अभिनेता सलमान खानच्या मुंबईतल्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे. सलमान खानच्या मुंबईतल्या घराबाहेर १४ एप्रिलला गोळीबार झाला होता. दोन अज्ञात व्यक्तींनी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला. ही घटना घडली तेव्हा सलमान खान आणि त्याचे कुटुंबीय घरातच होते. या प्रकरणाचा तपास आता एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक करणार आहेत.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी गुजरातच्या तापी नदीत शोध मोहीम राबवली. सलमान खानच्या घराबाहेर ज्यांनी गोळीबार केला त्या दोघांना गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. त्यांनी वापरलेलं पिस्तुल शोधण्यात येतं आहे. विकी गुप्ता, आणि सागर पाल या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी चौकशी दरम्यान हे सांगितलं की त्यांनी पिस्तुल तापी नदीत फेकल्याचं सांगितलं. आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक हेदेखील शोध पथकात आहेत. स्थानिक चालक, मच्छिमार यांच्याकडूनही माहिती घेतली जाते आहे. News 18 ने हे वृत्त दिलं आहे.
हे पण वाचा- सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर आयुष शर्माचं विधान; म्हणाला, “हा काळ आमच्यासाठी…”
मुंबई पोलिसांचं पथक सूरतमध्ये आलं आहे. सलमान खानच्या घराबाहेर जो गोळीबार करण्यात आला ते पिस्तुल शोधण्यासाठी हे पथक आलं आहे. आमची पथकंही त्यांना मदत करत आहेत. अशी माहिती सूरत पोलिस आयुक्त अनुपम सिंग गेहलोत यांनी पीटीआयला दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायकही या पथकात आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचं हे पथक आहे. पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी मच्छिमार, स्थानिक रहिवासी यांची मदत घेतली जाते आहे असंही पोलिसांनी सांगितलं.