शिल्पा परांडेकर

‘‘सोलो ट्रॅव्हरलच्या वेशात कोदे काकूंच्या घरी पोहोचले आणि त्या रात्रीपासूनच माझी कोकणातल्या खास चवींशी ओळख होऊ लागली. खायला गरम गरम कुळथाची पिठी होतीच, पण आजीच्या हातच्या पदार्थाना विशेष चव का, याचंही उत्तर मिळालं.’’

कोकणात शिरताना शहरातल्या गर्दीतून बाहेर पडून छान, गर्द वातावरणात मी प्रवेश करत होते. नुकताच पावसाळा संपला होता, त्यामुळे करोळ घाटात वळणावळणाचा रस्ता आणि डोंगरदऱ्या, हिरव्यागार, सुंदर दिसत होत्या. रमावंसं वातावरण होतं, पण मन अधीर होत होतं जुन्या खाद्यसंस्कृतीच्या शोधात मी ज्यांच्या घरी उतरणार होते त्या कोदे काकूंना भेटण्यासाठी.

चार तासांचा प्रवास करून मालवणला पोहोचले. स्टँडवर मी एकटीच मुलगी. गळय़ात प्रोफेशनल कॅमेरा आणि पाठीवर बॅकपॅक. ‘सोलो ट्रॅव्हलर’च्या अवतारात! रिक्षा स्टँडवर जाऊन भाडं वगैरे ठरवून रिक्षात बसलेही. एकटय़ा मुलीनं प्रवास करणं तसं नवीनच, त्यात आजच्याइतका सोलो ट्रॅव्हिलगचा ट्रेंड त्या वेळी नसावा. पण रिक्षावाला गप्पिष्ट निघाला. माझ्या येण्याचं कारण जाणून घेऊन त्यानंही मला काही माहिती आणि स्थानिक पत्रकारांचे फोन नंबर दिले. स्वत:चाही नंबर मला देऊन ठेवला. बोलण्यातून समजलं, की तो रिक्षावाला तिथला पोलीस पाटीलसुद्धा होता. गप्पांच्या ओघात रिक्षा कधी कांदळगावात येऊन पोहोचली ते कळलंच नाही.

रामेश्वराच्या छायेतलं हे इटुकलं गाव. एका चौकात उतरले. बाजूला डेरदार वृक्ष, समोर किराणा मालाचं लहानसं दुकान, दुकानाच्या दारात एका कापडावर काही भाज्या पसरवून विकायला ठेवल्या होत्या. मी एका काकांकडे चौकशी करायला लागले तर असंख्य प्रश्न सामोरे आले, पण तेवढय़ात कोदे काकूच तिथे आल्या आणि माझी त्या प्रश्नांतून सुटका झाली. कोदे काकू. सडसडीत आणि काटक अंगयष्टीच्या. साधीच, पण नीटनेटकी साडी, केसांची लांब वेणी. त्यांनी त्यांची दुचाकी माझ्यासमोरच थांबवली आणि माझ्याशी बोलू लागल्या. मला जाणवत गेलं, की त्या थोडय़ा कडक आहेत, पण अधिक प्रेमळ आहेत. त्यांच्या बोलण्या-वागण्यातला आत्मविश्वास, स्पष्टवक्तेपणा मला आवडला. पुढे माझ्या प्रवासात मला अनेक छोटय़ा-छोटय़ा गावांमध्ये अशा आत्मविश्वासू, स्पष्टवक्त्या आणि स्वावलंबी स्त्रिया भेटल्याच, पण माझ्यासाठी त्या वेळी हा अनुभव नवा होता.

