scorecardresearch

वय एक ‘आकडा’!

‘असा कसा वागतो हा माणूस, म्हातारचळ दुसरं काय!’ किंवा ‘तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे मी पाहिलेत, मला अक्कल शिकवू नकोस,’ अशी वाक्यं आपल्याला नवीन नाहीत.

दुलारी देशपांडे

‘असा कसा वागतो हा माणूस, म्हातारचळ दुसरं काय!’ किंवा ‘तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे मी पाहिलेत, मला अक्कल शिकवू नकोस,’ अशी वाक्यं आपल्याला नवीन नाहीत. त्या त्या वयानुसार विशिष्ट पद्धतीनंच वागलं पाहिजे, हे आपल्याकडे पूर्वापार चालत आलेलं आहे. हाच वयवाद. वयाविषयीच्या पूर्वग्रहबाधित दृष्टीमुळे केल्या जाणाऱ्या भेदभावाला मानसशास्त्रात ‘एजिझम’ वा ‘वयवाद’ म्हणतात. या वयवादाचा परिणाम अनेकांना मानसिक रुग्ण बनवतो आहे, तर कित्येकांना निष्क्रिय. म्हणूनच सेवानिवृत्ती म्हणजे ‘रिकामटेकडं  म्हातारपण’ हे समीकरण बदलून सक्रिय वृद्धत्वाला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. दिवसेंदिवस आपल्या देशातील वृद्धांची संख्या वाढत जाणार आहे, म्हणूनच साठी ते ऐंशी हा वयाचा टप्पा त्यांच्या प्रगल्भ अनुभवांचं गाठोडं तरुणांच्या हाती सोपवण्यासाठी करता येऊ शकतोच, शेवटी वय हा फक्त एक आकडा आहे, त्याच्याभोवती रचलेलं संपलेपण नाही..

काही वर्षांपूर्वी आपल्याकडच्या पस्तीशी ओलांडलेल्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं लग्न केलं. समाजमाध्यमांतून या अभिनेत्रीला त्या वेळी मोठय़ा प्रमाणावर ‘ट्रोल’ करण्यात आलं. कारण तिचा नवरा तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे. लग्न तिनं केलं होतं, पण आपले नेटकरीच जास्त अस्वस्थ झाले होते. याचं कारण विवाह करणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या वयाविषयीच्या नेटकऱ्यांच्या साचेबद्ध विचारसरणीला या लग्नामुळे जबर धक्का बसला होता. इथे त्या अभिनेत्रीचं वय हेच तिच्यावर होत असलेल्या जहरी टीकेमागचं खरं कारण होतं. वयाचा हा पूर्वग्रह कोणाकोणाला कशा कशा प्रकारे लक्ष्य करेल हे पाहणं गमतीशीर आहे.

नामवंतांनाच नव्हे, तर सर्वसामान्यांना केवळ वयावरून केल्या जाणाऱ्या अशा प्रकारच्या भेदभावाला आपल्या आयुष्यात कधी ना कधी सामोरं जावं लागतच असणार. याचं कारण आपल्या समाजात ‘वय’ या गोष्टीचा फारच बाऊ केला जातो. आपल्याकडे कोणी कोणत्या वयात काय करावं, याचे अगदी पूर्वापार चालत आलेले पूर्वग्रह आहेत. अर्थात वयाविषयीचे हे पूर्वग्रह ज्या काळात निर्माण झाले, त्या काळात एखाद्या वेळेस ते योग्य असतीलही, पण पुढे काळ जरी बदलत गेला, तरी वयाविषयीचे ते जुनेपुराणे पूर्वग्रह काळानुसार न बदलता तसेच राहिले.  एखादी व्यक्ती अशा एखाद्या संकेताला, एखाद्या रूढीला, एखाद्या परंपरेला छेद जाईल असं वागते. थोडक्यात, तिच्या वयाला न शोभेलसं वागते, तेव्हा पूर्वापार चालत आलेल्या पूर्वग्रहाला धक्का पोहोचवते. साहजिकच अशा वेळी ती सर्व समाजाचा रोष ओढवून घेते. याचा परिणाम म्हणून समाजमाध्यमांमधून ती मोठय़ा प्रमाणावर ट्रोल होते. हे झालं वयाविषयीच्या एका पूर्वग्रहाविषयी.

