19 September 2020

News Flash

महामोहजाल : ‘सोशल’ युगातल्या ‘ट्रोलधाडी’!

ट्रोलिंग म्हणजे काय आणि कसा करावा त्याचा सामना याविषयी..

समाजमाध्यमांद्वारे आपण नामवंत व्यक्ती आणि सेलिब्रिटींच्या संपर्कात राहू शकतो, हे कळल्यानंतर सुरुवातीला वाटणारं कौतुक हे विविध सेलिब्रिटींवरच्या  ‘ट्रोलिंग’च्या घटनांनंतर साशंकतेत बदललं.

प्रसाद शिरगांवकर – prasad@aadii.net

समाजमाध्यमांद्वारे आपण नामवंत व्यक्ती आणि सेलिब्रिटींच्या संपर्कात राहू शकतो, हे कळल्यानंतर सुरुवातीला वाटणारं कौतुक हे विविध सेलिब्रिटींवरच्या  ‘ट्रोलिंग’च्या घटनांनंतर साशंकतेत बदललं. जेव्हा ट्रोलिंग खुलेआम मानसिक िंहंसाचारात परावर्तित झालं, तेव्हा त्यानं अधिक गंभीर रूप घेतलं. मग ट्रोलिंगचे सामाजिक, मानसिक असे विविध पैलू समोर यायला लागले.  ट्रोलिंग म्हणजे काय आणि कसा करावा त्याचा सामना याविषयी..

एखाद्या व्यक्तीविरुद्ध विविध समाजमाध्यमांमध्ये झुंडीनं गरळ ओकणं याला ‘ट्रोल करणं’ असं म्हणतात. मनात काही आकस ठेवून, कधी पूर्वग्रहामुळे किंवा केवळ ‘गंमत’ म्हणूनही एखाद्या माणसाविरुद्ध राळ उठवणं आणि त्याच्या व्यक्तिगत आयुष्यावर शिव्या-शाप, बदनामी, धमक्यांची ‘टोळधाड’ घालणं हे या ट्रोल करणाऱ्या व्यक्ती करत असतात. उनाड, उडाणटप्पू आणि टोळासारखी उगाचच नासाडी करत फिरणाऱ्या दांडगट माणसांना पूर्वी ‘टोळभैरव’ म्हणायचे. तसं ऑनलाइन टोळधाडी घालणाऱ्या माणसांना ‘ट्रोलभैरव’ आणि त्यांच्या ऑनलाइन धुडगुसाला ‘ट्रोलधाड’ म्हणता येईल!

गेल्या काही वर्षांमध्ये अनेक कलाकार, लेखक, विचारवंतांपासून ते राजकीय-सामाजिक नेते, राज्य वा केंद्रातले मंत्री आणि अगदी समाजमाध्यमांवरील सेलिब्रिटींनाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. कु णाचीही एखादी कृती, एखादी घटना, समाजमाध्यमावरची एखादी पोस्ट, एखादा फोटो, त्यांनी केलेलं एखादं विधान, अशा कोणत्याही गोष्टीवरून अचानक ट्रोलिंग सुरू होतं आणि काही तासांमध्ये हजारो ट्रोल्सच्या ‘कमेंट्स’चा (प्रतिक्रियांचा) पाऊस त्यांच्या प्रोफाइलवर येऊन पडतो. हे अक्षरश: कोणाच्याही बाबतीत घडू शकतं, पण सेलिब्रिटी लोकांच्या बाबतीत होण्याची शक्यता खूप जास्त असते. कोणत्याही क्षेत्रात प्रसिद्धी मिळालेले लोक- अर्थात सेलिब्रिटी हे ट्रोलिंगसाठी अत्यंत सोपं आणि आकर्षक लक्ष्य (‘टार्गेट’) असतात. सोपं यासाठी, की त्यांच्या कामाच्या स्वरूपामुळे त्यांची समाजमाध्यमांवरची प्रोफाइल्स खुली असतात.   कु णीही ती बघू शकतं, त्यांना ‘टॅग’ करू शकतं, त्यांनी टाकलेल्या पोस्टवर (बहुसंख्य वेळा) कमेंट्सदेखील करू शकतं. आकर्षक यासाठी, की त्यांना हजारो, लाखो ‘फॉलोअर्स’ असतात. त्यामुळे सेलिब्रिटींना लक्ष्य करून किंवा टॅग करून केलेल्या पोस्ट हजारो-लाखो लोकांपर्यंत क्षणार्धात पोहोचू शकतात आणि ट्रोल करणाऱ्या व्यक्तीला क्षणिक सेलिब्रिटीपद मिळवल्याचा भास होतो. शिवाय सेलिब्रिटी लोकांविषयी सुप्त मत्सर आणि काहीसा राग हा असतोच अनेकांच्या मनात. तो जाहीरपणे व्यक्त करण्याची आयती संधीही मिळते यानिमित्तानं.