कोदे काकू शाळेत शिक्षिका होत्या. रोज त्यांना दुचाकीवरून बराच लांबचा प्रवास करून जावं लागे. आताही त्या शाळेतूनच परतल्या होत्या. त्यांना का कोण जाणे पण विश्वासच नव्हता, की खरंच एकटी आणि अशा काही निराळय़ा कामासाठी एखादी मुलगी इथे येईल म्हणून! मला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि कौतुक दिसत होतं. ‘तू अगदी बरोबर पत्त्यावर आलीस. कुणी ओळखीचं भेटलं का?’ त्यांनी मला विचारलं. मी त्यांना माझ्या सगळय़ा प्रवासाचा वृत्तांत सांगितला. ‘इथून पुढेही तुला तुझा एकटीनं प्रवास करायचा आहे. या प्रवासात तुला जे काही बरे-वाईट लोक भेटतील त्यांची योग्य पारख करून त्यांच्याबरोबर कितपत परिचय ठेवायचा हे तुझं तुलाच जाणून घ्यावं लागेल.’ त्यांचा हा सल्ला माझ्यासाठी पुढच्या प्रत्येक प्रवासात मार्गदर्शक ठरला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मी तुला ओळख करून देते. हे माझे मिस्टर. हे दुकानही आमचंच आहे.’ मी आवंढा गिळला! मगाशी मला खूप प्रश्न विचारणारे गृहस्थ कोण याचं उत्तर मिळालं! आम्ही गप्पा मारत त्यांच्या घराकडे चालू लागलो. त्यांनी मला खोली दिली, नियम सांगितले आणि पुढच्या दोन दिवसांचं नियोजनदेखील. ठरल्याप्रमाणे मी पुढचे दोन-तीन दिवस कोदे काकूंच्या ‘होमस्टे’मध्ये राहून आजूबाजूच्या गावांमध्ये मिळेल त्या वाहनानं प्रवास करणार होते.
त्या रात्रीही कोदे काकूंच्या आणि माझ्या खूप वेळ गप्पा चालल्या. अर्थातच कोदे काकासुद्धा होतेच. बोलता-बोलता तेही कोकणातल्या खाद्यसंस्कृतीविषयी बऱ्याच रंजक गोष्टी सांगायचे. रात्री कोदे काकूंनी त्यांच्या भाषेत अगदी साधा, घरगुती बेत केला होता. मात्र माझ्यासाठी ती अत्यंत स्वादिष्ट मेजवानी होती. पिठी आणि मऊ लुसलुशीत भात, सोबत लाल भाजी असा बेत होता. स्वयंपाक सुरू असताना मला त्या त्याच्या कृतीबरोबरच त्यांच्या आजीच्या काही आठवणी सांगत होत्या. ‘‘खरं तर नोकरी, आंब्याच्या बागा आणि बाकी जबाबदाऱ्यांमुळे मला या सगळय़ात फारसा वेळ नाही मिळत..’’ कोदे काकू सांगत होत्या आणि दुसऱ्या बाजूला स्वयंपाकाची लगबग सुरू होती. ‘‘कुळीथ हा कोकणी जेवणातला एक महत्त्वाचा घटक. आम्ही कुळथाची पिठी, मोड आणून उसळ आणि कुळथाचं कढण करतो. कोकणात तशा भाज्या कमी. त्यामुळे इथल्या आहारात कडधान्यांचा वापर अधिक होतो.’’ माझ्यासाठी ही प्रत्येक माहिती महत्त्वाची होती. मी त्या सांगतील तशा महत्त्वाच्या गोष्टी आणि या रेसिपी माझ्या वहीत नोंदवून घेत होते. ‘‘कोकणी स्वयंपाकातला दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे भरपूर ओला नारळ. याशिवाय आमचे सर्व पदार्थ अपूर्ण आहेत.’’ काकूंची एक वेगळी गोष्ट भावली. आता स्वयंपाकासाठी जितकं खोबरं लागणार होतं तितकं त्यांनी किसून घेतलं आणि उरलेलं भक्कल उलटं करून खिडकीत ठेवून दिलं. मी विचारलं, ‘‘असा बाहेर ठेवला तर नारळ खराब नाही का होणार?’’ ‘‘नाही गं. माझी आजी अशीच ठेवायची. आता बघ, कधी आपल्याकडून थोडा जास्तीचा कांदा चिरला जातो किंवा असं खोबरं थोडंच शिल्लक राहतं. मग आपण म्हणतो, कुठे इतकंसं बाजूला काढून ठेवू, वापरून टाकू यात. माझी आजी नाही बरं का असं करायची. तिचं सगळं अगदी प्रमाणशीर. त्यामुळे तिच्या हातच्या जेवणाला एक विशेष चव असायची. आपण अशा काही तरी बारीकसारीक चुका करतो आणि म्हणतो, आई-आजीसारखं मला नाही जमत.’’ बात तो पते की हैं! हो ना?.. (क्रमश:)
parandekar.shilpa@gmail.com