वयावरून केल्या जाणाऱ्या याच भेदभावाला मानसशास्त्रात ‘एजिझम’ म्हणतात. हा भेदभाव वयाविषयीच्या पूर्वग्रहबाधित दृष्टीमुळे केला जातो. मराठीत ‘एजिझम’ला ‘वयवाद’ म्हणतात. रॉबर्ट बटलर या अमेरिकी जेरंटोलॉजिस्टनं (वृद्धत्त्वाविषयक शास्त्रातील तज्ज्ञ) १९६९ मध्ये पहिल्यांदा ‘एजिझम’ ही संज्ञा वापरली. सुरुवातीला ही संज्ञा वापरताना त्यांच्या डोळ्यासमोर केवळ वयस्कर लोक होते. पुढे एजिझममध्ये तरुणांचाही विचार करण्यात आला. तरुणांच्या वयवादाला ‘रिव्हर्स एजिझम’ (उलट वयवाद) म्हटलं गेलं.

   एखाद्या वयस्कर व्यक्तीनं वयासंदर्भातला ‘स्टीरिओटाइप’ धुडकावत एखादी गोष्ट केली, की लगेच ‘कसं काय बुवा जमतं तुम्हाला या वयात? आम्हाला नाही बुवा जमणार!’ असा तिला खवचट टोमणा मारणं किंवा एखादी वयस्कर व्यक्ती थोडी जास्त हसता-खिदळताना  दिसली, फॅशनेबल राहिली वा तसे कपडे घातले की लगेच ‘शोभतं का या वयात? म्हातारचळ लागलाय नुसता, दुसरं काय!’ अशा प्रतिक्रियाही ऐकवल्या जातात किंवा एखादी वयस्कर व्यक्ती जरा अधिक उत्साहानं वागत असेल, तर ‘जुनं विमान हल्ली फारच उडतंय!’ अशा प्रकारे त्या व्यक्तीची वयावरून खिल्ली उडवणं, हेही अनेकदा होताना दिसतं. ही झाली समाजात हरघडी अनुभवाला येणारी वयवादाची उदाहरणं. तर दुसऱ्या बाजूला ‘मला नको अक्कल शिकवूस, तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे मी पाहिलेत, समजलास!’, ‘गाढवा, तुला काही अक्कल-बिक्कल आहे की नाही? तुझ्या वयाचा मी होतो तेव्हा, मी दोन पोरांचा बाप झालो होतो! एवढा घोडय़ासारखा वाढलास, अजून तुझ्या लग्नाचाच पत्ता नाही!’ यांसारखी घरी-दारी-बाजारी रोजच्या अनुभवाला येणारी ‘उलट वयवादा’चीही अनेक उदाहरणं देता येतील.

 वयवाद आपल्याला सर्व काळी, सर्व ठिकाणी दिसून येतो. कधी तो अजाणतेपणानं, सहजरित्या केला जातो. हा सौम्य स्वरूपाचा वयवाद. मात्र सर्वच वेळी वयवाद इतक्या सौम्य स्वरूपाचा नसतो. काही ठिकाणी हेतूपूर्वक समोरच्याला दुखावण्यासाठीच भेदभाव केला जातो. त्या वेळी वयवादाचं ‘लक्ष्य’ बनवण्यात आलेल्या व्यक्तीला त्याचा अतिशय मानसिक त्रास होऊ शकतो. आणि याला वयाचा अपवाद नाही. कोणत्याही वयातील कोणत्याही व्यक्तीला टोमण्यापासून ते थेट बोलण्यापर्यंत काहीही ऐकून घ्यावं लागतं.

