– सुषमा देशपांडे
बहुतांशी शाळेपासून सुरू होणारा कलाप्रवास जेव्हा प्रत्यक्ष रंगभूमीपर्यंत येऊन पोहोचतो तेव्हा बरोबर असते ते परिपक्व जाणतेपण. दरम्यानच्या काळात घरच्यांनी घेऊ दिलेला मोकळा श्वास त्या जगण्याला अधिकाधिक प्रगल्भ करत जातो आणि हाती लागतो तो अनुभवांचा भरगच्च पेटारा… त्यासाठी पहिली पावले महत्त्वाची. कला क्षेत्रातले सर्जनशील अनुभव सांगणारे हे नवीन सदर दर पंधरवड्याने.
मला ज्यातून आनंद मिळतो तेच मी करते, मग ती शोधपत्रकारिता असो, कथा, नाटक लिहिणं, दिग्दर्शित करणं असो, नाटक, चित्रपटात अभिनय करणं असो किंवा खेड्यातल्या स्त्रियांबरोबर काम करणं असो. त्यात मला कमाल आनंद मिळतो. तुझ्या याच आनंदावर लिही ना, असं अनेक जण सांगत राहतात, पण होतं नव्हतं. या सदराच्या निमित्ताने लिहायला बसलेय…
आपण जे काही करतो त्याची पाळंमुळं आपल्या बालपणात रुजलेली असतात. मी बारामतीची. आमचं घर शेतात होतं. सुट्टीत आम्ही चुलत, आत्ये, मामे भावंडं एकत्र हुंदडत असू. मनसोक्त विहिरीत पोहणं, यात आईही बरोबर पोहायला यायची. शिवाय संध्याकाळी आमचं नाटक, गाण्याचे कार्यक्रम आम्ही बसवत असू. रात्री त्याचं सादरीकरण होत असे… संपूर्ण कुटुंबं त्यात सामील होई. भांडी वाजवून केलेलं संगीत. चादरींचे केलेले पडदे, मोठमोठ्याने हसण्याचे क्षण सतत यायचे. यात मदतीचा सहभाग असे, आई आणि मोठी आईचा (आजी). त्यांनी लहानपणापासूनच मोकळा श्वास घेण्याची ताकद दिली हे खोलवर जाणवत राहतं.
बालक मंदिर, सहा नंबरची नगरपालिकेची शाळा, मग म.ए.सो.चे हायस्कूल. बालक मंदिरापासून असलेल्या रजू (रजनी पवार), उजी (उज्ज्वला कोल्हटकर) या मैत्रिणी. आमची नाती एकमेकींच्या घरातल्यांशीच नाही, तर त्यांच्या नातेवाईकांशीही होती. खरं तर गावातल्या सगळ्यांना आम्ही फक्त ओळखत नव्हतो, तर आमचं जणू गावाशीच घट्ट मैत्र होतं. कोणतंही स्नेहसंमेलन असो, आई हौसेने मला भूमिकेबरहुकूम तयार करायची. आईनेच जपून ठेवलेले माझे तेव्हाचे फोटो पाहते तर मी वर्गात उंच असून बाई मला नाचासाठी पहिल्या ओळीत, पुढे उभ्या करत हे दिसतं. मी दुसरीत असतानाचा एक प्रसंग आठवतो, बाई एक नाटक बसवत होत्या. त्यात राजाची भूमिका होती. बाई एकेक मुलाची आजच्या भाषेत ‘ऑडिशन’ घेत होत्या. बाईंना एकही मुलगा पसंत पडत नव्हता. तेव्हा माझ्या मनात येऊन गेलं होतं, ‘बाई मला का नाही विचारत आहेत?’ तेवढ्यात बाईंनी मला बोलावलं आणि चक्क निवडही केली. मिशा लावून सिंहासनावर बसलेला राजा करताना मजा आली होती.
