चित्रा वाघ
‘‘रोजच्या जगण्यातल्या अनुभवांना डोळसपणे टिपणं, त्यातलं मर्म नेमकं शोधून मोजक्या पण अर्थपूर्ण शब्दांत त्याची शैलीदार मांडणी करणं, ही बाबांच्या लिखाणाची ठळक वैशिष्टय़ं म्हणता येतील. प्रसन्न आनंदाचा शिडकावा करणारी चाळीस वाचनीय पुस्तकं आपल्या हातून लिहून झाली याबद्दल ते अतिशय समाधानी होते. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर, मी लेखन करतो कारण दुर्मीळ अशा तंद्रीचा अनुभव मला लेखन करताना येतो. या तंद्रीत तुडुंब सुख आहे. समाधानाच्या सरोवराकडे एकटय़ाने जाण्याची ती अद्भुत पायवाट आहे. कोऱ्या कागदाची हाक सतत कानावर पडणं ही श्रीरामाची परमकृपा..’’ सांगताहेत चित्रा वाघ पिता रवींद्र पिंगे यांच्या लेखनप्रवासाविषयी..
एखाद्या सुंदर डेरेदार झाडाच्या फळांना त्या झाडाचा भक्कम आधार मिळतो, पोषण होतं, निकटचा सहवास लाभतो, पण त्या झाडाचा आवाका, त्याची उंची जाणवत नाही. तसंच काहीसं आमचं होतं. ‘आनंद, सुख, समाधान या भावना म्हणजे अंती एकाच डोहातलं स्वच्छ पाणी आहे आणि देवाच्या या अफाट दुनियेत साध्या, सोज्वळ सुखांचा केवळ सुकाळ आहे. फक्त आपल्यापाशी वास्तव मान्य करणारी नजर हवी आणि संवादी सुरात कबुली देणारं, प्रांजळ, मोकळं मन हवं.’ असं प्रसन्न आणि आशयसंपन्न लिहिणारे आमचे बाबा रवींद्र पिंगे, एक सुप्रसिद्ध लेखक आहेत हे आम्हाला कळायला बरीच वर्ष जावी लागली.
आम्ही म्हणजे मी आणि माझा भाऊ सांबप्रसाद. बाबांचं लग्न तसं बरंच उशिरा म्हणजे त्यांच्या वयाच्या अडतिसाव्या वर्षी झालं. आमच्या जन्माच्या आधीच लेखक म्हणून ते नावारूपाला आले होते. लहानपणापासून आम्हाला जाणवायचं, की आमच्या बाबांसारखे इतरांचे बाबा सतत वाचताना किंवा लिहिताना दिसत नाहीत. आमच्या घरी बघावं तिथे पुस्तकं आणि शोभेच्या वस्तू कुठेच नाहीत. पण बाबांची दुनियाच निराळी होती. बाबा गेल्यावर त्यांच्याविषयी प्रसिद्ध झालेल्या अनेक लेखांतून, पत्रांमधून, अजूनही भेटणाऱ्या त्यांच्या वाचकांकडून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कितीतरी निराळे पलू आम्हाला समजले. अजूनही समजत आहेत. त्यांच्या पुस्तकातले अध्रेमुध्रे लेख वाचून फार तर ‘छान लिहिलंयत बाबा!’ असं सांगायचो. पण आज मात्र नव्याने वाचताना त्यांचे ललितलेख, प्रवासवर्णनं, व्यक्तिचित्रं खूप भावतात. बाबांशी त्यावर भरभरून बोलायला हवं होतं असं प्रकर्षांने जाणवतं. ही चुटपुट आता कायमच राहणार..
