|| राजकुमार तांगडे

‘‘माझ्या वयाच्या विसाव्या वर्षांपासून तिसाव्या वर्षांपर्यंतची दहा वर्ष माझ्या आयुष्यातली ‘सुपर इयर्स’. पेरणीची वर्षं. माझ्या भविष्याच्या सुगीची पेरणी. शेतकऱ्यांच्या भाषेत खऱ्या अर्थानं ती धूळपेरणी. काळ्या उन्हाळ्यात कोरडय़ा मातीत बिनधास्त घरातलं आहे नाही ते बी पेरण्यासारखंच ते धाडसाचं होतं. अनोळखी जगाच्या वाटेनं चालणं. पण पूर्ण जाण ठेवून मस्तीत जगलेले ते दिवस. रात्रीपेक्षा दिवसाचं स्वप्नं पाहून त्या दिशेन चालत निघालेली वाट.. ’’ शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, ‘आकडा’, ‘ शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ लिहिणारे नाटककार, अभिनेते राजकु मार तांगडे सांगताहेत त्यांच्या विशी ते तिशीतल्या प्रवासाविषयी..

सिनेमाच्या ‘ट्रेलर’सारखेच आयुष्यातले काहीच क्षण तुमच्या आठवणीत राहातात. त्यावरूनच तुमच्या जगण्याचा पोत कळतो. तुमच्या आयुष्यात खास आठवणी असतात त्या तुमच्या तारुण्याच्या उंबरठय़ावरच्या. तशी १९९५ ते २००५ ही दहा वर्ष माझ्या आयुष्यातली ‘सुपर इयर्स’.

बारावीला नापास झाल्यानं सुमार गोष्टी मिळवण्यासाठी बेसुमार पळापळीला कायमचा ब्रेक लागला होता. ‘तुला खूप शिकायचंय’, ‘नोकरी लागली पाहिजे’, या जाचातून मी मुक्त झालो होतो. आणि माझं आवडतं ठिकाण- माझं गाव सोडण्याची मला आता गरज उरली नव्हती. मला जे काही करायचं ते तिथूनच करायचं होतं.

मला जर कुणी विचारलं, की तुला काय करायचंय तर मी म्हणायचो, ‘‘मी जर ‘एस.टी.’त चढलो तर मला कुणीही उठून जागा दिली पाहिजे!’’ आता मला त्या दिशेनं काम करायला वेळ मिळणार होता. नेमकं काय काम करायचं, ज्यानं आपल्याला लोकं ही जागा देतील हे मात्र कळत नव्हतं. ना वारसा, ना भांडवल, ना मार्गदर्शन.. फक्त ऊर्जा आणि कुठल्याही गोष्टीत सकारात्मकता शोधायची सवय. त्यामुळे काही तरी करून पाहायला सुरुवात केली होती. तशी जागा मिळवायची म्हटलं तर चांगलं वागावं लागेल, जगावं लागेल, हे नक्की कळत होतं. लोक आपल्याला वाईट समजतील असं कुठलंच काम करायचं नाही, ही समज मला घरातूनच मिळाली होती. जवळजवळ माझी सर्वच मित्रमंडळी शाळा सोडून आधीच गावात अवतरली होती. कुणी घरच्या, तर कुणी दुसऱ्याच्या शेतात कामं करत होती. मला त्यांची स्वप्नं किंवा उद्दिष्टं लक्षात येत नव्हती. ते फक्त वारसा हक्कानं आपली काम करताहेत एवढंच जाणवत होतं. मीही त्यांच्यात सामील झालो. पण मला वारसाहक्कानं काहीच करायचं नव्हतं. एक सुरक्षित आणि पोषक जागा म्हणून मी गावात आलो. निसर्गानं दिलेली साडेपाच फूट उंची आणि पस्तीस ते चाळीस किलोचं वजन हे खरं तर शेती करण्यासाठी पुरेसं नसतं.. आणि शेतात काम करताना ते वाढण्याची सुतराम शक्यता नसते. त्यात घरची परिस्थिती जरा नाजूकच होती. इतकी, की असंच एकदा दिवस मावळता शेतातून आल्यावर थकल्यानं काही तरी गोड किंवा इतर काही असावं वाटलं म्हणून आईकडे चहा मागितला. तीही शेतातून थकू न येऊन स्वयंपाकाला लागलेली. मी दोन-चार वेळा म्हटल्यावर आई म्हणाली, ‘‘आता ना वावरातून आल्यावर जेवणच करीत जावा. साखर-पत्तीला लई पहाय-पहाय कराव लागती बघ. सकाळी एकदाच चहा घेतला पाहीजी..’’ एरवी प्रत्येक गोष्टीसाठी हट्ट करणारा मी एकदम सावरलो. बहिणीच्या लग्नानं परिस्थिती अधिकच बिकट झालेली.

