अनंत सामंत, लेखक
‘‘जगातील त्या सर्वात सुंदर बगिच्यातली फुलं सुंदर, सुगंधी, नाजूक आणि ईश्वरी होती. त्या फुलांनी मला अगदी तरुणपणीच ईश्वरी विश्वाच्या कॅनव्हासवरचं रक्तामांसाने बरबटलेलं आसुरी जग स्पष्टपणे दाखवलं. माझं नसलेलं जे जन्मापासून कवटाळून बसलो होतो, ते भिरकावून द्यायला शिकलो आणि जे जन्मत: माझंच असूनही सापडलं नव्हतं, ते कवेत घ्यायला शिकलो. ती इंडोनेशियातल्या बालिकपापानमधली ‘व्हॅली ऑफ होप’!’’
मध्ये सपाट आणि चारही बाजूंनी उंचावणाऱ्या कडा असणारं पूजेचं ताम्हण असतं किंवा सुप्त ज्वालामुखीचं तोंड असतं तशी ‘व्हॅली ऑफ होप’ होती. तळातली जमीन आणि चारही दिशांना उंचावणारे डोंगर, सारे गर्द हिरवे. विषुववृत्तीय रेनफॉरेस्ट पांघरलेले. झाडांच्या फांद्यांवर हुंदडणारी मर्कटसेना. आभाळभर भिरभिरणारी पाखरं. त्यात पांढऱ्याशुभ्र झोपडय़ा-श्ॉक्स. देखण्या. रांगेत नेटक्या मांडलेल्या. त्यांच्याभोवती राखलेल्या बागा. नागमोडी पाऊलवाटा. हे सारं प्रत्यक्षात अजून असंच आहे का, मला माहीत नाही. तो १९७३ चा सुमार होता. बोर्निओ-बालिकपापानमधला!
‘‘हिला ‘व्हॅली ऑफ होप’ का म्हणतात?’’ ओळख झाल्यावर मी बेतोला विचारलं. तेव्हा सोन्याच्या तारा एकमेकांत पिळून आकारलेल्या मानवी आकृतीप्रमाणे भासणाऱ्या बेतोने पांढरीशुभ्र वेणी मानेच्या झटक्याने पाठी उडवत उत्तर दिलं होतं, ‘‘कारण इथे येणाऱ्या प्रत्येक पुरुषातला दैत्य जरी फणा काढत असला, तरी इथून जाताना तृप्त झालेल्या एखाद्या दैत्यातला देव जागा होईल अशी आशा माझ्या मुलींना असते.’’ बेतो ‘व्हॅली ऑफ होप’ची स्वयंघोषित सम्राज्ञी होती. दैत्य आणि देव दोघेही माझ्यात वसत नाहीत, हे लक्षात आल्यावर मला न विचारता दत्तक घेतलेला मी तिचा एकुलता मानसपुत्र होतो. जग भटकणं या एकमेव उद्देशाने मी जहाजावर चीफ स्टुअर्डची नोकरी पत्करली, तेव्हा ‘पर्यटन’ आणि ‘पर्यटक’ हे मराठी माणसासाठी फार महाग शब्द होते. टुरिझम- टुरिस्ट या संकल्पनांपासून मी कोसो दूर होतो. कायम राहिलो. कारण ‘पर्यटक’ होण्याएवढा निबर, बेरड, असंवेदनशील मी कधीच नव्हतो. बेतोच्याच शिकवणीत पुढे कधी तरी आलं, की हे विश्व ईश्वराने घडवलं.
