बालाजी सुतार
‘‘पर्यटन म्हणजे माझ्यासाठी माझ्या गावची, अंबाजोगाईची शिवारफेरी. प्रत्येक ऋतूनुसार बदलणारा आसमंत, खळाळत जाणारी नदी, पलीकडच्या डोंगराच्या माथ्यावरून खाली पाझरत असलेले झरे, अधूनमधून खडक आणि चौफेर पसरलेलं टवटवीत, हिरव्याकंच रंगाचं मखमली गवत. मधूनच फुललेली नखाएवढय़ाच आकाराची हजार प्रकारच्या रंगछटा मिरवणारी शेकडो इवलाली रानफुलं. बरोबरीनं सकलेश्वर शिवमंदिर, बाराखांबी प्राचीन वास्तू, आईचा माळ, गावच्या इवल्याशा जत्रेतली घटकाभर करमणूक, नदीत खडकावर धुणं आपटण्याच्या आवाजानं त्या वाटेवर दुपारभर आसुडासारखे उठणारे फटके.. अशी किती तरी दृश्यं मनाच्या पाटीवर उमटत राहतात. आता वयानं कितीही वाढलेलो असलो, तरी अजूनही या वाटेवरून ‘पर्यटना’ला जातो.. तिथल्याच एका अश्मयुगीन शिळेवर बसून भोवतालातलं कातिल शहर नजरअंदाज करण्याचा प्रयत्न करत राहतो..’’
‘पर्यटन’ ही पैसा खर्चूनच करावी लागणारी गोष्ट आहे, हे गृहीतक काही तितकंसं खरं नाही. म्हणजे तुम्हाला अगदी सिमला किंवा केरळ किंवा स्वित्र्झलड वगैरे प्रांतात फिरायचं असेल, तर अर्थात पैसे लागणारच. अशा खर्चीक फिरण्यालाच पर्यटन असं म्हणतात, हे बऱ्यापैकी रूढ असलं, तरी याशिवायही पर्यटन असूच शकतं. पर्यटन म्हणजे आनंदासाठी फिरणं, हे जरा जास्त खरं आहे. असं फिरायला जावंसं वाटतं, तेव्हा मला फार काही करावं लागत नाही. मी सरळ उठतो आणि चालायला लागतो!
मला पर्यटनाचा आनंद देणारी स्थळं सहसा माझ्या जवळच सापडत गेली आहेत. म्हणजे मी अनेकदा वेरूळ, अजिंठा किंवा कोकणात किंवा गोव्यात फिरायला गेलेलो आहेच, पण तसं मुद्दाम ठरवून कुठल्या कुठे हिंडायला जाण्यात मला मजा वाटत नाही. मी पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रात खोलवर पोहत गेलेलो आहे, पण कुठल्याही समुद्रापेक्षा आमच्या गावाच्या कुशीतून वाहत गेलेला अतोनात बारीकसा ओढा मला अधिक मोहात घेरत आलेला आहे. मी नामांकित, गर्ददाट जंगलांत, अभयारण्यांतही फिरून आलो आहे. ते सगळं खूप भारी, खूप आवडण्यासारखंच असलं, तरी माझ्या परिसरातली माळरानं मला अधिक ओढ लावत राहतात. सहसा असं असतं, की सहलीखातर जगभर फिरून आलेल्या बहुसंख्य माणसांनी नेमकं आपलं स्वत:चं गाव, शहरच अनेकदा नीट न्याहाळलेलं नसतं. प्रत्येक गावाच्या आसमंतात किती तरी गोष्टी आपण आवर्जून जाऊन बघाव्यात, तिथे रमावं अशा असतातच. असं पर्यटन मला मनापासून आवडतं.