मेरिटचा विद्यार्थी असणारा माझा दादा कॉलेज सोडून शेतात काम करू लागला. मला माझं वय आणि शरीर पाहाता एकदम हलकी,सोपी कामं सांगितली जायची. तीही नसती सांगितली, पण आपल्याकडं शेतीत राबताना घरातली माणसंच काय, पण बुजगावण्यालाही कामाला लावलं तरी पोट भरणं मुश्कील असतं. म्हणून माझ्या वाटय़ाला कामं आली. हे सगळं करून, तर कधी दांडी मारून मी मित्रांच्या ओढीनं पाचलाच  गावाकडे यायचो. त्या काळात माझे गावात जवळजवळ मैत्रीचे तीन स्तर तयार झाले होते. एक माझ्या घराभोवतीचे लंगोटीयार, दुसरे वर्गमित्र आणि तिसरे संघटनेचे सहकारी. असे जवळपास तीस-चाळीस जण माझे मित्र. माझे गुरांकडचे मित्र मला दिवसा शेतात भेटायचे. मग कॅनलला पोहणं, सूरपारंब्या खेळणं, मस्ती करणं. पाचच्या नंतर गावात आलं की वर्गमित्र भेटायचे. त्यात सगळ्या गावगप्पा. थोडय़ा फार प्रेमाच्या, पोरांच्या-पोरींच्या, हातच्या-पदरच्या गप्पा, उखाळ्या पाखाळ्या. आणि तिसरा ग्रुप म्हणजे शेतकरी संघटनेचा, जो आम्हाला जगाच्या वर्तमानाबरोबर आमचं अर्थशास्त्र शिकवत होता. आपल्या परिस्थितीला देव-दैव जबाबदार नसून आपल्या घामाचं मोलच मिळू न देणारे जबाबदार कसे आहेत आणि आपणाला त्यांनी कसं भ्रमित केलं आहे, यावर रक्ताळीला येईपर्यंत चर्चा व्हायची. जगात कोणत्या मालाला भाव आहे, त्याला आपल्याकडे किती आहे.. अशा चर्चेत रोज गट पडायचे. आजच्या राजकीय परिस्थिती सारखंच. आज या गटाकडचा उद्या त्या गटाकडून जायचा. त्या गप्पा मात्र मारोतीच्या पारावर नाही तर कुठंही रात्री एक-दोन वाजेपर्यंत चालायच्या. ज्यांची लग्नं झाली, ती हळूहळू एकानं-दुकानं निघून जायची. पण आमच्यासारखे फकीर मात्र विषयाचा कीस काय, भुकटी होईपर्यंत गप्पा मारत, एकमेकांना थांबवून घेत वादविवाद करत बसायचो. त्यात पाच-पाच रुपये ‘सिंगपट्टी’ करून (जमा करून) ‘तऱ्ही’ करायची (म्हणजे तुरीच्या डाळीचं वरण, ज्यात भरपूर मसाले असायचे.). कुणाच्याच घरी फार मसालेदार, चटपटीत होत नसल्यानं त्यात मजा यायची. शाकाहारी लोकांची ती मेजवानी. त्यात घरूनच भाकरी आणाव्या लागायच्या. ज्यानं मला पहिलं नाटक लिहायला लावलं, तो माझा मित्र कवीराज कमीरमीला माझे पैसेपण टाकायचा. मग मस्त गप्पांचा फड रंगायचा. त्यानं चर्चेची तर सवय लागलीच, पण बोलायचं म्हणून माहिती जमवायची सवय लागली. कुणाचं काही ऐकलं तर ते ध्यानात ठेवायचं.. त्या रोजच्या बैठकीनं मैत्रीतही घट्टपणा येत होता. माझं रात्री झोपायचं अंथरुण पांघरुण चार जाग्यावर पडलं होतं. घरी, शेतातल्या आखाडय़ावर, मंदिरात आणि अशोकच्या शिलाई मशीनमध्ये! मी लिहिलेलं त्याला वाचून दाखवायचो. तो माझा चांगला श्रोताच बनला होता. संघटनेची शाखा स्थापन केल्यानं नवाच ट्रॅक मिळाला.