आमच्या घरात हात न्यावा तिथे फक्त पुस्तकं असल्यामुळे साहजिकच आम्हाला दोघांनाही लहानपणापासून वाचायची आवड लागली. आमच्या घरी सगळ्या विषयांची पुस्तक होती. सगळीच चांगली. ‘काय वाचू’ असा प्रश्न कधी पडलाच नाही. बऱ्याचदा मोकळ्या वेळात आमच्या चौघांच्याही हातात पुस्तक असायचं. आम्ही जरा मोठे झाल्यावर बाबा सांगायचे, की ‘मधूनमधून इंग्रजी पुस्तकंही वाचा, त्यामुळे तुमच्या वाचनाच्या कक्षा रुंदावतील. नवीन विषय समजतील.’ ते नेहमी म्हणायचे, की आपल्याकडचे लेखकही छान लिहितात, पण त्यांच्याकडे स्वानुभवाच्या मर्यादा आहेत. आमची शाळा मराठी असल्यामुळे इंग्रजी वाचताना खूपच अडचण यायची. सुरुवातीला आम्ही डिक्शनरी घेऊन बसायचो, पण त्यामुळे वाचनातली मजाच निघून जायची. आमचा कंटाळा बघून, त्यांनी ‘डिक्शनरीशिवाय वाचायला शिका, हळूहळू अर्थ लागत जाईल’ असं सुचवलं.
तसं म्हटलं तर बाबांनी पुढय़ात बसून आम्हाला काहीच शिकवलं नाही. मित्रमंडळींमध्ये खूप गप्पा मारणारे बाबा घरात मात्र अगदी मोघम बोलत. कधी कधी साहित्यवर्तुळातल्या नाहीतर कार्यालयामधल्या गमतीजमती सांगायचे. दुर्गाबाई भागवतांविषयी त्यांना अपार आदर होता. रेडिओवर त्या येऊन गेल्या किंवा ‘एशियाटिक’मध्ये भेट झाली, की त्यांच्याविषयी हमखास सांगायचे. या सगळ्या गप्पा जेवणाच्या टेबलावरच व्हायच्या. चुकूनही कधी शेजारीपाजारी किंवा नातेवाईकांबद्दल ते उणंदुणं बोलत बसल्याचं मला आठवत नाही. अशा गोष्टीत कुणी वेळ फुकट घालवल्याचा त्यांना रागच यायचा. शांत आणि समाधानी वृत्ती हा बाबांचा स्थायीभाव. ‘त्याचं त्याला, जिथल्या तिथे, जेव्हाचं तेव्हा’ हा मंत्र अगदी कसोशीने पाळत. कार्यालयाला जाण्याआधी संपूर्ण जेवण जेवून बरोबर साडेआठला बाहेर पडत. जाण्याचा कंटाळा केला किंवा आपल्या वस्तू शोधण्यात वेळ गेला, निघायला उशीर झाला, धावतपळत स्टेशन गाठलं, असं चुकूनही कधी झालं नाही. शांतपणे चालत स्टेशनला जात. धक्काबुक्की करण्याचा पिंडच नसल्याने कायम उभे राहून प्रवास करत. ट्रेनने जाता-येताना कायम पुस्तक हातात! सकाळी आम्हाला जाग येई तेव्हा बाबा टेबलाजवळ बसून काहीतरी लिहिताना दिसायचे. बाबांचा कर्मकांडावर विश्वास नसला तरी ते सश्रद्ध होते. स्वत: देवपूजा कधी केली नाही, पण कितीही गडबडीत असले तरी देव्हाऱ्यासमोर दोन मिनिटं भक्तिभावाने नमस्कार करणंही कधी चुकवलं नाही. आपल्या अभ्यासिकेत सत्पुरुषांच्या फोटोसमोर डोळे मिटून शांतपणे बसलेले बाबा आम्ही नेहमी पाहिले आहेत. बाबांच्या नवीन पुस्तकाला कव्हर घालण्याचं आणि लेख लिहून झाल्यावर त्यातले शब्द मोजण्याचं काम माझ्याकडे असे. सर्व लेख पाठकोऱ्या कागदांवर सुवाच्य अक्षरात लिहिलेले असायचे. कुठेही खाडाखोड नसे. ‘आठशे शब्द झालेत का बघ, बाराशे झालेत का मोज.’ असं सांगायचे. आश्चर्य म्हणजे सगळ्या लेखांची लांबी नेहमी शब्दमर्यादेतच असे. ना कमी ना जास्त!
