदविका वर्ग मुंबई, पुणे, नाशिक आदी ठिकाणी संगीत रंगभूमीवरील बुजुर्ग आणि श्रेष्ठ गायक नट आणि गानअभिनेत्री यांच्या साहाय्याने चालू ठेवणे, संगीत नाटकांसाठी तरुण कलाकार घडविणे आणि नाटय़संगीताचे जतन आणि संवर्धन करणे हे कार्य ‘विद्याधर गोखले संगीत नाटय़ प्रतिष्ठान’च्या वतीने आम्ही दोघे पती-पत्नी करतच आहोत. इतकेच नव्हे तर स्वबळावर पदविका वर्गातील निवडक विद्यार्थ्यांचे साभिनय, सवेश असे विविध कल्पनांवर आधारित कार्यक्रमही सादर करीत आहोत. हे कार्य गेली १५ वर्षे सातत्याने चालू आहे आणि अण्णांकडून मिळालेल्या शिदोरीवर ते यापुढेही चालू राहील असा विश्वास आहे. म्हणून म्हणावंसं वाटतं –

प्रीतीचा कल्पतरु जो मला लाभला।

आभाळमायेने तयाच्या गंध जीवना दिला॥

शालेय जीवनातील शिस्तीच्या पायावरच जाणत्या वयात अण्णांचं मोठेपण, त्यांच्यातला प्रेमळ, प्रत्येक गोष्ट समजावून सांगणारा पिता मला भावत गेला. मी महाविद्यालयीन शिक्षणाची सुरुवात करणार होते तेव्हाचा प्रसंग, अण्णा मला म्हणाले, ‘‘बाई गं, कॉलेजात जाणार आहेस. आता मोठी झाली आहेस. कुणाच्या प्रेमातबिमात पडलीस, लग्न वगैरे जुळवलं तर जरा डोळसपणे प्रेम कर. केवळ बाहेरच्या रुबाबाला भुलून जाऊ नकोस. मग माझा जातीचा काहीच अट्टहास नाही.’’ इतकं योग्य मार्गदर्शन वयात आलेल्या मुलीला करणारा पिता महद्भाग्यानेच लाभतो.

‘जय शंकरा! विद्याधरा!’ या  कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक गोष्टी शिकता आल्या. या कार्यक्रमाचा शेवटचा मुद्दा तर पूर्णपणे आध्यात्मिक होता. जेव्हा हा मुद्दा मी व्यवस्थित मांडलेला अण्णांनी ऐकला तेव्हा ते म्हणाले, ‘‘छान बोललीस! आता मला काळजी नाही!’’ कार्यक्रम चांगला झाला. पण या कार्यक्रमानंतर वर्षभरातच अण्णांचं निधन झालं आणि तेही लखनौला. विदर्भ ही अण्णांची जन्मभूमी, मुंबई ही कर्मभूमी पण त्यांची अखेर झाली ती गंगेच्या परिसरात..

shubhadadadarkar07714@gmail.com

chaturang@expressindia.com