 आज जगात ६ कोटी ३० लाख इतक्या प्रचंड संख्येनं असलेले नैराश्य या मानसिक आजारानं ग्रासलेले रुग्ण हा ‘तीव्र वयवादा’चा एक परिणाम असू शकतो, असे संकेत यावर झालेल्या अभ्यासातून मिळतात. ‘अमेरिकन सायकिअ‍ॅट्रिक सोसायटी’ ही वयवादाकडे भविष्यकाळातली एक गंभीर समस्या म्हणून बघते. तर ‘जागतिक आरोग्य संघटना’ वयवादाला चालू काळातली एक वैश्विक समस्या मानते. वयवादाचं हे वैश्विक रूप लक्षात घेता भारताच्या दृष्टीनं वयवादाचं स्वरूप समजून घेणं गरजेचं ठरतं.

वयवादात वयस्कर आणि तरुण व्यक्तींमध्ये त्यांच्या वयांमुळे निर्माण होणारी तेढ दिसते. हे व्यक्तीचं ‘शारीरिक वय’असतं. शारीरिक वय म्हणजे नेमकं काय? यावर डॉ. निखिल दातार सांगतात, ‘‘जीवशास्त्राच्या दृष्टीनं माणसाचं वय दर मिनिटाला वाढत असतं. वाढत्या वयानुसार इंद्रियांची काम करण्याची शक्ती हळूहळू कमी-कमी होत जाते. जनुकांमध्ये बदल होतात. शरीरात मुक्त मूलकांचं (फ्री रॅडिकल्स) प्रमाण वाढतं. वयवादाविषयी बोलायचं झालं, तर भविष्यकाळात जसजशी वैद्यकशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञानाची अधिकाधिक प्रगती होत जाईल, तसतशी माणसाच्या जीवितमानात आणि जीवन जगण्याच्या दर्जात निश्चितच वाढ होईल. साहजिकच त्यामुळे एकंदरीत प्रौढ आणि वयस्कर लोकांची संख्या वाढेल. भविष्यात वयवादाचा प्रश्न गंभीर रूप धारण करताना दिसेल. एक वेळ अशी होती, की माणसं चाळिशीतच ‘म्हातारी’ होऊन मरायची. निसर्गत:च त्या वयात त्यांच्या शरीराची क्रियाशीलता कमी व्हायची. वैद्यकशास्त्रातल्या प्रगतीनं माणसाच्या जगण्याची वयोमर्यादा चाळीसवरून आज ऐंशीवर आणून ठेवली आहे. भविष्यकाळात वयवाद जसा वाढत जाईल, तसा इच्छामरणाच्या प्रश्नाचादेखील आपल्याला गंभीरतेनं विचार करावा लागेल. भविष्यकाळात इच्छामरण हा वैद्यकीय प्रगतीचा ‘साईड-इफेक्ट’ ठरू शकतो.’’

आजच्या काळानुसार म्हातारपणाचे ढोबळमानानं टप्पे करायचे झाले तर ते असे करता येतील-

वय वर्ष ६० ते ७० – तरुण म्हातारा (यंग ओल्ड)

 वय वर्ष ७० ते ८० – मध्यमवयीन म्हातारा (मिडल ओल्ड)

वय वर्ष ८० व ८० च्या पुढे – म्हातारा म्हातारा (ओल्ड ओल्ड) 

