अश्विनी गोवारीकर
‘‘मानवकेंद्रित साध्य ही बाबांची प्रेरणा होती. ‘आपल्या शेतकऱ्यांकरिता’, ‘आपल्या माणसांकरिता’, ‘आपल्या देशासाठी’ अशा शब्दप्रयोगांनी किती संवादांची त्यांनी सुरुवात केली असेल त्याची गणती नाही. त्या आपलेपणाला अनुसरून त्यांनी अनेक प्रकल्प हाती घेतले. प्रकल्पाचे कित्येक विषय त्यांच्या अभ्यासाचे नव्हतेही. पण त्या विषयाचा अभ्यास करून आपल्या वैज्ञानिक विचारसरणीने ते तो प्रकल्प हाताळत असत. सर्जनशील क्षेत्रात मी कित्येक वर्षे काम करीत आहे, असे असूनही बाबांचा कोणत्याही समस्येकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला नेहमीच अचंबित करत असे.’’ सांगताहेत अश्विनी गोवारीकर आपले पिता डॉ. वसंतराव गोवारीकर यांच्याविषयी.
कथा, कादंबऱ्या, चित्रपट या माध्यमातून रंगवलेले वैज्ञानिकाचे सर्वसाधारण चित्र कसे असते? अस्ताव्यस्त केसांचा, विसरभोळा माणूस एकटाच आपल्या प्रयोगशाळेत किंवा अभ्यासिकेत काम करत बसलेला असतो. ज्या वैज्ञानिकाला मी ‘बाबा’ म्हणत असे तो वैज्ञानिक विसरभोळा होता, त्याचे केसही कधी कधी विखुरलेले असत. पण इथपर्यंतच ही तुलना बरोबर ठरते. कारण काम करण्याकरिता ते ज्या जागा निवडत त्या मात्र वेगळ्याच असत. माझ्या आठवणीतले बाबा हे जेवणाच्या टेबलावरच आपल्या बारीक अक्षरात लिहीत काम करत बसलेले असायचे. रेडिओ चाललेला असे, अवतीभोवती आम्हा तिघी बहिणींचा आरडाओरडा, गोंधळ, धावाधाव चाललेली असायची, त्यातच घरातले मांजरही मधूनच त्यांच्या खुर्चीवर उडी मारायला कमी करत नसे. पण कामातून त्यांचे चित्त जराही विचलित होत नसे. पण मधूनच कधी तरी आम्हाला एखादी मिठीही मारत किंवा आपल्या लाल पेनाने एखादे गमतीशीर चित्रही काढून देत असत. काम संपलं की आम्हाला घेऊन गाडीतून एखादी चक्कर मारत तर कधी आइसक्रीम खायला घेऊन जात. माझ्या मनातली वैज्ञानिकाची छबी अशी होती..
जशी मी मोठी झाले तसे माझे जग घराच्या बाहेर विस्तारू लागले आणि वैज्ञानिकाची ही छबी आणखी विस्तारत गेली. गाडीतून जाताना रस्त्यात कुणी ओळखीचं भेटलं तर थांबून ते त्यांना त्यांच्या घरापर्यंत सोडत. केवळ बसस्टॉपपर्यंत किंवा रिक्षापर्यंत असे त्यांनी कधी केले नाही. आठवडय़ातून काही दिवस त्यांचे सहकारी काम करायला घरी येत. त्या काळात बहुतेक सहकारी लग्न न झालेले होते. त्यांचं काम संपेपर्यंत त्रिवेंद्रममधली सर्व हॉटेलं बंद झालेली असत. मग काय हे सहकारी आमच्या घरीच जेवण करत, नंतर बाबा त्यांना घरी नेऊन सोडत. कारण त्या सहकाऱ्यांकडे स्वत:चं वाहन नसे. तशी त्यांची आणखी एक सवय माझ्या आठवणीत आहे ती म्हणजे कोणत्याही कामाच्या विषयावर चर्चा होत असताना बाबांचा हात सहकाऱ्यांपैकी कुणाच्या तरी खांद्यावर असे.