हे असं पर्यटन करायला जायच्या माझ्या काही ठरलेल्या जागा आहेत, जिथे पुन:पुन्हा जायला मला आवडतं. उदाहरणार्थ, माझ्या गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अंबाजोगाईच्या भोवतालच्या काही टेकडय़ा, तिथले डोंगर, डोंगरांचे उंचच उंच कडे आणि पावसाळय़ात त्यातून मधूनच खळाळत जाणारे किती तरी ओहळ. तिकडे टेकडय़ांवर अतोनात बहरलेली कसकसली गवतं आणि झुडपं आणि त्यावर फुललेली नखाएवढय़ाच आकाराची, हजार प्रकारच्या रंगछटा मिरवणारी शेकडो इवलाली रानफुलं. आपल्या सबंध आसमंताचे ऋतूंनुसार बदलणारे रंग निरखणं, हे एक कमाल ‘पर्यटन’ असतं असं मला वाटतं नेहमी. विशेषत: पावसाळय़ात आणि हिवाळय़ात हा परिसर विलक्षण देखणा दिसतो आणि उन्हाळय़ातही उन्हाळय़ाच्या स्वतंत्र अशा छटा असतातच. रोज अगदी पहाटेपासून तिथे दरीत, भोवतालातल्या रानांतून केकारव चालू होतो. मराठीचे आद्यकवी मुकुंदराज यांच्या समाधीच्या परिसरात सकाळी गेलो तर दरीच्या एका कडय़ावरून दुसऱ्या कडय़ावर उड्डाण करणारे मोर दृष्टीस पडतात. त्यांची ती अतोनात देखणी ‘फ्लाइट’ आपल्या नजरेला पडते, तेव्हा अक्षरश: मोहरून जायला होतं, इतकं ते अप्रतिम सुंदर दृश्य असतं. मुकुंदराजांची ही समाधी एका डोंगराच्या खोल कडय़ावरून उतरत उतरत खाली गेल्यावर कडय़ाच्या मध्यावर आहे. त्याही खाली पलीकडच्या डोंगरामुळे अरुंद होत गेलेली दरी आहे आणि तिच्यातून अंबाजोगाईची नदी वाहत जाते. पावसाळय़ात त्या समाधी परिसरातल्या कडय़ावरून डोकावून पाहताना ती खळाळत जाणारी नदी दिसते आणि पलीकडच्या डोंगराच्या माथ्यावरून खाली पाझरत असलेले झरे दिसतात. अधूनमधून खडक आणि चौफेर पसरलेलं टवटवीत, हिरव्याकंच रंगाचं मखमली गवत! पलीकडच्या डोंगरावरच्या जंगलसदृश झाडवनातून उठणारे पाखरांचे स्वर ऐकत इथल्या घसरणीवर मी दिवसभर बसू शकेन; बसलो आहे अनेकदा.
अंबाजोगाई हे तालुक्याचं ठाणं असलं, तरी अजूनही ते एक मध्यम आकाराचं शहरवजा खेडंच आहे. गावाच्या दोनेक बाजूंनी निव्वळ डोंगर आहेत, दऱ्या आहेत आणि फार जुनी जुनी, प्राचीन अशी देवळं आहेत. देवळांतल्या देवांमध्ये मला रस नसतो अर्थात; पण तिथलं प्राचीन स्थापत्य मला हाकारत राहतं सतत. गावाबाहेर डोंगर-टेकडय़ांच्या परिसरात बाराखांबी ही प्राचीन वास्तू आहे. तिथलं स्थापत्य हे केवळ अद्भुत सदरात मोडणारं आहे माझ्यासाठी. मुळातलं हे सकलेश्वर शिवमंदिर आहे, पण ते मंदिर आहे हे त्या वास्तूच्या आत गेल्यावर लक्षात येतं. अगदी प्रथमदर्शनी तिथे दिसतं ते वास्तुशिल्प इतकं अफाट देखणं आहे, की मी पहिल्यांदा ते पाहिलं, तेव्हापासून ते माझं अतिशय जिवलग पर्यटनस्थळ होऊन बसलं. अतिशय गावाबाहेर रानं, माळं, टेकाडं पार करून गेल्यावर आणखी एका बारीकशा टेकाडाच्या पायथ्याला लागून बाराखांबी आहे. बाहेरून कुठूनही पाहिलं तरी एका दृष्टिक्षेपात त्या गर्भागाराचे बरोबर बाराच खांब दिसतात, म्हणून त्याला बाराखांबी म्हणतात, अशी आख्यायिका आहे. मी कधी ते मोजायच्या फंदात पडलेलो नाही. आठशे-नऊशे वर्षांनंतर आता हे देखणं शिल्पस्थळ बरंचसं उध्वस्तलेलं असलं, तरी मूळ रचना लक्षात येईल इतकं ते स्ट्रक्चर अजून बुलंद आहेच. मला कधीकधी वाटतं, की तिथल्या गर्भागाराच्या समोरच्या उघडय़ा सभामंडपात रात्रीचं येऊन यक्ष वगैरे लोक नर्तन करत असतील! कधी तरी सगळे कृत्रिम उजेड बंद झाल्यावर सबंध चांदण्यांनी माखलेल्या एखाद्या रात्री तिकडे जाऊन तिथल्या अवाढव्य कातळांवर निश्चल पहुडून राहावं असा मला मोह होतो कितीएक वेळा! उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तिन्ही ऋतूंमध्ये बाराखांबी निरखावी. दिवसभरात अवचित येणारे कुणी कुणी दहा-पाच लोक वगळले तर बाराखांबीच्या आसपासच्या रानांत सामान्यपणे एखाद्दुसरा गुराखी दिसतो, पाच-दहा गाई-म्हशी चारत असलेला किंवा शेळय़ा-कोकरांचा जथा हाकत चाललेला एखादा शेरडंराख्या.
