12 July 2020

News Flash

अण्णा

नाटय़तपस्वी भालचंद्र पेंढारकर यांचं नुकतच वृद्धापकाळानं निधन झालं. मराठी संगीत रंगभूमीचे आधारवड असणारे ‘अण्णा’ घरात, मुलांबरोबर कसे होते.

| August 29, 2015 01:56 am

नाटय़तपस्वी भालचंद्र पेंढारकर यांचं नुकतच वृद्धापकाळानं निधन झालं. मराठी संगीत रंगभूमीचे आधारवड असणारे ‘अण्णा’ घरात, मुलांबरोबर कसे होते.या विषयी आपल्या आठवणींना उजाळा दिलाय त्यांच्या कन्या गिरिजा काटदरे यांनी..
माझ्या लहानपणी डोळ्यात साठवलेले अण्णा आज माझ्या मनातून शब्दरूपात साकार होत आहेत. रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे अण्णा माझ्या मनात वडील म्हणून कसे होते ते आज सांगावंसं वाटतं. वडील म्हटलं की त्यांचा घरात एक दरारा असतो, सतत मुलांना  उपदेशाचे डोस पाजणं, काय बरोबर, काय चूक हे दाखवून देणं, त्यांच्या अभ्यासावर लक्ष ठेवणं, क्वचित प्रसंगी रागावणं इत्यादी असे एक सर्वसाधारण ठोकताळे असतात. पण अण्णांना यातील एकही लक्षण लागू होत नव्हतं आणि म्हणूनच वडील म्हणून ते खूप वेगळे होते१९६२ साली आम्ही पुण्यावरून मुंबईला भाटिया हॉस्पिटलच्या समोर ‘फॉरजेट हिल’ इथं नवयुग नगर या ९ मजली इमारतीत राहायला आलो. अण्णांनी स्वत: घेतलेला ८ व्या मजल्यावरचा वन बीएचके फ्लॅट. पुण्याच्या शेणाने सारवलेल्या सदाशिव पेठेतील घरातून मी एका आलिशान फ्लॅटमध्ये आले. मी त्यावेळेस साधारणत: ७-८ वर्षांची होते. स्वत:च्या घरात आल्यामुळे आईच्या चेहऱ्यावरचा आनंद-उत्साह आजही मला आठवतो आहे. तोपर्यंत आम्ही पुण्याहून मुंबईला आलो की अण्णांचे स्नेही नाटय़प्रेमी बाबूराव आणि चंद्रकांत देसाई यांच्या ‘कपूर महाल’ या आलिशान घरात त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग होऊन राहत होतो. पण आता स्वत:च्या घरातला आईचा तो उत्साही वावर आजही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही.त्यावेळेस फॉरजेट हिलवर त्या एरियातील हीच एकमेव उंच कॉस्मोपॉलिटन बिल्डिंग होती. आमचं घर आठव्या मजल्यावर होतं. नवीन इमारत असल्यामुळे लिफ्ट वारंवार बंद असायची. त्यामुळे मला आठवतंय पहिल्याच दिवशी आम्ही आई, अण्णांसकट आठ मजले चढून गेलो. त्यानंतर नवयुगनगर सोडेपर्यंत लिफ्टला गर्दी असली की अण्णांना आठ मजले तुरुतुरु चढून येताना पाहत होते. तिथेच पहिला धडा मेंदूत गिरवला गेला. थांबायचं नाही, ताकद असेल तोपर्यंत चालत राहायचं. अर्थात मी आणि ज्ञानेश ताकद असल्यामुळे ८ मजले सहजच चढून जात होतो. पण अण्णा मात्र नेहमी आमच्या पुढे असायचे.

