01 October 2020

News Flash

चतुरंग मैफल : पहिलं प्रेम

माझ्या काही भूमिका मन समृद्ध करत गेल्या. त्यातली एक ‘चौकट राजा’. ‘चौकट राजा’नं मला अनुभवानं मोठं केलं. पहिल्या प्रथम स्क्रीप्ट वाचलं तेव्हा लक्षातही आलं

स्मिता तळवलकर यांनी ‘लोकसत्ता’च्या चतुरंग पुरवणीसाठी लिहिलेला लेख पुनर्प्रकाशित करीत आहोत.
‘‘ माझ्या काही भूमिका मन समृद्ध करत गेल्या. त्यातली एक ‘चौकट राजा’. ‘चौकट राजा’नं मला अनुभवानं मोठं केलं. पहिल्या प्रथम स्क्रीप्ट वाचलं तेव्हा लक्षातही आलं नव्हतं त्यातलं गांभीर्य. पण जेव्हा त्यात शिरत गेले तेव्हा विषयाची खोली लक्षात आली. खरं सांगायचं तर घाबरायला झालं.  इतकं झेपेल ना आपल्याला? कामाला सुरुवात झाली आणि त्यापुढचं वर्ष मंतरल्यासारखं पार झालं.. ‘चौकट राजा’मधली मीनल करता करता स्मिता तळवलकरला समृद्ध करणं फक्त याच क्षेत्राला जमलं.’’ आपलं पहिलं प्रेम असलेल्या मनोरंजन क्षेत्राचे व त्यातून आलेल्या समृद्धतेचे अनुभव सांगताहेत प्रसिद्ध अभिनेत्री, निर्मात्या स्मिता तळवलकर.
हालेख लिहिण्याच्या निमित्ताने मन ४५ र्वष मागे गेलं.. आठवीत असताना पुण्याला हुजूरपागेत दाखल झाले आणि पहिल्याच दिवशी शाळेत बाईंनी विचारलं, मोठेपणी कोण होणार? प्रत्येकीनं उत्तरं दिली. डॉक्टर, वकील, इंजिनीअर, सी.ए. मी एकटीनंच उत्तर दिलं होतं, मी डोअरकीपर होणार. बाई स्तब्धच झाल्या. चांगल्या घरातली मुलगी दिसतेय, काय ध्येय आहे हिचं? आणि मला त्यात काही चुकीचं वाटतच नव्हतं. दिवसाला तीन-तीन शोज बघायला मिळतात. काय मस्त नोकरी आहे डोअरकीपरची. त्यानंतर इतक्या वर्षांनी चित्रपटाच्या रिलीजच्या दिवशी पूजा करून थिएटरमध्ये पहिल्या शोला प्रेक्षकांच्या रिस्पॉन्ससाठी उभी असते तेव्हा लक्षात येतं, मी डोअरकीपरच्याच जागेवर उभी असते. भूमिका बदलली तरी जागा तीच. पडद्यावरचा आणि थिएटरमधला प्रतिसाद शोधायची. पुढे तीच आवड, तोच छंद कधी व्यवसाय बनला कळलंच नाही.