स्वत: वैज्ञानिक असूनही ते आमच्या अभ्यासाबाबत फार काटेकोर कधीच नव्हते. मला आठवतं, त्यावेळी आम्ही केरळमध्ये होतो. त्यावेळी स्पर्धा परीक्षांचं महत्त्व इतकं वाढलेलं नसल्याने शालेय गुणांना खूप महत्त्व दिले जाई. चांगले गुण मिळणं ही उच्च शिक्षणाची पहिली पायरी समजली जायची. चांगले गुण न मिळवलेल्या आमच्या वर्गमत्रिणी प्रगती पुस्तकावर सही मिळेल की नाही या विचाराने धास्तावलेल्या असत, पण आमचे बाबा आमच्या प्रगतिपुस्तकावर जसे पोस्टमनने आणलेल्या पत्राकरिता करावी तितक्या सहजपणे सही करत असत. अभ्यासातल्या गुणांपेक्षा आमच्या इतर गुणांकडे त्याचं लक्ष असायचं. आम्ही एखादा चटकदार विनोद केला, एखादं चांगलं चित्र काढलं किंवा कुणाला मदत केली तर आम्हाला प्रेमाने मिठी मारत, आमचं कौतुक करीत. इतर मुलींचे वडील त्यांना नेमलेली पाठय़पुस्तकं किंवा तत्सम पुस्तकं वाचायला लावत त्यावेळी बाबा आमच्या कॉमिक्स, गोष्टींची आणि इतर आवडीची पुस्तके वाचण्यावर भर देत. बाबा प्रगतिपुस्तकाला फार महत्त्व का देत नसत याचं कारण कित्येक वर्षांनंतर माझ्या लक्षात आलं. आई आणि बाबांना आमच्याकडून वेगळ्या अपेक्षा होत्या. आम्ही चांगला माणूस व्हावं, हे त्यांना जास्त महत्त्वाचं वाटे. आम्हाला काय व्हावंसं वाटतं ते होण्याकरिता आवश्यक ते धर्य किंवा बळ आमच्याकडे असावं. आम्ही जे करतो त्याची जबाबदारी घेण्याची आमची तयारी असावी. या गुणांकरिता शाळा किंवा महाविद्यालयातील गुण फारसे उपयोगी पडत नाहीत. अशा प्रकारच्या संगोपनामुळे आमच्या घरात एक प्रकारचा मोकळेपणा होता. त्यामुळेच त्या अजाणत्या वयात कुठल्याही विषयावर चर्चा करताना आम्हाला कधी संकोच वाटला नाही.
बाबांची विनोदबुद्धी वाखाणण्यासारखी होती. कोणतेही अपयश कडवटपणा न येऊ देता पचवायला ही विनोदबुद्धी कामी येत असावी. बाबांना पी.जी. वुडहाऊसची पुस्तकं फार आवडत. विद्यार्थी असताना आणि नोकरीला लागल्यावरही वुडहाऊसची बरीच पुस्तकं त्यांनी विकत घेतली होती. मला आठवतंय, आमच्या लहानपणी या पुस्तकांचं आम्ही एकत्र बसून वाचन करत असू आणि धम्माल हसत असू. आर. के. लक्ष्मण यांची कार्टून्स त्यांना फार आवडत. एखाद्यावर केलेल्या टीकात्मक किंवा खवचट विनोदाची बाबांना गंमत वाटत नसे, उलट निरागस विनोदांवर ते मिश्किल हसत. एक गंमत आठवतेय, मी लहान असताना आमच्याकडे ‘हिंदू’ हे वर्तमानपत्र येई. बाबांनी एके सकाळी मला विचारलं, ‘‘हिंदू आला का गं? तेव्हा मी म्हटलं, ‘‘हो, मग काय मुसलमान येणार आहे का?’’ हा विनोद ३ वर्षांच्या मुलीकडून ऐकून त्यांना इतकी मजा वाटली की पुढची ४० एक वर्षे तो विनोद आठवून त्यांना तितकंच मिश्किल हसू येत असे. विनोदी चित्रपट पहाणंही त्यांना फार आवडायचं. त्यांचा आवडता गमतीशीर चित्रपट म्हणजे ‘चलती का नाम गाडी.’ तो पाहताना ते असेच खुदुखुदू हसत.
