ती आहे अगदी जवळून युद्धाचे दारुण परिणाम पाहिलेली, सद्दामच्या भीतीच्या छायेत लहानाची मोठी झालेली झैनाब. डोळय़ांपुढे बॉम्बहल्ल्यात तिनं आप्तमित्रांची घरं बेचिराख होताना पाहिली. त्या यातना तिच्या कोवळय़ा मनावर तीव्र ठसा उमटवून गेल्या. इतरांच्या भळभळत्या हृदयावर फुंकर घालून त्यांना आपल्या पायांवर उभं करण्याचं व्रत तिनं हाती घेतलं. स्वत:ची आणि इतरांची जुलूमशाहीतून सुटका केली. त्यासाठी तिनं ‘वुमेन फॉर वुमेन इंटरनॅशनल’ची स्थापना केली,
त्या झैनाब साल्बीविषयी..

झै नाब साल्बीनं बोस्निया आणि क्रोएशियामधील रेप कॅम्प्सबद्दल- स्त्रियांना डांबून त्यांच्यावर पद्धतशीरपणे केल्या जाणाऱ्या बलात्कारांबद्दल पहिल्यांदा वाचलं, तेव्हा ती फक्त २३ वर्षांची होती. नव्यानं दुसऱ्यांदा विवाहित झालेली आणि अमेरिकेत शिक्षण घेत असलेली झैनाब ही बातमी वाचून इतकी हादरून गेली, की मधुचंद्रासाठी जाण्याऐवजी ती आपल्या नवऱ्याबरोबर थेट बोस्नियाला गेली.
   त्या अभागी स्त्रियांसाठी काहीतरी करावं या इच्छेपोटी ती तिथं पोचली तर खरी, परंतु तिथं नामवंत स्त्रियांच्या सामाजिक संस्था मदतीसाठी आधीच आलेल्या होत्या आणि त्यांच्यापुढे आपण एखाद्या मुंगीएवढय़ा क्षुल्लक आहोत, असं तिला वाटू लागलं. तरीसुद्धा ती नेटानं कामाला लागली आणि मदत करू इच्छिणाऱ्या भगिनींना एकत्र आणण्याचं काम तिनं सुरू केलं. ‘सिस्टर स्पॉन्सर्सचं (पुरस्कर्त्यां भगिनींचं) एकत्रीकरण करून तिनं ‘वुमेन फॉर वुमेन इंटरनॅशनल’ ही स्त्रियांना साहाय्य करणारी संस्था स्थापन केली. युद्धानं होरपळून गेलेल्या आठ देशांतील, समाजानं एकटय़ा पाडलेल्या स्त्रियांना ही संस्था आज मदत पुरवते आहे. आजवर या संस्थेनं ३,५१,००० स्त्रियांना मदत केली आहे. या संस्थेला कॅनडापासून बांगलादेशपर्यंतच्या विविध देशांतल्या स्त्रिया वित्तसाहाय्य पुरवत आहेत. साल्बीच्या या संस्थेला अर्धी मदत अशा वैयक्तिक पुरस्कर्त्यां स्त्रियांकडून मिळतेय, तर उरलेली अर्धी मदत विविध संस्थांकडून मिळतेय. दर महिन्याला प्रत्येक पुरस्कर्ती २२ पौंडांची रक्कम युद्धात होरपळणाऱ्या देशातील एका भगिनीला देते आणि त्या योगे त्या भगिनीला वर्षभराचं व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यांच्या कायदेशीर हक्कांबद्दल त्यांना माहिती करून दिली जाते. याच स्त्रिया, त्यांच्या समाजातील अन्य स्त्रियांचं नेतृत्व करतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व स्त्रियांचा पत्रांद्वारे आणि ई-मेल माध्यमातून परस्पर संपर्क राखला जातो.
झैनाब साल्बी म्हणते, ‘‘अशा मदतीला माझा ‘त्याग’ समजून रवांडातील एका स्त्रीनं माझे आभार मानले. त्या पैशामुळे ती तिच्या मुलांना शाळेत पाठवू शकली होती. तो माझ्यासाठी ‘त्याग’ नव्हता. परंतु त्या मदतीमुळे तिचं आयुष्य बदललं होतं, ते पाहून माझ्या स्वत:च्या सुस्थितीबद्दल माझ्या मनात कृतज्ञतेची भावना जागी झाली.’’