कुठल्याही प्रकारच्या भेदभावामागे काही दूषित पूर्वग्रह असतात. या पूर्वग्रहांचा माणसाच्या मनाशी संबंध असतो. वयवाद सर्व ठिकाणी एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर दिसण्यामागे कोणती मानसशास्त्रीय कारणं आहेत? याविषयी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे सांगतात, ‘‘आपल्याकडे पूर्वीपासून कुटुंब आणि संघटना (ऑर्गनायझेशन) या दोन्ही ठिकाणी वयाला धरून भेदभाव केला जात असल्याचं चित्र दिसतं. संघटनेपुरतं बोलायचं झालं, तर इंग्रजांच्या काळापासून ते आजच्या काळापर्यंत सर्व संघटना आदेश (कमांड) आणि नियंत्रण (कंट्रोल) या तत्त्वावर चालताना दिसतात. उदा. आम्ही नेते- तुम्ही अनुयायी. नेता नेहमीच सर्वश्रेष्ठ असतो. तुमच्यात निर्णयक्षमता नाही, आमचे हुकूम पाळणं त्यामुळे तुम्हाला गरजेचं आहे. संघटनेच्या दृष्टीनं तुम्ही केवळ ‘हात आणि पाय’ असता. स्वत:चं डोकं नसलेली तुम्ही मूर्ख, बिनडोक माणसं असता. त्यामुळे संघटनेच्या प्रमुखाचं काटेकोर आज्ञापालन करण्याची शारीरिक क्षमता ज्या वयोगटाच्या ठिकाणी जास्त आहे, त्या वयोगटाला साहजिकच नोकरभरतीत पहिल्यांदा प्राधान्य दिलं जातं. ब्रिटिशांच्या काळापासूनची ही ‘वसाहतवादी’ भूमिका आहे. आपल्याकडच्या आजच्या संघटनादेखील याच वसाहतवादी भूमिकेची ‘री’ ओढताना दिसतात. ब्रिटिशांच्या शिक्षणविषयक धोरणानं भारतीयांना ‘सायबा’ला ‘होय’बा म्हणणारा ‘मजूर’ बनवलं. हे झालं संघटनेपुरतं. आपल्याकडे भारतीय कुटुंबव्यवस्थेतही एक ‘पदसिद्ध वरिष्ठ’ असतो. कुटुंबातला कर्ता पुरुष. कुटुंबाचा वंशपरंपरागत ‘मालक’. जो स्वत:ला जात्याच हुशार, समजूतदार, शहाणा समजत असतो. अशा ‘पदसिद्ध वरिष्ठा’समोर तुम्ही मारून-मारून किती उडय़ा माराल? शतकानुशतकं चालत आलेली विचारांची हीच पद्धती आपल्या अगदी बोकांडी बसली आहे.’’

मानसशास्त्राच्या दृष्टीनं वयवादाबाबत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, तुमच्या वयाकडे बघण्याचा तुमचा स्वत:चा दृष्टिकोन. उदा. ‘मुलं मोठी झाली. माझी ‘वेळ’ संपली! आता आम्ही निवृत्ती घ्यायची.’ तुम्हाला स्वत:बद्दल जर असं वाटत असेल, तर साहजिकच तुम्ही त्याप्रमाणे वागायला लागता. तुम्ही तसे वागता म्हणून लोक तुम्हाला तसं समजतात. कारण तुम्ही स्वत:कडे ज्याप्रमाणे बघता, त्याप्रमाणेच माणसं तुमच्याकडे बघतात. आपल्याकडे या बाबतीत सामाजिक स्थित्यंतर घडणं जरुरीचं आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, पूर्वापार समजुतीपेक्षा जर का कोणी ‘वेगळं’ वागत असेल, तर समाज त्याला दूषणं देतो. त्या व्यक्तीनं त्याचं ‘उथळ’ वागणं सोडून ‘त्याच्या वयाप्रमाणे’ वागावं ही अपेक्षा ठेवतो. यामागे वय या गोष्टीकडे बघण्याच्या आपल्या ज्या रूढीबद्ध,साचेबद्ध धारणा असतात त्याच असतात. त्यात बदल होणं गरजेचं आहे.

