‘‘माझा पिंड मनस्वी, रसिक आहे. त्यामुळे अत्यंत हळुवार, उत्कट प्रेम करणारा  जोडीदार असणं ही माझी मानसिक गरज होती. मात्र ध्येयवादी माणूस त्याच्या ध्येयापेक्षा अधिक कुणावरही प्रेम करू शकत नाही. हा माणूस नाही, संस्था आहे,  हे अनेकांनी सांगितलेलं सत्य मी स्वीकारलं आहे. तरीही आमच्यातील भावबंध टिकून आहे, कारण परस्परसंबंधातील ताण-तणाव आणि आस्था कमी-जास्त होत असली तरी प्रत्येक संकटकाळी गिरीश देवाआधी माझ्या मागे उभा असेल, हा माझा विश्वास त्याने अनेकदा सार्थ ठरवला आहे.’’ सांगताहेत ‘स्नेहांकुर दत्तक विधान’च्या संस्थापिका डॉ. प्राजक्ता कुलकर्णी आपले पती व ‘स्नेहालय’चे संस्थापक   डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्याबरोबरीच्या   १७ वर्षांच्या सहजीवनाविषयी..

युनियन बँकेत व्यवस्थापक असणाऱ्या माझ्या वडिलांच्या दर तीन वर्षांनी बदल्या व्हायच्या. त्यामुळे अनेक ठिकाणी राहण्याचा अनुभव आला. आरंभी पुणे, त्यानंतर नगर जिल्हय़ातील संगमनेर, लोणी-प्रवरानगर पुढे नाशिक मग पुन्हा अहमदनगर असा हा प्रवास. पुणे येथील रेणुका स्वरूप शाळेत मी शिकले. पुढे बी.एस्सी. केलं. मग पुण्याला फॅशन डिझाइिनगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. दरम्यान अहमदनगरला वडिलांची बदली झाली. तेव्हा मी कायमची नगरकर होईन,असे मला कधीच वाटले नव्हते.
नगरमध्ये एका कंपनीत तात्पुरती नोकरी सुरू केली. कंपनीचे कार्यालय अहमदनगरच्या जुना मंगळवार बाजार येथे होते. कंपनीच्या कार्यालयाशेजारी एक घर होते. त्या घराचे नाव बिल्वदल, पण बाहेर एक पाटी लटकवली होती, ‘ स्नेहालय’. त्या वेळी दाढी वाढवलेला, सतत वर्दळीत असणारा, नवखी बालके आणि महिलांसोबत त्यांची काळजी वाहत त्यांचे जटिल प्रश्न सोडवत बसलेला माणूस मला दिसला. त्याचा पेहराव, कामाची पद्धत आणि स्वरूप तसेच जीवनशैली यांची कुठेच संगती लागत नव्हती. आमची ओळख झाली. ‘स्नेहालय’च्या कामाबद्दल गप्पा सुरू झाल्या. ओळखीच्या प्रत्येक माणसाला ‘स्नेहालय’च्या किंवा सेवेच्या कामात गुंतविण्याची गिरीशची हातोटी होती. ओळखीच्या आणि संबंधातल्या प्रत्येकाला कामात गुंतविणारा गिरीश माझ्यात गुंतला. खरे तर ‘स्नेहालय’च्या उभारणीत प्रचंड व्यग्र असलेल्या गिरीशची वृत्ती ‘सुख-दु:ख आणि जय-पराजय एकसमान’ अशी होती, पण विश्वामित्री बाण्याचा गिरीश माझ्या प्रेमात पडला. ‘स्नेहालय’चे कुठले तरी काम करीत असतानाच गिरीश सोबतीला बोलवायचा. काम करता-करता आम्ही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. एकाच वेळी बहुविध घटना आणि घटनाक्रम चालू असण्याची आमच्या आयुष्यातील परंपरा आजही खंडित नाही. कुठल्याही विषयात निर्णय झाला की, अंमलबजावणीत उशीर करायचा नाही, हा गिरीशचा खाक्या. आपण एकमेकांना आवडलो असू तर लग्नाचा विषय प्रलंबित ठेवणे योग्य ठरणार नाही, असा फैसला झाला. मी मराठा तर गिरीश ब्राह्मण. पण दोन्हीकडची माणसे समजूतदार. गिरीशने आधी त्याच्या आई-वडिलांची संमती घेतली. मोठय़ा रेवाकाकूंना आणि सर्वात ज्येष्ठ सरस्वतीआजींना मला भेटवले. गिरीशचा चुलत भाऊ डॉ. शिरीष आणि बहीण सुषमा यांनी आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाहाची परंपरा कुलकर्णी कुटुंबात रुजविली होती. त्यामुळे सर्व सुरळीत पार पडले. मग माझ्या आई-वडिलांना रीतसर भेटून प्रस्ताव दिला. गिरीशचे कुटुंब नगरमध्ये सर्व परिचित होते. माझ्या वडिलांचे मित्र कॅप्टन व्ही. जी. सोसे, गुंडूकाका आदींनी कुलकर्णी कुटुंबाची हमी घेतली. प्रेम हळूवारपणे फुलण्याची वाट न पाहता परिचयानंतर आठव्याच महिन्यात, २३ फेब्रुवारी १९९७ साली आमचे लग्न झाले. वाजंत्रींच्या गलबल्यात ‘हा माणूस नाही, संस्था आहे, लग्नाचा विचार पुन्हा एकदा कर ’ हे सल्ले मी ऐकून सोडून दिले. प्रियकर गिरीशबरोबरचे अनौपचारिक नाते संपले..
