डॉ. यदुनाथ जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘बाबांनी त्या काळात भिक्षुकी केली असती तर त्यांना एवढय़ा हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या नसत्या. पण त्यांनी ‘भारतीय संस्कृतिकोश’ तयार करण्याचा संकल्प सोडला आणि त्यासाठी स्वत:ला वाहून घेतलं. आईसुद्धा भाजी आणायला जावे त्या सहजपणे गोवा मुक्तिसंग्रामात तुरुंगात गेली. सुटकेनंतर आईला काँग्रेसने  उमेदवारी देऊ केली होती. त्या वेळी ती नक्कीच खासदार झाली असती पण आईने ही संधी नाकारली. बाबांप्रमाणे तिलाही पसा, प्रसिद्धी यांचा मोह कधीही नव्हता. साधेपणा, सच्चेपणा, निगर्वीपणा हा दोघांचा स्थायिभाव होता. दोघांचेही व्यक्तिमत्त्व स्वतंत्र, पण परस्परपूरक होते.’’ सांगताहेत डॉ. यदुनाथ जोशी आपले आई-वडील सुधाताई आणि महादेवशास्त्री जोशी यांच्याविषयी..

सर्व यशस्वी आणि कर्तबगार व्यक्तींच्या आत्मचरित्रात एक समान धागा आढळतो. एका खेडय़ातला जन्म. घरची गरिबी. शाळेसाठी पायपीट, सोयीसुविधांचा अभाव. त्या वातावरणातून बाहेर पडून शहरात प्रयाण. तिथेही अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी केलेला संघर्ष आणि त्यातून मिळालेले यश, मानसन्मान आणि पसा! बाबांच्या, महादेवशास्त्री जोशी यांच्या बाबतीत असं काही नव्हतं. त्यांनी आपल्या आत्मसन्मानासाठी सुरक्षित आणि सुखी आयुष्य सोडून हालअपेष्टा ओढवून घेतल्या आणि लेखक होण्याचं आपलं स्वप्न साकार केलं.

गोव्यातल्या एका छोटय़ा खेडय़ात आंबेडे येथे त्यांचा जन्म झाला. स्वत:चं वडिलोपार्जति घर होतं. भोवती मोठं कुळागर होतं. अखंड वाहणारे पाटाचे पाणी आणि त्यावर पोसलेली नारळ, सुपारी, आंबा, फणस आणि केळीची झाडं होती. पिढीजात भिक्षुकी होती. चार घरच्या पूजा सांगून दक्षिणा, तांदूळ, नारळ, धोतरजोडीची कमाई होत होती. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नव्हती. लग्न झालं होतं. दोन मुली होत्या. संथ, शांत, निवांत, सुखी, समाधानी आयुष्य होतं. आणखी काय हवं होतं? आणि काय खुपत होतं?

त्यांच्या जिव्हारी लागायची वाळपईच्या बाजारात ‘ए भटा’ अशी मारलेली हाक . त्या शांत, संथ, निवांत, आत्मसंतुष्ट, पण गोठलेल्या आणि गारठलेल्या जगात त्यांना अस्वस्थ वाटत होतं. तेव्हा त्यांनी ठरवलं, की या वातावरणातून बाहेर पडायचं. त्या काळी लोकांना पुण्याचं कुतूहल आणि आकर्षण होतं. पुणे हे विद्वानांचं शहर. पुण्याच्या पगडीखाली विद्वतेचा घडा असतो, अशी त्या वेळची समजूत होती. पगडी घालावी ती पुणेकरांनीच. बाबांनी ठरवलं, की आपण पुण्याला जायचं. १९३५ ला वयाच्या तिशीत, बायको आणि दोन लहान मुलींना घेऊन ते पुण्याला यायला निघाले. पुण्यात त्यांचं कोण होतं? कोणीही नाही. केवढं मोठं धाडस होतं ते. लेखनाची सुरुवात झाली; पण घर चालवायला पैसे कुठून आणायचे? पुण्यात भिक्षुकी करायची नाही आणि ज्योतिष सांगायचं नाही, ही त्यांची प्रतिज्ञा होती. एका मासिकासाठी ते उपसंपादक म्हणून काम करू लागले. जोडीला मच्छरदाण्या शिवून विकायला सुरुवात झाली. लेखन सुरू झालं; पण ते छापणार कोण? म्हणून स्वत:ची ‘ज्ञानराज प्रकाशन’ ही प्रकाशन संस्था सुरू केली. स्वत: लिहिलेली पुस्तकं स्वत:च प्रकाशित केली. आईने घरोघरी जाऊन बांगडय़ा विकायला सुरुवात केली. पुणेकरांच्या स्वयंपाकघरात या सवाष्णीचा प्रवेश झाला. अनेक घरातल्या लग्नसमारंभांत हिरवा चुडा भरायला आईला आमंत्रण येऊ लागलं. दरम्यान, माझा मोठा भाऊ अशोक आणि माझा जन्म झाला होता.

