माधुरी ताम्हणे

madhuri.m.tamhane@gmail.com

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

‘‘शॉर्टसर्किटमुळे आग लागू शकते म्हणून जुन्या वायरिंगवर एसी, वॉशिंग मशीन या उपकरणांचा अतिरिक्त भार टाकू नये. विद्युतयंत्रणा हलगर्जीपणे हाताळू नये. गॅस  शेगडी व पाइप्सची योग्य ती देखभाल व तपासणी करावी.  घराबाहेर पडताना देवाजवळ दिवा लावलेला असेल तर तो विझवून जावे, कारण घरातल्या पाळीव प्राण्याच्या धक्क्याने वा उंदीर असतील तर ते जळती वात कागद- कपडय़ांवर नेऊ शकतात. त्यामुळे आग लागण्याची शक्यता वाढते. पॉश इमारतींमध्ये इंटिरियर डेकोरेशनसाठी फर्निचर, प्लाय, पीव्हीसी, लाकूड अशा ज्वालाग्राही पदार्थाचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो. हे ज्वलनशील पदार्थ पटकन पेट घेतात व आग फैलावते. अशा वेळी अग्निशमन दल नागरिकांच्या संरक्षणासाठी धावून येतात. त्यासाठीही हेल्पलाइन आहे, १०१.

सामान्य माणसाच्या आयुष्यातली महत्त्वाची आणि म्हणूनच अत्यंत संवेदनशील हेल्पलाइन म्हणजे, १०१. अग्निशमन दलाची हेल्पलाइन! नावानुसार कुठेही आग लागली की, या हेल्पलाइनवर नागरिक त्या आपत्तीची वर्दी देतात. अशी वर्दी देणाऱ्या व्यक्तीने प्रथमत: आपले नाव, दूरध्वनी वा भ्रमणध्वनी क्रमांक, दुर्घटनेचा तपशील व घटनास्थळाचा पत्ता इत्यादी प्राथमिक माहिती देणे अपेक्षित आहे.

ही पहिली वर्दी नियंत्रण कक्षाकडे येते. तिथून हॉटलाइन वा वायरलेसवरून स्थानिक व घटनास्थळापासूनच्या सर्वात जवळच्या नियंत्रणकक्षाकडे वर्ग केली जाते. त्या ठिकाणचे जवान व अधिकारी तातडीने निघतात व मुख्य नियंत्रण कक्षाला ‘आम्ही निघालो’ असा संदेश देतात. घटनास्थळी अग्निशमन दलाचे वाहन पोहोचून कार्यवाही पूर्ण होईपर्यंत त्यावर संपूर्ण नियंत्रण मुख्य नियंत्रण कक्षाचे असते. घटनास्थळी अतिरिक्त मदत हवी असल्यास त्याचाही अंदाज घेतला जातो व तात्काळ तशी मदत तिथे पाठविली जाते. ठाणे अग्निशमन दलाचे उपस्थानक अधिकारी नीलेश वेताळ अग्निशमन दलाच्या यंत्रणेची व कार्यवाहीची विस्ताराने माहिती देतात. ‘‘सामान्यत: अग्निशमन दलाचा संदर्भ आगीच्या दुर्घटनेशी लावला जातो. अशा आगीच्या दुर्घटना रहिवासी वा निवासी इमारती, दुकानं, गोदाम, कारखाने या ठिकाणी लागतात. रसायने, फटाके असे ज्वलनशील पदार्थ जिथे साठवले जातात ते कारखाने वा गोदाम अनेकदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात. प्रत्यक्षातआगीच्या दुर्घटनेशिवाय घर वा इमारत कोसळणे, झाड पडणे, साप निघाला, वाहन पेटणे, रस्त्यावर तेल सांडणे, झाडावर पक्षी अडकणे, टॉवरवर माथेफिरूचे चढणे, नदी, नाले ओढय़ांना पूर येणं, त्यात कुणी बुडणं अशा घटना घडल्या की पहिली वर्दी अग्निशमन दलालाच मिळते व अग्निशमन दलाच्या जवानांना प्रथम सहायक म्हणून काम करावे लागते. अर्थात पोलीस, वाहतूक पोलीस, महानगर गॅस कर्मचारी, अनेक सरकारी व बिगरसरकारी संस्था अग्निशमन दलाशी संलग्न असतात व त्यांच्या साहाय्याने आपत्ती नियंत्रणाचे कार्य केले जाते.