एरवी बऱ्यापैकी निर्मनुष्य म्हणता येईल असाच तो परिसर आहे. तिथल्या पाषाणी चौथऱ्यावर एखाद्या पाषाणी खांबाला पाठ देऊन बसून राहिल्यावर त्या स्थानाचं जिवंतपण लक्षात येऊ लागतं. बाराव्या वगैरे शतकातल्या कसबी कलावंतांनी उभारलेलं हे स्थळ तेव्हा कसंकसं असेल, याची कल्पना करताना काही काही खूप भारी चित्रं मनाच्या पाटीवर उमटत राहतात. पर्यटन करावं अशा खूप जागा आहेत आणखी माझ्या आसमंतामध्ये. उदाहरणार्थ आमच्या गावचा ‘आईचा माळ’ हा भूप्रदेश. गावातून बाहेर पडल्यावर अनेक बारीक बारीक पायवाटा इकडेतिकडे शिवारभर सरसरत जातात. त्यातली एक अगदी वळणावळणांची पायवाट इकडे माळाच्या दिशेनं जाते. ती अनेक शेतांना वळसे घालून मधूनच वर-खाली चढत- उतरत मैलभर दूर जाते, तेव्हा एकाएकी एक विस्तीर्ण माळ समोर येतो. त्या माळावर ‘माळावरची आई’ नामक गावदेवीचं लैच बारकं देऊळ आहे. आता जीर्णोद्धाराच्या नावाखाली लोकांनी ते सिमेंटमध्ये बांधून काढलं; पण दोन-पाच वर्षांआधीपर्यंत तेही प्राचीन, जुनाट, दगडी होतं. शेतातून, रानातून कधी ढेकळं तुडवत, कधी भर पिकातून वाट काढत, एक बारकासा वाहता ओढा पार करून नवरात्रात दहा दिवस गावातली किती तरी माणसं देवीच्या दर्शनाला रोज पहाटे जाऊन उजडायला माघारा येतात. पहाटे थंडीत उठून लवकर माळावरच्या आईला जाऊन पहिल्यांदा मूर्तीवर पाणी कोण घालतं, याची पोरांमध्ये चढाओढ असते. या वाटेवर बऱ्याचदा पोरं शाळेतल्या भांडणाचं उट्टं काढतात. वाटेवरची झाडी, वळणं यांच्या आश्रयानं पोरांची झोंबी झडते. मातीनं पांढरे झालेले हातपाय, गुंडय़ा तुटलेला सदरा, पाण्यासाठी घेतलेला रिकामा तांब्या सांभाळत पोरं माळावर जातात. तिथं पुन्हा एक अगदीच बारकं, म्हणजे जरासं लांबून हात पुढे केला, तर दोन बोटांच्या चिमटीत धरता येईल एवढुसं तळं आहे. तिथे हातपाय धुवून, तांब्याभर पाणी घेऊन देवळात जाऊन, ‘आई’च्या डोक्यावर ओतून, अत्यंत भक्तिभावानं साष्टांग दंडवत घालून होईस्तवर सकाळची कोवळी उन्हं ‘बालभारती’च्या पुस्तकातल्या ‘पिवळे पिवळे ऊन कोवळे पसरे चौफेर..’ या कवितेतल्यासारखी माळावर ‘यत्र तत्र सर्वत्र’ मनमुराद पसरलेली असतात. असं हे दसऱ्यापर्यंत सगळे दहा दिवस रोज चालतं.