त्या दिवसांबाबत एकदा बाबा माझ्याशी मोकळेपणाने बोलले, ‘‘माझी प्रवृत्ती ललित लेखकाची होती. त्यामुळे मी ज्योतिषात रमलो नाही. मला ग्रहांपेक्षा माणसांची ओढ होती. त्या काळी मी लेखनाने पूर्णपणे पछाडलो होतो. सतत एखादी कथा मनात आकार घेत असायची. ती एक धुंदी होती. म्हणूनच त्या काळातल्या यातनाही सुसह्य़ झाल्या.’’ ते सातत्याने लेखन करत राहिले आणि म्हणूनच त्या काळच्या विद्याविभूषित पुण्यामध्ये लेखक म्हणून आपली ओळख निर्माण करू शकले.

१९५५ ला गोव्याचा स्वातंत्र्यलढा सुरू झाला. त्यात आपलाही सहभाग हवा म्हणून बाबांनी सत्याग्रहाला जायचं ठरवलं; पण आईने त्यांना ठाम विरोध केला. ती म्हणाली, ‘‘तुम्ही मिळवते पुरुष. तुम्ही सत्याग्रहाला गेलात तर आपला संसार कसा होणार? मुलं लहान आहेत, त्यांचं शिक्षण कसं होणार? त्यापेक्षा मीच जाते. घरात बसले आहे त्याऐवजी तुरुंगात जाऊन बसेन. तुम्ही घरी असाल तर मला मुलांची काळजी वाटणार नाही.’’ भाजी आणायला बाजारात जावं इतक्या सहजपणे आई तुरुंगात गेली. ४ एप्रिल १९५५ रोजी आई आणि बाबा गोव्याच्या सरहद्दीवरच्या दोडामार्ग इथे पोचले. दुसऱ्या दिवशी पहाटे आई गोव्याच्या हद्दीत शिरणार होती. त्या संध्याकाळी आई-बाबा तिथल्या ओढय़ाजवळ गेले. ओढय़ातल्या एका शिलाखंडावर दोघे बसले. बाबा आईला म्हणाले, ‘‘तुझा सत्याग्रह ही आपल्या कुटुंबातली एक मोठी क्रांती आहे. या क्षणी तुझा-माझा संसार खंडित झाला आहे. पुढचं कुणी सांगावं? उद्या तू गजाआड जाशील. कधी परत येशील हे ईश्वराला ठाऊक.’’ आई म्हणाली, ‘‘आता मी कोणाची आणि कसलीच काळजी करत नाही. तुम्ही मात्र स्वत:ला आणि मुलांना सांभाळा.’’