काही ट्रोल मात्र या एखाद्दुसऱ्या प्रतिक्रियेच्या क्षणिक आनंदाच्या पुढे जाऊन, त्या व्यक्तीला दिसेल तिथे ट्रोल करत राहण्यापासून ते फोन करून धमक्या देण्यापर्यंत, अन् प्रत्यक्ष गाठून मारहाण करण्यापर्यंत प्रगतीही (?) करतात हल्ली. यात ज्या व्यक्तीस ट्रोल केलं जातं ती स्त्री असेल तर ट्रोल करण्याच्या पद्धती जास्त भीषण आणि मानसिकदृष्टय़ा हिंसक झालेल्या दिसतात. स्त्रियांविरुद्ध ट्रोल्सची सगळ्यात मोठी पद्धत म्हणजे तिचं चारित्र्यहनन करणं. त्या स्त्रीविषयी वाटेल ती विधानं समाजमाध्यमांवर सरसकट  ठोकू न दिली जातात आणि मग तिच्या व्यक्तिगत आयुष्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत ऑनलाइन टीकाटिप्पणी करणं सुरू राहतं. स्त्रियांचं चारित्र्यहनन हे समाजात एक अमोघ शस्त्र असल्यासारखं वापरलं जातं. आपल्याला न बधणाऱ्या, आपल्या विचारांच्या विरुद्ध विचार करणाऱ्या, आपल्याहून जास्त यशस्वी होणाऱ्या, आपल्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या, अशा कोणात्याही स्त्रीचं चारित्र्यहनन करणं आपल्या समाजात खूप सोपं असतं. समाजमाध्यमांमुळे कु णीही कु णाचंही चारित्र्यहनन करणं सहज शक्य होत आहे. याशिवाय ज्याला ट्रोलिंग करायचं त्याला खुनाच्या किंवा त्याच्या कुटुंबातल्या स्त्रीवर बलात्काराच्या ऑनलाइन धमक्या देणं, हा ट्रोलिंगचा टोकाचा भीषण आविष्कार.

ट्रोलिंग का केलं जात असावं?

‘फेसबुक’, ‘ट्विटर’, ‘इन्स्टाग्रॅम’ यांसारखी समाजमाध्यमं जगातल्या सर्वासाठी मुक्त आणि खुली आहेत. इथे अकाउंट उघडणं आणि त्यावर काहीही पोस्ट करणं हे अगदी सहज आणि सोपं आहे. या सोपेपणामुळेच समाजमाध्यमं हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग बनत चालला आहे. ही माध्यमं हा के वळ फावल्या वेळातला विरंगुळा किंवा मनोरंजन म्हणून वापरणारे लोक आहेत, व्यक्त होण्यासाठी वापरणारे लोक आहेत, आपल्या विचारसरणीचा, कामाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी वापरणारे लोक  आहेत आणि सकारात्मक कारणांसोबत काही नकारात्मक कारणांसाठी वापरणारे लोकही आहेत.

एखाद्या व्यक्तीला ‘ट्रोल’ करणं हा समाजमाध्यमांचा सगळ्यांत मोठा नकारात्मक वापर. पण गंमत अशी आहे, की असा नकारात्मक वापर- म्हणजे ट्रोलिंग करणाऱ्या बहुसंख्य लोकांना आपण ट्रोलिंग करत आहोत याची जाणीवही नसते. ‘कसला हाणला त्याला’ किंवा ‘कसली मुस्कटात मारली तिला’ असा क्षणिक सूडात्मक आनंद मिळवणं आणि अचकटातली विचकट प्रतिक्रिया टाकून ‘आमच्या टोळक्यात मीच सगळ्यांत भारी’ असा टेंभा मिरवणं, याच्या पलीकडे यातल्या बहुसंख्य ट्रोलांना काहीही नको असतं, अन् मिळतही नाही. पण मुळात हे करण्यामागे काय मानसिकता असावी हा विचार करता काही मुद्दे समोर येतात-