शाळेत आठवी-नववीत असताना मी बसवलेले नाच आणि मिळालेली बक्षिसं आठवतात. उजीने कष्टाने केलेला कपडेपट आठवतो. त्या काळातली एक आठवण ठसठशीतपणे समोर आहे. मी ‘सावज माझं गवसलं’ या गाण्यावर नाच बसवला होता. आमच्या उपमुख्याध्यापक बाईंनी, ‘हे गाणं अश्लील आहे म्हणून हा नाच स्पर्धेत करायचा नाही’ असं सांगितलं. झालं… बसलेला नाच… आता काय करायचं? मोठ्ठा प्रश्न. तेव्हा प्रसिद्ध लेखक मुकुंद टाकसाळे आमच्या घरी यायचा. त्याची साहित्याची आवड आम्हाला माहीत होती. आईनं मुकुंदला त्याच तालात गाणं लिहून देण्याची विनंती केली. ‘जाऊ आपण शेतावरी… चल चल जाऊ या बिगी बिगी… सुरू जाहली आता सुगी’ असं गाणं मुकुंदनं लिहूनही दिलं. आम्हाला आकाश ठेंगणं झालं. नाच झाला. पुढे मुकुंदचा आणि माझा (तसेच इतरही काही जणांशी) पत्रव्यवहार होता. माझ्या आईनं मला आलेलं पत्र कधीच फोडून पाहिलं नाही. मुकुंदनं एका पत्रात, ‘तू पत्र असं लिहितेस की पुढं-मागं लेखिका होण्याची शक्यता आहे,’ असं लिहिलं होतं. ‘काहीही’ म्हणत मी तेव्हा मोठ्यानं हसले होते.
आई सुंदर गायची. वडील प्रभाकर देशपांडे नाटक करायचे, बसवायचे. बारामतीत काही नाटकवेड्या लोकांनी मिळून ‘नाट्यसाधना’ संस्था सुरू केली होती. ही संस्था दरवर्षी एक नाटक बसवत असे. गणपती उत्सवात आसपासच्या साखर कारखान्यावर त्याचे प्रयोग करत असे आणि मिळणाऱ्या पैशांतून ‘राज्य नाट्य स्पर्धे’त भाग घेत असे. तेव्हा मी सकाळ-संध्याकाळ मैदानावर खेळायला जात असे. संध्याकाळी उशीर झाला तर अंधारात एकटीनं घरी येऊ नये म्हणून नाटकाच्या तालमी ‘रिमांड होम’मध्ये असत तिथे जात असे. मला या नाटकाच्या तालमी पाहायला जायला आवडायचे. पपांनी शालेय स्पर्धेसाठी बसवलेली नाटके आणि त्याहून धमाल तालमी आठवतात.
पपा ‘नाट्यसाधना’ संस्थेसाठी एक गो. गं पारखींचं ‘हॅलो मी बोलतोय’ हे नाटक बसवत होते. नवविवाहित दाम्पत्य हनिमूनला गेले आहे व तिथे होणारे घोळ हा नाटकाचा विषय होता. माझा चुलत भाऊ अजित त्यात नवऱ्याची भूमिका करत होता. पपांना बायकोच्या भूमिकेसाठी मुलगी काही केल्या मिळेना. मी तेव्हा कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होते. पपांनी मला नाटकात घ्यायचं ठरवलं. सुरुवातीला एक अवघडलेपण होतं, पण पपांनी समजावून सांगून ते अवघडलेपण घालवलं. या नाटकाचे खूप प्रयोग झाले. खूप बक्षिसे मिळाली. तेव्हा फक्त ‘दूरदर्शन’ ही एकच वाहिनी होती. याकूब सईद तेथे निर्माते होते. त्यांनी हे नाटक ‘दूरदर्शन’वर प्रसारित केलं.
पपा त्या काळात ‘थिएटर अकॅडमी’ या संस्थेच्या अनेक एकांकिकांचे आणि नाटकांचे प्रयोग बारामतीत करत. ‘महानिर्वाण’ची रंगीत तालीम बारामतीत झाली होती. ‘घाशीराम कोतवाल’वरच्या बंदीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत झालेला ‘घाशीराम’चा प्रयोग आठवतो. ‘आविष्कार’चं ‘शांतता कोर्ट चालू आहे’ बारामतीत पाहिलं होतं. पुण्यात शिकायला आल्यावर तर नाटकं पाहणं हा कार्यक्रमच सुरू झाला. मोहन गोखलेनं बसवलेलं ‘महापूर’ अनेकदा पाहिलं.
