scorecardresearch

Premium

कलावंतांचे आनंद पर्यटन : जाणिवा समृद्ध करणारं पर्यटन

माणगांव येथील ‘साने गुरुजी स्मारक’ माझ्यासाठी पंढरपूर होऊन गेलंय. साने गुरुजी नावाच्या विठ्ठलाला, आणि त्यांच्या सगळय़ाच धडपडणाऱ्या मुलांना भेटायला मी दरवर्षी तिथे जाते.

cha3 Youth camp
‘युवा छावणी’त तरुणांशी गप्पा मारताना मिळालेली ऊर्जा खूप दिवस पुरली..

नीरजा

‘‘सहज म्हणून केलेले काही प्रवास नंतर मात्र तुमच्यासाठी आयुष्यभरासाठी तीर्थस्थळ होऊन जातात. माणगांव येथील ‘साने गुरुजी स्मारक’ माझ्यासाठी पंढरपूर होऊन गेलंय. साने गुरुजी नावाच्या विठ्ठलाला, आणि त्यांच्या सगळय़ाच धडपडणाऱ्या मुलांना भेटायला मी दरवर्षी तिथे जाते. गेल्या २३ वर्षांतल्या, जाणिवा समृद्ध करणाऱ्या या पर्यटनानं मराठीची सेवा घडवली. ‘आंतरभारती अनुवाद सुविधा’ केंद्र स्थापन करणं असो, वा अनुवादावरच्या ‘मायमावशी’ या षण्मासिकाचं संपादन, ‘साहित्य संवाद’साठीच्या नवनव्या विषयांवरची चर्चा करणं असो, लेखकांसाठी अनुवाद कार्यशाळा घेणं असो, या सगळ्यातला सहभाग माझ्यासाठी अखंड आनंदाचा प्रवास.  समाजभान देणाऱ्या या पर्यटनाविषयी उद्या- ११ जून, अर्थात साने गुरुजींच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं..

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…

माझा ‘एस.वाय.बी.ए.’चा निकाल लागला होता. तोही ‘टी.वाय.’ची एक टर्म संपल्यावर. मला ‘एटीकेटी’ मिळाली होती. त्याच दरम्यान कॉलेजात आठ दिवसांच्या बंगलोर (आता बंगळूरु ), म्हैसूर, उटी ट्रिपची नोटीस लागली होती. ‘शेवटचं वर्ष आहे, जाऊयात,’ म्हणून ग्रुपमधल्या मैत्रिणींचा आग्रह सुरू झाला. त्या वेळचे ३०० रुपये म्हणजे आजचे तीसेक हजार रुपये भरून ट्रिपला जाण्याचे ते दिवस नव्हते. असे खर्च आपल्यासाठी नसतात, हे त्या काळात कामगार वस्तीत किंवा चाळीत राहणाऱ्या आमच्या-सारख्या मुलांना माहीत असायचंच. पण ‘शेवटचं वर्ष आहे. मजा करूयात. मग कधी संधी येईल?’ वगैरे सांगत मैत्रिणी मागेच लागल्या.

एवढे पैसे आणि त्यात लागलेली एटीकेटी. कोणत्या तोंडानं बोलणार होते मी आईशी! त्या काळात बाबा मनमाडला राहात होते. त्यामुळे बाबांना थेट विचारता येत नव्हतं. शेवटी मैत्रिणींचा झालेला आग्रह आणि त्या ट्रिपनं घातलेली भुरळ यामुळे धाडस केलं आणि आईला म्हटलं, ‘‘बाबांना विचार ना!’’ आई म्हणाली, ‘‘लाज वाटते का? नापास झालीस एका विषयात आणि ट्रिपला जायचंय?’’ मी गप्प झाले आणि विषय संपवला.  पण आईनं बाबांना पत्र लिहिलं. माझं नापास होणं आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे एवढय़ा पैशांची सोय कशी करायची, हा प्रश्न विचारत सारं कळवलं. त्यावर बाबांचं उत्तर आलं, ‘‘जाऊ देत. तिला जग पाहू देत.’’ 

