लता पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूरचा स्वप्निल पाटील आज पोहण्याच्या स्पर्धामध्ये सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावत आहे. उजवा पाय मांडीपासूनच आक्रसल्यासारखा झाल्यावर, जीवघेण्या दुखण्यांवर मात करून त्याने न खचता पोहण्यातून अपंगत्वावर मात केली आहे. नदी, समुद्रही त्याच्या आड येऊ शकले नाहीत. यामागे त्याच्या आईचीही मेहनत आहेत. त्याच्या आई लता पाटील जणू सांगत आहेत, किनारा तुला पामराला..

लहानग्या अनुराधाच्या पाठीवर ६ जानेवारी १९९८ रोजी स्वप्निलचा जन्म झाला आणि आमचं चौकोनी कुटुंब तयार झालं. अनुराधा आणि स्वप्निल म्हणता म्हणता मोठे होत होते. त्यांची शाळा कधी सुरू झाली तेही त्यांच्या बाललीलांमध्ये समजलंच नाही. स्वप्निल ६ वर्षांचा, पहिलीत शिकत होता. २००४ च्या त्याच्या वाढदिवशी सगळी मुलं जमली होती, केक कापून वाढदिवस साजरा होणार होता. माझी लगबग सुरू होती. त्याच वेळी स्वप्निलला आठवलं की त्याचे नियमित केस कापणारे सलूनवाले काका त्याला म्हणाले होते की, मलाही केक खायला बोलाव. लहानग्या स्वप्निलने त्याच्या पप्पांना सांगितलं की, मी त्या काकांना बोलावून येतो. त्याचे पप्पा म्हणालेही, अरे थांब मी फोन लावतो, पण तो कसला थांबायला. त्याची लहानगी तीनचाकी सायकल घेऊन गेलाही. सगळे त्याची वाट पाहत असतानाच अचानक कोणी तरी सांगत आलं की स्वप्निल सायकलवरून पडलाय. त्याचे पप्पा धावत गेले आणि त्याला उचलून घेऊन आले. वाटलं खूप काही झालं नसेल. पण त्यांच्या अंगावरून हात फिरवताना जाणवलं की, त्याच्या मांडीचं हाड वर आलंय. त्याच्या पप्पांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर जाणवलं काही तरी गंभीर आहे.

कोल्हापूरच्याच राणे डॉक्टरांकडे त्याला घेऊन गेलो. त्याचं मांडीचं हाड मोडलं होतं. त्याचं वय लहान असल्यानं डॉक्टरांनी शस्त्रक्रिया न करता त्याला ट्रॅक्शन लावायचा निर्णय घेतला. माझा जीव थाऱ्यावर नव्हता. स्वप्निल जात्याच सहनशील असल्यानं तो ती वेदना सहन करतच होता. त्याच्या पप्पांनी डॉक्टरांना सांगितलं तुम्हाला योग्य वाटेल ते उपचार करा. मात्र डॉक्टरांच्या हाताखालच्या लोकांनी त्यावेळी अनेक चुका केल्या. अगदी इंजेक्शन देण्यापासून ते ट्रॅक्शनसाठी पट्टी लावण्यापर्यंत. त्याचा परिणाम असा झाला की त्याची तब्येत सुधारण्याऐवजी अधिकच खालावली. त्या काळात रात्रीचा दिवस करून मला त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागायचं. त्यातच डॉक्टरांनी त्याला प्लॅस्टर घालण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण शरीरालाच प्लॅस्टर घातले म्हणाना. त्यातून त्याच्या पायाला फोड झाले, दरुगधी यायला लागली. जवळपास सव्वा र्वष तो प्लॅस्टर घातलेल्या अवस्थेत होता. त्या आधीचे काही महिने हॉस्पिटलमध्ये. त्या काळात त्याला सांभाळणे, त्याची शी-शू सगळंच जागेवर असल्यानं ते काढणं, जखमा साफ करणं सगळंच मी केलं. त्या काळात मन खूप घट्ट करावं लागायचं. पोराचं दुखणं बघवलं जायचं नाही. पण त्याच्या सहनशीलतेमुळे आणि त्याच्या पप्पांच्या साथीमुळे मीच स्वत:ला खंबीर करत गेले. स्वप्निल पहिलीत असताना हा अपघात झाला होता, त्याचे सगळे मित्र पुढच्या वर्गात गेले होते, मग जमेल तसं मी त्याचा अभ्यास घ्यायलाही सुरुवात केली. शिवाय अनुराधाही त्यासाठी माझ्या जोडीला होती.