संध्याकाळी घरी परतण्यापूर्वी अनेकदा गिरगावात आत्माराम बंधूंच्या चाळीतल्या घरी जाऊन ते आपल्या आई-वडिलांना भेटत. त्या दोघांवर बाबांचं अतिशय प्रेम. त्यांचा एकही शब्द बाबा खाली पडू देत नसत. आमचे आजीआजोबा होतेही तसेच, सात्त्विक आचारविचारांचे, नवनवीन गोष्टी सांगणारे, रामाच्या देवळात कीर्तनाला घेऊन जाणारे आणि चुकूनही न रागावणारे. दोघेही मुंबई नगरपालिकेत प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी करून पुढे मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. माझी आई मूळची सातारची. माहेरची कमल मंत्री. सारस्वत ब्राह्मण असूनही पूर्ण शाकाहारी. माझे आजोबा नावाजलेले फौजदारी वकील. घरचा मोठा गोतावळा आणि त्याला साजेसा १०-१२ खोल्यांचा ऐसपस वाडा. घरची मोठी शेती.
तेल-तूप, धान्य, भाज्या सगळं घरचं. त्याच्या बरोबर उलटं सासर. लग्न करून ती आली गिरगावातल्या चाळीत पिंग्यांच्या दीडखणी घरात! गायी-म्हशी, दूधदुभतं, माडीवरच्या खोल्या, प्रशस्त अंगण हा विषयच नाही. समुद्र, चौपाटी, बस, ट्रेन, चाळीतले शेजारी, रेशनचं दुकान, नाटक-चित्रपट असं वेगळंच जग. इथेही गोतावळा मोठाच, पण वातावरण खेळीमेळीचं. मुलीसारखं प्रेमाने वागवणारे सासूसासरे, आजेसासूबाई, चुलतसासरे, दोन दीर, चार नणंदा, भाचरंडं अशा पिंगे कुटुंबात ती मनापासून रमली. त्यांनीही घरचे सगळे व्यवहार आणि अर्थातच स्वयंपाकघर आनंदाने तिच्या स्वाधीन केलं. अंडंदेखील कधी खाल्लेलं नसूनही ती इथे माशांचं जेवण करायला आणि खायलाही शिकली. कामाचा प्रचंड उरक असल्याने सकाळी उठून पाणी भरणं, बाजारहाट करणं, डबे करणं तिला अजिबात जड गेलं नाही. आईची आई तिच्या लहानपणीच वारली, पण माझ्या आजीचं आणि तिचं नातं काहीतरी वेगळंच होतं आणि ते शेवटपर्यंत तसंच टिकून होतं. तिची दोन्ही बाळंतपणं गिरगावातच झाली. बाळंतीण असताना आजी तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये जाई तेव्हा तिथल्या सर्वाना त्या दोघी मायलेकी आहेत असंच वाटे.
पुढे जागेची अडचण होत असल्याने आम्ही गिरगाव सोडलं आणि वाकोल्याच्या कुमार सोसायटीत राहायला आलो. या घराला छोटीशी गॅलरी होती. बाबा रात्री जेवण झाल्यावर कायम शतपावली घालायचे. कितीही दमून आले असले तरी त्यांची शतपावली कधी चुकली नाही. जेवणं झाल्यावर आम्हीसुद्धा पेंगुळलेले असायचो. दोघांचाही त्यांच्यामागे उचलून घेण्यासाठी आग्रह चालायचा. एकेकाला कडेवर घेऊन ते आपल्याच नादात फेऱ्या मारायचे (बहुधा मनात लेखाची जुळवाजुळव करत असावेत) आणि आम्ही शांतपणे त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपी जायचो. बहुतेक वेळा माझा नंबर आधी लागायचा. आम्ही तेव्हा बऱ्यापैकी मोठे म्हणजे पहिली-दुसरीत वगैरे असू. मग कधी हात दुखला की ते सांबूला म्हणायचे, ‘‘तू आता मोठा झालास, ती अजून लहान आहे.’’ मग तो म्हणे, ‘‘गेल्या वर्षी पण तुम्ही हेच म्हणाला होतात.’’ मग ते फक्त हसायचे. गॅलरीच्या दरवाजाशी फुरंगटून वाट बघत असलेला सांबू मला अजूनही आठवतो.