नवीन फ्लॅटमध्ये प्रवेश झाला. घर खूप सुंदर, हवेशीर, भरपूर उजेड असलेलं होतं. खिडकीतून संपूर्ण मुंबई आणि चौपाटीचा अथांग समुद्र दिसत होता. आईमधील गृहिणी खूप खूश झाली होती. पुढील काही दिवस घर सजवणं आणि शेजाऱ्यापाजाऱ्यांशी ओळख करून घेण्यात गुंतली होती. आणि अचानक एक दिवस अण्णा ५ बाय ५ चे दोन प्लॅटफॉर्म, नाटकाकरता तयार केलेली आरामखुर्ची, दोन लाकडी बैठका, दोन सिंगल बैठका, नाटकासाठीच तयार केलेली एक शोकेस, मोडे, रामकृष्ण परमहंसांचा फोटो, शंकराची सुंदर मूर्ती आणि नाटकातल्याच दरवाजाचा जाडजूड पडदा घेऊन घरी आले आणि एका दिवसात घराचा रंगमंच सजला. अण्णा या नेपथ्यावर खूश होते. आई मात्र थोडीशी नाराज होती. ती म्हणालीसुद्धा ‘‘हे काय घरात सेटिंग उभारलंय.’’ बस्स त्यानंतर नवरा-बायकोच्यात होतो तसा कुठलाही खडाजंगीचा संवाद त्यांच्यात घडला नाही. आम्ही मात्र काही वर्षे या रंगमंचावर आनंदाने बागडत होतो. पुढे काही वर्षांनी आईने हे नेपथ्य कधी बदललं ते अण्णांनाही कळलं नाही. त्यानंतर माझं शाळेत नाव घालण्याचा प्रश्न निर्माण झाला. हल्ली मुलांना कुठल्या शाळेत घालावं, कुठल्या मीडियमला घालावं असे प्रश्न पालकांना भेडसावत असतात. पण शाळा जवळ असल्यामुळे आईनं माझं पालिकेच्या शाळेत तिसऱ्या इयत्तेत नाव घातलं. पण मला वाटतं अण्णांना हे माहीतच नव्हतं की मी म्युनिसिपालटी शाळेत शिकते आहे. चौथीनंतर माझं नाव सेंट कोलंबो शाळेत घातलं आणि मला वाटतं अण्णांना हेही ठाऊक नसावं. कारण बरेचदा अण्णांना कोणी विचारलं की गिरिजा कितवीत आहे, कुठल्या शाळेत आहे, तर तेच प्रश्न ते मला विचारायचे. अण्णांचे हे प्रश्न खूप सहज असायचे. एकदा परीक्षेत मी एका विषयात लाल रेघ घेऊन आले होते. त्यामुळे नेहमी प्रगतिपुस्तकावर पालक म्हणून आईची सही घेणारी मी अण्णा संघात निघाले आहेत असं पाहून हळूच माझं प्रगतिपुस्तक अण्णांच्या समोर सरकवलं. अण्णांनी काय आहे म्हणून विचारलं आणि सही केली. आई नेमकी तेवढय़ात तिकडे आली. तेव्हा मात्र ती चांगलीच रागावली, ‘‘अहो, तुम्ही नीट पाहिलंत का? एका विषयात नापास झाली आहे ती. आणि काहीही न विचारता तुम्ही सही करता?’’ अण्णा हसले आणि म्हणाले, ‘‘हो का, असू दे असू दे.’’हळूहळू आमच्या घरात नट मंडळींची, नातेवाइकांची ये-जा सुरू झाली. घरात नाटकांचं वाचन, नाटकाच्या सुरुवातीच्या बैठय़ा तालमी, चर्चा सुरू झाल्या. कीर्ती, वंदना पंडितसारख्या माझ्या समवयीन कलाकार कधी नाटकाच्या तालमीच्या निमित्तानं तर कधी रामभाऊ जोगळेकर ‘आनंदी गोपाळ’ नाटकाच्या लेखनाच्या निमित्तानं तर कधी कमलाकर सोनटक्के ‘रक्त नको, मज प्रेम हवे’ या नाटकाच्या दिग्दर्शनाच्या निमित्तानं आमच्या कुटुंबाचाच एक भाग होऊन आमच्या घरी राहू लागले. त्यात मला प्रामुख्यानं आठवत आहे ते दोन अण्णांच्या गप्पा आणि चर्चा. अर्थात गप्पा हा शब्द अण्णांसाठी नाही तर विद्याधर गोखले अण्णांच्या करता आहे. नाटकांच्या चर्चेत मात्र अण्णांचा सहभाग असायचा. गोखले अण्णा नाटक आणि इतरही अनेक विषयांवर बोलत असायचे. अण्णा नुसतं ऐकायचं काम करायचे आणि मध्येच एखादी प्रतिक्रिया द्यायचे. आम्ही त्यांच्या आजूबाजूला असायचो. थोडक्यात घरात सूरगंगा आणि सरस्वतीचं वास्तव्य होऊ लागलं होतं. त्यामुळे रोजची जागरणं होत आहेत. सकाळी आम्ही शाळेत जात आहोत की नाही, अभ्यास करतो आहोत की नाही असे वडीलकीचे विचार अण्णांच्या मनात कधीच आले नाहीत.अण्णांना नाटकाव्यतिरिक्त ४ गोष्टी अतिशय प्रिय. इंडियन रेल्वे, इंपोर्टेड वस्तू, टेक्नॉलॉजी आणि कुत्रा. रात्री झोपताना वाचायला काही नसलं तर रेल्वेचं टाईमटेबल घेऊन वाचणारे वडील मी प्रथमच पाहिले. त्यामुळे ट्रेनच्या वेळा त्यांना अचूक पाठ होत्या. आगगाडीच्या छोटय़ा डब्यात म्हणजे पहिल्या वर्गाच्या डब्यामध्ये बसून प्रवास करण्याची गंमत काय असते ती मी त्यांच्यामुळे अनुभवली.