त्यानंतर कोजागिरीच्या दिवशी माळावर एक वावभर लांबीची बारकी जत्रा भरते. नारळ, देवीवर वाहायची पानं-फुलं, शेव-भज्यांची, भेंड-बत्तासे, गोडीशेव-रेवडय़ांची, फण्या-कुंकवा-रिबिनांची, शिनिमाच्या फिल्मा, बारकीसारकी मोटारी, फुगे, शिट्टय़ांची पालं ठोकलेली दुकानं, त्याच गर्दीत ‘आकडे’ लावायच्या चक्य्रा, तीन पत्तीवाले आणि चारच पाळणे असलेला हातांनी फिरवून गती द्यायचा रहाटपाळणा. आसपासच्या दोन-पाच गावांतले लोक या जत्रेला येतात. दिवसभर जत्रा गजबजून जाते. खरं तर आता जत्रेएवढा बाजार दर गावात दर आठवडय़ाला भरत असेल, पण जत्रेला यायचा मोह माणसांना सुटत नाही. देवीचं दर्शन हा भाग असतोच, पण बालपणीपासून मनात रुजून तरारलेलं जत्रेचं आकर्षण माणसांना तिकडे खेचून घेऊन येतं. सकाळी ९-१० ला ठोकलेली दुकानांची पालं सांजेला ५-६ ला उठतात. पायदळ मंडळी बिगीबिगी पायांनी, बैलगाडय़ांवाली बैलांच्या शेपटय़ा मुरगळीत खडा-खडा आणि सायकलीवाली रेमटून पायडलं हाणीत पंचक्रोशीतल्या चार-पाच गावच्या वाटांनी घर गाठायला निघतात. दुकानदार मंडळी आपापला पसारा बैलगाडीत किंवा टेम्पो-टमटमीत भरतात आणि खिशातलं दिवसभर जमलेल्या गल्ल्यातल्या नोटांचं बंडल सांभाळत आपापल्या गावी कूच करतात. जत्रा पांगते. गावातून माळाकडे गेलेली वाट दमली पावलं टाकत सांजसमयी पुन्हा मागची सगळी वळणंवाकणं पार करत गावात पहिल्या जागी येते. जत्रेचं सोडा, एरवीसुद्धा ही जागा मला अतोनात आवडते. अनेकदा लहर लागेल तेव्हा मी उठतो आणि पायात चपला सरकवून गावाबाहेर पडून चालायला लागतो. दुतर्फा दाट झाडी असलेल्या पाणंदीतून संथपणे चालत, ओढा पार करून शेतांच्या कडेकडेनं उन्हाच्या झळा झेलत किंवा सुगीसराईच्या आधीचे, पिकं फुलोऱ्यावर किंवा पोटऱ्यात येण्याचे (धान्याचं कणीस भरण्याआधीची अवस्था) दिवस असतील तर नाना प्रकारच्या पिकांचे धुंद करणारे गंध श्वासात रुजवून घेत घेत माळाच्या दिशेनं जात राहतो. तिथल्या झाडाच्या खाली बुंध्याला पाठ देऊन बसून राहतो.
सुन्न शुकशुकाट असतो. विशेषत: दुपारी फारच सुन्न. भोवतीनं पुन्हा अस्ताव्यस्त टेकडय़ा, काही शेतं. टळटळीत उन्हं आणि काही झाडं, काही पाखरं, काही खारोटय़ा आणि मधून पलीकडच्या खेडय़ाच्या दिशेनं गेलेला, माणूसकानूस दिसत नसलेला सुस्त रस्ता. शेजारी गावदेवीचं ते बारकं देऊळ. दूर टेकाडावर अधूनमधून चरणाऱ्या काळय़ाशार पाठींच्या म्हशी आणि तसल्याच रंगाचा गुराखी. चालत चालत तिथवर जायचं आणि झाडाशी विसावायचं, श्वास टाकायचा, घाम पुसायचा. क्वचित कुणी पायदळ मनुष्य रस्त्यानं चाललेला दिसतो, त्याच्या रामरामला रामरामनं उत्तर द्यायचं. खारुताईची सरसर पाहत, पाखरांच्या शिळा ऐकत हवं तितका वेळ बसून राहायचं. लहर लागली तर फोनवर विविधभारती लावायची आणि लता-रफी-आशा-किशोरचे तराणे किंवा ‘सखी सहेली’च्या स्त्री-संवादकांच्या अतोनात वेल्हाळ गप्पा ऐकत डोळे मिटून पडून राहायचं. खूप वेळानं कधी तरी आळसटून उठायचं आणि निवांत पावलांनी गाव जवळ करायचं.