या घरात आमच्याकडे कमीत कमी सामान होतं. एका लोखंडी कपाटात चौघांचे कपडे आणि अंथरुणं-पांघरुणं मावत होती. बाबांना लिहिण्यासाठी म्हणून डायिनग कम रायटिंग टेबल मात्र लगेच घेतलं गेलं. बेड त्यानंतर बऱ्याच उशिराने आला. याच टेबलावर बाबांनी सुरुवातीची अनेक पुस्तकं लिहिली. ‘शतपावली’ या पुस्तकाला राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार मिळाला तोही इथल्याच घरी. तेव्हा टीव्ही क्वचित एखाद्या घरात असे. बाबांनी त्या कृष्णधवल दिवसात सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ के. वि. बेलसरे यांची ‘दूरदर्शन’वर घेतलेली मुलाखत पाहिल्याचंही पुसटसं आठवतं.
या वाकोल्याच्या घरातली एक मजेदार आठवण आहे. नेहमीप्रमाणे आम्ही जेवून रात्री साडेआठ-नऊलाच झोपून गेलो होतो. अचानक दरवाजाची बेल वाजली आणि बाबांनी दुधाचं भांडं हातात घेऊन दार उघडलं. दारात हास्यकल्लोळ उडाला. आम्ही डोळे चोळत उठलो तर बाबांची मित्रमंडळी रात्री १२ वाजता आमच्या घरी येऊन थडकली होती. ‘नववर्षांचं अभिष्टचिंतन’ करायला! त्यात व.पु. आणि वसुंधरा काळे, अरुण दाते, बबन आणि नीलम प्रभू, शशी आणि उषा मेहता अशी ८-१० मंडळी होती. ३१ डिसेंबर म्हणजे ख्रिस्ती वर्षांखेर इतपतच आमचं ज्ञान! नववर्षांची पहाट वगैरे गोष्टी तर आमच्या गावीही नव्हत्या.
पुढे ते घर विकून आम्ही विलेपाल्र्याला ‘जय हनुमान सोसायटी’त राहायला आलो. या जागेसाठी तेव्हा दहा हजारांचं कर्ज घ्यावं लागलं होतं. मला आठवतं, ते कर्ज फिटेपर्यंत बाबांनी स्वत:साठी एकही कपडा शिवला नव्हता. पण आमची हौसमौज जमेल तशी पुरवणं चालू होतंच. आमचे जुने मित्रमत्रिणी तुटल्यामुळे नवीन जागेत आल्यावर आम्ही थोडे नाराज होतो. इथे आलो तेव्हा नवीन शाळा, नवीन मुलं. त्यांच्यात मिसळणं सुरुवातीला जड गेलं. त्या वेळी बाबा काही कामानिमित्त दिल्लीला गेले होते. तिथून त्यांनी सांबूसाठी क्रिकेटचा संपूर्ण सेट आणला. म्हणाले, ‘‘नवे मित्र जोडायचे असतील तर
बॅट-बॉल घेऊन जा. हवे तेवढे मित्र मिळतील.’’ आणि तसंच झालं. तो सेट बघून कुठून कुठून अनोळखी मुलं त्याला खेळायला बोलवायला लागली. बाबांनी आम्हाला ओरडल्याचं किंवा कुठल्या गोष्टीला विरोध केल्याचं फारसं आठवतच नाही. पाचवीत असताना मी पहिल्यांदा बॉबकट केला तेव्हा आईचा विरोध असल्यामुळे मी गुपचूप बाबांना बरोबर घेऊन एका घरगुती पार्लरमध्ये जाऊन केस कापून आले होते.