सोमवार ते रविवार, बाबा अगदी रोजच काम करायचे. पण ते तितकेच कुटुंबासाठीही असत, हे आम्ही तिघी बहिणींनी अनुभवले होते. शनिवार-रविवारी जर त्यांना कामासाठी बाहेर जावं लागलं तर आम्हाला घेऊन जात. सुटीचा दिवस असल्याने ऑफिसमध्ये इतर कुणी नसायचं. आम्हाला त्यांचा फळा वापरायला मिळायचा, त्यांच्या कन्टीनमध्ये जेवायला मिळायचं आणि ऑफिसच्या आजुबाजूची बाग, जवळचा समुद्रकिनारा खेळायला मिळायचा. आम्ही मुली खूश व्हायचो. कधी एखाद्या दिवशी ऑफिसमध्ये इतर माणसं येणार असतील तर ते आम्हाला प्राणिसंग्रहालयामध्ये सोडत. आई असायचीच बरोबर, मग तिथे तिच्याबरोबर जेऊन मग घरी परतत असू. सुट्टीच्या दिवशी ते त्रिवेंद्रमच्या आसपासच्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला घेऊन जात. आम्हाला चित्रपट बघायचे असत पण त्रिवेंद्रममध्ये मुलांचे चित्रपट लागत नसत. मग ते आम्हाला एर्नाकुलमला घेऊन जात. शाळेला सुट्टी असताना त्यांना कामासाठी कुठे बाहेर जायचं असेल तर आम्हाला ते घरी ठेवत नसत. आम्हाला सोबत घेऊन जात. त्यांच्या कामाची ठिकाणंही उटकमंडच्याजवळचं एक गाव, एर्नाकुलम आणि श्रीहरिकोटा ही असल्याने आमच्यासाठी धम्माल असायची. बाबा कायम कामात असत, पण आमच्या आनंदाचा ते कायम विचार करत. आम्हाला पुरेसा वेळ देत.
आमच्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत. आम्हा तिघींना त्यांनी लाडाने एक एक टोपणनाव ठेवलं होतं. ते त्याच नावाने हाका मारायचे. बाबा कधी रागावल्याचं आठवतही नाही पण त्याचीही गंमतच आहे. आईने कधी काही आमच्याबद्दल तक्रार केलीच तर आम्हाला ओळीने उभे करून शिक्षा करायचे. शिक्षा म्हणजे काय वर्तमानपत्राच्या गुंडाळीने पुढे केलेल्या हातावर स्पर्श करायचे, झाली शिक्षा. पण अनेकदा असंही व्हायचं की त्यांनी आम्हाला नावांनी हाक मारली की वाटायचं ते आमच्यावर रागावले आहेत. मग आम्ही गंभीर चेहरे करून वावरायला लागायचो. किंवा टेबलाखाली जाऊन बसायचो किंवा त्यांच्याशी अबोला धरायचो. त्यांना याचं खूप वाईट वाटायचं. मग आई त्यांचा हा गैरसमज दूर करी तर तिला ते म्हणत, ‘‘तू या पोरींना हडहड केलीस तरी त्या तुझ्या मागे मागे येतात आणि मी जरा काही केलं (तेही मुद्दाम नाहीच) तर माझ्याशी अबोला धरतात. हा काय न्याय आहे!’’ आई गालातल्या गालात हसत असे बस्स!
