तोच खरा पुरुषार्थ!!!

मला कल्पना आहे प्रत्येक पुरुषाच्या ठाई मेल-इगो असणारच आहे. तो त्याच्या हार्मोन्सचा परिणाम आहे. परंतु पुरुषांनी-कोणत्याही वयाच्या समकालीन पुरुषांनी सुरुवातीला जसे व्यक्त व्हायला शिकले पाहिजे, तसे पुढचे पाऊल म्हणून थोडेसे नम्र व्हायला शिकले पाहिजे. नम्रता म्हणजे गुडघे टेकवणे नाही, तर …

मला कल्पना आहे प्रत्येक पुरुषाच्या ठाई मेल-इगो असणारच आहे. तो त्याच्या हार्मोन्सचा परिणाम आहे. परंतु पुरुषांनी-कोणत्याही वयाच्या समकालीन पुरुषांनी सुरुवातीला जसे व्यक्त व्हायला शिकले पाहिजे, तसे पुढचे पाऊल म्हणून थोडेसे नम्र व्हायला शिकले पाहिजे. नम्रता म्हणजे गुडघे टेकवणे नाही, तर मान थोडी लवचीक करणे इतकेच अभिप्रेत आहे. मान सारखी ताठ ठेवण्यात पुरुषार्थ नाही. ती सर्वत्र फिरली पाहिजे म्हणजे जगात सध्या काय चाललंय ते पाहिलं पाहजे आणि हवं तेव्हा झुकलं पाहिजे! तोच खरा पुरुषार्थ!!!
प्रत्येक पुरुषाच्या जीवनात असे काही क्षण येतात जेव्हा त्याला वाटत असतं मला कुणीतरी चांगलं म्हणावं, माझं कौतुक करावं, माझ्या कामाला दाद मिळावी. हे सगळं जितकं स्त्रियांना हवंहवंस वाटतं तितकंच आणि तसंच पुरुषांनाही हवंस वाटतं. पण फार थोडे, (माझ्यासारखे) पुरुष ‘‘बघ माझा नवीन शर्ट?’’ असा थेट प्रश्न विचारून दाद मागतात. माझा मित्र सुजय म्हणतो, ‘‘माझी बायको माझ्या खरेदीसाठी कधीच बरोबर येत नाही आणि मी आणलेले कपडे पाहिले की त्यात खोडय़ा काढते. एकदा मी पांढराशुभ्र लीननचा शर्ट आणला. दोन हज्जार रुपयांचा! आणि ही म्हणते, ‘अरे सुजय असाच शर्ट घ्यायचा होता तर खादी भांडारातून सात-आठशे रुपयांत मिळाला असता.’ बोल, काय म्हणायचं हिला? आणि मी जर नवीन शर्ट घातला तर तिच्यासमोर उभा राहतो. उगाचच बटणावर बोटं फिरवतो. कॉलर सरळ करतो. ती बघत असते. पण प्रतिक्रिया नाही. मग मीच सांगतो, ‘हा गेल्या महिन्यात घेतलेला शर्ट. आज पहिल्यांदा घालतोय.’ त्यावर ती सरळ म्हणते, ‘अरे तुझा शर्ट नवा का जुना कळतच नाही. पांढरा, निळा आणि कधीतरी ऑफ-व्हाइट याच्या पलीकडे कुठले रंगच नसतात. आणि डिझाइन म्हणाल तर रेघा आणि चौकटी. मला त्यामुळे तुझे सगळे शर्ट सारखेच वाटतात. एकदा ती माझ्याबरोबर मॉलमध्ये आली. ती माझ्या वाढदिवसानिमित्त मला शर्ट घेणार होती. काय वैताग आणला माहितीय? यात अबोली शेड आहे का? निदान राणी कलर. खरं तर राणी कलरवर बॉटल ग्रीन रेषा छान दिसल्या असत्या आणि तुमच्याकडे फॉर्मलमध्ये पर्पल आहे का? मी शेवटी वैतागून म्हटलं, तुझी भाषा काही मला कळत नाही. मी आणीन सवडीने. अरे, पुरुषांना पण दाद हवी असते हे कधी समजणार? आणि आपण मात्र त्यांच्या कानात नवं काय? इथपासून यांच्या चपला आणि पर्स या ड्रेसला मॅच करतात का, या प्रश्नाचे उत्तर द्यायचं?’’