त्या काळात मी नुकतीच लिहायला लागले होते. काही कविता आणि दोन-तीन कथा लिहून झाल्या होत्या. महाविद्यालयाच्या वार्षिक अंकासाठीही एक कथा दिली होती. पण तेवढंच. तरीही बाबांना वाटलं, की लिहिणाऱ्या मुलीनं जग पाहायला हवं! आणि मी जग पाहायला निघाले. कळायला लागल्यावर, लिहायला सुरुवात केल्यावर आयुष्यातलं पहिलं पर्यटन! अविस्मरणीय ट्रिप झाली. त्याबद्दल आल्यावर एका स्पर्धेसाठी छोटासा, उपरोधिक शैलीतला मिस्कील लेखही लिहिला. प्रवासवर्णनात पाहिलेल्या ठिकाणांविषयी लिहिण्यापेक्षा त्या शहराच्या आणि तिथल्या माणसांच्या टिपलेल्या सवयी त्यात जास्त आल्यानं बक्षीस मात्र मिळालं नाही. पण माझं किंचित उपरोधाची धार असलेलं लेखन तिथून सुरू झालं हे नक्की.

पुढे लग्न झाल्यावर नोकरी, स्वत:चं घर घेणं, त्यासाठी लागणारं कर्ज, वगैरे गोष्टींत दिवस गेले. नंतर जमेल तशा छोटय़ा छोटय़ा ट्रिप्स केल्या आणि वयाची पन्नाशी ओलांडल्यावर काही लांबची स्थळंही पाहिली.  हिमाचल, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या काही ठिकाणांबरोबर अंदमान, युरोपही केलं. उंच पहाडातून निघालेला रस्ता, एका बाजूला महाकाय पर्वत आणि सोबतीला बाजूनं वाहणारी बियास किंवा तिस्ता नदी हे उत्तरेतल्या आणि ईशान्येतल्या प्रवासाचं वैशिष्टय़. त्यातून वाट काढत निघालेलो आपण कधी हिमाचलमधल्या शांघडमध्ये पोहोचतो, तर कधी तीर्थन व्हॅलीत नदीकिनारी मुक्काम करतो. आत आत हाडात शिरलेल्या थंडीनं कुडकुडत लाचुंगला पोहोचून जेव्हा मऊशार दुलईत शिरतो, तेव्हा मुंबईतल्या, चेहऱ्यावरून ओघळणाऱ्या घामाला विसरूनही जातो. कधी ‘केप ऑफ गुड होप’ या भूशीराला वेढून बसलेल्या, अटलांटिक महासागरातल्या निळय़ाशार पाण्याच्या विविध छटा डोळय़ांत साठवताना अंदमान बेटाच्या भोवतालचं पाणी आठवत राहतो, तर कधी दगडगोटय़ांनी भरलेल्या बियास नदीत पाय सोडून बसताना आपला औदुंबर होऊन जातो! रोममधल्या व्हॅटिकन सिटीत शिरतानाचा अनुभव भारावून टाकणारा असतो, तर व्हेनिसची सैर करताना शेक्सपीअरचा ‘र्मचट ऑफ व्हेनिस’मधला शॉयलॉक आठवत राहतो.

अथेन्समधले पीळदार शरीरयष्टी असलेले नग्न ग्रीक नायकांचे आणि कमनीय नायिकांचे पुतळे जसे त्यांच्या प्रेमात पाडतात, तसेच अ‍ॅमस्टरडॅममधले फुलांचे ताटवे ‘सिलसिला’तल्या अमिताभ-रेखाची आठवण करून देतात. युरोपातले गड, महाल असोत, की आयफेल टॉवर किंवा मदुरोदाम गार्डन मधली नेदरलँडची प्रतिकृती   (मिनिएचर हॉलंड) असो, वेगवेगळी म्युझियम्स असोत, की जर्मनीमधलं ‘बिबलोथेक’सारखं प्रचंड मोठं ग्रंथालय असो.. राईन किंवा थेम्स नद्या, घनदाट जंगलं असोत, की बर्फाच्छादित पहाड.. प्रत्येकाचं सौंदर्य वेगळं. पण सौंदर्याच्या या अशा कॅनव्हासवर कधी उध्वस्त शहरांचे आणि मनांचे अवशेषही दिसत राहातात. जर्मनीच्या फेरफटक्यात तर हिटलरच्या क्रौर्यानं दिलेली अपराधी भावना सर्वसामान्यांच्या मनावर सावटासारखी पसरल्याचं जाणवत राहतं.     