बाबांनी मला समोर बसवून काय करावं किंवा काय नाही, याबद्दल कधी व्याख्यान दिल्याचं आठवत नाही. पण आमच्या संवादातून किंवा कृतीतून त्याबद्दलचे धडे झिरपत असत. आमच्या घरी चच्रेकरिता कोणताही विषय वर्ज्य नसे. २० वर्षांची असताना मला एम.एस्सी.चा अभ्यास सोडून जाहिरात क्षेत्रात काम करावंसं वाटू लागलं. शिक्षण पूर्ण न करणं बाबांना जरा खटकलं असणार पण त्याचा जराही उल्लेख न करता मार्गदर्शनाकरिता जाहिरात क्षेत्रातल्या लोकांशी त्यांनी माझी गाठ घालून दिली. एकदा मी माझ्या खडूस बॉसबद्दल बाबांकडे तक्रार करत होते. त्यावर तोडगा म्हणून त्यांनी मला हलकेच एक गोष्ट सांगितली. ‘समस्यांना महत्त्व न देता आपल्या सर्जनशीलतेचा पुरेपूर उपयोग करण्याकडे लक्ष केंद्रित कर,’ असा त्याचा काहीसा आशय होता. जस जसं मी ते तत्व प्रत्यक्षात आणू लागले तसा मला त्याचा प्रत्यय येऊ लागला, जे माझ्या कल्पनेच्या पलिकडचे होते. मला त्या बॉसचा पुन्हा कधी त्रास झाला नाहीच उलट माझं कामही अधिक सर्जनशील झालं. कालांतराने मी लघुकथा लिहू लागले. बाबा माझे वाचक. ते त्यातील मुद्दय़ांचे, आशयाचं कौतुक करीत.
पुढे वयाच्या एका टप्प्यावर मी बाळ दत्तक घेण्याचा विचार करत होते. जेव्हा ‘बाळ घेऊन जाऊ शकता’ असा त्या संस्थेकडून निरोप आला त्यावेळी बाबा एका गंभीर आजाराला तोंड देत होते. तरीही त्यांनी या गोष्टीचं आनंदाने स्वागत केलं. त्यावेळी माझं वय ४० च्या पुढचं होतं, मी एकटी होते या गोष्टींचा त्यांना बाऊ वाटला नाही. उलट मी हे नीट पार पाडू शकेन असा त्यांना विश्वास वाटत होता आणि त्याच विश्वासावर मी माझी पुढची वाटचाल आनंदाने करते आहे.
बाबा वैज्ञानिक, शास्त्रज्ञ! त्यांचं काम मोठंच होतं, त्यामागे होती, त्यांची अखंड मेहनत, कामाचा ध्यास आणि मुख्य म्हणजे जगासाठी, माणसांसाठी काही तरी ठोस करण्याची प्रेरणा. बाबांना ‘इस्रो’ने प्रतिष्ठेची ‘प्रोफेसरशिप’ दिली. तेव्हा बाबांनी १९७६ मध्ये केलेल्या एका संशोधनाचा विकास करण्याचं ठरवलं आणि अखाद्य तेलापासून क्रूड तेल बनविण्याचे प्रयत्न सुरू केले. ‘इस्रो’च्या अध्यक्षांनी त्यांना सांगितलं की, तुमच्याकडून कोणत्याही कामाची अपेक्षा नाही. तुम्ही ‘इस्रो’त केलेल्या कामाचा हा सन्मान आहे. पण बाबांना स्वस्थ बसवलं नाही. हा प्रकल्प अजून चालू आहे. या प्रकल्पानंतर त्यांनी ‘खतांचा विश्वकोश’ तयार करायला घेतला. तो जगभरातला पहिलाच विश्वकोश ठरला. दर वेळी नवीन विषय घ्यायचा, तो आत्मसात करायचा आणि प्रकल्प तडीला न्यायचा हा त्यांचा छंद म्हणावा इतके त्यात ते रमून जात असत.
