16 January 2021

News Flash

व्यर्थ चिंता नको रे : जन्म : माणसाचा आणि अस्वस्थतेचा!

कधी कधी आपल्याला एकांत आवडतो. पण एकांताचा अतिरेक झाला तर तो ‘एकांतवास’ होतो नि खायला उठतो.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. आशीष देशपांडे

माणूस जन्माला आला.. जगायला लागला..  जगण्यासाठी काही गोष्टी मिळवू लागला.. आणि त्यातूनच अपेक्षा निर्माण होऊ लागल्या. कधी त्या पूर्ण झाल्या तर कधी ती अपेक्षापूर्ती धूसर दिसायला लागली आणि जन्म झाला तो बेचैनीचा, अस्वस्थतेचा, चिंतेचा. माणसाच्या आयुष्यात या गोष्टी अपरिहार्यपणे येतातच. गेलं वर्ष ‘करोना’मुळे आपण ज्या मानसिक चिंतेत, बेचैनीत काढलं त्यामागेही प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असणारच आहेत. कसा उगम होतो या चिंता, बेचैनीचा आणि त्यावर मात कशी करता येईल, हे सांगणारं हे नवकोरं सदर आजपासून दर पंधरवडय़ाला.

नमस्कार मित्रांनो! मानसशास्त्र नि मानसोपचार या विषयावर ‘लोकसत्ता’मध्ये आत्तापर्यंत बरंच काही लिहिलं गेलं आहे. मग बेचैनी, चिंता, काळजी, यावर नवीन काही का? गेल्या वर्षी मार्चपासूनच आपण सर्वच एका वेगळ्या संक्रमणातनं जात आहोत. असं वाटतंय की कुठंतरी याचा अंत जवळपास आलाय. ‘दुसरी, तिसरी लाट’, ‘लस’, ‘समूह- रोगप्रतिबंधकशक्ती’, असे काही दिलासा देणारे नि काही घाबरवणारे शब्द पुन:पुन्हा ऐकून नवीन वर्षांत आपल्यासाठी काय वाढून ठेवलंय, याविषयीचे तर्क  लढवतो आहोत.

तुकारामबुवा ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ म्हणतात, तसे अनेक छोटे छोटे समरप्रसंग आपल्या सर्वाच्याच आयुष्यात येत आहेत, येणार आहेत. नि रामदासांसारखे समर्थ मनाचे संतदेखील ‘अचपळ मन माझे नावरे आवरीता’ म्हणून अशा क्षणी विवंचनेतनं येणारी व्याकुळता, असहायता अनुभवतात. मग आपण कोण! थोडक्यात शरीरावर हल्ला करणारा विषाणू जाता जाता मनात वसू नये म्हणून हा ‘पुन्हा प्रपंच’.

कधी कधी आपल्याला एकांत आवडतो. पण एकांताचा अतिरेक झाला तर तो ‘एकांतवास’ होतो नि खायला उठतो. कारण पोटाला जशी भूक लागते, तशीच भूक मनालाही लागते. आपण कुणाशी तरी बोलावं नि कुणाचं तरी बोलणं ऐकावं, ही ती भूक! ही ‘सांगण्या-ऐकण्याची इच्छा’ कधी कथा-कवितांतून व्यक्त होते, तर कधी सुरांतून किंवा रंगांतून. पण ‘शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले’ ही अभिव्यक्तीच्या पलीकडली देवाणघेवाण साधण्याची किमया काहींनाच जमते नि कधीकधीच जमते. मग गप्पा रंगतात, मैफल धुंद होते, कविता भिडते. ही कलासक्ती मानवाच्या इतिहासात छापखान्यांच्या फार फार आधी आली. म्हणून पूर्वी आपण ‘बहुश्रुत’ होतो, नि आता ‘वेल रेड’ म्हणजे ‘बहुपठित’ झालो आहोत. या कलासक्तीत ‘देणारा नि घेणारा’ दोघेही दर्दी असायला लागतात. दुसऱ्याचे विचार समजून घेणं म्हणजे ‘ज्ञान’ मिळवणं जेव्हा बनतं, तेव्हा तो अचानक गंभीर मामला झाल्यासारखा वाटतो. मग त्या प्रक्रियेत एखाद्या ‘बातमी’प्रमाणे (ज्यात ‘बात’- काही खोटं पण नाही आणि ज्यात ‘मी’ पण नाही) केवळ डोळ्यांनी वाचून किंवा कानांनी ऐकून स्मरणशक्तीला जाच होतो.

‘आरोग्य’ या विषयावरील लेख वाचण्याची अनेक कारणं असू शकतात. आजारांची भीती, दुपारचा वेळ जाण्याचं बरं साधन, ‘बहुपठित’ असण्याचा अट्टहास किंवा स्वत:च्या समस्या, व्याधी, अडचणींचं निराकरण व्हावं ही भाबडी अपेक्षा. जेव्हा कुतूहलाव्यतिरिक्त कुठचीही वेगळी गाठ बांधून लिखाण वाचलं जातं, तेव्हा ते ‘शब्दांच्या पलीकडे’ जात नाही. आरोग्य या विषयावरील माहिती देणं ही त्या लेखावर, लेखकावर सोपवलेली कामगिरी असते.  पण ती माहिती जाणिवेतनं नेणिवेत येण्यासाठी लेखकाबरोबर किंवा त्याच्या विचारांबरोबर संवाद साधणं गरजेचं आहे. त्याच्या (पटणाऱ्या) विचारांशी मैत्री करणं जर जमवायचं असेल तर पटणाऱ्या विचारांना दुजोरा नि न पटणाऱ्या विचारांबद्दल चर्चा होणं आवश्यक आहे. पण दुर्दैवानं लेखकाशी चर्चा करणं शक्य असतंच असं नाही. मग ‘सम-कुतूहली’ आप्तेष्टांबरोबर चर्चा करून हा प्रश्न सोडवता येतो. समूहवाचन नि शिक्षण हा त्यातलाच एक प्रयोग आहे.

समर्थानी म्हटलंय, ‘दिसामाजी काही तरी ते लिहावे, पण प्रसंगी अखंडीत वाचीत जावे’. ही लेखमालिका वैयक्तिक समुपदेशनाला किंवा औषधोपचाराला पर्याय म्हणून नाही. आपण सगळ्यांनी कधी ना कधी अनुभवलेल्या ‘बेचैनी’कडे एका वेगळ्या (शास्त्रोक्त) कटाक्षानं बघण्याचा हा एक प्रयत्न आहे. आवडेल ही अपेक्षा!

आपल्याला जे ‘हवंय’ ते मिळवणं म्हणजे ‘जिद्द/ धमक/ ध्येय’ आणि जे मिळालंय ते हवंहवंसं वाटून घेणं म्हणजे आयुष्य! काय मिळवायचंय नि काय मिळालंय यातला कलह माणसानं पृथ्वीवरच्या त्याच्या वास्तव्यात फार लवकर अनुभवला असावा. आपलं काम सोपं करण्यासाठी साधनं (यंत्रं) तयार करणं नि ती जपून ठेवणं माणसाला जमलं, प्राण्यांना नाही. म्हणून माणूस उत्क्रांतीच्या आलेखात शिखरावर गेला. या साधनांचा वापर करून माणूस वेगवेगळ्या वातावरणांत, परिस्थितीत राहायला शिकला. साधारण ४०,००० वर्षांपूर्वी पहिल्या बर्फयुगाच्या आसपास माणसानं पहिलं चित्र किंवा मूर्ती तयार केली असावी. त्याच काळात मानव सर्व खंडांत पसरला नि त्यानं त्याच्या अपेक्षापूर्तीसाठी आपल्या गरजेप्रमाणे वस्तू नि कला निर्माण करायला सुरुवात केली. जेव्हा जेव्हा अपेक्षापूर्तीची शक्यता धूसर झालेली त्याला वाटली, तेव्हा तेव्हा चिंता/ काळजी/ बेचैनीनं नक्कीच ग्रासलं असणार आणि त्यातूनच नवनवी साधनं, यंत्रं, विचारांचा उगम झाला.

असं म्हटलं जातं, की पहिला माणूस आफ्रिकेत झाला. मांस, हाडं आणि लाकडं तोडण्यासाठी दगडांची साधनं त्यानं शोधली. ‘बायबल’प्रमाणे ‘अ‍ॅडम आणि ईव्ह’च्या इडन बगीच्यातल्या ‘कृत्याची’ची तारीख  शनिवार-रविवार २२-२३ ऑक्टोबर इ.स.पूर्व ४००४ असल्याचं आर्माघचे आर्च बिशप अश्शर यांनी अथक प्रयत्नांनी १६५० मध्ये शोधून काढलं. सध्याच्या इतर धर्मात अशी तारीख शोधलेली माझ्या वाचनात आलेली नाही. पण प्राचीन काळात माणसानं बनवलेली मृत जनावराच्या हाडापासून मांस वेगळं करण्याची दगडी छिन्नी माणसाच्या इतिहासाबाबत वेगळंच काही सांगते. उत्तर टांझानियातील सॅवानाजमधील ओल्डूवाई गोर्ज नावाच्या दरीत लुईस लीकी नावाच्या जीवाश्म आणि मानववंशशास्त्र विषयातील अभ्यासकाला १९३१ मध्ये सापडलेलं हाडं तोडण्याचं दगडी साधन आजतागायत माणसाच्या पृथ्वीवरील अस्तित्वाचा सर्वात जुना पुरावा आहे. त्याच दरीत साधारण १६ लाख वर्षांपूर्वीची दगडी कुऱ्हाडही सापडली. ओबडधोबड अशा या हातकुऱ्हाडीत मानवी प्रगतीची बरीच गुपितं दडली आहेत. पहिलं गुपित- अशा कुऱ्हाडी नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, लिबिया, इस्रायल, भारत, स्पेन, कोरिया, युरोप आणि इंग्लंडमध्येसुद्धा सापडल्या, पण साधारण १० लाख वर्षांपूर्वीच्या कालखंडातल्या! ही कुऱ्हाड आदीमानवाच्या स्थलांतराला कारणीभूत ठरली. बहुपयोगी कुऱ्हाड शिकार करायला, लाकूड तोडायला, संरक्षणासाठी वापरात आली. नवीन भौगोलिक जागा, तापमानाचे प्रदेश राहाण्या-वसण्यायोग्य बनायला लागले. मानव आपलं अस्तित्व जगाच्या पाठीवर पसरवायला लागला. नित्यासाठी आजच्या ‘स्विसनाईफ’प्रमाणे कुऱ्हाड त्याच्या साथीला होती. दुसरं गुपित हे मेंदू-मानसशास्त्राशी निगडित आहे. दगडाची साधनं तयार करताना मेंदूचे कुठले भाग उत्तेजित होतात हे जेव्हा शास्त्रज्ञांनी तपासलं तेव्हा असं कळलं, की मेंदूतला बोलण्याचा भाग त्यात प्रकर्षांनं उत्तेजित होतो. दगडी साहित्य बनवताना वापरल्या जाणाऱ्या सर्जनशीलतेबरोबरच माणसांमध्ये संवादक्षमतासुद्धा तयार झाली असावी.

५०,००० वर्षांपूर्वी माणसाच्या इतिहासात जगभर बदल झालेला दिसतो. स्थलांतरित माणूस दागिने, सजावटी कला करू लागला नि त्या कलेत त्याच्या आजूबाजूचं त्याला दिसणारं जग दाखवू लागला. इ.स.पूर्व ११००० म्हणजे १३००० वर्षांपूर्वीचं हस्तीदंतात कोरलेलं पोहोणाऱ्या रेनडियर नर आणि मादीचं एक प्रसिद्ध शिल्प हे याचंच एक उदाहरण आहे. बर्फयुगातील कलेचं हे एक सुंदर उदाहरण समजलं जातं. कौतुकास्पद निरीक्षणशक्ती, रेनडियरच्या शरीररचनेची जाण, ऋतुचक्राप्रमाणे होणारे रेनडियरमधील बदल नि ते बारकाईनं शिल्पात दिसावेत म्हणून केलेला विविध शिल्पाकृती बनवण्याच्या पद्धतींचा वापर, हे या कलाकृतीचं त्या वेळच्या समाजातील महत्त्वच दर्शवतात. पण अशी व्यवहारात निरुपयोगी वस्तू बनवावी असं माणसाला का वाटलं असावं? फक्त सौंदर्यदृष्टी? इतिहासकारांना असं वाटतं, की बर्फयुगातल्या युरोपमध्ये सध्याच्या सायबेरियासारखा हिवाळा होता. अशा वेळी घरामध्ये राहाणं, समूहामध्ये राहाणं, एकमेकांशी जुळवून घेणं जरुरीचं होतं. त्यासाठी, एकत्र जगण्याच्या अनुभवासाठी लोकांना विधी आणि त्या विधींसाठी बोधचिन्हं आवश्यक वाटली असणार. थोडक्यात, समूहजीवनासाठी उपयुक्त विचार, व्यवहार, वर्तणुकीच्या पद्धतींची गरज भासली असणार.

आदिमानवालासुद्धा मास्लो नावाच्या मानसशास्त्रज्ञानं अधोरेखित केलेल्या स्व-अपेक्षापूर्तीचा ध्यास होता. ‘पोटासाठी भटकत जरी’ तो ‘दूरदेशी’ फिरला, ‘राजाच्या सदनी किंवा घनदाट अरण्यात’ राहिला, तरीही त्याला नात्यांतली ऊब नि समूहातली सुरक्षा, सहभाग आवश्यक वाटली. ऐहिक भरभराटीबरोबरच वैचारिक उन्नती नि समाजमान्यता त्याला महत्त्वाची वाटली. प्रत्येक पायरीगणिक त्याला पुढच्या पायरीची इच्छा प्रबळ होत गेली आणि आजही ती तशीच आहे. जेव्हा जेव्हा पुढची पायरी चढण्याची शक्यता धूसर होताना दिसते, तेव्हा तेव्हा आदिमानवाप्रमाणेच ‘नादी-मानव’सुद्धा अस्वस्थ होतो. आणि त्या अपूर्णतेच्या जाणिवेला बेचैनी/ चिंता/ काळजी, असं आपण म्हणतो.

आता प्रत्येकाच्या स्वत:बद्दलच्या किंवा आयुष्यातल्या अपेक्षा या वेगळ्या असतात. कोणाचा भर नैतिक सुखांवर असतो, तर कोणाचा ऐहिक! कोणाचा वैवाहिक सुखांवर, तर कोणाचा सामाजिक! मनुष्यधर्माप्रमाणे या विविधतेतनं प्रत्येकाची गोष्ट सजत असते. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ‘जो जे वांछिल, तो ते लाहो’. पण ती पसायदानाची मागणी आहे. प्रत्यक्षात अपेक्षाभंगच जास्त असतात. हां, कधी कधी अनपेक्षित लाभही होतातच, पण अपेक्षाभंगाच्या मानानं फार कमी वेळा. प्रयत्न करूनही मिळणारं अपयश नि काहीही प्रयत्न न करता मिळणारं यश, या दोन यशापयशांच्या ओढीनं आपण आपल्या संसाराचं रहाटगाडगं चालवत असतो. अपेक्षाभंगाचं दु:ख तीव्रच असतं. वरच्या पायऱ्या न गाठल्याच्या दु:खात खालच्या पायऱ्या क:पदार्थ वाटतात. लोक म्हणतात, ‘सुखातलं दु:ख शोधतोय लेकाचा!’

आपलं आयुष्य जास्तीत जास्त सुखासीन करण्याचा प्रयत्न तर सगळेच करतात. जे नाही मिळालं, ते मिळवायचा कसोशीनं, जिद्दीनं, प्रयत्न करणं गैर नाही, किंबहुना अपेक्षितच आहे. पण जे नाही मिळालं, त्याचीच हळहळ सुरू झाली आणि जे मिळालंय ते हवंहवंसं नाही वाटलं तर?

डॉ. आशीष देशपांडे हे केईएम रुग्णालय आणि शेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करून गेली २६ वर्ष वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. य. दि. फडके शिष्यवृत्ती, ‘इंडियन असोसिएशन ऑफ रीटायर्ड पर्सन्स’च्या शिष्यवृत्तीचे ते मानकरी आहेत. ‘मौज’ प्रकल्पातर्फे १८०० शालेय मुलांचं ते दरवर्षी समुपदेशन करतात. ‘रोटरी अ‍ॅक्शन ग्रुप अडिक्शन प्रीव्हेन्शन’तर्फे ‘डीअडिक्शन कनेक्ट’ या उपक्रमात त्यांनी तांत्रिक सल्लागार म्हणून आणि पायलट प्रकल्पाची जबाबदारी सांभाळली आहे. व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमांसाठी देशभर- तीनसुखिया ते सुरत, चंडीगढ ते कोझीकोडे आणि महाराष्ट्रातही गावागावांतून ‘अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस’तर्फे होणाऱ्या जनजागृती सभा, पत्रकार परिषदा, चर्चांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. वृत्तपत्रांमध्ये, रेडीओ व दूरदर्शनवर मानसशास्त्राच्या प्रसार आणि जनजागृतीसाठी ते लेखन व कार्यक्रम करत असतात. ‘अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस’च्या ७० हजारांपेक्षा जास्त उपस्थितीत होणाऱ्या जागतिक परिषदेत भारतातील व्यसनमुक्तीच्या अनुभवकथनासाठी त्यांची निवड झाली होती. ते ‘इंडियन सायकॅट्रिक सोसायटी’चे ‘लाईफ फेलो’ असून २०१५ मध्ये ‘बाँबे सायकॅट्रिक सोसायटी’चे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.

dr.deshpande.ashish@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2021 12:03 am

Web Title: vyarth chinta nako rearticle on birth of man and of restlessness by dr ashish deshpande abn 97
Next Stories
1 मी, रोहिणी.. : अभिनयाचे धडे..
2 वसुंधरेच्या लेकी : रागावलेल्या मुलींची गोष्ट!
3 गद्धेपंचविशी : स्वत:ला शोधताना..
Just Now!
X