खरं तर आम्हाला नेमकंच मतदान आल्यानं एका राजकीय पक्षाची शाखा स्थापन करायची होती. पण अगोदरच्या शाखा अध्यक्षाला आम्हाला ते करून देण्यात अजिबात रस नव्हता. आणि प्रस्थापित पक्षात काम करावं असं आम्हाला घराणेशाहीचं सर्टिफिकेट नव्हतं. मला जर कुणी तू कुणाचा मुलगा आहेस म्हणून विचारलं आणि मी माझ्या वडिलांचं नाव सांगितलं, ‘लक्ष्मण’, तर समोरचा वेगळ्याच चार लोकांची नावं घेऊन म्हणणार, ‘‘या वाडय़ातले का? त्या वाडय़ातले का?’’ एवढी वडिलांची ओळख.. आपल्यासाठी जो जगातला सगळ्यात मोठा माणूस, त्याला कुणी ओळखत नसेल तर वाईट नाही का वाटणार? म्हणूनच मला ‘एस.टी.’त चढल्यावर लोकांनी उठून जागा देण्याएवढं मोठं व्हायचं होतं.

शाळेतल्या ग्रुपनं मिळून आम्ही मी दहावी नापास झालो तेव्हाच नाटकं बसवायला सुरुवात केली होती. त्यामुळं परिसरातही मित्रपरिवार तयार झाला होता. असंच एकदा शेतकरी संघटनेच्या शाखेची शेजारच्या गावात स्थापना होती. तेव्हा माझा एक मित्र- विष्णू मला आग्रहानं भाषणं ऐकायला घेऊन गेला. गावातले भरपूर लोक आले होते. मी आपलं मागे थांबलो. थोडय़ा वेळानं सभा सुरू झाली, तेवढय़ात आमचा विष्णू गायब झाला.  हळूहळू भाषणं सुरू  झाली. मुख्य वक्त्याचं भाषण बाकी असतानाच अचानक माझं नाव पुकारलं.. ‘‘दोन शब्द बोलतील..,’’ म्हणून. पाठीत एकदम चमक निघाली. विष्णूनंच तो घाव घातला होता. मी उठलो आणि सुरुवात केली. नाटकाचा अनुभव असल्यानं पटकन सावरलो आणि भाषण सुरू के लं. त्या गावातल्यांनी मला नाटकात पाहिलेलं. त्यात मी बोललो, की लोक टाळ्या वाजवत, हसत. सगळ्यांनीच कौतुक केलं आणि खाली उतरलो कीच वडलेसाहेबांनी (लक्ष्मण वडले) मला तालुका अध्यक्ष करायचं ठरवलं. मी त्याला नकार दिला, पण एक कार्यकर्ता म्हणून मी काम करायला सुरुवात केली आणि मला नवीनच वळण मिळालं. आता मला वेगवेगळ्या गावच्या शाखा स्थापनेला वक्ता म्हणून बोलवू लागले. त्यात घरून सांगणं होतं, की ‘‘दिवसभर काम केलं की रात्री तू मोकळा.’’ कार्यक्रमाला जायला परवानगी तर मिळे, पण जायचे वांधे. पैशांची पंचाईत. मग मी आई-वडील-दादा यांच्यापैकी एखाद्याचा चांगला मूड पाहून, पटवून चार-दोन रुपये जायपुरते पैसे घ्यायचो. ताई जर दिवाळी-जत्रेला आली तर चांदीच व्हायची. मला फक्त जायच्या पैशाचीच चिंता. परत येताना वडलेसाहेब पिंपळगाववरून गावाकडचं तिकीट काढून द्यायचे. एकदा तर तात्या (वडले) मला शोधत शोधत शेतात आले. जालन्याला संघटनेची मीटिंग होती. मी औत धरलं होतं. गावातून दोन-तीन पोरं त्यांच्यासोबत आली होती. मला जालन्याला घेऊन जायला. पण अडचण अशी होती, मी लुंगीवरच होतो. कपडे घालायला गावात जावं, तर घरचे असं औत सोडून जाऊ देणार नाहीत. मी तसाच गाडीत बसलो.. गमतीनं म्हटलं, ‘‘चला असंच जाऊ. दक्षिनेतले लोक किती लांब लांब लुंगीवर जातेत. आपुन तर आपल्याच जालन्याला चाललो.’’ आणि बैलाची वैरण-काडी करून मी तसाच जालन्याला मीटिंगला गेलो. संघटनेमुळे परीघ वाढत होता. पण तो परीघ मला अडचणीही निर्माण करू लागला.. मी दादासोबत माळवं विकायला आठवडी बाजारात जायचो. जेव्हा माझी कुणाशीच ओळख नव्हती, तेव्हा मी बाजारात आरडू आरडू माळवं विकायचो. पण ओळखी वाढल्यानं ग्राहकाचं रूपांतर मित्रात झालं, अन् मला माळव्याच्या दुकानावर वानवळाच जास्त वाटावा लागायला. दादाच्या लक्षात हे आलं अन् माझ्या बाजारावर ‘बॅन’ आला. मग मला गावात एक जणानं पार्टनरशिपमध्ये किराणा दुकान टाकून दिलं. आता मात्र माझ्याजवळ पैसे आले (दिवसाचा गल्ला). पण मला हलचुल करायलाही जागा नव्हती. झालं असं, की पारावरची गँग आता दुकानात येऊन बसू लागली. ग्राहकालाच यायला जागा नव्हती. शेवटी दुकानं बसलं.. परत वावरात कामं. मी थोडा वेगळाच राहायचो. सरासरी शर्टच्या गुंडय़ा लावण्यापेक्षा गाठच मारायचो.. गावातून म्हशींवर बसूनपण यायचो.. एवढय़ा सगळ्या गोष्टी जरी बिनधास्त करत असलो, तरी लेखनासाठी सोबत असलेली वही मात्र मी बनियनच्या आतूनच घेऊन जायचो! गावात येता जाता ती लपवलेलीच असायची.