‘डिझाइन थिंकिंग’ ही कल्पना आज जगभर प्रचलित होत आहे. त्यामागे मानवकेंद्रित अडचणींचं स्वरूप निश्चित करून त्यावर सुयोग्य तोडगा शोधणं याच्यावर भर दिलेला असतो. अधिक नवनिर्माणासाठी आणि अधिक सर्जनशीलतेसाठी आज अनेक आय. टी. कंपन्या, उत्पादक कंपन्या, सल्लागार कंपन्या आदींनी ‘डिझाइन थिंकिंग’मागची तत्त्वं आत्मसात केलेली आहेत. या विषयावरचे लेख जेव्हा मी वाचते तेव्हा ‘डिझाइन थिंकिंग’ हे बाबांच्या डीएनएमध्येच असावं असं वाटतं. त्यांना साध्य करण्याचे सर्व विषय, मग ते व्यक्तिगत असोत किंवा व्यावसायिक असोत, मानवकेंद्रित (ओघाने राष्ट्रकेंद्रित)असत. ही साध्यं गाठताना अडथळे किंवा अपयश म्हणजे तेथे पोहोचण्याच्या मार्गाचा भाग समजून बाबा ते पार करीत असत.
एकदा डॉ. विक्रम साराभाई यांनी ‘आपल्या अंतरिक्ष कार्यक्रमाच्या वाटचालीकरिता फ्रान्सकडून अत्यंत महाग असं प्रणोदक (रॉकेट इंधन – Rocket fuel)आणावं लागणार आहे,’ असा उल्लेख केला होता. ते ऐकल्यानंतर बाबा व त्यांचे सहकारी यांनी स्वदेशी इंधन बनवण्याचा चंग बांधला. त्या वेळच्या अपुऱ्या सुविधा, अनेक धोकादायक प्रसंग यातून मार्ग काढत अविश्रांत कष्ट घेत त्यांनी स्वदेशी इंधन अखेर तयार केलं. पुढे वैज्ञानिक म्हणून ‘विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्रा’त घनप्रणोदकाचा विकास बाबांनी केला. आजही घनप्रणोदक आपल्या अंतरिक्ष कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावत असतं. (त्यांच्या सहकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे घनप्रणोदक हे मोठय़ा सांध्याचा एक भाग होता).
मानवकेंद्रित साध्य ही बाबांची प्रेरणा होती. ‘आपल्या शेतकऱ्यांकरिता’, ‘आपल्या माणसांकरिता’, ‘आपल्या देशासाठी’ अशा शब्दप्रयोगांनी किती संवादांची त्यांनी सुरुवात केली असेल याला गणती नाही. त्या आपलेपणाला अनुसरून त्यांनी अनेक प्रकल्प हाती घेतले. प्रकल्पाचे कित्येक विषय त्यांच्या अभ्यासाचे नव्हतेही. पण त्या विषयाचा अभ्यास करून आपल्या वैज्ञानिक विचारसरणीने ते तो प्रकल्प हाताळत असत. सर्जनशील क्षेत्रात मी कित्येक वर्ष काम करीत आहे, असं असूनही बाबांचा कोणत्याही समस्येकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन मला नेहमीच अचंबित करत असे. १९८२ मध्ये बाबा ‘इंडियन सायन्स काँग्रेस’चे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी भारतीय लोकसंख्या हा विषय घेतला. भारतीय लोकसंख्येकडे विज्ञानाच्या दृष्टीतून बघत त्यांनी तो विषय हाताळला. पुस्तकाला ‘विज्ञान लोकसंख्या आणि विकास’ असं शीर्षक दिलं. अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञांना त्यांच्या दृष्टीतून भारतीय लोकसंख्या या विषयावर लिहायची विनंती केली. १९८० मध्ये आपली जनगणना झाली होती आणि आपल्या लोकसंख्येचे आकडे सर्वानाच बेचन करत होते. पण सकारात्मक विचार हे बाबांचं वैशिष्टय़ होतं. लोकसंख्या कमी होण्यासाठी काही वर्ष जावी लागतात हे जाणून त्यांनी त्या विषयावर लिहिलं. त्यात