ही सारी स्थळं पाहताना मनात साठवत होते, ते त्या त्या प्रदेशाचं सौंदर्य, तिथली संस्कृती, त्यांची वास्तुकला, शिल्पकला, चित्रकला, संगीत आणि वाचनसंस्कृती. पण याही पलीकडे जाऊन आपल्या जाणिवा प्रगल्भ आणि समृद्ध करणारी काही पर्यटनं असतात, जी तुमच्या आयुष्याला वेगळंच वळण देतात. माझंही असं एक पर्यटन झालं, ज्यानं माझ्या आयुष्याला वेगळंच वळण दिलं. एवढंच नाही, तर त्या स्थळाला मनात येईल तेव्हा वारकऱ्यासारखी भेट देत राहिले आणि ते स्थळ जगण्याचा एक भाग होत गेलं. अशी ठिकाणं निसर्गाची मुक्त उधळण करणारी, डोळय़ांना सुख देणारी नसतीलही.. पण प्रेमाची आणि विचारांची मुक्त उधळण करणारी आणि समाजभान देणारी असतात.  २००० मध्ये माणगाव इथे दोन दिवसीय ‘आंतरभारती साहित्य संवाद’ आयोजित केला होता आणि त्यात आमंत्रित केलेल्या इंदिरा गोस्वामी यांची मुलाखत घेण्याविषयी मला फोन आला.

इंदिरा गोस्वामी या आसामच्या लोकप्रिय आणि ‘ज्ञानपीठ’ मिळवणाऱ्या सर्वात तरुण लेखिका. त्यांची मुलाखत मी आणि नंदिनी आत्मसिद्ध यांनी घ्यावी अशी आयोजकांची इच्छा होती. मी तयार झाले. रायगड जिल्ह्यातलं हे गाव ओळखीचं होतं, पण ते पर्यटनाचं ठिकाण नव्हतं. म्हणजे आपल्या मनात पर्यटनाच्या ज्या व्याख्या आहेत, त्यात ते कुठेच बसत नव्हतं.  माझ्यावर प्रेम करणाऱ्या कवयित्री उषा मेहता त्या काळात तिथे सक्रिय होत्या. त्या चल म्हणाल्यानं मी गेले. मुंबईहून इंदिरा गोस्वामी यांच्यासाठी वेगळी गाडी केली होती. त्यात उषा मेहता, संजीवनी खेर, मल्याळी लेखिका मानसी, आशा दामले, नंदिनी आत्मसिद्ध, रिंकू भट्टाचार्य, धीरूबेन पटेल आणि मी, अशा काही लेखिका होतो. आमची मुद्दाम त्या गाडीत सोय केली होती.  हेतू हा, की जाता जाता त्यांच्याशी गप्पा मारता येतील आणि मुलाखतीची तयारी करता येईल.

 इंदिरा गोस्वामींबरोबरचा तो प्रवास इतका सुंदर होता, की वाटेत भेटलेल्या ज्या नद्या, जी शहरं, जी वळणं मला आधी माहीत होती, ती नव्यानं कळत गेली. नागोठण्याजवळची अंबा नदी असो, की कोलाडजवळची कुंडलिका नदी असो. त्यांचा इतिहास जाणून घ्यायला त्या उत्सुक होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला माणगावजवळचा रायगड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा परीसस्पर्श लाभलेलं महाडचं चवदार तळं यांबद्दलची माहिती मिळवताना दोघांविषयी नितांत प्रेम आणि आदर त्या व्यक्त करत होत्या. इंदिरा गोस्वामींसाठी तो प्रवास म्हणजे महाराष्ट्राचं केलेलं सांस्कृतिक पर्यटन होतं आणि आमच्यासाठी आपल्याच गावाचा नव्यानं केलेला अभ्यास. त्या दिवशी माणगावपासून साधारण सात-आठ किलोमीटर पुढे गेल्यावर आम्ही एका वळणावर वळलो. वाटेत ‘साहित्य संवाद’चे अनेक फलक स्वागताला उभे होते. पण खऱ्या अर्थानं स्वागत केलं, ते ‘साने गुरुजी स्मारका’च्या आत प्रवेश केल्यावर तिथल्या वटवृक्षांनी. छत्तीस एकर जमीन डोंगरानं व्यापलेली. मधोमध केवळ एक कौलारू घर आणि त्याच्या बाजूला उभे असलेले पुराणपुरुषासारखे घनदाट वटवृक्ष. त्या वृक्षांच्या पारावर बसलो आणि आम्ही सगळेच त्या जागेच्या प्रेमात पडलो. काय नव्हतं तिथं?.. तुम्हाला कुशीत घेणारी गर्द सावली, विसावायला लावणारा साने गुरुजींमधला प्रेमळ श्याम, ज्या सुधाला, आपल्या पुतणीला साने गुरुजींनी पत्रं लिहिली होती, त्या सुधाताई बोडा, ‘इथेच टाका तंबू’ म्हणणारे स्मारकातले आप्त, ‘आता उठवू सारे रान’ म्हणत आंदोलनं छेडणारे कार्यकर्ते आणि त्यांच्याबरोबर परिवर्तनाची भाषा करणारे कमलेश्वर, इंदिरा गोस्वामी यांच्यासारखे लेखक, गजानन खातू, अर्जुन डांगळे, रामदास भटकळ यांच्यासारखे आपापल्या क्षेत्रातले दिग्गज! एक माहोल तयार झाला होता. साहित्य संमेलनात असतो त्याहून खूप वेगळा. आनंद देणारा आणि आपल्या आत प्रेमाचा, आशेचा पाझर निर्माण करणारा. आपोआप जोडले गेले मी त्या सर्वाशी.