आपल्या विश्वातलं जे सुंदर, सत्य, चिरंतन, पवित्र, निरागस ते घडवणारा ईश्वर. सुंदर ते विद्रूप करणारा, सत्याला असत्याचा मुलामा फासणारा, चिरंतनाच्या मातीतून क्षणभंगुर विभ्रम उभारणारा, पावित्र्यास अपवित्र करणारा तो असुर. ईश्वरास मानतो, परंतु असुराच्या मर्जीनुसार जगतो तो ‘सामान्यजन’. ईश्वराने निर्मिलेलं निसर्गरम्य विश्व जेवढं सहज स्वीकारतो, तेवढंच सहज जो निसर्ग उद्ध्वस्त करत उगवलेलं दगडामातीचं- काँक्रीटचं जंगल स्वीकारतो, जेवढय़ा सहजतेने देवतांच्या देवालयात रमतो, तेवढय़ाच सहजतेने जो ग्लास हाऊसमधल्या रमणीत रमतो, सत्य आणि असत्य, करुणा आणि क्रौर्य एकाच कॅमेऱ्याने तेवढय़ाच उत्साहाने टिपतो, सारे फोटो एकाच अल्बममध्ये डकवतो आणि मिरवतो तो पर्यटक! देशाच्या सीमा मी पहिल्यांदा ओलांडल्या इंडोनेशियात जायला. ज्या पहिल्या जहाजावर चढलो ते ‘परतामिना’ या ऑइल आणि शिपिंग साम्राज्याचं होतं. सगळे खलाशी इंडोनेशी,ऑफिसर्स भारतीय आणि चिनी होते.
आम्ही इंडोनेशियाच्या एका बंदरात तेल भरायचो आणि त्यांच्याच शेजारच्या बंदरात रिकामं करायचो. अनेकदा जे रिकामं केलं तेच भरायचो, भरलं तेच रिकामं करायचो. सगळाच आनंद होता. आधी डचांनी लुटल्यानंतर, दुसऱ्या महायुद्धात जपान्यांनी ठेचल्यानंतर जेव्हा स्वकीयांनी स्वकीयांना लुटायला सुरुवात केली तेव्हाचा हा भ्रष्ट कालखंड होता. बंदरं जवळजवळ असायची. कधी आठवडय़ाभराच्या मुक्कामानंतर चार-पाच तासांचं सेलिंग करून परत आठवडय़ाकरिता पुढल्या बंदरात थांबायचो. महिनोन् महिने शेजारपाजारच्या गावातच असायचो, वावरायचो, भटकायचो. आम्ही जवळजवळ इंडोनेशीच झालो होतो. कंपनी नवी होती. जहाज नवं होतं. शिजवणं, खाणं, पिणं, याव्यतिरिक्त करायला कुणालाच फार काही नव्हतं. माझं पहिलंच जहाज, पहिलीच नोकरी. कसलाच अनुभव नव्हता. किनाऱ्यावर प्रचंड स्वस्ताई होती. जहाजावर निदान तीन महिन्यांचा अन्नसाठा एका वेळी घेऊन ठेवण्याचा प्रघात होता; पण कॅप्टन खवय्या होता. रोज स्वत: चीफ स्टुअर्डने बाजारात जाऊन ताज्या भाज्या, मासे आणण्याचं फर्मान त्याने काढलं.
मीही आनंदानं तयार झालो. आपल्या गावाकडच्या बाजारासारखाच बाजार असायचा. तशाच भाजीवाल्या आणि भाज्या, तसाच माती आणि चिखलाचा खरबाट. तशीच घासाघीस. तसेच हास्यविनोद. फक्त साडय़ांऐवजी सारुंग आणि अनोळखी भाषा. भाषा इंडोनेशियन. चायनीज चीफ ऑफिसर म्हणाला, भाषा शिकण्याचा ‘फास्तेस्त वे’ म्हणजे खूप मुलींच्या घोळक्यात राहायचं. त्याने बोसनला माझी सोय लावायला फर्मावलं. त्याच रात्री हसत-खिदळत अर्धा डझन इंडोनेशियन खलाशी मला ‘तिथे’ घेऊन गेले. बालिकपापानची ‘व्हॅली ऑफ होप’ सापडण्याआधी मला इंडोनेशियातल्या लहान लहान गावांतल्या टेकडय़ा, डोंगर, रेनफॉरेस्टने दडवलेले डोह दिसले. तिथे आशेने भरलेले डोळे दिसले. जहाजावरच्या कॅडेटपेक्षाही मी वयाने लहान होतो. तरी सगळय़ांपेक्षा उंच आणि रुंद होतो. हनुवटीवर दाढी होती. इंडोनेशियन खलाशांचा ‘ऑफिसर’ होतो.
