शिक्षण नाही म्हणून आत्याला आम्ही अडाणी म्हणतो, पण केवढं शहाणपण तिच्या ठायी आहे! तिची देवावरची श्रद्धा केवढी गहन आहे. आपल्या चुकीची, कर्माची जबाबदारी घेण्याचं मोठेपण तिच्याकडे आहे!
माझी धाकटी आत्या, भावंडात सगळ्यात लहान. ती दीड वर्षांची असतानाच तिचे वडील गेले. तिला समजत नव्हतंच काही पण आधीच मुलगी, त्यात वडील गेलेले, मग तिचे कुठले लाड आणि कसलं कौतुक! जरा मोठी झाली तशी ती आईच्या हाताखाली लहान-मोठी कामं करू लागली. पाच मुलगे आणि दोन मुलींचा प्रपंच आजी एकटी चालवत होती. ‘बडा घर पोकळ वासा’ असल्याने आपलं दैन्य कुणाला न दाखवता संसार चालला होता. मुलगे शिकत होते, त्यांनी घरकाम करण्याची त्या वेळची रीत नव्हती. मोठी मुलगी वांड होती, साहजिकच आजीने या धाकटय़ा लेकीला हाताशी धरलं. रागावणं, चिडणं तिला माहीत नव्हतं. परिस्थितीची जाणीव अगदी लहान वयात आल्याने तिचं बालपण तिने संपवून टाकले. कधी कुणाजवळ हट्ट केला नाही, कुणाला कसला त्रास दिला नाही. शाळेच्या अभ्यासात मात्र ती मागे पडली ती पडलीच.
भोरमधल्याच माझ्या काकांच्या मित्राशी लग्न होऊन आत्या सासरी गेली. ‘एकादशीच्या घरी शिवरात्र’ असं सासर तिला मिळालं होतं. आत्याच्या भावांनी मुलाचे गुण बघितले होते, स्वभावाने माणसं फार चांगली होती. आत्याला सासरी कष्ट पडणार होते, पण सासुरवास होणार नव्हता. तिच्या घराच्या अंधाऱ्या नागमोडी जिन्यातून नुसतं चढताना आमची दमछाक व्हायची. तशा जिन्यावरून ती खालून वापरायचं, प्यायचं सगळं पाणी भरायची. आत्या सतत कामातच असे. तिचे दोन दीर मिलिटरीत गेले होते, त्यांच्या बायका आत्याच्या भोरच्या घरात असत. मोठय़ा जावेची, आत्याची लहान मुलं. आम्ही सुट्टीला भोरला गेलो की आत्याकडे रोज चक्कर असायची. काहीतरी खाऊ हातावर ठेवल्याशिवाय ती आम्हाला परत जाऊ द्यायची नाही. मग एक दिवस खास आम्हा सगळ्या भाचरांना ती जेवायला बोलवायची. तिच्या घरचे सगळे आमच्या तनातीला असायचे. दुपारी बापूराव त्यांच्या खास शैलीत नवनव्या गोष्टी रंगवून रंगवून सांगायचे. त्यांच्या घरातल्या आदरातिथ्याने आणि कोडकौतुकाने आम्ही खूश होऊन जायचो. मुलांकडे फारसे खास लक्ष न पुरवण्याचा तो काळ होता. अशा वेळी आत्याकडची आम्हाला मिळणारी ती शाही वागणूक माझ्या कायमची मनात राहिली आहे. आत्याची आíथक परिस्थिती बिकट आहे, असं आम्हाला कधीच वाटलं नाही, तिने कधी तसं जाणवूच दिलं नाही.
आत्याचे यजमान रंग कारखान्यात कामाला होते, कारखान्यात संप, ले-ऑफ चालत. आत्याने कधी आपल्या भावांजवळ हात पसरले नाहीत की रडगाणं गायलं नाही. तिच्याजवळ शिक्षण नव्हतं, पण ती डबे करून द्यायची, दुपारी मसाले बनवायची, ते विकायची. दूध विकायची. जमेल त्या मार्गाने तिने कष्ट करून संसाराला हातभार लावला. तिची मुलेही कष्टाळू निघाली. बघता बघता दिवस पालटले. आत्या आणि बापूराव मुलाच्या संसारात नातवंडाचा सांभाळ करायला पुण्यात स्थायिक झाले.
देवावर आणि गोंदवलेकर महाराजांवर आत्याची अपार श्रद्धा आहे. देवधर्माचं फारसं अवडंबर न करता तिच्यापुरते नेम ती मनोभावे करीत असते. परवाच्या पेपरमध्ये बातमी वाचली, आत्याचं नाव आलं होतं, पहाटे देवदर्शनाला ती निघाली होती. वाटेत चोरांनी तिला गाठलं, ‘आम्ही पोलीस आहोत.  या भागात फार चोऱ्या होतात. तुम्ही अंगावर दागिने कसे घालता?’ असं बोलून तिच्या हातातील बांगडय़ा आणि पाटल्या काढून घेतल्या अशी बातमी होती. वाचल्यावर मला फार वाईट वाटलं. आत्याने आयुष्यभर इतके कष्ट केले, प-प जमवून मिळवलेलं असं एका क्षणात जावं? स्वप्नातसुद्धा तिने कुणाचं वाईट केलं नाही तर तिला असा त्रास का? निदान फोनवर चौकशी करावी, तिला धीर द्यावा म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी फोन केला.