 खरं तर कोणत्याही प्रवासाहून परत आलो, की हळूहळू विसरतो आपण त्या जागा, ती माणसं, तो परिसरही. मग केवळ आठवण म्हणून कुठेतरी रुतून राहातात त्या जागा नेणिवेत किंवा अनेकदा फोटोंच्या स्वरूपात. पण इथे उलटंच घडलं. मी पुन्हा पोहोचले तिथे. जीवराज सावंत या माझ्या मित्रानं युवा छावणीत एक सत्र घेण्यासाठी बोलावलं. तरुणांबरोबर दिवस घालवल्यावर मिळालेली ऊर्जा पुढे अनेक दिवस पुरली. रात्री त्या कौलारू घरात जिथे जागा मिळेल तिथे सारे झोपलो. सकाळी सकाळी डोंगरावर फिरणारे मोर पाहात तिथला परिसर पायाखाली घातला. त्या ३६ एकरात असलेल्या डोंगराच्या माथ्यावर जाऊन तो परिसर डोळय़ांत साठवला. 

मग दोनच वर्षांत पुन्हा एकदा स्मारकात गेलो. ११ जूनला साने गुरुजींच्या स्मृतिदिनी पालगडला जाण्याआधी तिथे मुक्काम केला. पहिल्यांदा गेलो होतो त्याच मैत्रिणींचा ग्रुप होता. तिथे काम करणाऱ्या सखाराम मामांबरोबर करंवंदाच्या जाळय़ांतली करवंद वेचून खाताना अनुभवलेली मजा आजही आठवते आहे. पाऊसभरलं आभाळ, त्यात उगवणाऱ्या रानभाज्या, बकुळीच्या फुलांचा सडा आणि पावसाळय़ात शंभरएक लोकांच्या हातून होणारी भाताची लावणी ही या पर्यटनस्थळाची वैशिष्टय़ं. हळूहळू ही जागा माझ्यासाठी पंढरपूर होऊन गेली आणि साने गुरुजी नावाच्या विठ्ठलाला भेटण्यासाठी मी नेमानं जात राहिले तिथं. जोडले गेले मी तिथल्या माणसांशी.. साने गुरुजींच्या सगळय़ाच धडपडणाऱ्या मुलांशी. गेल्या तेवीस वर्षांत किती फेऱ्या झाल्या असतील स्मारकात त्याची गणतीच नाही आणि प्रवास नेहमीच उत्साहानं भरलेला. अगणित चर्चा, अगणित किस्से, आपुलकीनं भरलेला. या प्रवासात सुचलेल्या अनेक कल्पना. मग ती ‘आंतरभारती अनुवाद सुविधा’ स्थापन करण्याविषयीची रामदास भटकळांची कल्पना असेल, की ‘आंतरभारती कलाभवन’ सुरू करण्याची गजानन खातू आणि युवराज मोहिते यांची कल्पना असेल.