या सगळ्या घटनेत मेल-इगो दडलेला आहे. कसा?
मुळात इगो म्हणजे काय तर नसíगक ऊर्मीना चालना देणारी ऊर्जा किंवा शक्ती. इगोसाठी इडची गरज असते. इड म्हणजे माणसाच्या खाणे, पिणे, लंगिक प्रेरणा आणि काही गोष्टी टाळण्याची उपजत प्रेरणा. इडला या प्रेरणांचे किंवा ऊर्मीचे समाधान करणे इतकेच ठाऊक असते. त्याला स्थळ, काळ, समाज, नीती आणि रिती यांचे कशाचेच घेणे-देणे नसते. या इडला गरज भासते इगोची. इगोचे काम काय तर इडची तृप्ती करण्यासाठी ऊर्जा देणे. पण इगो त्याला वाटेल तसं वागू शकत नाही. कारण त्याच्या डोक्यावर सुपर इगो अर्थात विवेकबुद्धी बसलेली असते. ती इगोला योग्य मार्गावर ठेवते. आता इड, इगो आणि सुपर इगो स्त्री व पुरुष या दोघांमध्येही असतात. मग मेल-इगो वेगळा का?
याचं साधं उत्तर म्हणजे पुरुषांच्या शरीरात निर्माण होणारे टेस्टेरोन हे हार्मोन्स. यामुळे पुरुषाकडे आक्रमकता, ताकद, जोश निर्माण होतो. त्यातून जन्माला येते स्पर्धा. जिंकण्याची, यशस्वी होण्यासाठी आवश्यक अशी महत्त्वाकांक्षी वृत्ती.
या वृत्तीतून आणि पुरुषाच्या लहानपणापासून संगोपनातून आणि संस्कारातून आकाराला येतो मेल-इगो. आणि त्यातही गंमत आहे बरं का. एका बाजूला तो आक्रमक धाडसी महत्त्वाकांक्षी असला तरी हार्मोन्समुळे झालेले बदल वगळता त्याच्या मूळ प्रेरणा स्त्रीपेक्षा भिन्न नसतात, म्हणूनच पुरुषांनासुद्धा आपल्या असण्याची, दिसण्याची, कृतींची आणि कर्तृत्वाची दाद हवी असते! त्यांचे कौतुक झालेले त्यांना आवडते. त्यांचे नाव वर्तमानपत्रात छापून येणे, फोटो (मग तो ग्रुपमध्ये अस्पष्ट दिसणारा का असेना) छापून येणे, टीव्हीवर दर्शन घडणे, रेडिओवर नाव येणे अशा गोष्टींचे अप्रूप असते. जी मंडळी आता पन्नाशीत आहेत, त्यांना विविध भारती केंद्रावर ‘इस गानेको पसंद किया है झुमरी तल्लयासे सूरज, राजीव, संजीव, अफजल, विक्रमसिंगने’ हे रोज ऐकायला मिळत असे. पुरुष मंडळी आपले नाव रेडिओवर ऐकले जावे यासाठी इतकी पत्रे पाठवतात की पोस्टाने आकाशवाणी आणि दूरदर्शन यांना पाठवायची पोस्टकार्ड महाग केली. आजसुद्धा फेसबुकवर सारखे नवे प्रोफाइल फोटो अपडेट करून किती लाइक्स मिळाले याची मोजदाद करणारे पुरुष पाहिले की पुरुषांनाही कौतुकाची किती गरज असते ते स्पष्ट होईल.