‘वुमेन फॉर वुमेन इंटरनॅशनल’ या संस्थेसाठी २० र्वष काम करताना साल्बीला युद्धातून बचावलेल्या ज्या विविध स्त्रिया भेटल्या, त्यांच्या मुलाखतींबद्दल आणि आयुष्याबद्दल वर्णन करणारं नवं पुस्तक तिनं नुकतंच प्रकाशित केलं आहे. त्याचं नाव आहे, ‘इफ यू न्यू मी, यू वुड केअर’ सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या काँगोमधील एका स्त्रीचं, पौगंडावस्थेत असताना एका लष्करी नेत्याशी विवाह झालेल्या एका मुलीचं व्यक्तिचित्र त्यात उद्धृत केलं आहे. साल्बी म्हणते, की अशा होरपळलेल्या स्त्रियासुद्धा प्रेम, आशा, क्रांती अशा भावना तेवत्या ठेवू शकल्या आहेत. शांतीचा अर्थ काय, असं त्यांना विचारलं असता त्या उत्तर देतात, ‘‘शांती आमच्या हृदयात असते. ती आमच्यापासून कुणी हिरावूनही घेऊ शकत नाही किंवा ती आम्हाला कुणी देऊही शकत नाही.’’ बलात्काराला अनेक महिने सामोरं जाऊन त्यातून निसटून आल्यावर काँगोमधील एका झोपडीत राहणाऱ्या स्त्रीच्या तोंडून शांतीची ही व्याख्या ऐकल्यावर ती स्त्री साल्बीला शांतिदूत वाटली, यात आश्चर्य ते कोणतं?
अशा स्त्रियांशी संवाद साधून त्यांना बोलतं करताना झैनाब साल्बी त्यांना नेहमीच सुरुवातीला तिची आत्मकहाणी ऐकवते. ती कहाणीसुद्धा आगळीवेगळीच आहे. इराकमध्ये जन्मलेली झैनाब साल्बी सद्दामच्या छायेतच मोठी झाली. तिचे आई-वडील सुशिक्षित व्यावसायिक होते. त्या वेळेस इराकचा उपाध्यक्ष असलेल्या सद्दाम हुसेनच्या मैत्रीच्या जाळय़ात तरुण वयातच ते अडकले. तो अध्यक्ष झाला, तोवर त्यानं पाडलेल्या खुनांबद्दल त्याच्या तोंडून त्यांनी इतक्या वल्गना ऐकल्या होत्या, की त्याच्याशी नातं तोडलं तर तो कोणता सूड उगवेल या भीतीपोटी ते दोघं काहीही करू शकले नाहीत. झैनाबचे वडील सद्दामच्या वैयक्तिक विमानाचे पायलट म्हणून काम करू लागले. झैनाब त्याला आमो (काका) म्हणून संबोधू लागली आणि बरेचसे वीकएण्ड त्याच्या सहवासात घालवू लागली. त्या वेळेस ती जे उसनं हसू धारण करत असे, त्याला ती ‘प्लॅस्टिक स्माइल’ म्हणू लागली. ती २० वर्षांची असताना तिच्या आईनं इराकी वंशातील एका अमेरिकी माणसाबरोबर विवाह करण्यासाठी झैनाबचं मन वळवलं. परंतु सुटकेचा मार्ग दाखवण्याऐवजी तिच्या या नवऱ्यानं तिच्यावर बलात्कारच केला. ती तिच्या मैत्रिणीच्या घरी पळून गेली आणि त्याच वेळेस आखाती युद्ध सुरू झाल्यामुळे अमेरिकेतच अडकली. अनेक वर्षांनी तिनं तिच्या आईला छेडलं, की तिनं अशा लग्नासाठी तिच्यावर का दडपण आणलं. आईनं दिलेलं उत्तर ऐकून झैनाब हादरून गेली. सद्दाम झैनाबकडे आकर्षित होतोय हे तिच्या आईच्या नजरेला आल्यावर तिच्या मनात संदेह राहिला नाही की एक दिवस झैनाब त्याच्या वासनेला नक्कीच बळी पडेल. आपल्या मैत्रिणींसंदर्भात अशा गोष्टी घडलेल्या तिनं पाहिलेल्या होत्या. कालांतरानं झैनाबनं ताडलं की बहुधा तिच्या आईच्या वाटय़ालासुद्धा हेच भोग आले असावेत.
वयाच्या तेविसाव्या वर्षी झैनाबनं स्त्रियांसाठी स्थापन केलेली संस्था तिनं २० र्वष जोपासली, वाढवली आणि २० वर्षांनंतर ते पदाधिकार दुसऱ्यावर सोपवून तिनं मध्य-पूर्वेतील स्त्रियांसाठी कार्य करायचा निर्णय घेतला. ती म्हणते, ‘‘हा निर्णय घेणं सोपं नव्हतं. मला स्वत:ला मूल नाही आणि ‘वुमेन फॉर वुमेन’ हे मला अपत्यवत प्रिय आहे. परंतु मी सुरुवातीपासूनच म्हणत असे, की २० वर्षांनी मी अधिकारपद सोडेन. साठाव्या वर्षीसुद्धा तेविसाव्या वर्षी सुरू केलेल्या संस्थेला चिकटून बसणं मला शक्य नाही.’’
२०१२ साली साल्बीला बार्कलेजनं ‘वुमन ऑफ द इयर’ सन्मान दिला. बिल क्लिंटननं तिला ‘ट्व्ॉन्टीफर्स्ट सेन्चुरी हिरॉईन’ म्हणून नामांकन दिलं आणि टोनी ब्लेअर फेथ फाऊंडेशननं तिला ‘फेथ हिरॉईन’ म्हणून सन्मानित केलं. तरीसुद्धा झैनाबनं आपण स्वत: संस्थापित केलेल्या संस्थेचे पदाधिकार सोडले आहेत आणि ती आता तिच्या जगातल्या- मध्य-पूर्वेतील देशांमधल्या स्त्रियांसाठी काहीतरी करू इच्छिते.
