पतीच्या हत्येनंतर कॅनडात स्थलांतरित झालेली एक सच्ची कार्यकर्ती. आपलं दु:ख बाजूला सारून पुन्हा सोमालियात, आपल्या मातृभूमीत परतण्याचा निर्णय घेते आणि तेथे युद्धामुळे त्रास भोगणाऱ्या स्त्रिया आणि तरुणांना मदत करायचं ठरवते. ‘सिस्टर सोमालिया’ ही तिची संस्था म्हणजे पूर्व आफ्रिकन देशांमधील पहिले ‘रेप क्रायसिस सेंटर.’ मानवी हक्कांचा पुरस्कार आणि स्त्रियांचे हक्क यासाठी लढणाऱ्या फरतून अब्दीखलान अडान विषयी..
मो गादिशू, स्थानिक पातळीवर हमार म्हणूनही ओळखले जाणारे सोमालियातील एक मोठे शहर. मोगादिशूमध्ये राजकीय अशांतता आहे. अलीकडेच मोगादिशूत झालेल्या बॉम्बस्फोटात किमान सहा लोक ठार झाले. मरण पावलेल्यांमध्ये निष्पाप नागरिकांसह पोलिसांचाही समावेश होता. एका महत्त्वाच्या माजी शासकीय अधिकाऱ्याच्या गाडीला त्यांनी लक्ष्य बनवलं होतं. ‘अल-शबाब’ या इस्लामी मिलिटंट ग्रुपने हा स्फोट घडवल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अलीकडच्या काही महिन्यांत मोगादिशूत होणाऱ्या हल्ल्यांचं प्रमाण वाढलं आहे. सोमालियाच्या या इस्लामी फायटर्सना ‘मॉसकिटो मिलिटंटस्’ म्हणून नाव पडलं आहे, कारण त्यांचा कितीही नायनाट केला तरी ते पुन:पुन्हा हल्ले करीत राहतात. इस्लामी बंडखोरांबरोबरच्या कित्येक वर्षांच्या नागरी युद्धानंतर, सोमाली सरकार सोमालियाची पुनर्बाधणी करण्याचा कसून प्रयत्न करते आहे आणि त्यांच्या लोकांना शांतता मिळवून देण्यासाठीही प्रयत्नशील आहे.
फरतून अब्दीखलान अडान ही एक सोमाली कार्यकर्ती! अडान सोमालियातच मोठी झाली. स्थानिक उद्योजक आणि शांततेसाठी काम करणारा कार्यकर्ता एलमान अली अहमदशी तिचा विवाह झाला. त्यांना चार मुली झाल्या. १९९६ मध्ये नागरी युद्ध चालू असताना दक्षिण मोगादिशू येथील त्यांच्या घराजवळच एलमानला ठार मारण्यात आलं. आपल्या जिवावरचा धोका टाळण्यासाठी १९९९ मध्ये अडान कॅनडात स्थलांतरित झाली. मात्र २००५ मध्ये मातृभूमीची ओढ आणि आपल्या लोकांचे अश्रू पुसण्यासाठी, शांतता आणि मानवी हक्क यांचा पुरस्कार करण्यासाठी सोमालियात परत आली.
दिवंगत पतीच्या स्मृत्यर्थ तिने  ‘एलमान पीस अ‍ॅण्ड ह्य़ूूमन राइट्स’ केंद्राची स्थापना केली. तिची मुलगी लिवाद या कामी तिला मदत करते. याच केंद्राच्या माध्यमातून फरतून अडानने ‘सिस्टर सोमालिया’ या संस्थेची स्थापना केली.  ही संस्था म्हणजे लैंगिक अत्याचारातून वाचलेल्यांना वैद्यकीय सेवा, समुपदेशन, शिक्षण आणि स्वतंत्र उद्योजकतेबद्दल सल्ला देऊन त्यांना आपल्या पायावर उभा करणारा एक गट! लैंगिक हिंसाचाराला बळी पडलेल्यांना मदत करण्यासाठी अस्तित्वात आलेला त्या देशातील हा पहिलाच उपक्रम किंवा पूर्व आफ्रिकन देशांमधील ते पहिले ‘रेप क्रायसिस सेंटर’ आहे. कॅमेऱ्यापुढे क्वचितच मोकळ्या होणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यांचा आणि ध्येयधोरणांचा शोध घेणाऱ्या ‘आफ्रिकन व्हॉइसेस’ या वीकली शोमधून ‘सिस्टर सोमालिया’चं काम जगापुढे आलं..