माझ्या अकरावी-बारावीच्या तमाम कोऱ्या वह्य़ांनी मला कुणाकडे हात पसरावयाचं काम ठेवलं नव्हतं. पण ज्या दिवशी मी वही शेतात नेली, त्या दिवशी म्हशीचं-बैलाचं गाऱ्हाणं आलंच समजा. याच्या कापसाची झाडं खाल्ली, त्याची ज्वारी खाल्ली! त्याचं व्हायचं असं,

म्हैस-बैल चरण्यात गुंग आहे, हे पाहून मी लिहायला बसायचो आणि मी लिखाणात गुंग झालो, हे पाहून म्हैस कुणाच्या तरी धनात चरायची. त्यामुळे माझ्या वहीवर त्यांची करडी नजर असायची. मी ‘यातना’ नाटक लिहिताना धुवाधार पाऊस चालू होता आणि मी वळणावर पोत्याचा घोंगटा करून लिहीत होतो. तेवढय़ात माझी कांडी संपली. मी पॉइंट काढून कांडीत पाण्याचा थेंब भरत होतो. माझ्याजवळ पेन कधी टिकलं नाही, पण कांडी मात्र सतत सोबत. मी लहानपणी खूप मितभाषी होतो. एकदा आमच्या सरांनी ‘गरीब गाय आणि पोटात पाय’ ही म्हण समजावून सांगताना एका कोपऱ्यात चूपचाप बसलेल्या माझ्याकडे बोट केलं होतं. नंतर नंतर मी खूप बोलायला लागलो. इतका, की मग मला सर्टिफिकेट मिळायला लागलं, ‘ते लई शहानं आहे’ म्हणून! या अशा बोलण्यानं मी एकदा गावाच्या नजरेत ‘महापापी’च्या यादीत जाऊन बसलो होतो. एकदा तर मी आमच्या आमदाराला वेशीतच अडवून त्यांनी गावाला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. तेव्हाही चांगलाच गदारोळ झाला. आता मात्र अवखळ प्रतिमा बनत होती. पण घरून या सगळ्या कारनाम्याला पाठिंबा मिळायचा. दादा खंबीर होता. त्यानं मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं.