आत्यानेच फोन घेतला. ‘काल वाचलं पेपरमध्ये, फार वाईट वाटलं, असं कसं झालं गं?’ मी म्हटलं.
 नेहमीच्या शांत आवाजात म्हणाली, ‘वाईट तर वाटतंच ना, जन्मभर साठवून मिळवलेलं एका मिनिटात घालवून बसले, चूक माझीच झाली, सतत बातम्या येतच होत्या, मी मंगळसूत्र काढून ठेवलंच होतं गं, बांगडय़ासुद्धा खोटय़ाच होत्या, पाटल्या तेवढय़ा खऱ्या होत्या, बाकी माझ्याकडे तेवढंच सोनं होतं, बांगडय़ापण घट्ट होत्या. सहज निघण्यासारख्या नव्हत्या म्हणून ठेवल्या होत्या हातात. त्यांनी मला एका कारपार्किंगमध्ये नेलं. दमदाटी केली, मी घाबरून गेले. आणखी एक मोठी चूक झाली. ‘आरडाओरडा केला नाही, ओरडायची सवयच नाही ना गं?’
‘काय झालं?’
‘ ते दोघे माझ्या बांगडय़ा आणि पाटल्या घेऊन गेले. मी पुढे आले. एक ओळखीचा मुलगा भेटला, त्याला सगळं सांगितलं. तो म्हणाला, ‘आजी पोलीस कम्प्लेंट करायला हवी.’ त्यानेच घरी कळवलं. आम्ही पोलीस चौकीत गेलो, पण तुला सांगते, आपण पोलिसांबद्दल इतकं ऐकतो, मला तर चौकीत जायची भीती वाटत होती पण पोलीस फार चांगले वागले. मी म्हटलंदेखील पोलिसांना, ‘तुम्ही वेळोवेळी सांगूनही आम्ही नागरिक तुमचं ऐकत नाही, अंगावर सोनं घालतो, त्यामुळे चोऱ्या होतात. आता आमच्या चुकीमुळे तुम्हाला केवढा त्रास!
‘अगं, पोलिसांना कसला त्रास?’
‘काय म्हणतेस, इतक्या मोठय़ा शहरात हे चोर कुठे पळाले, ते शोधायला किती त्रास नाही का?’
‘काय म्हणाले, पोलीस?’
‘ते म्हणाले, आजी आमचं ते कामच आहे, तुम्हाला मात्र यावं लागेल चौकीत.’
आपल्या नुकसानापेक्षा पोलिसांना
मला हसावं की रडावं कळेना, आपल्या नुकसानापेक्षा पोलिसांना होणाऱ्या त्रासाने दु:खी होणाऱ्या या बाईला काय म्हणावं?
‘ठेवू का फोन, आज रामनवमी आहे ना, देवळात जायचंय, कीर्तन आहे, जन्माचा सोहळा आहे.’
‘आत्या, इतकं होऊन देवळात जायचंच आहे?’
‘माझ्या चोरीमध्ये रामाचा काय दोष आहे? चूक माझीच होती. शिक्षा मला मिळणारच, रामाचा दोष नाही की महाराजांचाही नाही, त्यांच्या मनात असेल तर चोर मिळेल, माझ्या पाटल्या मिळतील आणि राहिला प्रश्न आणखी काही चोरीला जाईल या भीतीचा, तर आता चोरण्यासारखं काही राहिलेलंच नाही.’
शांतिब्रह्म आत्याचे पाय धरावे, असं मला वाटलं. शिक्षण नाही म्हणून तिला आम्ही अडाणी म्हणतो, पण केवढं शहाणपण तिच्या ठायी आहे. तिची देवावरची श्रद्धा केवढी गहन आहे. आपल्या चुकीची, कर्माची जबाबदारी घेण्याचं मोठेपण तिच्याकडे आहे. त्यामुळेच कुणावर चिडण्याचा, रागावण्याचा प्रश्नच येत नाही. तिच्या भक्तीची जातकुळी, आपल्याला काही मिळावं म्हणून देवाजवळ नवस बोलणाऱ्या, संकट आल्यावरच देवाकडे धाव घेणाऱ्या, आपल्या यशाची फुशारकी गाणाऱ्या, व्यवहारी भक्तांसारखी नाही. गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचे प्रत्यक्ष आचरण करणाऱ्या माझ्या आत्याचं मोठेपण मला जाणवलं. पण फार प्रकर्षांनं जाणवलं, तिचं अंगभूत शहाणपण, आंतरिक समाधान जे कुठल्याही चोराला चोरता येणार नाही.    
    chaturang@expressindia.com