दीडशे वर्षांच्या इंग्रजी राजवटीच्या गुलामगिरीच्या मानसिकतेचा परिणाम म्हणा किंवा लोकांचा आग्रह म्हणा ‘गोरी बायको हवी’ अशा विचारसरणीचा जमाना होता तो! त्या काळात जन्म घेतलेली आणि वर्णानं काळी अशी एक मुलगी होते मी.
क ळायला लागल्यापासून सतत ‘तुमच्या घरातले सगळे गोरे आणि हीच कशी बाई काळी झाली?,’ ‘कसं होणार हिचं?’ (म्हणजे लग्न बरं का!) नातलग, ओळखीपाळखीचे असे सगळय़ांचे शेरे ऐकतच माझं बालपण, शालेय तसंच कॉलेज जीवन चालू होतं. ‘गडद रंगाचे कपडे घालू नकोस,’ ‘दोन्ही खांद्यांवरून पदर घ्यावा’ असले सल्ले पचवताना, शाब्दिक वाग्बाण झेलता झेलता माझ्या मनात खरंच न्यूनगंड निर्माण झाला होता,ं पण अचानक जादू झाली व एम. ए. करताना मला एक नवी मैत्रीण मिळाली. मेतकूट जमलं आमचं आणि केवळ तिच्या नजरेनं टिपलेले माझे इतर गुण मला खूप बळ देऊन गेले. ‘अगं पण हा डार्क रंग असला म्हणून काय झालं, तुझ्या अंगावर खूप खुलतोय. घेच तू ही साडी, ‘तुझी उंची, फीचर्स किती छान आहेत आणि जोडीला मस्त स्वभाव.’ ‘चल मी तुझी हेअर स्टाइलच बदलून टाकते.’ ‘आधी तो रंगाचा विचार काढून टाक मनातला’ असं तिचं सकारात्मक प्रोत्साहन मिळाल्यावर माझ्या आयुष्यानं एक मानसिक यू-टर्नच मारला आणि हरवलेला आत्मविश्वास गवसला. तो माझ्या वागण्या-बोलण्यात-चालण्यात दिसू लागला आणि ‘केवळ गोरा वर्ण म्हणजेच ग्रेट’ हा विचारही मनातून नाहीसा झाला. आश्चर्य म्हणजे त्यानंतर रंगावरून खरंच मला कोणीही टोमणे मारले नाहीत.
पुढचा टर्निग पॉइंट आला, लग्नानंतर तब्बल सोळा वर्षांनी. सासरी नोकरी करणारी सून नको म्हणून लग्नाआधीच नोकरी सोडली. अर्थात नंतर दोन मुलांना मोठं करण्यात त्यांच्यावर उत्तम संस्कार करण्यात, भरपूर वेळ देऊन घालवलेला काळही उत्तमच होता. परंतु जेव्हा आर्मी लाइफ सोडून परत पुण्यात स्थायिक होण्याचं ठरवल्यावर तेव्हा दिल्लीतल्या माझ्या एका पंजाबी मैत्रिणीनं (ज्योती पुरी ही स्वत: डॉक्टर आहे) मला कळकळीनं सांगितलं, ‘उषा अब बहोत हो गया! पूना जाते ही तुरंत जॉब ढूंढो और अपनी अलग पहचान बनाओ।’ खूप विचार केल्यावर मला पटलं तिचं म्हणणं. पुण्यात आल्यावर फोटोग्राफीसारख्या नव्या क्षेत्रात शिरून परत नोकरी करायला लागले. घर, मुलं व नोकरी अशी तारेवरची कसरत कधीच जाचक वाटली नाही, उलट वेगवेगळय़ा अनुभवांमुळे नवा दृष्टिकोन मिळाला. बॉसच्या पत्नीनं अमेरिकेहून आणलेलं ‘चिकन सूप फॉर द सोल’ हे इंग्रजी पुस्तक वाचून तर उत्साह अधिकच वाढला.
परंतु नंतर आयुष्य एका ठरावीक चकोरीतून जात राहिल्यामुळे तोचतोचपणाचाही कंटाळा येऊ लागला. एव्हाना आमचा मुलगा अमेरिकेला गेल्यामुळे तिकडे जाण्याचे वेध लागायला सुरुवात झाली होती. खासगी नोकऱ्यांमध्ये सुटय़ांचा प्रश्न असतो, त्यामुळे दहा-अकरा वर्षे करीत आलेली नोकरी सोडून दिली आणि अमेरिकेची पहिलीवहिली वारी करून आलो.
पूर्वी वाचलेल्या ‘चिकन सूप फॉर द सोल’ या पुस्तकानं मनात कुठेतरी घर केलेलंच होतं. त्या मालिकेमधली पुस्तकं भारतातही उपलब्ध होऊ लागली होती. मग बरीच पुस्तकं खरेदी करून वाचून काढली. मनाला भावणाऱ्या त्यातल्या कथा मी आईला ऐकवत असायचे. आईच्या डोक्यात एक कल्पना आली. त्या कथांचा मी मराठी अनुवाद करावा म्हणून ती माझ्या मागे लागली. आणि मग काय माझ्या आयुष्यात आला आणखी एक टर्निग पॉइंट. ‘चतुरंग’ (२००३) मध्ये वर्षभर माझा हा अनुवाद छापला गेला. वाचकांच्या प्रतिसादामुळे एका पाठोपाठ एक करीत या मालिकेतील पाच पुस्तकं व इतर विषयावरच्या दोन पुस्तकांचा मराठी अनुवाद करून मी अनुवाद क्षेत्रात बऱ्यापैकी नाव कमावलंय. माझ्या आयुष्यात तीन टर्निग पॉइंट आले, पण त्या तिघांनी मला समृद्धच केलं.
संग्रहित लेख, दिनांक 20th Sep 2014 रोजी प्रकाशित
काळय़ा रंगाचा न्यूनगंड
दीडशे वर्षांच्या इंग्रजी राजवटीच्या गुलामगिरीच्या मानसिकतेचा परिणाम म्हणा किंवा लोकांचा आग्रह म्हणा ‘गोरी बायको हवी’ अशा विचारसरणीचा जमाना होता तो!

First published on: 20-09-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three thing bring turning points in my life