गावातून मध्यातून बाहेरच्या दिशेनं आणखी एक वाट जाते. ती मोठी वाट आहे. ती गावाच्या दुसऱ्या वेशीतून बाहेर जाते आणि बाहेर गेल्यावर एकदम अंग आखडून घेऊन सडपातळ होत गावाला बिलगून वाहणाऱ्या निव्वळ बारक्या ओढय़ाच्या काठाशी लगट करत ओढय़ाच्याच काठावर असलेल्या एका बारीकशा महादेवाच्या देवळाकडे जाते. नदीकाठाशी लगटून असलेल्या एका अतोनात मोठ्ठय़ा वडाच्या झाडाच्या सावलीत, तिथल्या चहूबाजूंनी पसरून भुईत रुतलेल्या मुळांच्या अवाढव्य पसाऱ्यातल्या एखाद्या मुळीवर मुंडासं टिकवून आणि त्यावर डोकं टेकून काही म्हातारे त्यांच्या काळातल्या गप्पा हाकत बसलेले असत. जत्रेतल्या कुस्त्यांचे, तमाशांचे फड किंवा गावात पहिल्यांदा लाइट आली तेव्हा कसं वाटत होतं.. किंवा आडतीवरून पट्टी घेऊन येताना तालुक्याच्या गावातल्या ऐन स्टँडवर आपला सगळाच पट्टीचा खिसा कसा कापला गेला होता.. किंवा फलाण्या कीर्तनकारानं बिस्ताण्या साली सप्त्यातल्या कीर्तनात कसली धमाल केली होती.. किंवा मग एखाद्या समवयस्काला त्याची पोरं सांभाळत नाहीत, आता या कलयुगात असंच होत राहणार.. आणि जगबुडी काही लांब नाही आता.. वगैरे ऐकत ऐकत तिथून वाहणारा ओढा देवळाच्या पायथ्याशी जरासा खोल होऊन तिथे एक डोहात उतरायचा. लहानपणी त्याच डोहात मी पोहायला शिकलो. ही वाट चालत तिकडे जातानाच डोहातल्या पाण्यात उतरण्याच्या कल्पनेचा गारवा आधीच मनात दाटवून अंगावर शहारे उमटवत तिकडे घेऊन जायची. पोहून येताना ही वाट पोरांच्या आबदार कोवळय़ा पायांना भारी टोचत असे, पण त्या टोचण्यामुळे या वाटेवर जडलेला जीव कधीच हळहळला नाही. या वाटेवर धुणं धुवायला जाणाऱ्या बायांचा आणि काही धोबी काम करणाऱ्यांचा कायम राबता असे. खडकावर धुणं आपटण्याच्या आवाजानं या वाटेवर दुपारभर आसूडासारखे फटके उठत असत. आता वयानं कितीही वाढलेलो असलो, तरी अजूनही या वाटेवरून ‘पर्यटना’ला जावं वाटतंच कायम; आद्यकवी मुकुंदराज यांच्या समाधीच्या परिसरात.
आणि शेवटचं सांगायचं, तर पुढच्या मुक्कामाच्या शहराबाहेरची एक नागमोडी पायवाट आणि पलीकडे एक डोंगर. डोंगराच्या अंगावर कायम हिरवे-पिवळे शहारे. असा दोन शहाऱ्यांच्या मधून वाट काढत कधी कधी मी वर वर चढत जातो आणि एका अश्मयुगीन शिळेवर बसून भोवतालातलं कातील शहर नजरअंदाज करण्याचा प्रयत्न करतो. अंगावर त्वचेसारखं घट्ट चिकटून बसलेलं मानवप्राणीपणाचं वस्त्र खरवडून काढायचा जमेल तेवढा प्रयत्न करतो. जमेल तेवढं नागडं व्हायचं बघतो. विरघळायचं बघतो अंतर्बाह्य. तोंड लपवत लपवत भेदरलेला सूर्य गडबड करून क्षितिजाआड पळून जातो आणि रातकिडे तुफान किरकिरायला लागतात, तेव्हा दिवसा या शहराला घाबरून लपून बसलेला हरीणकाळजाचा चंद्र दबकत दबकत वर येऊ लागतो. झाडं जागी होऊ पाहतात, डोंगर हळवा होऊ पाहतो, शिळा मृदू व्हायचा प्रयत्न करते. वाऱ्याचा श्वास अधिक मोकळा होतो. माझ्या भोवतालात एक जिवंत गावठाण असल्यागत वाटू लागतं. मी निमूट ऐकत राहतो, यांच्या सहज श्वासांनी एकमेकांना दिलेले अलगद हुंकार. माझी माणसाची जहरीशहरी कहाणी यांना ऐकवण्यासारखी नसतेच. मी निमूट ऐकत राहतो फक्त.. आवडीनं.. पर्यटनासाठी माझ्या गावाभोवतीच्या टेकडय़ा, ओढे, माळरानं मला पुरून उरतात.