१९७६-७७ मधली ‘पुरुषोत्तम करंडक स्पर्धा’ पाहिली होती. त्यात मृदुलानं (भाटकर) दिग्दर्शित केलेलं ‘सूर्यास्ताच्या अंतिम किरणांपासून…’ पाहिलं होतं. १९७७-७८ या वर्षात मी पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र विभागाचा एक वर्षाचा अभ्यासक्रम करण्यासाठी दाखल झाले. मृदुला तिथे भेटली. तिनं ‘पुरुषोत्तम करंडक’साठी आपण महेश एलकुंचवार यांचं ‘रक्तपुष्प’ नाटक करू या असं सुचवलं. त्याच गप्पांमध्ये, ‘नाटक मोठं आहे, ‘पुरुषोत्तम’च्या स्पर्धेच्या अटी लक्षात घेता आपल्याला नाटक एडिट करायला लागेल, मात्र महेशला नाटक एडिट केलेलं आवडत नाही’ हेही मृदुला म्हणाली. मृदुला आमची दिग्दर्शक होती. तेव्हा महेश ‘थिएटर अकॅडमी’च्या बरोबर काही प्रकल्पांच्या कामासाठी पुण्यात राहत होता. रोज सकाळी ‘रूपाली’ हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी यायचा. आमचा वृत्तपत्र विभाग ‘रूपाली’च्या समोरच होता. तो तिथे असण्याच्या वेळी आम्ही दोघी ‘रूपाली’त गेलो. नाटकाची परवानगी मागितली. महेशने होकार देताच, आम्ही सांगितलं, ‘नाटक ‘पुरुषोत्तम’च्या नियमांमुळे कापावे लागणार आहे. त्यामुळे तालमींना तू येणे अपेक्षित नाही.’ विद्यापीठातून राम ताकवले सरांनी स्पर्धेत भाग घ्यायला परवानगी दिली आणि तालमी सुरू झाल्या. हे ‘मेनोपॉझ’ सुरू झालेली अर्थात पाळी जात असण्याच्या काळातली आई आणि पाळी नुकतीच सुरू झालेली उमलत्या वयातली मुलगी अशा आई-मुलीच्या आणि अनुषंगाने येणाऱ्या नात्यांची मांडणी असलेलं नाटक.
या काळात प्रा. राम बापट यांची ओळख झाली होती. नाटकातील काही वाक्यांचे अर्थ सरांना विचारले होते. (आता त्याचं हसू येतं पण तेव्हा… गंभीरपणे विचारले होते.) ‘रक्तपुष्प’मध्ये आई-वडिलांना आवेगाने मिठी मारते असं लिहिलं आहे. दिग्दर्शक म्हणून मृदुलाला ती घट्ट मिठी अपेक्षित होती. प्रयोगाला उत्साहाने आलेली माझी आई, लेक म्हणजे मी महाविद्यालयीन स्पर्धेच्या स्टेजवर घट्ट मिठी मारणार म्हणून थोडी ताणात होती. पूर्ण शांततेत प्रयोग संपला. टाळ्यांच्या कडकडाटात आम्ही ‘भरत’च्या (नाट्यमंदिर) छोट्या दरवाजातून बाहेर येत होतो. दूर उभा असलेल्या महेश एलकुंचवारनं अंगठा वर करून पावती दिली. आईच्या चेहऱ्यावर हसू होतं. महाविद्यालयीन कोलाहलात आम्ही सामील झालो. नाटक ‘पुरुषोत्तम’ला पहिलं आलं. मला अभिनयाचं ‘केशवराव दाते’ बक्षीस मिळालं. गंमत म्हणजे बक्षीस समारंभ महेशच्या हस्ते झाला. हे पारितोषक मिळालं की तुम्हाला अचानक अति महत्त्व दिलं जातं. त्या रात्री वृत्तपत्रात छापायला माझा फोटो मागणारे पत्रकार पाहून मी चक्रावले होते.