अमेरिकी डॉलर्स कमवत होतो. मी राजांचा राजा होतो. चीफ ऑफिसरच्या ऑर्डरवरून खलाशी मला मोठय़ा अभिमानाने मिरवत पहिल्यांदा घेऊन गेले ती बंदराजवळच्या गावापलीकडली टेकडी होती. जिथे बंदर आणि प्रतिष्ठितांची वस्ती संपते, तिथे इंडोनेशियात मातीचे रस्ते, चिखल, डबकी, डास आणि अंधाराचं साम्राज्य सुरू व्हायचं. माझ्या निम्म्या आकाराचा इंडोनेशियन धापा टाकत सायकलरिक्षाचं पेडल मारत माझ्या पावलांना चिखल स्पर्शू न देता आम्हाला टेकडीवर घेऊन आला. इथे दारांना लटकलेल्या कंदिलाभोवती दाटलेल्या अंधारात कुडाच्या, बांबूच्या झोपडय़ा दार उघडं ठेवून उभ्या होत्या. एका जरा मोठय़ा टपरीत डझनभर मुली त्यांच्या परीने नटून-सजून जमल्या होत्या. चार रिक्षांनी टेकडय़ा चढायला सुरुवात केलीय ते त्यांनी हेरलं होतं. धक्क्याला फक्त आमचंच जहाज लागलं होतं. त्यांची आजची भूक भागणार की नाही हे आमच्या मर्जीवर अवलंबून होतं. अंधारात बुडालेल्या टेकडीवर समुद्रवाऱ्यासोबत रॉकेलचा वास पसरवत कंदील-दिवटय़ा मिणमिणत होत्या. दरवर्षी न चुकता गावी परतणाऱ्या पाहुण्यांभोवती कल्ला करणाऱ्या मुलांप्रमाणे त्या डझनभर मुलींनी गोडसा गोंगाट केला. जन्मोजन्मीची ओळख असल्याप्रमाणे त्या खलाशांना बिलगल्या.
खलाशी आणि मुलींत खूपसा हास्यसंवाद घडल्यानंतर त्या साऱ्या माझ्याकडे अप्रूपाने बघू लागल्या. मला स्पर्शण्याची, माझ्याशी संवाद साधण्याची चढाओढ त्यांच्यात सुरू झाली. सोबतच्या खलाशांना मी समजावल्यानंतर खट्टू झालेल्या मुली काहीशा दूर झाल्या. एकएक खलाशी एकेका मुलीसोबत दिसेनासा झाला. टपरीत डुगडुगणारी लाकडी जुनाट टेबलं आणि बाकडे होते. वाऱ्यावर हलणारे कंदील होते. मी एक जागा निवडून बसलो. हळूहळू कुजबुजत मुली माझ्या भोवताली बसल्या. मी माझ्यासाठी एक बिन्तान्ग मागवली. मुलींना हवं ते मागवायची परवानगी दिली. कोणी बिन्तान्ग घेतली, कोणी ‘चा’ घेतला. एकीने कोरडा भात घेतला. दोन-तीन दिवस तिला कुणीच भेटलं नव्हतं. मोडक्या-तोडक्या इंग्रजीत आमचं संभाषण सुरू झालं. माझं नाव, माझं गाव, मग त्यांची नावं, त्यांची गावं. मग घरी कोण कोण असतं. संवाद सोपा करण्यासाठी मी म्हणालो, ‘‘मला कोणी नाही. मी जगात एकटा आहे.’’ ‘एकटा!’ पापण्यांचे पंख फडफडवत त्या चीत्कारल्या. एकमेकांत खूप काही किलबिलल्या. कोणी माझ्या केसांतून बोटं फिरवली. कोणी गालगुच्चा घेतला. कोणी हात, कोणी पाठ थोपटली. सारे डोळे व्याकूळले. त्या साऱ्यांना आपापल्या ‘फॅमिली’ होत्या. फॅमिली त्यांना भेटायला इथे यायची. किंवा त्या फॅमिलीकडे जायच्या. मी अनाथ होतो. त्यांच्यापेक्षा कमनशिबी होतो. मग पहाटेपर्यंत आम्ही गप्पा मारल्या. खलाशी, मुली येत-जात राहिले; पण आमचं कोंडाळं घट्ट राहिलं. पहाटेच्या प्रकाशात त्यांचा