दुसऱ्या दिवशी पहाटे आई-बाबा सरहद्दीजवळ आले. एकमेकांचे हात हातात घेतले. ते हात काय बोलले असतील? कारण शब्द मुके झाले होते. कालिदासाच्या महाकाव्यात शोभून दिसावा असा तो प्रसंग होता. कसलीही राजकीय व सामाजिक पाश्र्वभूमी नाही; पण आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी डोळसपणे स्वत:ला झोकून देणारी ती दोघं महाकाव्यातली धीरोदात्त नायक-नायिका होती. माणसाचं मोठेपण तो किती आणि कसं सोसतो यावरून ठरतं. त्या कालखंडात आई-बाबांनी अपार सोसलं. आईने तुरुंगात आणि बाबांनी तुरुंगाबाहेर. तुरुंगात आईविरुद्ध खटला सुरू झाला. न्यायाधीश पोर्तुगीज होता. तो आईला म्हणाला, ‘‘अगं, तू संसारी स्त्री आहेस. तुला लहान मुलं आहेत. त्यांना सोडून तू इथे कशाला आलीस? तू फक्त ‘सॉरी’ म्हण मी तुला लगेच मुक्त करतो.’’ आईने नकार दिला आणि तिला तब्बल १३ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली.

आईचा निरोप घेऊन बाबा एकटे पुण्याला परतले. त्यांची अवस्था संभ्रमित होती; पण अशा अवस्थेत हातपाय गाळून शोक करायचा नाही, हे त्यांनी मनाशी पक्कं ठरवलं. आपल्या बायकोच्या तोलामोलाचं काम आपल्या हातून व्हायला पाहिजे तरच पत्नीचा वियोग आणि संसारातल्या भकासपणावर मात करता येईल, यातूनच ‘भारतीय संस्कृती कोशा’ची संकल्पना साकारली. बाबा प्रथम आळंदीला गेले. ज्ञानेश्वरांच्या समाधीवर मस्तक घासून म्हणाले, ‘‘माऊली, एक नवा संकल्प उरी धरून मी तुझ्या चरणांशी आलो आहे. मला आशीर्वाद हवा आहे.’’ ते आळंदीहून पुण्याला परतले आणि भारतीय संस्कृती कोशाची सुरवात झाली. ‘श्री ज्ञानेश्वराय नम:’

आईविना आम्ही दिवस रेटत होतो. तुरुंगातून आईचे पत्र महिन्यातून एकदा यायचे.  बाबा त्या पत्राला उत्तर पाठवायचे; पण बाबांना गोव्यात तिला भेटायला जायची बंदी होती. मी आणि माझी बहीण मात्र दोन वेळा आईला भेटायला जाऊन आलो. त्या वेळी गोव्यात जायला पासपोर्ट लागायचा. १९५८ ला माझी मावशी आईला भेटायला निघाली. एव्हाना आईच्या तुरुंगवासाला तीन वर्ष झाली होती. मावशी बाबांना म्हणाली, ‘‘तुमचा काही खास निरोप आहे का?’’ बाबा म्हणाले, ‘‘ती जाऊन तीन वर्ष झाली. पुढची दहा वर्ष तरी ती मला दिसणार  नाही. तू तिचा एक फोटो काढून आणशील का?’’ मावशी लगेच म्हणाली, ‘‘एवढंच ना? आणते.’’ हे फार जोखमीचं काम होतं; पण मावशी कॅमेऱ्यासकट आईपर्यंत पोचली. जवळजवळ दोन तास त्यांची भेट झाली. तेवढय़ा वेळात तिने शिताफीने आईचा फोटो काढला आणि पुण्याला येऊन बाबांच्या हाती दिला.