दोन गोष्टी प्रामुख्याने नमूद केल्या. एक तर लोकांचं आयुर्मान वाढत आहे, त्यामुळे लोकसंख्येत कमी घट होत आहे. ही आपल्या वैद्यकीय सेवेकरता अभिमानास्पद गोष्ट आहे. दुसरं म्हणजे वाढत्या लोकसंख्येत तरुणांची संख्या मोठी आहे. या पुस्तकाचं स्वागत झालं. त्याची एक लहान आवृत्ती काढावी अशी सूचना आल्याने ‘द इनएव्हिटेबल बिलियन प्लस’ शीर्षकाचं पुस्तक काढलं गेलं. याचंही सर्वत्र स्वागत झालं. त्याची पेपरबॅक आवृत्ती ‘नॅशनल बुक ट्रस्ट’नेही काढली. त्यानंतर एक आणखी सूचना आली की, या पुस्तकात कुणी काय म्हटलंय हे तुम्ही एकटाकी का लिहीत नाही? त्यामुळे ‘आय प्रेडिक्ट’ शीर्षकाखाली त्यांनी आणखी एक पुस्तक लिहिलं. या पुस्तकामुळे भारतीय लोकसंख्येकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू लागला. हे या पुस्तकांचं खरं यश आहे.
बाबांचा आणखी एक प्रकल्प म्हणजे भारतीय पावसाचे अचूक अंदाज करणारं मॉडेल. ते जेव्हा ‘डिपार्टमेंट ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी’मध्ये काम करू लागले तेव्हा हवामान खातं त्यात समाविष्ट होतं. हवामान खात्यात तज्ज्ञ लोक आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यांना एक गोष्ट खटकायला लागली. ‘‘आपल्याकडे इतके तज्ज्ञ लोक असताना आपल्या पावसाच्या अंदाजाकरिता बाहेरची मदत का लागावी?’’ त्यानंतर हवामान खात्यात काम करणाऱ्यांची बैठक घेऊन त्यात ‘स्वदेशी मान्सून मॉडेल’ बनविण्याचं ठरलं. आणि वर्ष-दीड वर्षांत असं मॉडेल तयार करण्यात आलं. त्यांनी केलेला पहिलाच अंदाज बरोबर ठरल्याने सर्वाचा उत्साह वाढला. त्या मॉडेलला हवामानखात्यातले लोक प्रेमाने ‘गोवारीकर मॉडेल’ म्हणू लागले आणि त्या वेळी लोकांना वाटायचं की, डॉ. वसंतराव गोवारीकर हे हवामानशास्त्रज्ञ आहेत.
बाबांचा एक वेगळाच गुण ठळक होतो तो त्यांच्या अपयशी प्रकल्पांतून. १९९० च्या दशकात बाबांनी सरकारकरिता मुंबईमध्ये एक प्रकल्प राबवायची कल्पना मांडली. त्यात कचऱ्याची विल्हेवाट, मुंबईतल्या झोपडपट्टय़ांत सांडपाण्याची व्यवस्था आणि स्वच्छतागृहं या गोष्टींचा समावेश होता. या प्रकल्पामुळे झोपडपट्टीतल्या लोकांना कपडे धुण्याची व संडासच्या पाण्याची सोय होईल व खतं बनवणाऱ्या कंपन्या कचरा विकत घेतील आणि त्यापासून जळणाला उपयोगी पडतील अशा वडय़ा तयार करता येतील, अशी बाबांची कल्पना होती. याबरोबर आणखीही एक प्रकल्प त्यांनी आखला होता. त्यात शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवायचा त्यांचा मानस होता. मातीपरीक्षा करून त्या-त्या प्रदेशात उपयोगी पडेल अशी खतमिश्रणं बनवायची आणि ती शेतकऱ्यांना द्यायची. सुयोग्य खतामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढेल या कल्पनेने त्यांचे डोळे लकाकू लागत. पण हे दोन्ही प्रकल्प प्रत्यक्षात आलेच नाहीत. काही वर्षांनंतर मी बाबांना त्यासंबंधी विचारलं तेव्हा ते एवढंच म्हणाले, ‘‘नाही झाले.’’ मी खोदून खोदून विचारलं तेव्हा ते हसले व एवढंच म्हणाले, ‘सरकार बदललं.’