आज ४० वर्षे अव्याहतपणे हाच व्यवसाय मनाला समाधान, आनंद देतोय. किती आभार मानायचे परमेश्वराचे. कित्येक मंडळी भेटतात. मलासुद्धा लहानपणी खूप आवड होती या क्षेत्राची. अनेकांकडून जेव्हा घरच्यांनी परवानगी नाकारली म्हणून नाइलाजानं डॉक्टर, इंजिनीअर, वकील झालो, नोकरी करीत राहिलो. मन मारून जगत आलो, असं जेव्हा ऐकते तेव्हा कळतं की, अनुभवाचं किती भरभरून ताट आपल्यासमोर आलं. दुसऱ्या कुठल्याच व्यवसायात रमलेच नसते. वयाच्या सतराव्या वर्षी दूरदर्शनवरून बातम्या देताना कुठे माहीत होतं पुढची ४० वर्षे याच वाटेवरून खूप मोठा प्रवास करायचाय. कुठल्याही कॉलेजमध्ये, शाळेमध्ये त्यावेळच्या वातावरणाचे संस्कार मिळणंच अशक्य. सुहासिनी मुळगांवकर, विजया जोगळेकर, याकूब सईद, कमलेश्वर, तबस्सूम, भक्ती बर्वे, विश्वास मेहेंदळे असे शिक्षक ज्या कॉलेजमध्ये होते त्या ठिकाणी शिकलेली मी नशीबवान विद्यार्थिनी. आता लक्षात येतंय त्या वयात जे भरपूर पाहायला, वाचायला मिळालं तेच आतापर्यंत पुरतंय. त्यावेळचा सुरू झालेला कलेचा प्रवास ४० वर्षे सातत्यानं नाटक, चित्रपट, दूरदर्शन, निर्मिती, दिग्दर्शन, डिस्ट्रिब्युशन या सगळ्याच भागांत सहजपणे सुरू आहे. यात कुठेही वैयक्तिक आयुष्यातल्या अडचणी मध्ये आल्या नाहीत. कारण या क्षेत्रावर, त्यातल्या कामावर भरभरून प्रेम केलं. खूप भूमिकांसाठी परकाया प्रवेश  झाला. त्या भूमिकांनी समृद्ध केलं, जगवलं.
१९८३ सालापासून व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल टाकलं आणि ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक, राजकीय सगळ्याच प्रकारच्या नाटकांतून भूमिका करायची संधी आली. तीनही माध्यमांतून काम करताना नाटकाची मजा जास्त जाणवत गेली. रसिकांबरोबरचं नातं आणखी घट्ट होत गेलं. त्या तीन तासांचं राजेपण कुठेच मिळत नाही. खरोखर, स्टेजवर पाऊल टाकलं की आपण राजे असतो. त्या तीन तासांतली भूमिका जगणं हा अनुभव विलक्षण असतो. अजूनही तिसरी घंटा झाली की तेव्हापासून स्टेजवर पाऊल पडेपर्यंतचा पोटातला गोळा आणि छातीतली धडधड कुठेच अनुभवता आली नाही. आतापर्यंत ३० नाटकं रंगमंचावर आली, पण तरीही अजूनही प्रत्येक वेळी हाच अनुभव येतो.
चित्रपट किंवा दूरदर्शनच्या पडद्यावरची प्रत्येक भूमिका मन, शरीर समृद्ध करत गेली, असा अनुभव नाही मिळत, पण तरीही ‘चौकट राजा’सारख्या कलाकृती अपवाद ठरतात. ‘चौकट राजा’नं मला मोठं केलं. मी वयानं, मानानं नाही म्हणत, अनुभवानं मोठं केलं. पहिल्या प्रथम स्क्रिप्ट वाचलं तेव्हा लक्षातही आलं नव्हतं त्यातलं गांभीर्य. पण जेव्हा त्यात शिरत गेले तेव्हा विषयाची खोली लक्षात आली. खरं सांगायचं तर घाबरायला झालं.  