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडे फायर, इंजिन, जम्बो वॉटर टँक, आपत्कालीन शिडय़ा, बुलेट मोटर बाइकसारखी जलद वाहन व्यवस्था उपलब्ध असते. आगीच्या दुर्घटनेत अडकलेल्या रहिवासी इमारतींमधील नागरिकांच्या सुटकेसाठी एरियल लॅण्डर, प्लॅटफॉम्र्स, टर्न टेबल अशा अत्याधुनिक सुविधांचा वापर करून आग विझवणे व आपत्तीग्रस्तांचे विमोचन इत्यादी कामे केली जातात. आगीच्या दुर्घटनेव्यतिरिक्त कधी कोणी खाडीत, तलावात, नदीत जीव दिल्यास वा चुकून पडल्यास अग्निशमन दलाला वर्दी दिली जाते. अशा वेळी गळ, बोट, लाइफ जॅकेट अशा विविध साधनांचा वापर करून त्या व्यक्तीला बाहेर काढलं जातं. कधी कधी पक्षी वा प्राणी झाडावर अडकतात. उंच जागी कावळे वा कबूतरे पतंगाच्या मांज्यात अडकून पडतात. अशा वेळी अग्निशमन दलाचे जवान शिडीच्या व रेस्क्यू पोलच्या साहाय्याने त्यांच्यापर्यंत पोहोचतात व त्यांचे प्राण वाचवून त्यांना पक्षीमित्रांच्या हवाली करतात. कधी घरांत वा आवारांत साप निघतो. हे कळताच योग्य त्या उपकरणांसह जवान तिथे पोहोचतात व सापाला पकडून सर्पमित्रांच्या हवाली करतात. कधी कधी झाड रस्त्यावर पडते. अशा वेळी कर्ट्सच्या साहाय्याने कापून ते हलवलं जातं. कधी रस्त्यात तेल सांडतं. दुचाकीस्वार त्यावरून घसरून मोठा अपघात होऊ शकतो. अशा वेळी त्या तेलावर माती टाकून हा धोका कमी केला जातो.

उपस्थानक अधिकारी नीलेश वेताळ अशा अनेक घटनांची माहिती देताना सांगतात, ‘‘एकदा एका डबक्यात मगरीचं पिल्लू असल्याचं कळलं. त्याच्या जिवाला धोका होता. प्राणीमित्रांना बोलावून ते त्यांच्या हवाली केलं. एकदा ठाणे रेल्वे स्टेशनच्या विद्युतवाहिनीच्या खांबावर एक मानसिक रुग्ण चढून बसला. त्या वेळी अतिशय सावधगिरीने आणि कौशल्याने त्याच्याशी संवाद साधून त्याला खाली उतरवण्यात आले. त्यासाठी उंच शिडीचा वापर करण्यात आला. तो थेट वरून खाली उडी मारू शकतो हे लक्षात घेऊन खाली रेस्क्यू नेटही लावण्यात आले. असा सगळा विचार या वेळी करावा लागतो. अग्निशमन दलाचे जवान अग्नी दक्षता बाळगतात. अलीकडे पावसाळ्यात ‘महालक्ष्मी एक्सप्रेस’ बदलापूरनजीक रात्रीच्या वेळी पुराच्या पाण्यात अडकली, तेव्हा अग्निशामक दलाच्या जवानांनी गाडीतील प्रवाशांना बोटी, लाइफ जॅके टच्या मदतीने काळोख, पाण्याखाली गेलेले रूळ, चहुबाजूंनी पुराचं प्रचंड वाढलेलं पाणी अशा अत्यंत अवघड परिस्थितीत सुरक्षित स्थळी हलवायला मदत केली. तेव्हा त्या वेळी रेस्क्यू करणाऱ्या जवानांचा महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला. त्याच दिवशी मुंब्रा, वाळकुंभ भागात पंधरा ते वीस हजार माणसं पुराच्या पाण्यात अडकली होती. त्यांचीही सुटका अग्निशमन दलाच्या जवानांनी केली. काहीवेळा अशा तीन-चार घटनांची माहिती एकाच वेळी मिळते. या पावसाळ्यात सांगली, कोल्हापूर इथल्या पूरग्रस्तांना अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीने वाचवलं व नागरिकांचा दुवा घेतला.