सामिष आहार, विशेषत: मासे, हा बाबांचा आणि माझा खास जिव्हाळ्याचा विषय. मासे किंवा तिसऱ्या असल्या, की बाबा जेवायला येताना हातात एक कागदाचा छोटा चौकोनी तुकडा घेऊन यायचे. आमच्या दोघांच्या दोन ताटांखाली त्याचं एकेक टोक जाईल अशा पद्धतीने तो कागद मध्ये पसरायचे. काटे आणि शिंपले यांची अडगळ ताटात होऊ नये म्हणून ही खास सोय! मासे खाताना त्यांच्या लहानपणीच्या गिरगावातल्या किंवा त्यांच्या गावच्या, उपळेच्या गोष्टी हमखास निघत. दादरला ‘आयडियल’मध्ये जाणं झालं, की येताना गव्हाची खमंग खारी बिस्किटं, कधीतरी केळफूल, कोरलाची पालेभाजी, ओले काजू असं घेऊन येत. आजी आजोबा तेव्हा गिरगावात राहात. बाबा ऑफिसमधून येताना तिथे जाऊन येत. आमच्या आजीच्या साध्या जेवणालासुद्धा अमृताची चव होती. कधीतरी त्यांच्या रिकाम्या डब्यातून ते आजीने केलेली एखादी भाजी किंवा आमटी घेऊन येत. आमच्या रात्रीच्या जेवणाला त्यामुळे आजीच्या मायेचा स्वाद येई.
माझ्या आईने संसाराची पूर्ण जबाबदारी एकटीने सांभाळली. आमचा अभ्यास, अॅडमिशन्स, आजारपण, छोटे-मोठे समारंभ, पाहुणे, खरेदी, बँकेचे व्यवहार या कशातही बाबांना लक्ष घालावं लागलं नाही. कदाचित म्हणूनच नोकरी सांभाळून ते इतकी वर्ष सातत्याने दर्जेदार लेखन करू शकले. बाबांची व्यवहाराची पद्धतही वेगळीच होती. महिन्याच्या एक तारखेला ते आईच्या हातात ठरावीक रक्कम ठेवायचे. हिशोब कधीच विचारायचे नाहीत. त्यांची स्वत:ची हिशोब ठेवण्याची पद्धतही सोप्पी होती. फक्त आलेल्या पशांची नोंद करीत, गेलेल्या पशाचा हिशोब त्यांनी कधीच ठेवला नाही. त्यांनी कितीतरी गरजूंना मदत केली, पण कधीच कुणाकडे त्याची वाच्यता केली नाही. अगदी घरातही नाही. अजूनही काहीजण भेटले की त्याविषयी सांगतात तेव्हा आम्हाला समजतं.
सुरुवातीची काही वर्षे सचिवालयात काम केल्यावर बाबांनी थोडय़ा कमी पगाराच्या पण लेखन-वाचनासाठी अत्यंत पोषक वातावरणाच्या आकाशवाणी केंद्रावर नोकरी केली. तिथे मनापासून रमले. मराठी विभाग प्रमुख या नात्याने त्यांनी खेडोपाडय़ातल्या अनेक गुणी आणि होतकरू लोकांना आकाशवाणीवर सादरीकरणाची संधी दिली. विस्मृतीत गेलेल्या कित्येक वृद्ध आणि गरजू साहित्यिकांना, कलाकारांना शासकीय निवृत्तिवेतन उपलब्ध करून देण्यासाठी धडपड केली. कितीतरी नवलेखकांना सर्वतोपरी मार्गदर्शन केलं, वाचकांनाही अधिक चांगलं साहित्य वाचण्यासाठी कायम प्रवृत्त केलं. आमच्या घरी अशा साहित्यप्रेमींचा राबता नेहमीच असे. बाबा उत्तम लेखक जसे होते तसेच ते उत्तम वाचकही होते. पुस्तकांवर त्यांचं मनापासून प्रेम होतं. वाचलेल्या प्रत्येक पुस्तकाची व्यवस्थित नोंद ते करत. त्यांचा पत्रव्यवहारही दांडगा होता. रोजच्या रोज ते पोस्टात फेरी मारत. आलेल्या प्रत्येक पत्राला न चुकता उत्तर पाठवत. व. दि. कुलकर्णी, रमेश मंत्री, तुकाराम कोठावळे, माधव गडकरी, राजा राजवाडे, वसंत सरवटे, केशव केळकर, आनंद साधले ही मंडळी जवळपास राहात असल्याने अनेकदा बाबांचे जाणे-येणे होत असे. मंगेश पाडगावकर तर गिरगावातले जुने स्नेही. नीलम प्रभू, अनुराधा औरंगाबादकर,
स्मिता राजवाडे, मीरा प्रभुवेल्रेकर, प्रतिभा आळतेकर, सुधा नरवणे अशा अनेकांशी आमचा कौटुंबिक स्नेह जडला.