इतकं झेपेल ना आपल्याला? कामाला सुरुवात झाली आणि त्यापुढचं वर्ष मंतरल्यासारखं पार झालं. किती पालकांचे, मुलांचे, शिक्षकांचे अनुभव! चित्रीकरणासाठी मुंबईतल्या किती शाळा पाहिल्या. पण मनालाच येईनात आणि कुणी तरी पुण्यातल्या ‘कामायनी’ शाळेचं नाव सुचवलं. स्क्रिप्ट घेऊन शाळेच्या संचालिका सिंधुताई जोशींना भेटले. त्यांनी स्क्रिप्ट वाचलं. म्हणाल्या, फार वरवरचं आहे. नीट अभ्यास करा. मी तुम्हाला केसेस देते. संशोधन करा आणि मग काम करा. त्यानंतरचे १५ दिवस मी संस्थेत होते. वेगवेगळ्या केसेसचा अभ्यास चालला होता. प्रत्येक मूल नव्यानं कळत होतं, जाणवत होती त्यांच्या जगण्यातली वेदना. आणि  बदलांसकट पुन्हा स्क्रिप्ट लिहिलं गेलं. पालकांना आशा द्या, नंदूला मारू नका, आम्हाला माहीत आहे, या मुलांचं आयुष्य कमी असतं, पण तसं दाखवू नका. सिंधुताईंची ही इच्छाही पूर्ण केली आणि ‘चौकट राजा’चा शेवट बदलला. प्रमुख भूमिका मीनल साकारताना मला याचा खूप फायदा झाला कारण स्क्रिप्ट तयार होतानाचा अनुभव पाठीशी होता. प्रत्यक्ष ‘कामायनी’मधल्या चित्रीकरणाच्या वेळी अशोक सराफ आणि दिलीप प्रभावळकरनं कमाल केली. त्या मुलांबरोबर चित्रीकरण करणं सोपी गोष्ट नव्हती. ग्लिसरिनची गरजच पडली नाही. आपोआप या मुलांकडे बघून डोळे भरायचे. ज्या परमेश्वरानं इतकं सुंदर जग निर्माण केलं त्यानंच ही विकृती का जन्माला घालावी? काही प्रश्नांची उत्तरं मिळतच नाहीत. चित्रीकरणाच्या दरम्यान मला सिंधुताई म्हणाल्या होत्या, ‘या मुलांची स्मरणशक्ती खूप अधू असते. त्यांना जूनमध्ये पुन्हा नव्यानं सुरुवात करावी लागते. कारण एप्रिल-मेची सुट्टी मध्ये जाते. ते शिक्षक, शाळा विसरतात. मनानं खूप प्रेमळ,  निस्वार्थी असतात. पण तेवढेच विसरभोळे.’ चित्रीकरण संपताना खूप जड मनानं मी मुलांचा निरोप घेतला. शरीरानं चाळिशीचे असले तरी मनानं मुलंच ती. मेहनतीचं चीज झालं आणि ‘चौकट राजा’ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मी ठरवलंच होतं, या चित्रपटाची कुठलीही यशाची गोष्ट पार्टी देऊन नाही साजरी करायची. प्रत्येक रिलीजचा पहिला शो गतिमंद मुलांच्या शाळेला द्यायचा. पुरस्काराची बातमी आली आणि मी त्याच सुमाराला एका स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणी म्हणून जात  होते. आठवणीनं ‘कामायनी’मध्ये जायचं ठरवलं. पेढय़ांचा पहिला मान त्या मुलांचा होता. सकाळी बक्षीस समारंभाला गेले. समारंभ झाला. माझं भाषण झालं. मी व्हीआयपी रूममध्ये बसले होते. कोपऱ्यात एक पांढरी साडी नेसलेल्या पन्नाशीच्या बाई सारखं सांगत होत्या, ‘मला स्मिता तळवलकरांना भेटायचंय’ आणि आजूबाजूचे कार्यकर्ते सांगत होते, ‘त्यांना वेळ नाही.’ हे बरं असतं. तेच ठरवत असतात, मला वेळ नाही. मलाच शेवटी राहवेना. मी त्या बाईंना आत बोलावलं. ‘नमस्कार, मी मिसेस वैद्य. ज्यांच्या नावानं ही स्पर्धा भरवली जाते त्यांची मी बायको.’ मी चकित झाले. आजूबाजूच्या कार्यकर्त्यांची चलबिचल सुरू झाली. पटकन त्यांना कुणी तरी बसायला खुर्ची दिली. ‘असू दे हो. हे गेले, खुर्ची गेली. मी आपली दरवर्षी त्यांनी सुरू केलेलं हे काम बघायला येते. किती कलाकार, तंत्रज्ञ  तयार होतात इथं. भाषण छान झालं तुमचं. येते मी.’ त्या गेल्यासुद्धा. त्यांना चहा-कॉफी विचारावी हेसुद्धा कुणाला सुचलं नाही. मी मात्र सुन्न झाले. समारंभ झाला आणि मी पेढय़ाचा पुडा घेऊन ‘कामायनी’कडे निघाले. आठवणीनं फोटोंचा अल्बमही घेतला होता. कशी ओळखणार ही मुलं? विसरभोळी असतात. त्यांना आठवणी सांगाव्या लागतील. मी शाळेपाशी पोहोचले. गेट उघडलं. कोपऱ्यात मुलं बागकाम करीत होती. माझ्याकडे ती धावत आली. माझा हात धरला. ‘चौकट राजा’च्या गाण्यात काम केलेला राजू पुढे आला. कुठे पिक्चर? फोटो काढला ना? कुठे फोटो? शूटिंग करूया? त्याच्या मोडक्या तोडक्या शब्दात तो बोलायचा प्रयत्न करत होता आणि एका अनामिक जाणिवेने मी जागीच हादरले. नेमकं कोण गतिमंद आहे? माणूस गेल्यावर त्यांच्या माणसांची आठवण न ठेवता समारंभालाही त्याच्या नातेवाईकांना न बोलावणारे लोक? की विसरभोळी म्हणून समाजानं अधू म्हणून बाजूला टाकलेली तरीही माझी, शूटिंगची आठवण ठेवणारी ही मुलं?  खरी विकृती कुठे आहे? नॉर्मल समजल्या जाणाऱ्या या समाजात की ‘कामायनी’सारख्या शाळांत जाणाऱ्या या मुलांच्यात? केवढी मोठी  जाणीव, केवढा मोठा अनुभव होता हा! कितीही लाखो, करोडो खर्च करून कुठल्याही शाळा, कॉलेजमध्ये न मिळणारा. अशा अनेक अनुभवांनी प्रत्येक कलाकृतीनं समृद्ध केलंय माझं आयुष्य!
माझ्या वैयक्तिक आयुष्यातल्या प्रत्येक संघर्षांच्या वेळी अडचणींच्या वेळी मात करता आली या कलाविश्वामुळे. कारण माझं पॅशन आहे हे विश्व. वयाच्या बाराव्या वर्षांपासून ओळख  झालेलं हे विश्व पुढे तेच आपलं आयुष्य ठरणार हे कुणाला माहिती होतं? या प्रवासात भेटलेले अनेक सहकारी, मार्गदर्शक, सहकलाकार अनुभवविश्व आणखी समृद्ध करत गेले. या कलेच्या आधाराशिवाय जगणं ही कल्पनासुद्धा नकोशी वाटते. गेल्या चार वर्षांत तर आजारानंतर पुन्हा नव्यानं झेप घेता आली तीसुद्धा या कलेमुळे. त्यामुळेच रसिकांचं नातं घट्ट झालं. ‘चौकट राजा’मधली मीनल करता करता स्मिता तळवलकरला समृद्ध करणं फक्त याच क्षेत्राला जमतं. म्हणूनच मी हक्कानं म्हणते, आम्ही या क्षेत्रात काम करणारी देवाची लाडकी लेकरं असतो. देवाचं देणं निगुतीनं प्रेमानं सांभाळणं, जपणं हेच जमावं, जमवावं लागतं. स्वत:ला प्रत्येक क्षणी सांगावं लागतं. ऊतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2013 1:01 am

Web Title: smita talwalkar
Next Stories
1 ‘बोलायाचे आहे काही..’
2 यंत्राची कुरकुर आणि प्रगतीचा वेग
3 पेराल तरच उगवेल!
Just Now!
X