स्मारकाचं बांधकाम कशा पद्धतीनं व्हावं, याचा आराखडा करवून घेणारे सुधीर देसाई असोत, की सुविधा केंद्राच्या वेगवेगळय़ा प्रकल्पांविषयी सूचना करणाऱ्या पुष्पा भावे असोत. आमचं एक कुटुंब होण्याची ही प्रक्रिया सुरू झाली, ती या अशा प्रवासांतूनच. ‘मायमावशी’ या षण्मासिकाचा प्रवासही इथेच सुरू झाला. भटकळ आणि सुनील कर्णिक यांच्या कल्पनेतून सुरू झालेल्या या षण्मासिकाचं संपादन मी अनेक वर्ष केलं. जवळजवळ २०१५ पर्यंत या षण्मासिकातून भारतभरच्या लेखकांचा, अनुवादकांचा, आणि केवळ अनुवादकांना उपयोगी पडतील असे विषय घेऊन त्यावर लिहिणाऱ्यांचा लेखकांचा मेळाच घेतला आम्ही आणि मराठी वाचकांना भारतीय साहित्याची सफर घडवून आणली. ‘साहित्य संवाद’साठी नवनव्या विषयांवरची चर्चा असो, की अनुवाद कार्यशाळा घेण्याची कल्पना असो, स्मारकात अनेक उपक्रम घेतले आम्ही सर्वानीच. त्यायोगे भारतातल्या अनेक लेखक-अनुवादकांचा पूल बांधण्याचा प्रयत्न केला. त्यावर खूश होऊन ‘विंदां’नी (विंदा करंदीकर) ज्ञानपीठ पुरस्कारात मिळालेले  दोन लाख रुपये स्मारकाच्या सुपूर्द केले आणि ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार’ सुरू झाला. 

 गेली पंचवीस वर्ष या स्मारकानं अनेकांचं स्वागत केलं. युवकांपासून ते बुजुर्ग लेखकांपर्यंत सर्वाना कवटाळलं. कुठुन कुठून प्रवास करून आलेले भारतभरचे लेखक, कवी या अशा अद्भुत पर्यटनस्थळाशी जोडले गेले आणि महाराष्ट्र सरकारनं या स्मारकाला महाराष्ट्रातल्या पर्यटन स्थळाचा दर्जा दिला.  इथे आलेला प्रत्येक माणूस या परिसराच्या नुसता प्रेमात पडत नाही, तर स्वातंत्र्य, समतेचा, बंधुत्वाचा विचार घेऊन जातो. धर्म, जात, लिंगापलीकडे असलेला साने गुरुजींचा मानवतेचा धर्म आचरणात आणतो. इथलं ‘साने गुरुजी पॅव्हेलियन’ पर्यटकांना साने गुरुजींच्या काळात घेऊन जातं, हळव्या श्यामविषयी लिहिणाऱ्या साने गुरुजींची ओळख करून देतंच, पण त्याहीपेक्षा जास्त सागतं, ते दलितांना मंदिराची दारं खुली व्हावीत म्हणून पंढरपूरचा सत्याग्रह करणाऱ्या लढवय्या साने गुरुजींची गोष्ट. भारतीय संस्कृती आणि इस्लाम संस्कृतीचा अभ्यास करणारे, अनुवादक असलेले, देव आणि देवळांच्या आडोशानं दंगली करणाऱ्यांचे कान उपटणारे, ‘सोन्या मारुती’सारख्या नाटकातून जनतेचे मूळ प्रश्न काय आहेत हे सहज सांगणारे साने गुरुजी इथे भेटतात.

माझा जगण्याचा प्रवास खरं तर हळवेपणाकडून कोरडेपणाकडे होत गेला होता. माझ्या एका कवितेत मी म्हटलं होतं, ‘शामची आई ते मेरसॉची आईपर्यंतचा प्रवास; मूर्तीतून घडत गेलेला एक निव्वळ दगड!’ पण निर्थक जगण्याला कवटाळून बसलेल्या मला या प्रवासानं पुन्हा एकदा साने गुरुजींकडे आणलं. अर्थात हळव्या श्यामच्यापेक्षाही सारासार, विवेकी विचार करणाऱ्या, ‘जगाला प्रेम अर्पावे’ अशी भाषा करतानाच प्रसंगी सारं रान उठवण्याची क्षमता असणाऱ्या, सामान्य, कष्टकरी माणसाचा आवाज झालेल्या साने गुरुजींकडे घेऊन आला हा प्रवास.  ‘साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, वडघर, माणगाव, जिल्हा रायगड’ हा माझ्यासाठी आयुष्यभराच्या प्रवासातला समाजभान देणारा, विचार करायला लावणारा टप्पा बनून गेला. जाणिवा समृद्ध करणारा, स्वत:ची आणि जगाची ओळख करून देणारा हा आनंददायी प्रवास तेवीस वर्षांपूर्वी सुरू झाला. तो थांबणार नाहीच. शेवटच्या श्वासापर्यंत होत राहील हे नक्की!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Artist tourism enriches the senses of tourism chaturang article ysh

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×