एखादी कल्पना डोक्यात घुसली की, ती प्रत्यक्षात आणूनच पाहायची अशी गिरीशची वृत्ती. त्यामुळे लग्नासारख्या व्यक्तिगत जीवनातील सर्वात महत्त्वाच्या प्रसंगीदेखील त्याचा श्वास असलेल्या ‘स्नेहालय’साठी त्याने निधीसंकलन केले. लग्नाची त्याने स्वतंत्र पत्रिका काढली. त्यात स्नेहालय, रावसाहेब पटवर्धन स्मारक अशा त्याचा संबंध असलेल्या संस्थांसाठी लोकांकडून आहेराऐवजी संस्था सहयोग मागितला. जे लग्नाला येऊ शकले नाहीत, त्यांना लग्नानंतर भेटून त्याने मदतरूपी आहेर वसूल केलाच. अशा विक्षिप्तपणाबद्दल कोणी काही बोलले तरी त्याचा गिरीश कधीच विचार करीत नाही.     
माझे सासरे दिनुभाऊ कुलकर्णी यांचा प्रचंड जनसंपर्क होता. ते क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रात नामांकित होते. घरात सतत उकळणारा चहा, अमर्यादित काळासाठी मुक्कामाला येणारे पाहुणे, लग्नानंतर दोन वर्षांनी जन्मलेली आमची तान्ही निहार यांनी जीवन व्यापून टाकले होते. एकाच वेळी गिरीश अनेक व्यवधाने सांभाळायचा. तेव्हा तो नगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयात राज्यशास्त्र शिकवायचा. दैनिके, वृत्तसंस्थेसाठी नगर जिल्हय़ाचा बातमीदार म्हणून काम करायचा. ‘स्नेहालय’चे अहोरात्र काम चालायचेच. त्यात चळवळी, आंदोलने, निधी संकलन, संवाद अशी गुंफण असायची. याशिवाय कधी हॉटेल, कधी जाहिरात एजन्सी अशी अनेक कामे गिरीश करायचा. ‘स्नेहालय’कडून कुठलाच लाभ अथवा मानधन न घेता ‘स्नेहालय’च्या गरजा भागविण्यासाठी कुठल्याच चौकटीत न बसणारी प्रचंड धावपळ तो करीत होता. मीदेखील अशीच धावपळ करावी, बऱ्याच गोष्टी एकाच वेळी साध्य कराव्यात असा गिरीशचा आग्रह होता. त्यामुळे त्याने मला ‘मास्टर इन मास रिलेशन्स्’ त्यानंतर डी. फार्म., बालविकास पदविका अभ्यासक्रम, मास्टर इन सोशल वर्क, मराठी विषयात एम.ए. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन दिले. हे अभ्यासक्रम पूर्णच करायला लावले. माझा दीर मनीष अकाली गेला. माझा तो खूप जवळचा मित्र होता. गिरीशच्या व्यस्ततेमुळे माझ्या आयुष्यात निर्माण झालेले मानसिक एकटेपण त्याच्यामुळेच मला पेलता आले. त्याने मला पीएच.डी. करण्यासाठी प्रोत्साहित केले. पण मनीष अकाली गेल्यावर माझी उमेदच खचली. तेव्हा आपला ठेवणीतला हट्टाग्रह करून गिरीशने मला पीएच.डी. अभ्यासक्रम पूर्ण करायला भाग पाडले. या प्रक्रिया चालू असताना माझे वाक्ताडन सहन करीत आपला हेका गिरीशने सोडला नाही. हा अभ्यासक्रम करीत असताना मला आवडणारा आंब्याचा रस डब्यात घेऊन गिरीश मला भेटायला तिष्ठत उभा असायचा. मी काही स्थानिक वृत्तपत्रांत सदर लिहिले. आयुष्य प्रचंड वेगवान बनले. अशा आयुष्याची जडणघडण करणाऱ्या अनेक प्रसंगांतून आमचा भावबंध फुलत गेला.