वयवादात मुळात असा भेदभावच का केला जातो? याविषयी मानसशास्त्राच्या प्राध्यापक वेदवती परांजपे-सुर्वे एक उदाहरण देतात- समजा, एखादा नातू आपल्या आजोबांना ‘ऑनलाइन पेमेंट’ करायला शिकवतोय. आजोबा ‘या वयात आपल्याला ते जमेल का?’ या विचारानं आधीच साशंक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून नकळत सारख्या चुका होतात. नातू आजोबांना एकदा सांगतो, दोनदा सांगतो, तीनदा सांगतो. पण ‘वयामुळे आपल्याला हे करायला जमणारच नाही, अशा विचारानं ‘सेल्फ प्रोग्राम्ड’ झालेले आजोबा तरीही सारखे चुकतात. एखादी ‘स्टेप’ विसरतात. लवकरच नातवाचा त्यांना शिकवण्याचा ‘पेशन्स’ संपतो. ‘किती वेळा तीच-तीच गोष्ट तुम्हाला सांगायची आजोबा? इतक्या वेळा सांगितलं तरी तुम्हाला समजत कसं नाही? सारखंसारखं कसं विसरता?  तुम्ही ‘म्हातारे’ झालात. मला नाही वाटत तुम्ही मोबाइल वापरू शकाल.’ नातू हे बोलून मोकळा होतो, कारण त्यानंही ही वाक्यं कुठेतरी कधीतरी ऐकलेलीच असतात. आणि वय झाल्यावर नवीन तंत्रज्ञान शिकता येत नाही, असं आजोबांनीही कुठेतरी कधीतरी ऐकलेलं असल्यामुळे (पूर्वग्रह) नातवाचं बोलणं ते मुकाटय़ानं सहन करतात. वास्तविक पाहता आपण कुठल्याही वयात काहीही शिकू शकतो. मेंदूच्या संशोधनात सिद्ध झालंय, की आपण आपला मेंदू जितका जास्त वापरतो तितका तो जास्त कार्यक्षम राहतो. म्हातारपणात आपण मोबाईल शिकू शकणार नाही या पूर्वग्रहामुळं आजोबा शिकण्याआधीच हार मानून मोकळे होतात. वैवाहिक जीवनातही आपल्याला ‘दृश्य वयवाद’ दिसतो. आपल्या वैवाहिक जोडीदाराचे केस पिकायला लागले, की त्याच्याकडे बघण्याचा त्याच्या जोडीदाराचा ‘दृष्टिकोन’ बदलतो. त्यामुळे प्रियकर वा प्रेयसी असताना जे वागणं आवडत असतं, तेच नवरा वा बायको झाल्यावर अल्लड वा बालिश वाटायला लागतं.

त्याही पलीकडे, एखादी व्यक्ती वयस्कर आहे आणि तिला नैराश्यासारखा एखादा मानसिक आजारही आहे, अशा वेळी तिच्या मानसिक आजाराकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं आणि ‘ती तशी ‘बरी’आहे, ‘वया’मुळे ती अशी वागणारच ना’, असं त्याचं समर्थनही केलं जातं. मानसशास्त्रानुसार सगळय़ांच्याच मनात मृत्यूची, अपंगत्वाची, परावलंबित्वाची भीती असते. अस्तित्ववादात आपल्याला या भीतीचं मूळ सापडतं. वयस्कर लोक तरुणांना या गोष्टीची सतत आठवण करून देत असतात. तरुणांसाठी या भीतीपासून स्वत:चं संरक्षण करण्याच्या ‘बचाव यंत्रणे’चा भाग म्हणजे वयस्कर लोकांना टाळणं. त्यांना नाकारणं. थोडक्यात, आपल्या डोळय़ांसमोर वयस्कर माणसं नकोत, आपल्याला त्यांच्यात जायचं नाही, असा विचार तरुणांचं मन करतं. त्यातून त्यांच्या मनात वयाबद्दल इतके पूर्वग्रह निर्माण होतात, यातून पुढे वयवाद निर्माण होतो.