त्यात सीएनएनच्या वार्ताकनानुसार मोगादिशूच्या एका उजळ रंगात रंगवलेल्या क्लिनिकमध्ये सलिमा (तिचं हे खरं नाव नव्हे) तिच्या सात वर्षांच्या मुलाशेजारी बसून तिची आरोग्य तपासणी होण्याच्या  प्रतीक्षेत आहे. आपला सारा अनुभव ती समोर बसलेल्या व्यावसायिक आरोग्य कार्यकर्त्यांला सांगते. तिच्यावर बलात्कार कसा झाला आणि मग तिच्या असहाय्य लहान मुलावर लैंगिक अत्याचार होताना तिला कसं बघावं लागलं, याचा अनुभव ती वर्णन करते.. मदत शोधण्याची आत्यंतिक भीती वाटत असताना ज्यामुळे उपयोग होईल असं तिला वाटलं ते तिने केलं. चार दिवस सतत तिने मुलाच्या जखमा गरम पाणी आणि मिठाने धुतल्या..  नंतर त्यांना ‘सिस्टर सोमलिया’ आणलं गेलं.
‘अशा किती तरी कहाण्या आहेत, तुम्ही पहिली ऐकता तोच दुसरी त्यापेक्षा अधिक वाईट असल्याची तुमची खात्री होते.’ फरतून अडान सांगते. ‘मी दिवसा जे ऐकते त्याचीच रात्री स्वप्नंदेखील पडतात,’ असे जरी ती सांगत असली तरी  सोमालियात स्त्रियांच्या हक्कांसाठी काम करणारी एक आघाडीची कार्यकर्ती असल्याने अडानला अशा कथा ऐकण्याची सवय झाली आहे. ‘बलात्कारित स्त्रिया इथे असताना त्यांना सुरक्षित वाटावं हा आमचा उद्देश आहे. तुम्हाला रडायचं असेल, तुम्हाला हसायचं असेल- त्यांना आधार द्या- त्यांना घरासारखे वाटू द्या- हे सांगत आम्ही हे केंद्र स्थापन केलं.’
पतीनिधनाच्या सहा वर्षांनी जेव्हा अडानने तिच्या मुलांना कॅनडात मागे ठेवून येण्याचा धाडसी निर्णय घेतला तेव्हा  सुरुवातीला अडानने तिच्या दिवंगत पती करत असलेल्या चाइल्ड सोल्जर होण्यापासून मुलांना वाचवण्याच्या कामावर लक्ष केंद्रित केले. पण त्याच वेळी २०११ मध्ये सोमालियाच्या बऱ्याच भागांत दुष्काळ पडला आणि हजारो लोकांना कष्टप्रद प्रवास करून मोगादिशूला जाणं भाग पडलं. मानव कल्याणासाठी कार्य करणाऱ्या संस्था लोकांना तिथे अन्न देत होत्या. राजधानीत सर्वत्र तात्पुरते कॅम्पस उभारले गेले. विस्थापित झालेल्यांना आश्रय देण्यात आला. पण तिथे राहणाऱ्या कित्येक स्त्रियांना आणि मुलांना त्यांच्या गटाच्या संरक्षणापासून वेगळं व्हावं लागल्याने, हे कॅम्पस म्हणजे बलात्कार आणि हिंसाचाराची ठिकाणं बनली.
या वाढणाऱ्या आणिबाणीच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी अडानने ‘सिस्टर सोमालिया’ सुरू केलं. लैंगिक शोषणाला बळी पडलेल्यांचा थक्क करायला लावणारा आकडा जाहीरपणे समोर आणणारं आणि त्यावर भाष्य करणारं त्या देशातलं ते पहिलं केंद्र होतं! ‘बलात्कार सगळीकडेच होत होते, सोमालिया ते का नाकारत होता?’ ती विचारते, ‘नकाराचं प्रमाण खूपच होतं आणि त्यामुळे काम कठीण होत होतं.’