‘पुरुषोत्तम’च्या एक परीक्षक मीनाताई चंदावरकर होत्या. त्या वेळी भास्कर चंदावरकर, दया पवार यांच्या ‘बलुतं’ या आत्मकथनावर चित्रपट करत होते. दया पवार यांच्या आईच्या भूमिकेसाठी मीनाताईंनी मला बोलावलं. छोटा दगडू ते लेखक दया पवार हा प्रवास चित्रपटात होता. अर्थात तरुण आई ते म्हातारी आई असा प्रवास चित्रपटात साकार करायचा होता. सतीश पुळेकर दया पवारांची भूमिका करत होता. चित्रपटाचं नाव, ‘अत्याचार’. तरुण आईचे कष्ट दाखवण्यासाठी ‘बाई मी धरण धरण बांधिते, माझं मरण मरण कांडिते’ ही दया पवारांची प्रसिद्ध कविता वापरली होती. गावाकडे कष्ट करणारी आई ते झोपडपट्टीतलं दया यांचं जगणं चित्रित होत होतं. दया पवार कधी तरी चित्रीकरणाला येत असत. माझं काही चित्रीकरण चालू असेल तर ते काहीसे भावुक होत. हे स्वाभाविक आहे, असं माझं व मीनाताईचं बोलणं झालं. चित्रीकरण संपल्यावर चंदावरकर यांच्या घरी सगळे एकत्र जमत असत. एके दिवशी परतल्यावर मी माझं आवरून स्लीव्हलेस गाऊन घालून बाहेर आले आणि गप्पांमध्ये सामील झाले. मला दया पवार काहीसे अस्वस्थ, हरवल्यासारखे वाटत होते. थोडा वेळ गेला आणि ते माझ्याजवळ येऊन बसले. सगळे गप्पांमध्ये रमलेले होते. एका क्षणी हळुवारपणे मला म्हणाले, ‘‘मी एक बोललो तर चालेल का? रागावणार तर नाही ना?’’ मला वाटलं त्यांना भूमिका कशी करावी याच्या सूचना द्यायच्या आहेत. ‘‘बोला ना,’’ मी सहज म्हटलं. काहीसं चाचपडत म्हणाले, ‘‘तुम्ही हे चित्रीकरण संपेपर्यंत स्लीव्हलेस कपडे नाही घातलेत, तर चालणार नाही का?’’ मी आणि माझी भूमिका त्यांच्यासाठी वेगळ्या नव्हत्या. कमालीचा साधा आणि स्वत:शी प्रामाणिक असलेला माणूस… मी लगेच कपडे बदलले.
जगणं समजून घ्यायची क्षमता अनुभवांनी विस्तारते. पुढे ‘उंबरठा’तील समलिंगी व्यक्तीची भूमिका, सावित्री-जोतिबा, तमाशातल्या स्त्रिया, वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, डॉ. सुधीर पटवर्धनांच्या चित्रातल्या गोष्टी, उर्मिला पवारांच्या ‘आयदान’मधला समाज समजून घेण्यासाठीची ही पहिली पावलं होती…
लेखिका पत्रकार, मराठी आणि हिंदी रंगभूमीवरील बहुगुणी कलाकार, एकपात्री नाटककार आणि अभिनेत्री आहेत. ‘किर्लोस्कर’, ‘मिळून साऱ्याजणी’ , ‘दिनांक साप्ताहिक’ आदीसाठी त्यांनी साहाय्यक संपादक म्हणून काम केले आहे. ‘एक आवश्यक बंड’, ‘प्रकरण पहिले’ या नाटकांचे लेखन, ‘व्हय मी सावित्रीबाई’ या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयही त्यांनी केला आहे. त्यांनी लिहिलेले ‘तिच्या आईची गोष्ट अर्थात माझ्या आठवणींचा फड’ हे नाटक तमासगीर स्त्रियांवर आधारित आहे. स्त्री संतांच्या अभंगांवर आधारित ‘संगीत बया दार उघड’ तसेच ‘माय मदर, द घरवाली, हर मालक अँड हिज वाइफ’ या वेश्या व्यवसायातल्या स्त्रियांवर आधारित नाटकाचेही त्यांनी दिग्दर्शन केले. त्यांचे ‘आयदान’ हे नाटक उर्मिला पवार यांच्या आत्मकथेवर आधारित आहे. सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांवर आधारित ‘चित्रगोष्टी’ लघुपट त्यांनी केला आहे. त्यांना ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ आणि ‘पुणे नाट्य परिषदे’चा ‘दया पवार स्मृती’ पुरस्कार मिळाला आहे. ‘व्हय मी सावित्रीबाई’ या नाटकासाठी त्यांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे.
sushama.deshpande@gmail.com