ठाणे येथील मुख्य अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे सांगतात, ‘‘पावसाळ्यात फायर इंजीन फायर स्टेशनला क्वचित असते. ते चोवीस तास फिरत असते. एका फायर स्टेशनच्या सगळ्या गाडय़ा वर्दीवर गेल्यास दुसऱ्या फायर स्टेशनमधून मागवल्या जातात. अग्निशमन दलाचे जवान व अधिकारी प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचवतात. त्यांच्यासाठी कोणतीही आपत्ती छोटी वा मोठी नसते. पूर असो वा रासायनिक गोदामांना आग लागलेली असो, आपत्तीचं संपूर्ण निवारण होत नाही तोवर जवान अहोरात्र काम करतात. मुंब्य्रात रासायनिक गोदामाला लागलेली आग तीन दिवस जवान विझवत होते, तर डम्पिंग ग्राऊंडवर लागलेली आग दोन ते तीन महिने धुमसत होती. जंगलातले वणवे असो वा रासायनिक गोदामे असो, रसायनाच्या जीवघेण्या धुरात उभे राहून जवान धीरोदात्तपणे काम करतात. प्रत्येक कॉलवर जवानांसोबत प्रशिक्षित अधिकारी जात असल्याने त्यांच्या सूचनांनुसार जवान आग विझवण्याचे वा नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे, त्यांच्या सुखरूप सुटकेचे कार्य करत असतात.’’

‘‘या जवानांना फायर फायटिंग सूट, सेफ्टी हेल्मेट्स, हॅण्डग्लोव्ह्ज, गमबूट्स वगैरे दिलेले असतात. अशा सुरक्षिततेच्या साधनांचा वापर प्रत्येक जवान प्रत्येक वर्दीच्या वेळी करतातच. तरीही कधी-कधी त्यांच्याही जीवावर बेतते. अलीकडेच एका मॉलमध्ये लागलेल्या आगीत नागरिकांसह एका जवानाला धुरामुळे गुदमरून श्वसनाचा त्रास होऊ लागला व त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. आग लागताच विद्युत उपकरणे बंद केली जातात. अंधारात नीट दिसत नाही. त्यामुळे वा प्रत्यक्ष आगीमुळे अपघात होऊ शकतात. पण असे अपघात टाळण्याचाच प्रयत्न अग्निशमन दल करत असते.’’

आगीच्या घटनांमुळे नागरिकांच्या व जवानांच्या जीवाला धोका पोहोचू नये यासाठी प्रतिबंधक उपाययोजना अत्यंत आवश्यक असतात. त्यासाठी नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक असते, असे सांगून काळे यांनी काही उदाहरणे दिली. ‘‘शॉर्टसर्किटमुळे आग लागते म्हणून जुन्या वायरिंगवर एसी, वॉशिंग मशीन या उपकरणांचा अतिरिक्त भार टाकू नये. विद्युत यंत्रणा हलगर्जीपणे हाताळू नये. गॅसची शेगडी व पाइप्सची योग्य ती देखभाल व तपासणी करावी. रात्री उपकरणे बंद करावीत. घराबाहेर पडताना देवाचा तेलाचा दिवा विझवून जावे, कारण एखाद्या छोटय़ाशा प्राण्याच्या धक्क्याने दिवा कलंडला व तो खाली असलेल्या कपडे, वह्य़ा, पुस्तके यांवर पडला तर आग लागू शकते. घरात उंदीर असतील तर ते जळती वात कागद कपडय़ांवर नेऊ शकतात त्यामुळे आग लागण्याची शक्यता वाढते. चाळींमध्ये वायरिंगला जॉइंट्स मारले जातात. झोपडय़ांवर प्लास्टिक व मेणकापडांची आच्छादनं असतात. ती चटकन पेट घेतात व झोपडय़ांना आग लागते. पॉश इमारतींमध्ये इंटिरियर डेकोरेशनसाठी फर्निचर, प्लाय, पीव्हीसी, लाकूड अशा ज्वालाग्रही पदार्थाचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो. हे ज्वलनशील पदार्थ पटकन पेट घेतात व आग फैलावते.’’