१९५९ चं वर्ष उजाडलं. आई तुरुंगात जाऊन चार वर्ष झाली होती. माझी मुंज व्हायची होती; पण किती दिवस थांबणार? शेवटी बाबांनी माझी मुंज करायची ठरवली. १२ मे १९५९ ला माझी मुंज झाली आणि बरोबर पाच दिवसांनी आईची सुटका झाली. हे अगदी अनपेक्षित होतं. ‘केसरी’चे संपादक जयंतराव टिळक यांचा बाबांना फोन आला. ‘‘शास्त्रीबुवा, सुधाताई सुटल्या. उद्यापर्यंत त्या बेळगावला येतील. आपल्याला आजच बेळगावला जायचं आहे.’’ दुपारी जयंतरावांची गाडी आली. मीपण त्यांच्याबरोबर निघालो. पाच दिवसांपूर्वीच मुंजीत माझा चमनगोटा केला होता. गाडीमध्ये त्या दिवशीची दहा-बारा वर्तमानपत्रं होती आणि प्रत्येकांत पहिल्या पानावर आईच्या सुटकेची बातमी होती. जयंतराव मिश्कीलपणे बाबांना म्हणाले, ‘‘बघा शास्त्रीबुवा, आजच्या सर्व वर्तमानपत्रांत सुधाताई पहिल्या पानावर झळकताहेत. तुम्ही कधी पहिल्या पानावर आलात का?’’ बाबा लगेच म्हणाले, ‘‘नाही, माझ्यासाठी पहिलं पान कधीच नव्हतं. माझ्यासाठी तिसरं पान आहे आणि तिथे मी कायम राहीन.’’

गोवा सत्याग्रहानंतर आई प्रसिद्धीच्या झोतात आली. तिच्या सत्काराच्या सभा सुरू झाल्या. काही सभांमध्ये अध्यक्षांनी घोषणा केली, ‘‘आता यानंतर सुधाताई यांचे पती, महादेवशास्त्री जोशी भाषण करतील.’’ पण त्यामुळे बाबा विचलित झाले नाहीत. त्यांना न्यूनगंड आला नाही आणि आईही अहंकारी झाली नाही. घरातलं वातावरणही बदललं नाही. १९६० ला आईला काँग्रेसने पुण्यातून लोकसभेसाठी उमेदवारी देऊ केली होती. त्या वेळी आई नक्कीच खासदार झाली असती आणि तिचं आणि आमचं आयुष्य बदलून गेलं असतं; पण आईने ही संधीही नाकारली. बाबांप्रमाणे तिलाही पसा, प्रसिद्धी यांचा मोह कधीही नव्हता. साधेपणा, सच्चेपणा, निगर्वीपणा हा दोघांचा स्थायिभाव होता. दोघांचेही व्यक्तिमत्त्व स्वतंत्र, पण परस्परपूरक होते. अगदी ‘मेड फॉर इच अदर’.

लग्नाच्या वेळी आईचं वय होतं दहा वर्ष. शिक्षण नव्हतं. स्वयंपाकदेखील येत नव्हता. बाबांनी तो शिकवला. तिला पुस्तकं वाचायची गोडी लावली. वाडय़ातल्या इतर बिऱ्हाडांत सतत नातेवाईकांचा वावर असायचा; पण आमच्या घरी अनेक थोरामोठय़ांची ये-जा असायची. घरात सतत कोणी तरी साहित्यिक यायचे. गप्पा सुरू असायच्या तेव्हा बाबा आईला म्हणायचे, ‘‘तुझा स्वयंपाक थोडा वेळ बाजूला ठेव आणि आमच्यात येऊन बस.’’ मीसुद्धा त्या साहित्यिक गप्पा खोलीच्या बाहेर बसून ऐकायचो; पण बाबांनी कधीच मला तिथून हाकललं नाही. वसंत कानेटकरांनी एकदा ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाची संपूर्ण रूपरेखा बाबांना सांगितली. त्या घटनेचा मी साक्षीदार होतो.