समाजमाध्यमांवर खोटय़ा ओळखीच्या मुखवटय़ामागे लपता येतं. प्रत्यक्ष आयुष्यात आपण चारचौघांत जे बोलणार नाही, ते बोलण्याचं धारिष्टय़ या मुखवटय़ामुळे मिळतं. एखादी व्यक्ती प्रत्यक्षात भेटल्यावर तिच्या तोंडावर आपण जे बोलू शकणार नाही तशा प्रकारची, अन् तशा भाषेतली ‘कमेंट’ सोशल मीडियावर करणं हे खूप सोपं असतं. या मुखवटय़ामुळे मिळालेल्या अनामिकतेमुळे कोणावरही कोणत्याही भाषेत गरळ ओकणं सहजसाध्य बनतं. व्यक्तिगत आयुष्यात असलेलं नैराश्य, वैफल्यग्रस्तता किंवा यशस्वी माणसांविषयीचा मत्सर हा ट्रोलिंग करून व्यक्त केला जात असण्याची शक्यता आहे. या कारणांसोबतच राजकीय किंवा धार्मिक विषयांसारख्या अस्मिताजन्य विषयांवरून केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगला इतरही काही पदर असतात. जात, धर्म, देव, भाषा, प्रांत, राजकीय पक्ष या विषयीच्या अस्मिता सध्या टोकदार बनल्या आहेत. आपल्या कोणत्याही अस्मितेच्या टोकावर कु णाही माणसाच्या विचारांनी घाला घातला, की त्यास जोरदार विरोध करणं ही मानसिकता बनत चालली आहे. मग त्यांना विरोध करण्यासाठी आपल्यासारखीच अस्मिता असणाऱ्या ‘टोळी’चा आधार घेऊन आपल्या भावना दुखावणाऱ्यावर ट्रोलधाड टाकणं हे घडत असावं.

‘ट्रोलिंग’ हे ‘हायपर कनेक्टेड सोशल मीडिया युगा’चं न टाळता येणारं भीषण वास्तव बनलं आहे. ट्रोलिंगच्या पद्धती, प्रमाण आणि वारंवारिता अत्यंत वेगानं वाढत चालली आहे. आपल्या मताविरुद्ध मत व्यक्त करणारी व्यक्ती, आपली आवडती विचारधारा वा राजकीय पक्षाला विरोध करणारी व्यक्ती, आपल्याला न पटणारे विचार मांडणारी व्यक्ती दिसली रे दिसली, की तिच्यावर ट्रोलधाड टाकणं हा एक प्रकारचा नवा नियम असल्यासारखा बनत चालला आहे. आपली वैचारिक टोळी निवडायची आणि विरुद्ध टोळीतल्या वाटणाऱ्या माणसावर टोळीनं धाड टाकायची ही समाजमाध्यमांवरच्या सामाजिक वावराची नवी पद्धत बनत चालली आहे.

मात्र या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते. सर्वच सेलिब्रिटी लोकांच्या सर्वच पोस्ट साळसूदपणे केलेल्या असतात आणि त्यातल्या काहींना लक्ष्य करून ट्रोलिंग केलं जातं असंच संपूर्ण चित्र नाहीये. काही जण काही विवादास्पद पोस्ट जाणूनबुजून करत असावेत अन् त्यावर ट्रोलिंगची राळ उडून प्रसिद्धीच्या झोतात राहात असावेत असं मानायला जागा आहे. ट्रोल करणाऱ्या लोकांची जशी इतरांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याची मानसिकता असते, तशी स्वत:वर जाणूनबुजून ट्रोलिंग ओढवून घेणाऱ्यांचीही असू शकते. त्यामुळे ऑनलाइन ट्रोलिंगच्या या खेळात ट्रोलिंग करणारे जितके दोषी असतात तितकेच, काही वेळा, स्वत:वर ट्रोलिंग ओढवून घेणारेही दोषी असू शकतात.

ट्रोलिंगचा सामना कसा करावा?

आपल्या समाजमाध्यमांवरील प्रोफाइलवर पडणारी ट्रोलधाड थांबवता येणं जवळपास अशक्य असतं. मात्र आपल्यावर ट्रोलिंग होऊ नये म्हणून किंवा झालं तर त्यानं फार नुकसान होऊ नये म्हणून काही उपाय करता येतात. सगळ्यांत पहिला उपाय म्हणजे समाजमाध्यमं हे खुलं जाहीर व्यासपीठ आहे हे लक्षात ठेवून तिथे जे व्यक्त व्हायचंय, जे पोस्ट करायचंय ते अत्यंत जबाबदारीनं करणं. ज्यांना हजारो-लाखो फॉलोअर्स आहेत त्यांनी हे करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आपली प्रत्येक पोस्ट, फोटो, प्रतिक्रिया हजारो-लाखो जण वाचणार आहेत, ती सूक्ष्मदर्शकाखाली घेऊन त्याचं विश्लेषण केलं जाणार आहे, अन् त्यावर लोक व्यक्त होणार आहेत, याची जाणीव प्रत्येक सेलिब्रिटीनं ठेवली पाहिजे. आपण कुठले द्वेषमूलक विचार मांडतो आहोत का, आपण आपल्या भल्या-बुऱ्या अस्मितांच्या धारणांमधून काही मांडतो आहोत का, त्याचाही विचार प्रत्येकानं केला पाहिजे अन् या सगळ्याचा विचार करून समाजमाध्यमांवर अत्यंत प्रगल्भपणे व्यक्त झालं पाहिजे.

अत्यंत प्रामाणिकपणे आपण हे केल्यावरही जर आपल्यावर ट्रोलिंग झालं, तर एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवायचा- ट्रोलांना इंधन द्यायचं नाही!- अर्थात ‘डोन्ट फीड दी ट्रोल्स’. आपल्या पोस्टवर ट्रोल करणाऱ्या लोकांशी वाद घालणं, ते ट्रोल करत आहेत अशा पोस्ट टाकणं, ट्रोल लोकांची विनाकारण माफी मागणं, इत्यादी साऱ्या गोष्टी या ट्रोलांना दिलेलं इंधन असतं. ते पूर्णपणे टाळावं. आपल्यावरच्या ट्रोलिंगला अजिबात इंधन देऊ नये. उलट काहीही चर्चा न करता आपल्याला ट्रोल करणाऱ्या प्रतिक्रिया ‘डिलीट’ करणं, आपल्याला ट्रोल करणाऱ्यांना ‘ब्लॉक’ करणं, ही साधनं समाजमाध्यमांवर उपलब्ध असतात. ती वापरावीत. याशिवाय आपल्याला कोणी धमक्या देत असेल, तर त्यांची अकाउंट्स ‘रिपोर्ट’ करणं, किंवा त्यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रारी नोंदवणं, हेही करता येतं अन् केलं पाहिजे. त्याहीपलीकडे जाऊन आपण अत्यंत मनापासूनचे आपले विचार मांडले असतील, आपण आपल्या आयुष्यातल्या खऱ्याखुऱ्या घटना जगासोबत ‘शेअर’ केल्या असतील, आणि त्यावर कोणी ट्रोलिंग करत असेल, तर पूर्णपणे दुर्लक्ष करणंही जमलं पाहिजे.

ट्रोलिंगशी सामना करण्यासाठी डिलीट किं वा ब्लॉक ही ऑनलाइन टूल्स, तक्रार वा खटले हे कायदेशीर मार्ग, आणि दुर्लक्ष करणं हा सर्वसामान्य मार्ग, हे तिन्ही वापरता येऊ शकतात, आणि वापरले पाहिजेत.

शेवटी, समाजमाध्यमं आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे एक व्यक्ती हजारो-लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकते, तसंच हजारो-लाखो लोकही एका व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतात. हा अव्याहतपणे सुरू असलेला सामाजिक संवाद कोणत्याही कारणानं, कोणत्याही क्षणी नियंत्रणाबाहेर जाऊन त्यातून ट्रोलिंगरूपी वावटळीपासून त्सुनामी वा तुफान असं काहीही निर्माण होऊ शकतं. हे होऊ नये याची काळजी घेणं आपल्या हातात असतं. सर्व काळजी घेऊनही जर आपल्यावर ट्रोलधाड पडलीच तर तिच्याशी समर्थपणे लढताही आलं पाहिजे. हे ‘ट्रोलयुग’ आहे, याची जाणीव ठेवूनच समाजमाध्यमांवर व्यक्त झालं पाहिजे!

(लेखक मुक्तस्रोत तंत्रज्ञानामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे प्रशिक्षक व वक्ते आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2020 12:43 am

Web Title: trollers trolling on social media mahamohajal dd70
Next Stories
1 सायक्रोस्कोप : सुखनिवास
2 न्यायालयाचे न्याय्य पाऊल
3 मिशन मंगल!
Just Now!
X