आपल्याला कामाच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर वयवाद दिसून येतो. साठीपर्यंत ‘खुर्च्या’ अडवून बसलेले  वयस्कर आणि ते तिथून कधी उठतात याची ताटकळत वाट पाहणारे तरुण, असं चित्र आपल्या अगदी परिचयाचं आहे. वयवादाचा अर्थशास्त्राशी संबंध स्पष्ट करताना अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर सांगतात, ‘‘भारत कृषिप्रधान देश आहे. भारतातली ७० टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. पूर्वी आपल्याकडे एकत्र कुटुंब-पद्धती होती. पुरुष शेती करत, स्त्रिया घर सांभाळत. शेतीसाठी बरीच मुलं जन्माला घातली जात. त्या वेळी जननदर जास्त होता. वैद्यकीय सोयीसुविधांचा, स्त्री-शिक्षणाचाच नव्हे, तर एकूणच शिक्षणाचा अभाव असल्यामुळे त्या काळी मृत्युदरही जास्त होता.  

मुलांची संख्या जास्त जरी असली, तरी कुटुंबावर त्यांचा भार नव्हता. मुलं थोडी आणखी मोठी झाली, की शेतीला हातभार लावायची. मुलं त्या काळी ‘इन्व्हेस्टमेंट गूड’सारखी होती. नंतर वैद्यकशास्त्र प्रगत झालं. तंत्रज्ञानाचा विकास झाला. स्त्री-शिक्षणाचा प्रसार झाला. या गोष्टींचा परिणाम जननदर आणि मृत्युदरही कमी होण्यात झाला. त्यानंतरच्या काळात शहरीकरण मोठय़ा प्रमाणावर झालं. स्त्री-पुरुष दोघांनाही नोकऱ्या करणं आवश्यक झालं. मुलांना वाढवणं खर्चीक झालं. शहरात मुलं ‘कन्झ्मशन गूड’सारखी झाली. या सर्वाचा परिणाम जननदर आणखी घसरण्यावर झाला. आपला जननदर आज कमी ( २.१ रीप्लेसमेंट लेव्हल फर्टिलिटी – म्हणजे प्रत्येक स्त्रीला किती मुलं होणं वा असणं शक्य आहे तो गृहीत धरलेला दर) होत चालला आहे. बालमृत्यूचं प्रमाण घटलंय. यापुढे तिसऱ्या टप्प्यात कमी मुलं जन्माला येतील. मृत्युदर कमी झाल्यामुळे असलेल्या लोकसंख्येचं वय वाढेल. लोकसंख्या ‘म्हातारी’ होत जाईल. तिसऱ्या टप्प्यात भारतात सरासरी पंचावन्न ते साठ वयोगटातले लोक असतील. समाजात ऐंशी वर्षांपेक्षा जास्त वयाचे बरेच लोक असतील. बाकीचे तीस-पस्तीसच्या वयोगटातले लोक असतील. लहान मुलांची संख्या तुलनेनं कमी असेल. आपण ‘तरुण’ देश आहोत ही ‘मिथ’ बाजूला ठेवून शासनाला यासाठी काही यंत्रणा उभी करावी लागेल.   कुटुंबात मुलांमध्ये गुंतवणूक केली जाते. भविष्याकरिता ही गुंतवणूक असते. मात्र त्याचवेळी म्हाताऱ्यांची आबाळ होते, कारण त्यांच्यासाठी अशी वेगळी तरतूद अनेकदा केली जात नाही. हा स्पष्टपणे वयवाद आहे. सरकारी नियमानुसार नोकरीतून वयाच्या ५८ व्या वर्षी व्यक्ती सेवानिवृत्त होते खरी, पण ती सर्व दृष्टीनं ‘फिट’ असते. परंतु तरुणांना संधी मिळावी म्हणून प्रौढांना सेवानिवृत्त व्हावं लागतं. नोकऱ्यांच्या संदर्भात बोलायचं, तर सरकारी नोकरीशिवाय आपण फारसे पर्याय निर्माण करू शकलो नाही. हा खरा प्रश्न आहे. वयस्कर व्यक्ती काम करायला ‘सक्षम’ आहेत की नाहीत हा मुळात प्रश्नच नाही आहे.’’