एक दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आईबाबांना दिल्लीला बोलावणे आले. आईबाबा दिल्लीला निघाले. त्या काळी मला थोरामोठय़ांच्या स्वाक्षऱ्या घेण्याचा छंद होता. माझी छोटीशी वही मी आईच्या हातात दिली आणि सांगितलं, ‘‘मला पंडित नेहरूंची स्वाक्षरी घेऊन ये.’’ दिल्लीत नेहरूंची भेट झाली, गप्पा झाल्या. नेहरू आईला म्हणाले, ‘‘तुम्ही गोव्यासाठी खूप काही केलंत. तुम्हाला काय हवं ते सांगा.’’ आई म्हणाली, ‘‘मला काही नको. गोवा माझी मातृभूमी आहे म्हणून मी सत्याग्रह केला. आता मी पुन्हा माझ्या संसारात व्यग्र आहे.’’ भेटीची वेळ संपली आणि आईने माझी स्वाक्षऱ्यांची वही नेहरूंच्या समोर धरली. ‘‘माझ्या मुलाला तुमची स्वाक्षरी हवी आहे.’’ नेहरूंनी लगेच स्वाक्षरी दिली. त्यांचे अक्षर अप्रतिम होते. ती स्वाक्षरी मी किती तरी दिवस सगळ्यांना दाखवत भाव खात होतो. दुर्दैवाने पानशेतच्या पुरात ती वही वाहून गेली.

प्रत्येक लहानथोर माणसाला पशांची चिंता असते. पशांसाठी आपण तडजोड करतो, करावीच लागते; पण बाबांनी अशी तडजोड केली नाही. पुण्यात सुरुवातीच्या काळात त्यांनी भिक्षुकी केली असती तर त्यांना एवढय़ा हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या नसत्या; पण ती ओळख त्यांना नकोशी होती. त्यातून मिळणारा पसाही त्यांना नको होता. हेच त्यांचं वेगळेपण.

आणि हेच पुढे घडलं. संस्कृतिकोशाचं लेखन सुरू झालं आणि त्यांनी ललित लेखन थांबवलं. त्यांना व्याख्यानासाठी महाराष्ट्रातून आमंत्रणं यायची. त्यासाठी मानधन मिळायचं. यापुढे ‘वेळ जातो’ म्हणून त्यांनी व्याख्यानाची निमंत्रणं स्वीकारणं बंद केलं. एखादं काम हाती घेतलं, की ते पूर्ण करायलाच हवं. संस्कृतिकोश हा दहा खंडांचा भव्य प्रकल्प आहे. त्यासाठी किमान २५ वर्षे लागतील, शिवाय लाखो रुपये जमा करावे लागतील. तेव्हा आपला पूर्ण वेळ आणि ऊर्जा या कामासाठीच. आपल्या हयातीत हा प्रकल्प पूर्ण व्हायलाच पाहिजे. त्यांच्यासाठी ते ध्येय होतं.

त्यांना दर महिना ४०० रुपये मानधन मिळायचे. त्याच्यातच त्यांनी आपला प्रपंच केला. त्याच काळात माझं वैद्यकीय शिक्षणही त्यांनी पूर्ण केलं. सहा वर्ष मी गोव्यात होतो आणि तो खर्च ते करू शकले. कठीण काम होतं. पशांचा मोह त्यांना नव्हता आणि पशांसाठी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. अशी माणसं अतिशय दुर्मीळ असतात आणि बाबा त्यातले एक. भरपूर पैसे मिळवावेत, गाडी- बंगला असावा, परदेशभ्रमण करावं, असं त्यांना कधीच वाटलं नाही; पण काही तरी भव्यदिव्य करावं आणि आपली एक ओळख निर्माण करावी हेच त्यांचं स्वप्न होतं. ते त्यांनी पूर्ण केलं.

एक नामवंत साहित्यिक एकदा घरी आले होते. ते म्हणाले, ‘‘शास्त्रीबुवा, तुमचा हेवा वाटतो मला. तुम्ही समाधानी आहात. तुमच्या योग्यतेच्या तुलनेत तुम्हाला मानसन्मान आणि पसा मिळाला नाही; पण तुम्हाला त्याची खंत नाही. हे कसं जमतं तुम्हाला? मला तुमच्यापेक्षा अनेकपटींनी मानसन्मान आणि पसा मिळाला; पण मी समाधानी नाही. अजून ‘पद्मश्री’ मिळाली नाही. एव्हाना मिळायला हवी होती. मी थोडी फार खटपट केली, पण केव्हा मिळेल हे देवास ठाऊक.’’