मेकअप बटबटीत भासायला लागला; पण मेकअपमागले खरे चेहरे आधीच स्पष्ट दिसायला लागले होते. दुसऱ्या रात्री त्यांनी खास माझ्यासाठी ‘बिंहू गोरँग’ (तांदळाच्या शेवयांचा तिखट पदार्थ) शिजवला. काही मुली मेकअप न करता साध्या कपडय़ात वाट बघत होत्या. बंदरात असेपर्यंत रोज रात्री मी टेकडीवर जात होतो. बेचावाला, गार्ड, गावकरी, मुली मला ‘विक्षिप्त मुलगा’ म्हणून ओळखायला लागले होते. मुली आपणहून स्वत:बद्दल सांगत होत्या. काही उत्साहाने मला ‘भाषा इंडोनेशिया’ शिकवत होत्या. सभ्य माणसं चारचौघांत उच्चारायला घाबरतात असे शब्द त्या हसत कल्लोळात शिकवत होत्याच; पण भावुक स्वरात आई-मुलाचे, पती-पत्नीचे संवादही म्हणून दाखवत होत्या. तिथे मी शिव्यांसोबत दुवा देणारे, फसव्या स्मितासोबत खाऱ्या आसवांची गोडी सांगणारे शब्दही शिकलो.
माझं नसलेलं जे जन्मापासून कवटाळून बसलो होतो, ते भिरकावून द्यायला शिकलो. जे जन्मत: माझंच असूनही सापडलं नव्हतं, ते कवेत घ्यायला शिकलो. त्यांच्या वेडेपणात मी शहाणपणात भिजून निथळलो.. हेही बेतोनेच लक्षात आणून दिलं होतं नंतर! जाईन त्या बंदराबाहेर अशा टेकडय़ा, वस्त्या, गल्लीबोळं धुंडाळण्याचं, त्यांना आपलसं करण्याचं, वाचण्याचं माझं वेड नंतर कित्येक वर्ष वाढत गेलं. तिथे फक्त भाषा नाही, माणसांची संस्कृती आणि इतिहाससुद्धा कळतो. इंडोनेशिया-फिलिपिन्स-थायलंड असू दे अथवा जर्मनी-इटली-फ्रान्स. ईश्वरी विश्वाच्या कॅनव्हासवरचं रक्तामांसाने बरबटलेलं आसुरी जग तिथे स्पष्ट दिसू लागतं. ईश्वरी-आसुरी जगाची सुरू असणारी शतकानुशतकांची सरमिसळ आता या वस्त्यांतच स्पष्ट बघता येते. ईश्वरी अस्तित्व नाकारणाऱ्या प्रत्येक आसुरी सत्तेपोटी या वस्त्या जन्म घेत राहिल्या. प्रत्येक आसुरी सत्ताधुंद संघर्षांत या वस्त्या फोफावत गेल्या. दुसऱ्या जागतिक महायुद्धाने तर ईश्वरी आणि आसुरी ही सीमारेषाच पुसली. या महायुद्धात अंदाजे दहा ते तीस कोटी सैनिक एकमेकांविरुद्ध लढले. सात ते नऊ कोटी माणसं या युद्धात मारली गेली. मरणाऱ्यांत निरपराध नागरिकांची संख्या सैनिकांच्या दुप्पट होती. दोन ते तीन कोटी माणसं उपासमारीने मारली. जगभरातील निदान नऊ कोटी कुटुंबांतला कर्ता तरुण मारला गेला. युद्ध म्हणजे लढणारा वीर आणि त्याच्यासाठी स्वेटर विणणारी स्त्री, हे चित्र उद्ध्वस्त झालं. युद्ध म्हणजे तडफडत मरणारा पुरुष आणि कुटुंबासाठी तडफडत जगणाऱ्या स्त्रिया ही आसुरी प्रतिमा बिनशर्त स्वीकारली गेली. आभाळ-पाणी-मातीत मिसळलेल्या मृत्यूसोबत ऐषारामात जगणाऱ्या आजच्या आसुरी जगाचा पाया त्या युद्धात मेलेल्यांच्या हाडामांसाचा आहे. त्या खत-मातीतून ‘व्हॅलीज् ऑफ होप’ आजसुद्धा जागोजागी फोफावतायत. जगाच्या पर्यटनाचं- पर्यटकांचं प्रमुख आकर्षण ठरतायत.