 सेवानिवृत्तीला म्हातारपणातील आपण मानत असलेल्या निष्क्रियतेशी जोडणं आपण थांबवलं पाहिजे. वयाविषयीच्या आपल्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल होणं गरजेचं आहे. फेसबुक, इंस्टाग्रामसारखी समाजमाध्यमं (हे तरुणाईचं माध्यम आहे असं सांगत) वयवादाला मोठय़ा प्रमाणावर खतपाणी घालताना दिसतात. वयवादाविषयी समाजशास्त्राचा दृष्टिकोन सांगताना, प्राध्यापिका सुश्री संगीता सांगतात, ‘‘आज समाजात ६० ते ८० वयोगटांतल्या ‘आरोग्यसंपन्न’ व्यक्तींची संख्या वाढलेली आहे. वयस्करांच्या या वाढत्या लोकसंख्येचा, त्यांच्या कार्यानुभवाचा समाजाला कसा फायदा करून घेता येईल, याचा समाजशास्त्र विचार करत आहे. साठनंतरच्या व्यक्ती ‘पे रोल’ वर जरी नसल्या, तरी त्यांच्या कार्यानुभवाचा अगदी देश पातळीवरती नसला, तरी स्थानिक पातळय़ांवर- जसं ग्रामपंचायती, महानगरपालिका, तालुका-जिल्हा पातळयांवर स्थानिक सुधारणा घडवण्याच्या कामी मोठय़ा प्रमाणावर उपयोग करून घेता येऊ शकतो. स्थानिक पातळीवरील कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण यांसारख्या कामांमध्ये वयस्करांना मोठय़ा प्रमाणात सहभागी करून घेता येऊ शकतं. समाजात,  कुटुंबात वयस्कर व्यक्तींचं ‘अलगीकरण’ न करता, समाजाच्या ‘मुख्य धारे’त त्यांचा कसा समावेश करता येईल, यावर, एकंदरीतच ‘सक्रिय वृद्धत्वा’वर समाजशास्त्राचा भर आहे.

 ‘सक्रिय वृद्धत्वा’ची कल्पना प्रत्यक्षात येण्याकरिता योग आणि ध्यान-धारणा बरीच उपयोगी ठरू शकते, असा विचार योग-शिक्षिका, विजया इखारे मांडतात. त्यांच्या मते, योगासनं-ध्यानधारणा केल्यामुळे म्हातारपण टाळता जरी आलं नाही, तरी निश्चितच लांबवता येतं. योगासनांमुळे शरीर लवचीक, निरोगी राहतं. ध्यानामुळे मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह वाढतो. त्यानं स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. ध्यानामुळे गुणसूत्रांच्या टोकाला असलेल्या ‘टेलीमीटर्स’ची लांबी वाढते. या ‘टेलीमीटर्स’ची लांबी कमी झाली की पेशी ‘म्हातारी’ होते. त्यामुळे म्हातारपण येतं. ध्यानानं मेंदूत एन्डॉर्फिन्स, डोपामाइन, ऑक्सिटोसिन आदी खुशीची संप्रेरकं स्रवतात. त्यामुळे मन आनंदी, उत्साही राहतं. म्हातारपण लांबणीवर पडतं.