आजवर लहान-मोठे निर्णय घेताना गिरीश मला आणि कुटुंबाला नेहमीच गृहीत धरत आला. एक दिवस त्याने जाहीर केले, ‘आजपासून आपल्या घरी काही एड्सबाधित व्यक्ती कायमच्या राहायला येणार आहेत.’ पुण्याहून विजयाताई लवाटे यांनी बुधवार-शुक्रवार पेठेतल्या एड्सग्रस्त महिला पाठविल्या. मुंबईच्या ‘प्रेरणा’ संस्थेकडून एक बाधित महिला मुलासह आली. त्यांना राहायला स्नेहालयात जागाच नव्हती.  तेव्हा निहार माझ्या पोटात होती. भीती व अस्वस्थतेने माझे मन भरून गेले. मात्र थोडय़ाच काळात कल्पनेहून वास्तव चांगले आहे, असे वाटू लागले. कारण मृत्यूच्या भीतीवर मात केलेल्या या सगळ्या जणी माझ्यावर बिनशर्त प्रेम करू लागल्या. माझ्या बाळंतपणात सतत माझ्या बरोबर राहणारी कमळा, गप्पिष्ट रंगम्मा, निगुतीने खायला घालणारी दया या एड्सबाधितांनी माझे भावविश्व अबाधित ठेवले. निहारला त्यांच्या हातात देताना मनात कधीच कुठलीही शंका आली नाही. आपण या लोकांना स्वीकारले तरच लोक त्यांना स्वीकारतील, या जाणिवेतून गिरीशने धाडसी निर्णय घेतला. या लोकांची त्याने मलमूत्र काढण्यापासून सेवा केली.  गिरीश मला प्रथम भेटला तेव्हा त्याच्याबरोबर सागर नावाचा एक एड्स आणि बहुव्याधीग्रस्त मुलगा असे. त्याचे मोठे आतडे संडासच्या जागेतून बाहेर आले होते. त्यातून सतत रक्त ठिबकायचे. त्याचे मोठे आतडे गिरीश हाताने मागे सरकवायचा. तो जिथे बसेल तिथे डाग पडू नये म्हणून वर्तमानपत्राचे कागद खाली अंथरायचा. डॉ. मार्सयिा वॉरन यांच्या मदतीने सागरची शस्त्रक्रिया करून त्याला त्याने नवजीवन दिले. त्यामुळे छोटय़ा आयुष्यात सागर काही दिवस वेदनामुक्त जगला. संकटे आली की, गिरीश धीरोदात्त होतो. त्याला दु:खी आणि निराशाग्रस्त क्वचितच कोणी पाहिले असेल. तो काम संपेपर्यंत थांबत नाही. शेवटपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करीत राहतो. त्यातून अशक्य ते घडते. अशा घटनांनी गिरीशला माझ्या नजरेत उत्तुंग केले.   
गेली सतरा वष्रे गिरीशला माणूस म्हणून रोज  देदीप्यमान होताना पाहिले आहे.
क्षुल्लक कामासाठी, परवानग्या घेणे, अन्न गरम करून जेवायला वाढणे, कामाच्या वस्तू हातात देणे, पशांचे हिशेब देणे या गोष्टी करण्यातच अनेक स्त्रियांचे आयुष्य संपून जाते. माझ्याकडून या अपेक्षा न ठेवून गिरीशने मला अमूल्य भेट दिली. प्रत्येक गुरुपौर्णिमेला मी त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करते, कारण आमच्यातले नाते पती-मार्गदर्शक-गुरू असे बदलत गेले. व्यक्तिगत दु:ख, राग-लोभ यांचा कामाच्या निष्ठेवर परिणाम होऊ न देणे, समयसूचकता, लोकांना बरोबरीने वागविणे, कृतज्ञता जपणे या गोष्टी त्याच्या व्यक्तिमत्त्वातून माझ्यात नकळत झिरपल्या.
स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राचे काम, कुमारी आणि अत्याचारित महिलांचे पुनर्वसन या क्षेत्रात गेली १० वर्षे मी काम करीत आहे. हे काम माझ्या शिस्तशीर पद्धतीने उभे करताना माझी मते आणि आग्रह यांचा त्याने अनादर केला नाही.  