‘डिझाइन थिंकिंग’मध्ये अपयशाला इतक्या सहज ओलांडून नवीन मार्ग शोधावे असं काही शिकवतात का हे मला माहीत नाही, पण हा बाबांचा ट्रेडमार्क होता असं म्हणायला हरकत नाही.
बाबांना जाऊन ४ वर्ष झाली. त्यांच्या विचारातली स्पष्टता, सकारात्मकता आम्हाला कायम साथसोबत करणार आहे. सकाळी कामाचा रगाडा सुरू होण्यापूर्वी ‘टाइम्स’मधलं आर. के. लक्ष्मण यांचं कार्टून पाहून खुदुखुदु हसणारे बाबा आणि त्याचबरोबरीने ‘पावसाळ्याच्या लहरीपणातून शेतकऱ्यांची सुटका करण्याकरिता आपल्याकडे पुरेशी धरणं असली पाहिजेत.’ या विषयावर आपलं आजारपण विसरून तळमळीने बोलणारे बाबा.., आजही त्यांची ही दोन्ही रूपं माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीत.. आजही त्यांची अनेक वाक्यं माझी साथसंगत करत असतात.. ‘पुढे पाहात राहिलं तर भविष्यकाळ नेहमी उज्ज्वल असेल,’ हे त्यांचं वाक्य आठवलं की माझं धर्य परत येतं..
बाबांचा आणखी एक प्रकल्प म्हणजे भारतीय पावसाचे अचूक अंदाज करणारं मॉडेल. ते जेव्हा ‘डिपार्टमेंट ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी’मध्ये काम करू लागले तेव्हा हवामान खातं त्यात समाविष्ट होतं. हवामान खात्यात तज्ज्ञ लोक आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यांना एक गोष्ट खटकायला लागली, ‘आपल्याकडे इतके तज्ज्ञ लोक असताना आपल्या पावसाच्या अंदाजाकरिता बाहेरची मदत का लागावी?’ त्यानंतर हवामान खात्यात काम करणाऱ्यांची अखेर बैठक घेऊन त्यात ‘स्वदेशी मान्सून मॉडेल’ बनविण्याचं ठरलं. आणि वर्ष-दीड वर्षांत असं मॉडेल तयार करण्यात आलं. त्यांनी केलेला पहिलाच अंदाज बरोबर ठरल्याने सर्वाचा उत्साह वाढला. त्या मॉडेलला हवामानखात्यातले लोक प्रेमाने ‘गोवारीकर मॉडेल’ म्हणू लागले आणि त्या वेळी लोकांना वाटायचं की, डॉ. वसंतराव गोवारीकर हे हवामानशास्त्रज्ञ आहेत.
एकदा डॉ. विक्रम साराभाई यांनी ‘आपल्या अंतरिक्ष कार्यक्रमाच्या वाटचालीकरिता फ्रान्सकडून अत्यंत महाग असं प्रणोदक (रॉकेट इंधन)आणावं लागणार आहे,’ असा उल्लेख केला होता. ते ऐकल्यानंतर बाबा व त्यांचे सहकारी यांनी स्वदेशी इंधन बनवण्याचा चंग बांधला. त्या वेळच्या अपुऱ्या सुविधा, अनेक धोकादायक प्रसंग यातून मार्ग काढत अविश्रांत कष्ट घेत त्यांनी स्वदेशी इंधन अखेर तयार केलं.
gowariker@gmail.com
chaturang@expressindia.com