कायद्याच्या दृष्टीनं याचा विचार करता भेदभाव कमी करण्यासाठी कायद्याचा बडगा नेहमीच उपयोगी ठरतो. आपल्याकडे कायदा वयवादाकडे कोणत्या दृष्टीनं बघतो, याविषयी बोलताना अ‍ॅड. नीता कर्णिक सांगतात, ‘‘हिंदुमध्ये पूर्वीपासून एकत्र कुटुंबपद्धती होती. आपल्या पितृसत्ताक समाजात कुटुंबाचा कर्ता पुरुष केवळ त्याचं वय वाढलंय म्हणून कुटुंबावरचा त्याचा अधिकार गमावत नाही. हिंदु एकत्र कुटुंबपद्धती या संकल्पनेचा स्वीकार व्यक्तिगत कायद्यापुरता (पर्सनल लॉ) मर्यादित नाही. आयकरासाठीदेखील याचा फायदा होतो. आपल्याकडे वयस्कर व्यक्तींच्या हिताची बऱ्याच नागरी आणि फौजदारी कायद्यांमध्ये तरतूद करण्यात आली आहे. यातले काही कायदे हे मुलांच्या पालकांप्रती असलेल्या जबाबदारीविषयी आहेत. काही पालक आणि वयस्कर व्यक्तींचा सांभाळ त्यांच्या नातेवाईकांकडून केला जात नाही त्याविषयीही आहेत. एखाद्याला एखादी प्रॉपर्टी प्रेमानं ‘बक्षीस’ दिली जाते. परंतु ज्याला ती प्रॉपर्टी मिळते तो, ती प्रॉपर्टी ज्यानं दिली, त्याला मूलभूत सुविधा पुरवायला, तसंच त्याचा सांभाळ करण्याला अपयशी होतो. त्यावेळी ते बक्षीस परत घेण्याची सोय कायद्यात आहे. आपल्याकडे वयस्कर व्यक्तींना त्यांच्या कल्याणासाठी कायद्याअंतर्गत अनेक सोयीसुविधा आणि सवलती देण्यात आल्या आहेत. भविष्यकाळात, कामाच्या ठिकाणी होणारा वयवाद कमी करण्यासाठी नवीन कायदे बनवण्याची गरज निर्माण होऊ शकते. येत्या वीस-पंचवीस वर्षांत वाढत्या शहरीकरणामुळे ग्रामीण भागातही एकत्र कुटुंबपद्धतीऐवजी विभक्त कुटुंबपद्धती मोठय़ा प्रमाणावर वाढेल. अशा वेळी एकत्र कुटुंबपद्धतीला समोर ठेवून निर्माण केले गेलेले कायदे निरुपयोगी ठरू शकतात. त्यासाठी नवीन ‘पर्सनल लॉ’ बनवावे लागतील.’’

 भारतापुढे येत्या काही वर्षांमध्ये वयवादाची मोठी समस्या उभी राहणार आहे. वयवाद कमी करण्यासाठी सरकारला त्या दिशेनं ठोस पावलं उचलावी लागतील. समाजात शिक्षणाद्वारे याविषयी जागृती निर्माण करता येईल. कामाच्या ठिकाणी होणारा वयवाद कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना विशेष ‘वय-लक्ष्यी’ प्रशिक्षण देता येईल. भिन्न वयोगटांच्या व्यक्तींमध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी त्यांचे काही एकत्र सामाजिक उपक्रम राबवता येतील. समाजातील वयस्कर व्यक्तींचं अलगीकरण टाळून त्यांचं समाजाच्या मुख्य धारेत सहभागीकरण करण्यासाठी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांना सहभागी करून घेता येईल. वैयक्तिक पातळीवरची सर्व आर्थिक नियोजनं ८० वर्षांचं वयोमान धरून करावी लागतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, शतकानुशतकं चालत आलेले वयाविषयीचे आपले दूषित पूर्वग्रह आपल्याला बदलावे लागतील. 

वयानं ‘लहान’ आणि ‘मोठा’ या सापेक्ष संज्ञा आहेत. तुमच्या आधी जन्मलेल्यांसाठी तुम्ही ‘लहान’ आणि नंतर जन्मलेल्यांसाठी तुम्ही ‘मोठे’ आहात. पोटात असणाऱ्या मुलापेक्षा आज जन्मलेलं मूल हे सापेक्षत: ‘मोठं’ आहे. त्यामुळे तसं पाहायला गेलं, तर एकाच वेळी तुम्ही लहानदेखील आहात आणि मोठेदेखील आहात. तुम्ही स्वत:च्या वयाकडे कसं पाहता यावर बरंच काही अवलंबून आहे. तो दृष्टिकोन तुम्हाला ‘तरुण’ किंवा ‘म्हातारा’ ठरवतो. असं असताना वयाचा उगाच बाऊ करण्याची अजिबातच गरज नाही. कारण वय म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून फक्त केवळ एक ‘आकडा’ आहे!

dularid111@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Age number depending age behave certain way biased because vision ysh