वाढत्या सहवासाबरोबर माणसाचा दंभ ठळकपणे दिसायला लागतो. गिरीशचे बलस्थान असलेली ‘फकिरी’ आणि साधुत्वाचा अहंकार याचे फटके मी खाल्ले आहेत. सामाजिक कार्यकत्रे मुलांची हेळसांड करतात, बायकोला अंत्ययात्रेतच फक्त डोळे भरून पाहतात, चांगली राहणी त्यांना अपराध वाटते हे बहुधा खरेच असावे. पूर्वनियोजन न करता रेल्वेच्या जनरलच्या डब्यात बसून कार्यकत्रेपण भोगणे, निदान बऱ्या लॉजमध्ये राहण्याऐवजी दिल्लीत गेल्यावर चांदणी चौक गुरुद्वारात फुकट जेवणे व राहणे, रोजच रात्रीचा दिवस करणे, कुठल्याही आनंदाच्या प्रसंगी इतरांसोबत शेअरिंग न करता स्वत:च्या व्यवधानातच व्यग्र राहणे, सोबत असतानाही सतत तिसऱ्याच माणसाशी मोबाइलवर बोलणे, अगदी कमी महत्त्वाच्या गोष्टी लोकांची मने जपण्यासाठी लक्ष देऊन ऐकण्यात वेळ घालविणे, माणसे जपणे आणि टिकविण्यासाठी सतत शुगरकोटेड संवाद करणे, अशा सवयींमुळे गिरीशचा राग येतो. सामाजिक दृष्टीने अतिसंवेदनशील असलेला माणूस कौटुंबिक आणि व्यक्तिगत संदर्भात तरल का नसतो? त्यातून कटू शब्द बोलले जातात, पण त्याचा नंतर विषाद वाटतो.
 मुलांनी कुठे तरी घेऊन चला असा आग्रह केला की, २-३ वर्षांत एकदा गिरीश कुठे तरी नेऊन आणतो. एकदा त्याने आम्हाला महाबळेश्वरला नेण्याची घोषणा केली. आम्हाला आश्चर्य वाटले, कारण महाबळेश्वर तसे खर्चीकच. मग गिरीशने ‘स्नेहालय’चे विश्वस्त अरूण शेठ यांच्या महाबळेश्वरच्या घरात आणले. नियोजन करून सहलीच्या खर्चात बचत केली. आपल्याला खूष करताना त्याला जे साध्य करायचे असते, ते तो बरोबर साधतो. वाचलेल्या पशातून काय-काय सामाजिक काम होणार आहे, याचा ताळेबंद त्याच्याकडे तयार असतो. कितीही आग्रह केला तरी तो नवे कपडे आणत अथवा शिवत नाही. मित्रांनी दिलेल्या, त्यांना नकोशा झालेल्या कपडय़ांवर त्याचे आयुष्य मजेत चालते. ‘पोटाचा घेर चाळीस असलेली आणि सतत नवे कपडे विकत घेण्याची, जुने टाकून देण्याची आवड असलेली माणसे मला फार आवडतात’, असे गिरीश कोडय़ात सांगतो. ज्याला त्याच्या खोडी माहिती आहेत, त्यालाच असले विनोद समजतात.
माझा मनस्वीपणा, प्रवाहाविरुद्धचे विचार, आत्मसन्मानाची प्रखर होत गेलेली जाणीव या वैवाहिक जीवनात अडथळे ठरणाऱ्या गोष्टी त्याने विलक्षण सहजतेने, निर्भयतेने, आत्मसंयमाने स्वीकारलेल्या मी अनुभवल्या. आजपर्यंतचे आमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे दोन आस्तित्वांचा समांतर परंतु परस्परपूरक प्रवास आहे, असे म्हणावे लागेल. या प्रवासात सर्वसामान्य बायकांसारखे नवऱ्याचे कोडकौतुक माझ्या वाटेला आले नाही, पण त्याने जगाची कवाडे माझ्यासाठी खुली करून दिली. याची कृतज्ञतापूर्वक जाणीव मला आहे. एकमेकांविषयीचा आदर, कृतज्ञता, समान जीवनध्येय यांमुळे हा प्रवास सुफळ-संपूर्ण होईल याची खात्री वाटते.     स्नेहाची सावली
डॉ. गिरीश कुलकर्णी – girish@snehalaya.org
आमचे नाते आशयसंपन्न करण्यात प्राजक्ताचाच सिंहाचा वाटा आहे, असे मला प्रांजळपणे वाटते. तिने वेळोवेळी दाखवलेल्या समजूतदारपणामुळे मला नेहमीच विनम्र आणि चकित केले. ‘स्नेहालय’च्या वाटचालीत तिच्या अनेक सूचना, आग्रह अत्यंत मोलाचे ठरले. आधी एक प्रेयसी, पत्नी, नंतर सामाजिक कार्यातील साथीदार असणारी प्राजक्ता तिच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्व आणि क्षमतांमुळे आता ती एक संस्थाच बनली आहे. मागील १७ वर्षांतील वाटचालीत प्राजक्ताने मला सावलीसारखी साथ दिली. अनेक धोक्यातून वेळीच सावध करून बाहेर काढले. आमच्या नात्याच्या कॅनव्हास खूपच मोठा आहे. त्यातील काय लिहावे हा मोठा प्रश्न आहे.