उंच इमारतीत आगीची घटना होताच नागरिकांनी लिफ्टचा वापर न करता जिन्याने रिफ्यूज एरियात जमावं. हा भाग मोकळा असल्याने धूर कोंडत नाही. माणसं धुरामुळे गुदमरत नाहीत. मोठय़ा सोसायटय़ांमध्ये फायर अलार्म डिटेक्शन सिस्टीम, स्प्रिंकलर सिस्टीम अशा अद्ययावत यंत्रणा असतात. कोणतीही आग सुरुवातीला छोटी असते. म्हणूनच अशा छोटय़ा आगी तात्काळ विझवण्याचे मूलभूत प्रशिक्षण व माहिती नागरिकांना मिळावी यासाठी अग्निशमन दल जनजागृती मोहिमा राबवीत असतात. १४ एप्रिल ते २० एप्रिल या अग्निशमन दल सेवा सप्ताहात नागरिकांना विविध प्रात्याक्षिकांद्वारे प्रशिक्षण दिलं जातं. त्यासाठी सोसायटय़ांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधून प्रशिक्षणाची लेखी मागणी करणे आवश्यक असते. याशिवाय प्रत्येक सोसायटीत मॉक ड्रिल्स आयोजित केली जातात. त्याद्वारे खरी आपत्ती ओढवल्यास कसा प्रतिसाद द्यायचा, सुरक्षित जागा कोणत्या, तिथवर कसं पोहोचायचं हे सर्व सांगितलं जातं. सोसायटीच्या रहिवाशांमधूनच फायर व्हॉलेंटियर्सची निवड करून आग प्रतिबंधक यंत्रणांचा सुयोग्य वापर कसा करायचा याचे रीतसर प्रशिक्षण दिले जाते.

अग्निशमन दलाचे अधिकारी नागरिकांकडून अशी अपेक्षा करतात, की अग्नीची दुर्घटना घडल्यास लोकांनी गर्दी न करता अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी लवकरात लवकर पोहोचण्यास मदत करावी. जवानांना कामात सूचना करू नये तसेच बघ्यांनी गर्दी करून अडथळा निर्माण करू नये. जवान रिस्पॉन्स व्हेईकल, मोटारसायकल यांचा उपयोग करून प्राथमिक स्वरूपाची आग विझवत असतील तेव्हा त्यांना सहकार्य करावं. अग्निशमन दलाचे जवान व अधिकारी वर्दी मिळताच आग विझवण्यास व आपत्ती निवारण करण्यास तातडीने घटनास्थळी हजर होतात. शांतपणे व शिस्तबद्धरीतीने आपले काम करतात. कधी कधी तिथूनच परस्पर पुढच्या वर्दीसाठी निघून जातात. जणू ते रोज नवी लढाई लढतात. मात्र ‘मा फलेषु कदाचन’ अशा निर्मम वृत्तीने ते काम करतात व केवळ कर्तव्यपूर्तीचं असीम समाधान मिळवण्यात धन्यता मानतात.

१४ एप्रिल ते २० एप्रिल या अग्निशमन दल  सेवा सप्ताहात नागरिकांना विविध प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण दिलं जातं. त्यासाठी सोसायटय़ांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधून प्रशिक्षणाची लेखी मागणी करणे आवश्यक असते. याशिवाय प्रत्येक सोसायटीत मॉक ड्रिल्स आयोजित केली जातात. त्याद्वारे खरी आपत्ती ओढवल्यास कसा प्रतिसाद द्यायचा, सुरक्षित जागा कोणत्या, तिथवर कसं पोहोचायचं हे सर्व सांगितलं जातं. सोसायटीच्या रहिवाशांमधूनच फायर व्हॉलेंटियर्सची निवड करून आग प्रतिबंधक यंत्रणांचा सुयोग्य वापर कसा करायचा याचे रीतसर प्रशिक्षण दिले जाते.

Story img Loader