आमच्या घरात अक्षरश: हजारो पुस्तकं होती, बरीचशी गिरगावातल्या घरातही होती. त्यातली कितीतरी दुर्मीळ पुस्तकं त्यांनी फुटपाथवरल्या पुस्तकांतून शोधून काढलेली होती. पुस्तकांविषयी काही संदर्भ विचारण्यासाठी त्यांना अनेकजण फोन करत. याबाबतीत त्यांची स्मरणशक्ती इतकी तीव्र होती, की देशविदेशातले लेखक, त्यांची महत्त्वाची पुस्तकं, लेखनवैशिष्टय़ं, त्यांच्या आयुष्यातले विशेष प्रसंग, असा सगळा तपशील त्यांच्या तोंडावर असे. कुणी मागितलं तर कुठलंही पुस्तक ते पटकन काढून देत. ब्रिटिश कौन्सिल आणि एशियाटिक सोसायटी ही त्यांच्यासाठी मंदिरं. ते नेहमी म्हणत, ‘‘सुमार लेखक होण्यापेक्षा उत्तम वाचक होणं केव्हाही चांगलं!’’
बाबांबरोबर प्रवास म्हणजे तर चंगळ असे. प्रत्येक स्टेशन, बसस्टॅँडवर उतरायचं म्हणजे उतरायचंच. तिथल्या विशिष्ट खाद्यपदार्थाची आणि ते मिळणाऱ्या ठिकाणांची त्यांना बरोबर माहिती होती. मग ते इंदापूर एस.टी स्टॅँडवरचे झणझणीत कोंबडीवडे असोत किंवा दक्षिणेकडे जातानाचा केळीच्या पानावरचा आंबटसर दहीभात. त्या त्या पदार्थाचा आनंद ते मनसोक्त लुटायचे आणि आम्हालाही द्यायचे.
बाबांना फिरण्याची प्रचंड आवड होती आणि आम्हालाही वेगवेगळे अनुभव द्यायला ते उत्सुक असायचे. त्यांना एक दिवस वाटलं, की आपल्या मुलांनी विमानातून प्रवास केला पाहिजे. खरंतर तेव्हा आमची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती, पण त्यातल्या त्यात त्यांनी आम्हाला लहानपणी मुंबई-पुणे विमानप्रवास घडवला होता. त्या वेळचे वैमानिक नेमके बाबांचे वाचक निघाले. मग काय? सांबूने संपूर्ण प्रवास कॉकपीटमध्ये बसून केला. त्याने तर असाच एकदा बाबांबरोबर आगगाडीच्या इंजिनातूनही प्रवास केलाय. ‘नेहरू तारांगण’ सुरू झाल्याबरोबर बाबा आम्हाला तिथे कार्यक्रम पाहायला घेऊन गेले होते. कोकण रेल्वेचा पहिल्या दिवशीचा प्रवास, रायचूरला जाऊन पाहिलेलं १९८० चं शतकातलं सर्वात मोठं खग्रास सूर्यग्रहण, रायगडावरला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचा तीनशेवा स्मृती सोहळा, कन्याकुमारीचं विवेकानंद स्मारक, हंपीचं विजयनगरचं साम्राज्य, रामेश्वराचं देऊळ, मराठी विज्ञान परिषदेच्या सहली, अगदी अलीकडची ‘आनंदवन’ची भेट अशा त्यांच्याबरोबरच्या कितीतरी सफरी मनावर कोरल्या गेल्यात.