विद्याधर माझा बालमित्र. शाळेत तसा ढ विद्यार्थी. जेमतेम काठावर अकरावी (हो आमच्या वेळी शालान्त परीक्षा अकरावीत असे आणि तेव्हा साठ टक्के मिळाले तरी ग्रेट वाटे. असो). तेव्हा नुकतेच व्हिडीओ शूटिंगचे वारे वाहू लागले. तो शूटिंग शिकला आणि त्यात तो इतका निपुण झाला की आम्ही ‘हुश्शार’ मंडळी चेतक घेत होतो, तेव्हा तो फियाट (प्रीमियर पद्मिनी)मधून िहडू लागला होता आणि आमच्या शहरातील प्रत्येक श्रीमंत कुटुंबातील सर्व कामे विद्याधर करू लागला. पण शिक्षण कमी असल्याने लग्न जमेना. शेवटी अखेर एका श्रीमंत कुटुंबातील शूटिंग करता करता त्यांच्या एकुलत्या एक मुलीलाच गटवले. आणि आम्ही सगळे बरोबरीचे त्याच्यावर ‘जळू’ लागलो. हासुद्धा मेल-इगोचाच एक प्रकार. स्पध्रेत मागे पडल्याने वाटणारी खंत ही पुरुषांना स्त्रियांपेक्षा जास्त तीव्रतेने जाणवते, परंतु आपल्या भावना व्यक्त करायच्या नाहीत असे समाजमान्य गृहीतक आपली खंत, निराशा अशा नकारात्मक भावना व्यक्त करत नाहीत आणि समजा व्यक्त केल्या तर  ‘पुरुषासारखा पुरुष ना तू? एक संधी गेली तर पुढची ताटं मांडून हजर आहेत. जिद्द सोडून चालणार नाही,’ असे ऐकावे लागते.
या उलट स्त्रीला कोणत्याही परीक्षेत अपयश आल्यास ‘सोडून दे ग. तुला थोडंच घर चालवायचंय,’ असे एक प्रकारे निरुत्साहित केले जाते. अजूनही !
उअ/कउहअ/उर अशा व्यावसायिक परीक्षा असू देत किंवा केंद्र/राज्य सरकारच्या स्पर्धा परीक्षा असू देत, पुरुषांना अपयश आले तरी पुन्हा त्यांना संधी मिळते, मुलींना मात्र ‘आता पुरे’चा मंत्र ऐकावा लागतो. हासुद्धा मेल इगोचाच एक प्रकार.
पुढे येणाऱ्या लेखातून मेल-इगोचे काही तरल प्रकारही समजून घेणार आहोत आणि आपल्या मेल इगोचं सकारात्मक प्रकटीकरण कसं करावं ते पाहणार आहोत. ते करण्यापूर्वी पुन्हा एकदा निक्षून सांगतो एकविसाव्या शतकात पुरुष बदलले नाहीत तर नातेसंबंधात अनेक अडचणी निर्माण होतील. आणि एक सत्य जे थोडे लोक स्वीकारतात ते हे की प्रेम करणाऱ्या व्यक्तीची स्त्रीपेक्षा पुरुषाला अधिक गरज असते. म्हणूनच पुरुष घटस्फोटाची डिक्री मिळण्याअगोदर पुन्हा विवाह संस्थेत नाव नोंदवतात आणि स्त्रिया मात्र घटस्फोट होऊन काही वर्षे झाली तरी पुन्हा लग्नाला तयार होत नाहीत. ज्येष्ठ वयाचे विधुरसुद्धा लिव्ह-इन रिलेशनशीप शोधतात, तर विधवा स्त्रिया एकटं राहणं पसंत करतात. विशेषत: वृद्धापकाळात प्रेमाच्या स्त्रीची निकड पुरुषांना पदोपदी लागते, तर स्त्रिया त्यांच्या मानाने अधिक स्वावलंबी असतात.
आता बदलायला हवंच. मला कल्पना आहे प्रत्येक पुरुषाच्या ठायी मेल-इगो असणारच आहे. तो त्याच्या हार्मोन्सचा परिणाम आहे, परंतु पुरुषांनी-कोणत्याही वयाच्या समकालीन पुरुषांनी सुरुवातीला जसे व्यक्त व्हायला शिकले पाहिजे, तसे पुढचे पाऊल म्हणून थोडेसे नम्र व्हायला शिकले पाहिजे. आपण कितीही कर्तृत्ववान असलो, प्रतिष्ठित असलो तरी नम्रता हा असा अमलात आणण्याजोगा गुण आहे की तो स्त्रियांशीच नव्हे तर इतर पुरुष मंडळींशी चांगले नाते निर्माण करू शकतो. नम्रता म्हणजे गुडघे टेकवणे नाही तर मान थोडी लवचीक करणे इतकेच अभिप्रेत आहे. मान सारखी ताठ ठेवण्यात पुरुषार्थ नाही. ती सर्वत्र फिरली पाहिजे म्हणजे जगात सध्या काय चाललंय ते पाहिलं पाहिजे आणि हवं तेव्हा झुकलं पाहिजे! तोच खरा पुरुषार्थ!!!    
 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Authentic manhood