समाजातील वयस्कर लोकांना अडानने बलात्कार लपवावेत असं वाटत होतं. दहशतवादी गट तिला सतत धमक्या देत होते. पण या कार्यकर्तीने या सगळ्या धोक्यांना आव्हान दिलं. ‘सिस्टर सोमालिया सेंटर’मध्ये स्त्रिया आणि मुलांची काळजी घेणारं उत्तम केंद्र असल्याचं ती म्हणते. स्त्रिया आणि मुलांना सुरक्षित घरांत निवारा दिला जातो. समुपदेशन आणि उपचार देण्यात येतात, भावनिक आधार मिळतो. अडान म्हणते की ‘ही खूप सुरक्षित जागा आहे- आम्ही बोलू शकतो, एकत्र चहा घेऊ शकतो-थोडीशी मजा एकत्र अनुभवू शकतो- त्यामुळे त्या आपला भयानक अनुभव मागे ठेवतात. त्यांची दुखं आम्हाला सांगतात.’
मानवी हक्कांचा पुरस्कार आणि स्त्रियांचे हक्क यासंबंधी फरतून अडानने धोकादायक परिस्थितीत केलेल्या कामासाठी  तिला अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे ‘विमेन ऑफ करेज अवॉर्ड’ने नुकतच गौरविण्यात आलं. ‘आमची दखल घेतली गेली ह्य़ाबद्दल केवळ माझ्यासाठी नव्हे तर आम्ही सोमालियात जे करतो आहोत तसंच कार्य इतर ठिकाणी करणाऱ्या स्त्रियांबद्दलदेखील मला आनंद आहे. आम्हाला त्यामुळे प्रोत्साहन मिळालं आहे,’ अडान सांगते. तिला तिच्या कामात उत्तर अमेरिकास्थित एका आठ सभासद असलेल्या स्वयंस्फूर्त मदत गटाकडून व्यवस्थापकीय मदत मिळते. ‘स्त्रियांना मदत कशी करता येईल याबद्दल मी नेहमीच विचार करायचे, पण त्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाईल, असा मी विचारही केला नव्हता.’
बलात्काराला सोमालियात फार मोठा सामाजिक ठपका मानला जातो. त्यामुळे अडानच्या क्रायसिस सेंटरकडे मदतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या वाढली असली तरी त्यापेक्षा अधिक स्त्रिया मूकपणे त्रास सोसत आहेत. कुटुंबंसुद्धा त्यांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचं नाकारतात. काय चाललंय त्याची खूप लोकांना कल्पना आहे, पण ते सत्य नाकारतात, त्यामुळे काम कठीण होत जातं.. पण आता प्रथमच दीर्घ कालावधीनंतर सोमालियात एका नवीन आशेची चाहूल लागते आहे..
 दोन दशकं चाललेल्या लढाईनंतर आता सोमालियातील नवनिर्वाचित सरकारने या प्रश्नांची दखल घेतली आहे आणि त्यामुळे भविष्यासाठी आशा निर्माण झाली आहे.
‘इतर देशांप्रमाणे मला शांतता, न्याय, विकास बघायला आवडेल’, अडान म्हणते, ‘चिंता न करता स्त्रियाबाहेर फिरतील, बाजारात जाऊन त्यांना जे पाहिजे ते घेऊ शकतील, शिकू शकतील, आरोग्य मिळवू शकतील- हे मूलभूत मानवी हक्क आहेत- मला ते बघायचं आहे.’
अडानचं वक्तव्य पुरेसं बोलकं आहे- तिचा दुर्दम्य आशावाद स्तिमित करणारा आहे.

Husband wife dispute, Husband dispute Over Over Cold Dinner, Husband attempt Suicide, Husband attempt Suicide in Nagpur, Nagpur police,
बायकोने दिली थंड भाजी, नवऱ्याने घेतला आत्महत्येचा निर्णय; पोलिसांच्या सतर्कतेमुळे नवऱ्याचे वाचले प्राण
Why has the government banned 23 dangerous dogs in the country
पिटबुल, रोटवायलर, अमेरिकन बुलडॉग… देशात २३ ‘धोकादायक’ श्वानांवर सरकारकडून बंदी का? श्वानप्रेमींचे बंदीविरुद्ध आक्षेप कोणते?
Elon musk on israel iran war
इस्रायल-इराण युद्धावर एलॉन मस्क यांची लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाले, “रॉकेट एकमेकांच्या…”
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी