14 August 2020

News Flash

झाडं अनुभवताना..

कोणाच्या खिडकीबाहेर छानसं झाड दिसत असेल, तरी त्या व्यक्तीचं त्याच्याकडे लक्ष जाईलच असं नाही. नवीन पालवी दिसतेय, पलीकडची फांदी जरा सुकल्यासारखी वाटतेय

| March 1, 2014 05:19 am

कोणाच्या खिडकीबाहेर छानसं झाड दिसत असेल, तरी त्या व्यक्तीचं त्याच्याकडे लक्ष जाईलच असं नाही. नवीन पालवी दिसतेय, पलीकडची फांदी जरा सुकल्यासारखी वाटतेय, कावळ्याने घरटं बांधायला घेतलं वाटतं पुन्हा, पानांमधून पाऊस कसा मस्त ओघळतोय, असं काही आपल्याला दिसतच नाही. घराशेजारच्या झाडांबद्दल इतका परकेपणा तर बसने/लोकलने प्रवास करताना दिसणाऱ्या, पळणाऱ्या झाडांकडे कुठलं कोणाचं लक्ष जायला? झाडं अनुभवणं हा एक छान अनुभव असतो त्यातून आपसूकच आपलं पर्यावरणाचं भानही वाढत जातं.
फे सबुकवर काही महिन्यांपूर्वी पुण्याच्या सुषमा दातार यांनी एका इमारतीच्या बांधकामाचा फोटो टाकला नि त्यासोबत खालील ओळी ..
संगणकावर काम करता करता,
डोळ्यांचा थकवा घालवण्यासाठी ,
दमलेली मान सलावण्यासाठी
थोडी उजवीकडे वळवली म्हणजे दिसायचा,
तळव्या एवढय़ा काळसर हिरव्या पानांमधे
एखादं केशरी पान मिरविणारा फणसवृक्ष.
शेजारीच नाजूक पानांची पण भरदार चिंच.
पलीकडे ताडमाड वाढलेला सोनचाफा.
आता खिडकीतून दिसतात, फक्त खिडक्या
हिरवाईची वजावट करून दाम दुपटीनं वाढणाऱ्या.
डोळे निवण्यासाठी आता बघते मी
समोरच्या कॅलेंडरमधलं हिरवं छापील जंगल.
या त्यांच्या पोस्टवर टाकलेली माझी उत्स्फूर्त प्रतिक्रिया ही अशी होती .
तरी प्रत्येक जण जपत असतो हिरवाई आपापल्या परीनं .
     कॉर्पोरेट ऑफिसांमधले दर आठवडय़ाला बदलणारे
     इनडोअर पाम्स,
हायब्रोज्च्या दिवाणखान्यातले प्रिम अँड प्रॉपर
बोन्साय नि हँिगग्ज्,
फ्लॅटच्या एनक्लोज्ड बाल्कनीच्या कट्ट्यावर
दाटीवाटीने वाढणारे गुलाब, कोरफड नि ब्रह्मकमळ,
चाळीच्या कॉमन गॅलरीच्या कठडय़ांबाहेर मारलेल्या ब्रॅकेट
नि त्यात अडकवलेल्या कुंडय़ांतील तुळस नि कढीपत्ता,
आणि रस्त्यालगतच्या झोपडपट्टीच्या खिडकीत वाढवलेली,
म्हटलं तर आडोशाचं कामही करणारी, सदाफुली.
 यावर सुषमा ताई म्हणाल्या,‘‘ अगं, मी मोठय़ा झाडांविषयी बोलतेय, नि तू छोटय़ा.’’
साधारण याच सुमारास, फेसबुकवरचं एक चित्रं बघण्यात आलं. ‘मी संगणकावर काढलेलं चित्र, गुलमोहर’ अशा शीर्षकासहीत ते चित्र त्या व्यक्तीने पोस्ट केलं होतं. चित्रातील हिरवी-लाल रंगसंगती छानंच होती. पण का कोण जाणे मला काही तरी खटकत होतं. जरा निरखून बघितल्यावर माझ्या लक्षात आलं, झाडाचा डेरेदार आकार चित्राच्या चौकटीत कितीही चांगला बसवला असला तरी तो आकार गुलमोहराच्या झाडासारखा वाटत नव्हता. संगणकासारखं, चित्रातल्या चुका खाडाखोड न करता सहज दुरुस्त करता येणारं माध्यम वापरलं असलं तरी ते झाड हुबेहूब साकारलं गेलं नव्हतं. तिचं चित्र काढण्यातलं हौशीपण जरी आपण स्वीकारलं, तरी तिचं निरीक्षण कमी पडलं हे नक्की.
 सुषमा ताईंबरोबरच्या संवादातून जी गोष्ट माझ्या लक्षात आली होती ती या गुलमोहराच्या चित्राने आधोरेखित केली. शोभेच्या किंवा फुलांच्या छोटेखानी झाडांची आवड जरी आपण बहुतेक सर्वजण वैयक्तिक पातळीवर जोपासत असलो तरी सार्वजनिक परिसरातल्या मोठय़ा झाडांकडे आपण बहुतांशी दुर्लक्ष करतो. आपल्या घराच्या सभोवताली किंवा रोजच्या वाटेवर कोणते वृक्ष आहेत, असं जर आपल्याला कोणी विचारलं तर आपल्याला पटकन उत्तर देता येणार नाही.
  नोकरी-व्यवसायानिमित्त बराच वेळ घराबाहेर जातो. सुट्टीच्या दिवशीसुद्धा कुठेतरी बाहेर जाणं होतंच. जागेपणचा जो वेळ घरी उरतो तो एक तर घरकामात किंवा टी.व्ही./कॉम्प्युटर/फोनमध्ये जातो. खिडकीबाहेर डोकावायला सवडच नसते कोणाला आणि समजा क्वचित कोणी खिडकीबाहेर बघितलंच तर झाडं दिसण्याची शक्यता कमी. टोलेजंग इमारतींच्या ऐसपस खिडक्यांमधून दूरवर पसरलेली वस्ती नि त्यातून वाट काढणारे रस्ते दिसतात. या गर्दीत झाडं असली तरी ती लपून जातात. काही घरांच्या खिडक्यांमधून नुसत्या दुसऱ्या घरांच्या खिडक्याच दिसतात.
अगदीच कोणाच्या खिडकीबाहेर छानसं झाड दिसत असेल, तरी त्या व्यक्तीचं त्याच्याकडे लक्ष जाईल असं नाही. नवीन पालवी दिसतेय, पलीकडची फांदी जरा सुकल्यासारखी वाटतेय, कावळ्याने घरटं बांधायला घेतलं वाटतं पुन्हा, पानांमधून पाऊस कसा मस्त ओघळतोय, पक्ष्यांनी मस्त आडोसा तयार केलाय, असं काही आपल्याला दिसंतच नाही. म्हणजे डोळ्यासमोर जरी झाड असलं तरी आपल्यासाठी ते परकं असतं. आपल्या मनात विचार वेगळेच असतात. आपले रोजचे सरावाचे. ऑफिसमधल्या कटकटी, घरातली धुसफूस किंवा दैनंदिन टी.व्ही. मालिकांचं कथानक! घराशेजारच्या झाडांबद्दल इतका परकेपणा तर बसने/लोकलने प्रवास करताना दिसणाऱ्या, पळणाऱ्या झाडांकडे कुठलं कोणाचं लक्ष जायला? ‘पळती झाडे पाहू या’ हे फक्त आगीनगाडीच्या गाण्यापुरतंच.
   कुंडय़ांमध्ये किंवा गच्चीतल्या बागेत लावलेल्या छोटय़ा झाडांची किती काळजी घ्यावी लागते. रोज पाणी घाला, अधून मधून खत घाला, कीड लागू नये म्हणून जपा, छाटणी करा. पण हे सगळं आपण हौशेने करतो. या उलट सार्वजनिक जागी असणाऱ्या झाडांकडे आपल्याला काहीच लक्ष द्यावं लागत नाही. म्हणून आपलं अजिबातच लक्ष जात नाही या झाडांकडे.
आपण लहान असताना देखाव्याचं चित्र काढतो,  दोन डोंगर, त्यांच्या मधून निघून पुढे वहात येणारी नदी, एक झाड, एक कौलारू घर. त्या चित्रातलं झाड कसं असतं? जाड बुंधा, २-३ फांद्या नि त्यावर आडव्या लंबगोल आकारात पसरलेला पानांचा डोलारा. त्यात पानं काढलीच, तर त्यांचा आकारही ठरलेला. दोन गोल कंस जोडून बनेल असा. आपण झाडांकडे कधी नीट लक्ष देऊन बघत नाही, म्हणून आपल्याला सगळी झाडं तशीच दिसतात, त्या चित्रातल्या झाडासारखी साचेबद्ध.