सव्वा वर्षांने स्वप्निलचे प्लॅस्टर काढल्यावर ते कटू सत्य मला समजलं. एक तर त्याचा पाय गुडघ्यापासून हलतच नव्हता आणि त्याच्या अपघात झालेल्या उजव्या पायाचा आकार आणि लांबी कमी झाली होती. पाय एक इंचाने कमी झाला होता. त्याच्या गुडघ्याच्या मागे चेंडूएवढय़ा आकाराची गाठ झाली होती. आता पुढे काय होणार हाच प्रश्न माझ्यासमोर उभा होता. गुडघ्याच्या मागे झालेली गाठ शस्त्रक्रिया करून काढायचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. शस्त्रक्रियेचा दिवस ठरला. त्याच्या आदल्या दिवशी काय कोणास ठाऊक स्वप्निलने त्याच्या पप्पांकडे पोहण्याचा तलाव बघायचा हट्ट धरला. त्याचा तो हट्ट पूर्ण करण्यासाठी ते त्याला तरणतलावावर घेऊन गेले. तेथे फिरत असताना जलतरणपटू वीरधवल खाडे आणि त्याच्या वडिलांनी त्यांची विचारपूस केली. त्यांना सर्व ‘कथा’ समजताच वीरधवलच्या वडिलांनी त्याला ‘बेबी पूल’मध्ये आणून त्याचा गाठ असलेला पाय रोज जमेल तसा हलवून पहा कदाचित गाठ निघून जाईल असा सल्ला दिला. त्याच्या वडिलांना तो पटला आणि त्यांनी डॉक्टरांना शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय सांगितला. तोपर्यंत डॉक्टरांनीही त्यांची पूर्वी झालेली चूक मान्य केली होतीच. शिवाय या शस्त्रक्रियेनंतर स्वप्निलची तब्येत सुधारेपर्यंत काही महिन्यांचा कालावधी जाणार होता. मलाही तो निर्णय योग्यच वाटला. मग त्याचे पप्पा त्याला तरणतलावावर नेऊ लागले आणि तिथेच त्याला पोहण्याची गोडी लागली आणि तो उत्तम प्रकारे पोहायला शिकला. वर्षभरात त्याला व्यावसायिक प्रशिक्षकांकडून पोहणे शिकवावे लागले, इतका तो तयार झाला. आणि हो या कालावधीत त्याची गाठही गळून गेली. मात्र त्याचा उजवा पाय लांबीने कमी कमीच होत गेला. सध्या त्याचा पाय आक्रसला जाऊन नऊ इंचांनी कमी झाला आहे. अर्थात चालण्यासाठी तो कुठल्याही साधनाचा वापर करत नाही, त्याने त्याची स्वत:ची अशी चालण्याची एक शैली विकसित केली आहे.

पोहणे सुरू केल्यावर दुसरीकडे त्यानं शाळेत जावं यासाठी मी प्रयत्नशील राहिले. स्वप्निलला अशक्तपणा जाणवणार नाही यासाठी त्याच्या खाण्यापिण्याची जबाबदारी घेतली. व्यवसायामुळे त्याच्या वडिलांना कधी त्याला आणि अनुराधाला तरणतलावावर नेणे शक्य झाले नाही तर तिथे घेऊन जाणे मी केले. त्याचे फिजिओथेरपीकडे लक्ष देणे आदी गोष्टी केल्या.

२००७ पासून स्वप्निलने स्पर्धामध्ये उतरायला सुरुवात केली. स्थानिक पातळीवर, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये तो सहभागी झाला आहे. अपंग तसेच सामान्य गटांमध्येही तो सहभागी झाला. आतापर्यंत त्यानं ३०० हून अधिक बक्षिसं मिळवली आहेत. त्यात २२ आंतरराष्ट्रीय पदकांचा समावेश आहे. त्याच्या नावावर पोहण्यातील दोन आशियायी रेकॉर्ड आहेत. २०२० मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकसाठी तो आता तयारी करत आहे.

एवढय़ा मोठय़ा काळात मी एवढंच शिकले की पालक म्हणून तुम्ही हताश होऊन चालत नाही. आई आणि वडील दोघांनी परस्परपूरक प्रयत्न करायला हवेत. आज स्वप्निलचे वडील त्याच्याबरोबरीने पोहायला शिकले एवढेच नव्हे तर त्यांनी वॉटर थेरपी शिकून घेतली आणि त्यांच्या नियमित व्यवसायाशिवाय ते अपंग मुलांवर वॉटर थेरपीचे उपचार करतात. आपणच खचलो तर मूल कधीच प्रगती करू शकणार नाही, हे कायम लक्षात ठेवावं. मूल आजारी असो किंवा अपंग ते घरात पडून राहणं कधीही योग्य नाही. कोण काय म्हणतंय याचा विचार करत बसायचं नाही. त्याऐवजी आपल्या मनाला पटेल, रुचेल आणि मुलालाही त्यात आनंद मिळेल अशा गोष्टी करत राहायच्या. आणखी एक महत्त्वाचं समजलं ते म्हणजे, सगळं लक्ष केवळ एकाच मुलाकडे न एकवटता दुसऱ्या मुलाच्याही सगळ्या गोष्टींत पालकांनी सामावून घेतलं पाहिजे. आम्ही अनुराधालाही पोहायला शिकवलं, तिच्या शिक्षणाकडे लक्ष पुरवलं त्यामुळेच आज तीसुद्धा एमएस्सी झाली आहे. स्वप्निल सहनशील तर आहेच पण भावनिकही आहे. त्यानं एक उत्तम माणूस म्हणून घडावं यासाठी मी नेहमीच प्रयत्न केला. त्यातूनच स्वत:चं अपंगत्व विसरून दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याचा त्याचा स्वभाव तयार झाला आहे. आतापर्यंत त्यानं बुडणाऱ्या तिघांना वाचवलंय तेही तो केवळ १२ ते १५ वर्षांचा असताना. शिवाय तो अभ्यासासाठीही मेहनत घेतो. २०१० पासून तो बंगळूरुला प्रशिक्षण घेतोय, तेही आम्हाला सगळ्यांना सोडून. तो एकटय़ाने राहू शकेल यासाठी मी त्याला त्यापद्धतीने तयार केले. २०१५ पासून तो हरियाणाकडून खेळतोय. त्याची प्रगती हेच माझं समाधान.

sanjay.patil0698@gmail.com  

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व अपूर्णांक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swimmer swapnil patil
First published on: 28-04-2018 at 00:34 IST