अण्णांनी आमचे लाडही जगावेगळे केले. अण्णा माझा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करायचे. वाढदिवसाला ते मला एक रुमाल आणि एक पात्रा सेंटची बाटली द्यायचे. माझ्या एका वाढदिवसाच्या दिवशी संध्याकाळी अण्णा एका हातात प्रोजेक्टर दुसऱ्या हातात एक मोठा डबा आणि मागे गोंडा नावाचा त्यांच्यासारखाच साधा असिस्टंट घरी घेऊन आले. आम्ही भराभर जेवणं आटपली. अण्णा मात्र जेवले नाहीत. आल्यापासून प्रोजेक्टर उघडणं, वायर्स जोडणं, इत्यादी कामात मग्न होते. मग बिल्डिंगमधल्या माझ्या मित्र-मैत्रिणींना बोलावलं आणि आम्ही सगळे भिंतीकडे तोंड करून बसलो. दिवे मालवले आणि भिंतीवर ‘चलती का नाम गाडी’ सिनेमा सुरू झाला. सिनेमा संपल्यावर सगळ्यांना एक चॉक लेट देण्यात आले. अण्णा तो प्रोजेक्टर वायर्स आवरण्यात गुंतले होते. तहान नाही,
भूक नाही. फक्त प्रोजेक्टरवर सिनेमा दाखवण्याच्या आनंदात ते मग्न आणि घरबसल्या सिनेमा पाहायला मिळाला म्हणून आम्ही आनंदात. पुढे माझ्या आणि ज्ञानेशच्या प्रत्येक वाढदिवसाला अण्णांनी सिनेमा दाखवायचा आणि अशी सवय फक्त आम्हालाच नाही तर संपूर्ण बिल्डिंगला लागली. अर्थात त्यानंतर महिन्यातून एक तरी हिंदी, मराठी ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट त्यावेळेचे क्लासिक सिनेमे आम्ही घरबसल्या बघत असू. वाढदिवसाच्या या प्रथेत फक्त एकदाच खूप छान बदल घडला. नेहमीप्रमाणे आम्ही जमलो होतो आणि भिंतीकडे तोंड करून बसलो होतो.  वाटलं होतं सिनेमा सुरू होईल, पण अचानक रामदास पाध्येंची आवडाबाई आणि अर्धवटराव बाहेर आले आणि त्यांनी आम्हाला खूप हसवलं. वाढदिवसाच्या दिवशी अण्णांनी मला दिलेली ही आगळीवेगळी भेट मी कधीही विसरू शकणार नाही.त्यानंतर घरात प्रोजेक्टर, सोनी, अकाइचे टेपरेकॉर्डर अण्णा घेऊन आले. आणि मग त्यावर मी, ज्ञानेश, माझी मावशी आशा आमच्या गाण्यांची रेकॉर्डिग करणं हा एक नवीन छंद सुरू झाला. आम्ही बहुतेक हिंदी चित्रपटांतील गाणी म्हणत असू, पण त्यालाही अण्णांनी विरोध केला नाही. कारण या हिंदी सिनेमांच्या गाण्यांवर रेकॉर्डमधलं म्युझिक मिक्स करणं, दोन ट्रॅकवरील रेकॉर्डिगचं मिक्सिंग एडिट करणं असे नवनवीन प्रयोग करायला अण्णांना खूप आवडायचं (पुढे याचा उपयोग त्यांनी  ३००, ३५० नाटकांचा संग्रह रेकॉर्ड करण्यासाठी केला).बालपणीच्या या प्रवासात मला आठवत नाही अण्णा कधी म्हणाले, ‘‘मी नाटक करून आलो आहे. मी दमलो, थकलो आहे. माझं डोकं दुखतं आहे, पाय दाबून द्या, दंगामस्ती करू नका.’’ कारण ‘नाही’ हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हताच. देहानं ते घरी असायचे. मनाने रंगभूमीवर कायम निळा कोट आणि धोतर नेसणारे शांत, साधे, सात्त्विक, मितभाषी, मितआहार घेणारे अतिशय सकारात्मक असे आमचे अण्णा. ‘बाळपणीचा काळ सुखाचा, आठवतो घडी घडी’ हे देवलांचे हे शब्द अक्षरश: आम्ही जगलो. आमचं बालपण समृद्ध झालं.अण्णांनी आम्हाला वडील म्हणून काही मुद्दाम शिकवलं नाही. आम्ही सहजपणे शिकत गेलो. शिस्त लावली नाही तर शिस्त म्हणजे काय असते ते दाखवलं. संस्कार केले नाहीत, पण आजूबाजूला संस्कारित वातावरण निर्माण केलं. असे हे माझे जगावेगळे वडील आणि अशा या जगावेगळ्या वडिलांना त्यांच्या सुखदु:खात सुंदर साथ दिली ती माझ्या आईने. सगळ्यांची मालूताई. एक उत्तम कलावती, आदर्श गृहिणी कशी असू शकते हे तिनं मला दाखवलं.अण्णा, आई, तुम्ही दिलेले संस्कार आणि कलेचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं बळ आम्हाला लाभो, एवढाच आशीर्वाद द्या.मातृ देवो भव पितृ देवो भव.

गिरिजा काटदरे girijakatdare@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2015 1:56 am

Web Title: story of bhalji pendharkar
Next Stories
1 बदलाच्या शोधातली ग्रामीण स्त्री
2 जगणं मसणाच्या वाटेवरचं
3 निर्गुणी संत
Just Now!
X