नंतर मी बाबांना विचारलं, ‘‘तुम्हाला ‘पद्मश्री’ मिळावी असं वाटत नाही?’’ ते म्हणाले, ‘‘मी त्याबाबतीत कधी विचार केला नाही आणि त्यासाठी काही खटपटही करणार नाही. एक गोष्ट मात्र नक्की. मी ‘पद्मश्री’ हा किताब स्वीकारणार नाही. माझ्यासाठी केवळ ‘पद्मविभूषण’ हाच किताब योग्य आहे.’’ हा अहंकार नव्हता; पण प्रखर आत्मसन्मान होता.

‘भारतीय संस्कृतिकोश’ हा त्या काळचा ‘विकिपीडिया’ होता. बाबा काळाच्या पुढे होते. आता ‘गूगल’वर तुम्हाला घरबसल्या हवी ती माहिती मिळते. म्हणून ‘संस्कृतिकोश’ आता कालबाह्य़ झाले आहेत. हा काळाचा महिमा आहे; पण तरीही बाबांचं योगदान विसरता येणार नाही.

बाबा वेदशास्त्री पंडित होते; पण कर्मठ नव्हते. घरात फक्त दीड दिवसांचा गणपती. बस एवढंच. सत्यनारायण, संकष्टी, अंगारकी, पितृपक्ष, अभिषेक, आरत्या, रुद्रपठण, यापैकी काहीही नव्हतं. सोवळंओवळं नव्हतं. मात्र गळ्यांत जानवं होतं. मी कधी गळ्यात जानवं घातलं नाही आणि त्यांनीही त्याबाबत मला सक्ती केली नाही. माझं लग्न झाल्यावरसुद्धा आमच्या घरी सत्यनारायण झाला नाही. बाबा रोजची पूजासुद्धा करत नसत. ते काम आईचं. आई खूप सश्रद्ध होती. काही ठळक अपवाद आहेत ज्या वेळी बाबांना पूजा सांगावी लागली. आई नियमितपणे हरतालिकेची पूजा करायची आणि तिच्या हट्टापायी बाबा पहाटे उठायचे, पूजा सांगायचे आणि परत झोपायचे.

माझ्या सासूबाईंनी चारधाम यात्रा केली आणि नंतर घरी गंगापूजन केलं. बाबा त्या वेळी हजर होते. गुरुजी पूजा सांगत होते आणि बाबा ऐकत होते. पूजा संपत आली तेव्हा बाबा म्हणाले, ‘‘अहो गुरुजी, गंगापूजन करता आहात, मग गंगामहिम्न म्हणायला नको का?’’ गुरुजी हात जोडून म्हणाले, ‘‘मला गंगामहिम्न येत नाही.’’ बाबा शांतपणे उठले आणि पाटावर बसून त्यांनी संपूर्ण गंगामहिम्न म्हटलं. १९३० नंतर १९८१ मध्ये त्यांनी ते पुन्हा म्हटलं आणि तेसुद्धा कुठेही न अडखळता.

बाबांची एक मानलेली मुलगी होती. तिच्या मुलीचा साखरपुडा होता. तिने मुहूर्त काढला होता. मुहूर्त जवळ आला तरी गुरुजी आले नव्हते. ती बाबांना म्हणाली, ‘‘बाबा, आता काय करू मी?’’ बाबा म्हणाले, ‘‘मी आहे ना. काळजी करू नको. मी पूजा सांगतो.’’ पाटावर बसून त्यांनी मुहूर्ताच्या वेळी पूजा केली. प्रत्यक्ष पंडित महादेवशास्त्री जोशी पूजा सांगत होते आणि जमलेले सर्व नातेवाईक आश्चर्यचकित होऊन ऐकत होते.