बाबांनी ‘चला’ म्हटलं, की आम्ही निघायचो. कुठेही गेलं, की तिथल्या नदीत किंवा समुद्रात एक तरी डुबकी मारायची हा त्यांचा अलिखित नेम. दुसरा नेम म्हणजे साध्यातल्या साध्या, स्वच्छ हॉटेलमध्ये जेवणं. ‘हॉटेल जितकं साधं तितकं जेवण रुचकर.’ हे त्यांचं पक्कं मत होतं. खरेदी मुळीच नसायची. स्थानिकांना विचारून त्या त्या गावातल्या खास जागा आवर्जून पाहायच्या. नंतर कधीतरी त्यांच्याच पुस्तकात आम्ही एकत्र पाहिलेल्या ठिकाणाचे सुंदर प्रवासवर्णन वाचनात येई. तो लेख वाचल्यावर नेहमी आश्चर्य वाटायचं की हे सर्व बाबांनी कधी पाहिलं आणि ते आम्हाला कसं दिसलं नाही! भारतभर भटकंती केली असली तरी त्यांचं सर्वांत आवडतं ठिकाण म्हणजे आम्हा पिंगे कुटुंबीयांचं मूळ गाव, बाबांच्या सर्व वाचकांच्या परिचयाचं, राजापूरजवळचं निसर्गरम्य उपळं.
लहान मुलांची बाबांना फार आवड होती. तरुणपणी त्यांना भाचरंडांचा भरपूर सहवास मिळाला, त्यानंतर आम्ही. आम्ही मोठे झाल्यावर सकाळी पोस्टात फेरी मारताना कडेवर शेजारच्या वीरकरांची नातवंडं असत. पुढे आमच्या मुलांनी बाबांचा कब्जा घेतला. मुलांना मारणं तर फार दूरची गोष्ट, पण बाबा मोठय़ा आवाजात कधी ओरडल्याचंही मला आठवत नाही.
आपल्याला लेखक म्हणून मिळालेला मानसन्मान आईवडिलांनी त्यांच्या हयातीत पाहिला याचं बाबांना फार समाधान होतं. त्यांच्या वयाच्या जवळपास सत्तरीपर्यंत त्यांना आईची माया लाभली. बाबांचं फिरणं आणि लेखन वाचन अखेपर्यंत चालू होतं. भाषणांसाठी खेडय़ापाडय़ांमध्ये मिळेल त्या वाहनाने प्रवास करून ते जात. कुठल्याकुठल्या शाळा, वाचनालयं, लहानमोठय़ा संस्था त्यांना आस्थेने बोलवत आणि कुणाचं मन मोडणं त्यांच्या स्वभावातच नव्हतं. गावोगावच्या वाचकांना भेटणं, त्यांच्याशी गप्पा मारणं हा त्यांच्या आनंदाचा भाग होता. ८२ वर्षांचं निरोगी, अतिशय तृप्त, निर्व्यसनी आणि सश्रद्ध आयुष्य ते जगले. गृहसौख्य पूर्णपणे उपभोगलं. आईने त्यांना उत्तम साथ दिली. सांबूनेही त्यांच्या इच्छेला नेहमीच मान दिला. छाया सून म्हणून घरात आली. बाबांशी ती नेहमी मुलीप्रमाणेच वागली. विलेपार्ल्यातच दुसरं माहेर मिळावं तशी मी वाघांच्या घरात गेले. राजूसारखा समजूतदार जावई मिळाला. तन्मय, सुयश आणि केदार या तीन नातवांचं मनसोक्त कोडकौतुक करायला मिळालं. सर्व कुटुंबीयांचा उत्कर्ष त्यांनी पाहिला. सगळे नातेवाईक सतत संपर्कात होते. यापलीकडे कुठल्याही सुखाची त्यांना अपेक्षा नव्हती.