या दहा वर्षांत मला आणखी दोन माणसं भेटली. लक्ष्मण वडले (तात्या- जे पुढे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष झाले.) आणि नंदू माधव. माझा भाऊ- दादानं मला स्वातंत्र्य आणि पाठबळ दिलं, तात्यानं मला विचाराचा रस्ता दिला आणि नंदू माधवांनी मला मुख्य प्रवाहात आणलं. मला मित्र खूप ताकदीचे भेटले. त्यामुळे चळवळ्या स्वभावाला खतपाणी मिळालं. एकदा तात्यांबरोबर एका कारखान्यावरच्या मोर्चाच्या प्रचाराला औरंगाबाद जिल्ह्य़ात गेलो. वय चोवीस वर्ष होतं. आमच्या गाडीवरच्या ड्रायव्हरशी गट्टी झाली. त्यानं माझ्या लग्नाबद्दल विषय काढला. विधवेशी लग्न करण्याचा माझा विचार होता. मी म्हणालो, ‘‘पण घरच्यांना कसं सांगायचं.. ती विधवा आहे?’’ त्या ड्रायव्हरनं आयडिया दिली, ‘‘तू त्यांना मुलगी विधवा आहे असं नको सांगू.. हळदीच्या अंगानं नवरा वारला म्हणून सांग.’’ हे सगळं डोक्यात घेऊन घरी आलो. तोपर्यंत घरच्यांनी मामाला जाऊन पोरगी मागितली होती. हुंडा न घेण्याच्या अटीवर मामाच्या पोरीशी मी लग्न केलं. माझं हुंडाबळीवरचं ‘बहीन माझी प्रितीची’ हे नाटक मंचावर आलं होतं. लग्न झाल्यावर मला पायकुट बसेल हा समज फोल ठरला. लग्न झालं कीच मी बायकोला पटवून ‘काय दिलं स्वातंत्र्यानं’ हे माझं शेतकरी आत्महत्यांवर लिहिलेलं आणि संभाजीनं (संभाजी तांगडे) बसवलेलं नाटक साधारण २००० मध्येच केलं. त्यात रात्री तालीम असायची, दिवसा शेतात. नवीन लग्न झाल्यावर हा पराक्रम म्हणजे घटस्फोटाला आमंत्रणच होतं! पण आमच्याकडे तो रिवाज नसल्यानं धकून जातं. त्या नाटकांनंतर आम्ही पुस्तक केलं. संभाजी औरंगाबादला ‘एम.ए.’ला शिकायला असताना मला बाड घेऊन बोलवायचा. आम्ही दोघं ते वेगवेगळ्या लोकांना दाखवत फिरायचो. त्याचं म्हणणं असायचं, ‘‘राजा, तोह्य़ासारखं इथं कोन्हीच लिहीत नाही रे.. पण हे कळणारा भेटावं.’’ आम्ही कुणालाही भेटायचो. त्यातूनच एक जणानं वीस हजार रुपये घेऊन आमचं पुस्तकं काढतो म्हणून सांगितलं. तिकिटाला वीस रुपये नसणारे आम्ही हो म्हणलो. आमचे स्नेही- संघटनेच्या संजूदादानं दहा हजार दिले, पण उरलेले.. अजून आमचं पुस्तक तिथंच पडलेलं आहे. त्या प्रकाशकानं पत्र पाठवलं, धमक्या दिल्या.. पण पैसेच नसल्यावर काय.. आम्ही शेतकरी लोक. आम्हाला कुणाचंच बुडवायचं नसतं, पण नसल्यावर काय?

त्या दहा वर्षांत मी खुल्या विश्वाच्या विद्यालयात पदवी घेत होतो. आंदोलनं, मोर्चे, मला सजग बनवत होते. नाटकातून माझी धुमस बाहेर पडत होती आणि समाज मला वारंवार जाणीव करून द्यायचा, तू आणि मी वेगळे नाहीत.. माझे प्रश्न हेच तुझे आहेत. त्यानं त्या काळात मला कधीच एकटय़ाला सोडलं नाही.. आणि मीही कायम समाजासोबतच राहिलो. आपण कायम सार्वजनिक वाहनानं प्रवास करणार आहोत, ही खूणगाठ कदाचित तेव्हापासूनच माझ्या मनात पक्की असावी. नाटकाच्या प्रयोगांसाठी ‘एस.टी.’नं, ट्रेननं जाण्याचे प्रसंग नेहमी येतात. ‘जनरल’मधून जाताना प्रत्येक वेळी हटकून कुणी ना कुणी ओळखीचं भेटतंच आणि मला बसायला जागा मिळते!

rajkumar.tangade@gmail.com