बेतोच्या म्हणण्याप्रमाणे बालिकपापानमधली ‘व्हॅली ऑफ होप’ जगातील सर्वात सुंदर बगिचा होती. इथल्या फुलांसारखी सुंदर, सुगंधी, नाजूक, ईश्वरी फुलं जगातल्या कुठल्याही दुसऱ्या बागेत फुलली नव्हती. इथल्या मुली त्यांच्या मुलांच्या, पित्यांच्या, पतीच्या, कुटुंबाच्या सुरक्षित भवितव्यासाठी इथे आल्या होत्या. ते झालं की त्या इथून जाणार होत्या; पण इथेही त्या ईश्वरी आणि आसुरी शक्तींच्या युद्धात जखमी होणाऱ्या सैनिकांना सावरणाऱ्या परिचारिका होत्या. आजच्या फ्लोरेन्स नाईटिंगेल होत्या. पहाटेच्या आभाळातून अंधारलेली रात्र आणि उजाडणारा दिवस वेगवेगळा निवडणं अशक्य असतं; पण आशेच्या डोहात जगणाऱ्या या मुली समुद्रावरच्या क्षितिजरेषेप्रमाणे होत्या. ईश्वरी संकल्पना आणि आसुरी वासना त्यांच्या सान्निध्यात शरीर आणि वस्त्राप्रमाणे एकमेकांपासून दूर करता येतात. पक्ष्याला गाऊ द्यावं का त्याचा गळा चिरून खावं, पाण्याला वाहू द्यावं का गढूळ करावं की अडवावं, फुलाला फुलू द्यावं का खुडून माळावं, हे त्यांच्या सहवासात सहज ठरवता येतं. ईश्वर आजही बरसत असतो; पण तो रक्तामांसाने भरलेल्या आसुरी प्याल्यात झेलता येत नाही. त्यासाठी रिकामी ओंजळ उघडावी लागते. हे सारं सांगता सांगता ‘व्हॅली ऑफ होप’ची स्वयंघोषित वृद्ध सम्राज्ञी पॅगोडातल्या मूर्तीप्रमाणे प्रसन्न हसत म्हणाली होती, ‘‘जे तुझं नव्हतंच कधी ते आसुरी भिरकावून दे. जे अजून सापडलं नव्हतं, पण सदैव तुझंच होतं, ते ईश्वरी सारं कवेत घे. तुझ्या या वेडेपणात इतरांनाही सामावून घे. नवी जमीन, नवं आभाळ असंच निर्माण होतं.’’ ती ‘व्हॅली ऑफ होप’ होती. वर्ष १९७३ होतं. आसुरी जग जगवणारं ‘सेक्स टुरिझम’ तेव्हा जन्मालाही आलं नव्हतं. मराठीत पर्यटन आणि पर्यटक हे शब्द खूप महाग होते.