ती म्हणते, ‘‘स्त्रियांची भूमिका अधोरेखित करण्याच्या दृष्टीनं मध्य-पूर्व हा जगातील सर्वात अवघड टापू आहे.’’ ती आता तिचा अर्धा वेळ इथं खर्च करून तरुण मुस्लीम स्त्रियांचा आवाज जगभर पसरवणार आहे. ‘क्रांतीमधील स्त्रियांचा सहभाग आणि भूमिका’ यावर ती एक अनुबोधपट काढते आहे आणि या भागातील स्त्रियांबद्दल एक पुस्तक लिहिते आहे. पुढल्या वर्षी ती ‘निदा’ (ठ्रिं) नावाचं बहुमाध्यमीय व्यासपीठ मध्य- पूर्वेतील स्त्रियांसाठी उपलब्ध करून देणार आहे आणि तेथील तरुण स्त्रियांनी पत्रकार बनून ब्लॉग्ज लिहावेत, परिषदा घ्याव्यात आणि मोहिमा चालवाव्यात म्हणून एक मदत संस्थासुद्धा सुरू करणार आहे. या संस्थेचा उद्देश तळगाळापासून काम करणं हा नसून, स्त्रियांसाठी सत्ताबांधणी करून देणं हा असणार आहे. ती म्हणते, ‘‘जगभरात  प्रसारमाध्यमात निर्णय घेण्याची सत्ता ३ टक्केपेक्षा कमी स्त्रियांच्या हाती आहे. फक्त १८ टक्के स्त्रिया राजकारणात आहेत आणि उद्योगधंद्यात उच्चस्थानी फारच थोडय़ा स्त्रिया पोचू शकल्या आहेत. या जागा आपण काबीज करायला हव्यात.’’
या विषयांवरचे तिचे विचार तिच्या काही भाषणांमधून स्पष्टपणे कळतील. ‘युद्ध हा संगणकावर खेळला जाणारा आण्विक खेळ नव्हे. युद्धाचा रंग मातीचा असतो आणि तो आपल्या समोर स्फोट घेत असतो. मुलांच्या विनवणीच्या आवाजानं, धुराच्या वासानं आणि भीतीच्या भावनेनं आपल्यावर आघात करत असतो. युद्धात बचावलेल्या स्त्रिया ही टी.व्ही.च्या पडद्यावर दिसणारी क्षणचित्रं नव्हेत! युद्धात बचावलेल्या स्त्रिया म्हणजे कुटुंबांना, देशांना एकत्र सांधणारा चिवट दुवा आहे. स्त्रियांना आणि युद्धाच्या या दुसऱ्या बाजूला जाणून घेतलं तर कदाचित आपण युद्धाबद्दलची चर्चा अधिक विनम्रतेनं करू शकू. इतिहासाबद्दल स्त्रियांची बाजू ऐकून घेण्याची हीच योग्य वेळ आहे.’’
‘मला मोठं आश्चर्य वाटतं की लोकांचा जो गट लढत नाहीय, मारत नाहीय, लुटालूट करत नाहीय, जाळपोळ आणि बलात्कार करत नाहीय आणि जो युद्धकाळात आयुष्य सुरू ठेवतोय, त्याच गटाचा युद्धाच्या वाटाघाटींच्या वेळेस समावेश केला जात नाहीय.’
हा आवाज आहे अगदी जवळून युद्धाचे दारुण परिणाम पाहिलेल्या एका सहृदय स्त्रीचा. सद्दामच्या भीतीच्या छायेत ती लहानाची मोठी झाली आप्तमित्रांची घरं बेचिराख होताना पाहिली. त्या यातना तिच्या कोवळय़ा मनावर तीव्र ठसा उमटवून गेल्या. इतरांच्या भळभळत्या हृदयावर फुंकर घालून त्यांना आपल्या पायांवर उभं करण्याचं व्रत तिनं हाती घेतलं. तिनं त्यांना बोलतं केलं. त्यांचा आवाज तिनं जगापर्यंत पोचवला. ती म्हणते, ‘‘स्त्रियांना सक्षम करून, बोलतं करून त्यांना एकत्र आणलं तरच ही गोष्ट पुढे नेता येईल.’’
झेनाबनं या कार्याला प्रारंभ केला, तेव्हा तिच्या मते तिनं खारीचा वाटा उचलला होता. परंतु अनेकांना या कामात उद्युक्त करता आल्यामुळे त्या रेणुकणाचा आता सेतू बनतो आहे..  
आधार : ‘२ एप्रिल २०१३ रोजीच्या ‘गार्डियन’मधील होमा खलिली  यांनी झेनाब साल्वीची घेतलेली मुलाखत.