बाबा पुरोगामी विचारांचे होते. १९४० ला त्यांनी ‘जगावेगळे सासर’ ही कथा लिहिली. त्यामध्ये सासरा आपल्या विधवा सुनेचे कन्यादान करतो. याच कथेवरून पुढे ‘कन्यादान’ हा चित्रपट आला आणि बाबांना उत्कृष्ट कथेचा पुरस्कार मिळाला. त्याच कथेवर हिंदीतही ‘बहुबेटी’ हा चित्रपट आला. त्यानंतर ‘मानिनी’ या त्यांच्या कथेवर याच नावाचा चित्रपट आला. जयश्री गडकर अभिनीत हा चित्रपटही गाजला. त्या काळात अनेक चित्रपटांच्या पटकथा- संवादासाठी त्यांना विचारलं गेलं. मानधनही त्या काळी ५ हजार रुपये होतं; पण संस्कृतिकोशाच्या कामामुळे त्यांनी या सगळ्याला नकार दिला. असं उदाहरण विरळाच.

माझ्या मोठय़ा भावाचं लग्न झालं. तो ‘सगोत्र’ विवाह होता; पण बाबांचा त्याला विरोध नव्हता. ‘सगोत्र’ ही संकल्पना आता कालबाह्य़ झाली आहे हे त्यांचं मत होतं. माझ्या लग्नात माझी पत्रिका नव्हती; पण त्यावाचून काही अडलं नाही. लग्न झाल्यावर बऱ्याच वर्षांनी मला वाटलं की, आपली पत्रिका असावी. एका ज्योतिषाकडून मी ती करून घेतली आणि बाबा मुंबईला आल्यावर त्यांच्यापुढे ठेवली. ते म्हणाले, ‘‘कशाला हा उपद्व्याप केलास?’’ मी म्हटलं, ‘‘केवळ कुतूहल म्हणून. आता तुम्ही माझं भविष्य सांगा.’’ बाबांनी पत्रिका बघितली आणि म्हणाले, ‘‘ज्ञानसंपादन हा तुझा स्थायिभाव आहे. आयुष्यभर तू ज्ञान गोळा करशील आणि त्यातूनच तुला यश आणि पसा मिळेल. पसा गरजेपुरता मिळेल. मुबलक मिळणार नाही. बस, आता परत मला काही विचारू नकोस.’’ (हे भविष्य पूर्णपणे खरं ठरलं.)

२००५-०६ हे बाबांचं जन्मशताब्दी वर्ष. १२ जानेवारी २००६ ला जन्मशताब्दी वर्षांची सांगता झाली. त्या दिवशी त्यांच्या जन्मगावी (आंबेडे) समारंभ आयोजित केला होता. त्या गावातल्या एका रस्त्याला ‘पंडित महादेवशास्त्री जोशी मार्ग’ हे नाव दिले गेले. १९९२ ला आई गेली. नंतर बरोबर चाळीस दिवसांनी बाबा गेले. धायरी गावातच त्यांचे अंत्यसंस्कार झाले. स्मशानात शोकसभा झाली. त्यामध्ये एका गावकऱ्याने बाबांच्या मोठेपणाचं अगदी वेगळ्या भाषेत वर्णन केले. तो गावकरी म्हणाला, ‘‘शास्त्रीबुवा म्हंजी लई मोठा मानूस. मोठा म्हंजी किती मोठा? तर असं बघा, त्यांनी एव्हढी बुकं लिहिली. ती बुकं जर येकावर येक, येकावर येक ठेवली तर त्यांची उंची बाबांच्या उंचीपेक्षा जास्त होईल एवढा मोठा मानूस होता हा.’’

yadunath@hotmail.com

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhalmaya special memories sudhatai mahadev shastri joshi abn
First published on: 05-10-2019 at 00:09 IST