 मास्तरकीतून मिळालेला माझा सर्व पगार आजही पहिल्या पाच दिवसांतच संपतो. अनेकदा तर कामाच्या ओघात बिल भरण्याचे विसरून जातो आणि नंतर पसे संपल्याने माझा मोबाइल, घराचे वीज कनेक्शन बंद पडते. मात्र, या घटनांमुळे विचलित न होता प्राजक्ता आमच्या संसाराचे गाडे न कुरकुरता खेचते. कधी तरी माझ्या बेदरकार वृत्तीमुळे मुलांची शिक्षणे नीट होणार नाहीत, अशी चिंता तिला वाटते. पण ‘होईल बरोबर, उगाच चिंता करू नकोस,’ असे मी म्हटले की ती सावरते. माझ्याकडे याबाबत फार सखोल विचार आणि काही योजना असल्याचा समज ती करून घेते. माझे एक छोटे घर नगरच्या हडको वसाहतीमध्ये होते. तेथे २००५ साली मी ‘अनामप्रेम’ संस्थेच्या अंध मुलींचे वसतिगृह चालू केले. नगरच्या जिल्हा न्यायालयासमोर एक जागा घेतली होती. तेथे ‘स्नेहालय’चा समस्याग्रस्त महिलांसाठीचा ‘स्नेहाधार’ प्रकल्प आणि महिलांच्या पुनर्वसनासाठी ‘भारतमाता’ केंद्र सुरू केले. जुना मंगळवार बाजार येथील वडिलोपार्जति जागेत वडिलांचे निधन होताच मूकबधिर बालकांचे वसतिगृह चालू केले. हे निर्णय मी एकटय़ानेच घेतले आणि प्राजक्ताला फक्त सांगितले. ती म्हणाली, ‘कुठे आपण रस्त्यावर आलो आहोत?’ हा तिच्या मनाचा मोठेपणा.
काही महत्त्वाच्या प्रसंगी तरी नवऱ्याने आपल्याबरोबर असावे, असे पत्नीला वाटते. मी अनेकदा रूक्षपणे ‘प्रथम स्नेहालय’ म्हणत अनेक अशा जबाबदाऱ्या टाळल्या. लग्नानंतर प्राजक्ताला दिवस राहिले. परंतु अचानक रक्तस्राव मोठय़ा प्रमाणावर झाला. तेव्हा भावाने, मनीषने तिला रुग्णालयात नेले. तिचा गर्भपात झाला होता. हे कळूनही नगरमध्येच असून मी तिला कामाच्या गडबडीमुळे दोन दिवसांनी भेटलो. खूप अपराधी वाटले. पण तिने मला शब्दानेही दुखावले नाही. आमची धाकटी मुलगी ओजस ऊर्फ चेरी हिचे बारसे होते. त्याकडे मी फिरकलोही नाही, प्राजक्तानेच सारे पाहिले. प्राजक्तामुळे घराकडे पाहावे लागत नसल्यानेच पूर्णवेळ मला सामाजिक काम करता येते.
‘स्नेहांकुर’ ही प्राजक्ताची मागील दहा वर्षांच्या मेहनतीची स्वतंत्र उपलब्धी आहे. कुमारी माता आणि अनौरस-बेवारस बालकांचे जटिल प्रश्न सोडविण्याचे असामान्य कसब तिच्यात अनुभवाने आले आहे. त्यासाठी भारतीय समाजसेवा केंद्राच्या माजी संचालिका लता जोशी, सुनीता तगारे, बंगळुरूच्या अलोमा लोबो अशा अनेकांशी तिने सातत्यपूर्ण संवाद ठेवला. अहोरात्र तिच्या कामाचे फोन येतात. माझ्यासारखीच तीही या कामामुळे अस्वस्थ आत्मा बनली आहे. नव्या कौटुंबिक जबाबदाऱ्या लादल्या नसत्या तर प्राजक्तालाही स्वच्छंद आधिक आनंदी जगता आले असते, असे नक्की वाटते.