 बऱ्याच वर्षांपूर्वी जहांगीर आर्ट गॅलरी येथे एक प्रदर्शन बघितलं होतं. कागद हे माध्यम वापरून केलेल्या त्रिमितीय देखाव्यांचं. कलाकाराचं नाव आता आठवत नाही आहे. पण त्यातील बगिचाचा देखावा माझ्या कायमचा लक्षात राहिला आहे. कागदातून झाडं, पानं, फुलं करायची कलाकुसर खूप किचकट असणार. एकाच प्रकारची अनेक झाडं करून त्यांचं काम सोप्पं झालं असतं. तरी त्यांनी त्या कागदी बगिच्यात अगदी खऱ्या बगिचासारखं वैविध्य दाखवलं होतं. त्यांनी ती झाडं इतकी हुबेहूब बनवली होती की अगदी सहज ओळखता येत होती. पण झाडं वेगवेगळी ओळखायची नजर आपल्याला नसते.
वसंत ऋतूमध्ये फुलांनी बहरणारी झाडं एका पाठोपाठ फुलून येतात. तेव्हा जरा आपलं लक्ष जातं त्यांच्याकडे. पण एरवी सुद्धा हिरव्या रंगाची छटा, पानांचा आकार, पानांचा प्रकार, फांद्यांचा विस्तार, खोडाचा रंग, झाडांची उंची यावरून झाडं वेगवेगळी ओळखता येतात हे आपल्या लक्षातच येत नाही. नेहमीच्या बघण्यातली झाडं अगदी लांब असली किंवा पळताना दिसली तरी अगदी सहज ओळखता येतात. पण आपण बघू तर ना!
मात्र एकदा एखाद्या झाडाकडे तुमचं लक्ष गेलं, की आपसुकच आणखी काही गोष्टी तुमचं लक्ष वेधून घेतील. पालवी फुटणे, फुलं येणे, पानं गळणे, चक्र चालूच असतं. झाड जरा जवळून दिसत असलं की त्यात त्याची पानं, फुलं, फळं आली. पानं खाणारे सुरवंटं आले, फुलांभोवती फुलपाखरं आली, मधमाशा आल्या, फळं खायला पक्षी आले, वटवाघळं आली, फांद्यांच्या बेचक्यात घरटं बांधणारे कावळे आले, खोडाच्या ढोलीत रहाणाऱ्या खारी आल्या. केवढी वर्दळ असते एका झाडावर! आपल्या अवतीभवतीच्या या छोटय़ा छोटय़ा गोष्टी, आपल्याला आपल्या व्यस्त दिनक्रमातच विरंगुळ्याचे क्षण मिळवून देतात. झाडं अशी अनुभवणं खूप छान असतं. आपल्याला पर्यावरणाचं भानही देतं.
निसर्ग म्हणजे काही वर्षांतून एकदा आठवडाभर गावाला अगर पर्यटनाला गेल्यावर तिथेच फक्त  बघायचा असं थोडीच आहे. मुबईचं कितीही शहरीकरण झालं, त्याच्या जोडीने कितीही बकालपण आलं, तरी त्यातूनही निसर्ग या झाडांच्या रूपाने दशांगुळे उरला आहे. तो जपायला हवा. नवीन बांधकामाच्या ठिकाणी भूखंडाच्या प्रमाणात नवीन झाडं लावण्याचा सरकारी नियम, जुनी झाडं तोडण्याच्या विरोधात मोजक्या पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी केलेली निदर्शनं, या पलीकडे जाऊन तुम्ही आम्ही तो जपायला हवा. आपल्या परिघातला निसर्ग बघायला आपल्याला एकदा जमलं, की आपसुकच आपल्याकडून तो जपला जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2014 5:19 am

Web Title: while feeling tree
टॅग Chaturang
Next Stories
1 एकटीचा घरोबा
2 शब्द गोंदलेली शाळा
3 शक्तीसाधना
Just Now!
X