‘मुंबई साहित्य संघ’, पुण्याची ‘मराठी साहित्य परिषद’, ‘कोमसाप’, ‘चतुरंग प्रतिष्ठान’ अशा अनेक संस्थांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. ‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे जीवनगौरव पुरस्काराबरोबर दिली जाणारी मानपत्रं लिहायला बाबांनी सुरुवात केली. एकाहून एक सरस अशा मानपत्रांचा ‘मानवंदना’ हा संग्रह म्हणजे या पद्धतीच्या लेखनाचा एक मापदंडच ठरला. ‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे त्यांचा सहस्रपूर्णचंद्रदर्शन सोहळा दिमाखात साजरा झाला. बाबांची ग्रंथतुला झाली, राजहंस प्रकाशनतर्फे ‘सर्वोत्तम रवींद्र पिंगे’ हे पुस्तक प्रकाशित झालं आणि साक्षात् किशोरीताईंच्या हस्ते सत्कार झाला. बाबांना शास्त्रीय संगीताची उत्तम जाण होती. पं. कुमार गंधर्व आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर ही तर त्यांची दैवतं. बाबांच्या मते तो सत्कार म्हणजे त्यांना मिळालेला सर्वोच्च पुरस्कार!
रोजच्या जगण्यातल्या अनुभवांना डोळसपणे टिपणं, त्यातलं मर्म नेमकं शोधून मोजक्या पण अर्थपूर्ण शब्दात त्याची शैलीदार मांडणी करणं ही बाबांच्या लिखाणाची ठळक वैशिष्टय़ं म्हणता येतील. प्रसन्न आनंदाचा शिडकावा करणारी चाळीस वाचनीय पुस्तकं आपल्या हातून लिहून झाली याबद्दल ते अतिशय समाधानी होते. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर, ‘मी लेखन करतो कारण दुर्मीळ अशा तंद्रीचा अनुभव मला लेखन करताना येतो. या तंद्रीत तुडुंब सुख आहे. समाधानाच्या सरोवराकडे एकटय़ाने जाण्याची ती अद्भुत पायवाट आहे. कोऱ्या कागदाची हाक सतत कानावर पडणं ही श्रीरामाची परमकृपा..’
अखेरच्या काही वर्षांत बदलापूरचे शामसुंदर जोशी हे समानधर्मी स्नेही बाबांना लाभले. त्यांचं ग्रंथप्रेम आणि मराठी साहित्याविषयीची विलक्षण तळमळ पाहून बाबांनी आपल्या संग्रहातील बरेचसे ग्रंथ त्यांच्या ‘ग्रंथसखा वाचनालया’ला दिले. जोशीकाकांनी बाबांच्या नावाची अभ्यासिका सुरू करून त्यांच्या निवडक वस्तू, हस्तलिखितं आणि पत्रांचा ठेवा आजही प्रेमाने जपलेला आहे.
ऑक्टोबर २००८ मध्ये बाबा कर्करोगाने गेले. अवघ्या चार-पाच महिन्यांत सर्व संपलं. त्या दिवसांतही पुस्तकं, वाचन, लेखनाचे नवे विषय हेच त्यांच्या बोलण्यात असे. त्यांना आपला शेवट समोर दिसत होता, पण मृत्यूचं भय जरासुद्धा नव्हतं. जितकं शांत आयुष्य जगले तितकंच शांत मरण त्यांना लाभलं. आज मी आणि माझा भाऊ आपापल्या संसारात अतिशय सुखासमाधानात आहोत.
सर्व कलांविषयी ओढ, समाधानी वृत्ती, समंजसपणा आणि स्वतंत्र निर्णयक्षमता हा आम्हाला बाबांनी नकळत दिलेला वारसा आहे. त्याबद्दल शाब्दिककृतज्ञता व्यक्त केलेली त्यांना आवडली नसती, पण शब्दांपलीकडल्या प्रामाणिक भावना मात्र आजही त्यांच्यापर्यंत पोहोचतील.
chiwagh@gmail.com
chaturang@expressindia.com