सुषमा देशपांडे
नाटक असो की चित्रपट लेखक, दिग्दर्शक, कलाकार अशी अनेक माणसं भेटत गेली, आणि जगण्याची ऊर्मी पेरत गेली. अशाच १९७९ ते १९८४ या काळादरम्यानच्या या काही आठवणी रंगभूमीवरच्या आणि पत्रकारितेतल्या…
काम कोणतंही असो, प्रत्येक ठिकाणी आपल्याला नवनवीन माणसं भेटतात आणि आपल्यात रुजावं असं काही त्यांच्याही नकळत देऊन जातात. अशाच या काही आठवणी १९७९ ते १९८४ या काळादरम्यानच्या…
सुप्रसिद्ध दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या ‘बेगार’ चित्रपटात मी काम केलं होतं. चित्रीकरणाचा माझा पहिलाच दिवस होता. त्यासाठी मी तुळापूर गावात पोचले. सुप्रसिद्ध अभिनेता ओम पुरीचं चित्रीकरण चालू होतं. विहिरीवरच्या उंच फांद्यांवरून ओम वर चढत आहे, असा तो प्रसंग. विहीर प्रचंड खोल आणि बिनपायऱ्यांची होती. खरं तर कोरड्या आणि खोल नसलेल्या विहिरीवरच्या फांद्यांवर हे चित्रीकरण याआधी झालंच होतं. मात्र विहिरीची खोली जाणवावी म्हणून एक ‘शॉट’ खोल आणि पाणी असलेल्या विहिरीचा घेणं भाग होतं. ‘टेक’ पूर्ण झाला.
ओम एका फांदीला धरून वर येत होता. तेवढ्यात ती फांदी अनपेक्षितपणे तुटली आणि काही समजायच्या आत ओम त्या खोल विहिरीच्या पाण्यात धपकन् पडला. नि पाण्यावर हातपाय मारत म्हणत राहिला, ‘‘ Can’t swim.’’ झालं! सगळ्यांचं धाबं दणाणलं. सई घाईघाईत विहिरीच्या कठड्याशी धावली. मीरामावशी (रानडे) तिला सांभाळायला पुढे झाली. शंकर नाग विहिरीजवळ धावला, ओरडलाच ‘‘सई मागे, मागे हो…’’आणि ओमला सूचना देऊ लागला, ‘‘भिंतीला हात टेकव आणि पाय हलवत राहा.’’
अरुण होर्णेकर दोर आणायला धावला. पहिला दोर फेकला तो ओमपर्यंत पोचला नाही. तातडीनं दुसरा दोर आणला. शंकरने दोर विहिरीत सोडला, तो ओमने पकडला आणि शंकरच्या सूचना सुरू झाल्या, ‘‘रिलॅक्स ओम, नाऊ रिलॅक्स.’’ मग शंकरने दोर कमरेभोवती कसा बांध, कुठून कसा घे, सूचना दिल्या. सूचनाबरहुकूम दोराच्या गाठी कष्टाने बांधत ओमने दोर हातात बांधले व पाय विहिरीच्या भिंतीवर टेकवले. शंकर, अरुण यांनी दोर वर खेचायला सुरुवात केली. ओम विहिरीच्या भिंतीवर पावलं टाकत वर येत
राहिला. अवघड होतं सारं, पण ओम वर आला आणि सगळ्यांना हुश्श झालं. मात्र त्या सगळ्या प्रक्रियेत केवळ धोतर गुंडाळलेल्या ओमची पाठ सोलवटून निघाली होती. जखमा झाल्या होत्या. ओमची जखम पुसणं, औषधं लावण्याची जबाबदारी मला देण्यात आली.
तुळापूरमध्येच एका मोठ्या सभागृहामध्ये आमची राहायची सोय होती. सईने आम्हाला चित्रीकरण चालू असताना ‘काम नसेल तरी भूमिकेच्या कपड्यातच राहा,’ असं सांगितलं होतं. ‘‘आम्ही अभिनेते आहोत. आमचं काम नसेल तर आम्ही निवांत राहणार.’’ असं वातावरण चित्रीकरण स्थळी नव्हतं. सगळे एका कुटुंबाचा भाग होतो. आम्हाला वापरायला लागणारं पाणी दुसऱ्या एका विहिरीवरून मोठ्या बॅरलमध्ये घेऊन यावं लागायचं. एक दिवस बैलगाडी पाणी आणायला निघाली. काम नव्हतं, ओम गाडीबरोबर निघाला. जाताना त्याने, ‘‘येतेस का?’’ असं मला विचारलं म्हणून मीही गाडीत चढले. पाणी भरण्याचं काम चालू असताना ओमने मला विचारलं, ‘‘मै कुएमें गिरा तो क्या लगा था तुम्हे?’’
‘‘बहोत सारा डर.’’ मी म्हणाले.
तर ओम म्हणे,‘‘तुम्हे तैरना आता है?’’
मी होकार दिला. मी घरच्या शेतात विहिरीतच पोहायला शिकलेली आहे.
‘‘यहाँ ‘स्विम’ करोगी?’’असं त्याने विचारताच मी थेट विहिरीत उडी मारली. पोहत बाहेर आले. माझ्या भूमिकेसाठी घातलेले कपडे पूर्ण भिजले. मग टेन्शन आलं, आता मध्येच ‘शॉट’ लागला तर? सईची भीती वाटली. मात्र कपडे अंगावरच वाळले. सर्व सुरळीत पार पडलं. चित्रीकरण संपल्यावर ओम मुंबईला गेला. लगेचच त्याने मला आवर्जून कळवलं, ‘‘मैंने स्विमिंग सिखना शुरू किया है!’’
ओम पुरी, शंकर नाग, तसेच तिथे भेटलेले आणि पुढे कायम, ‘आम्ही आहोत. झोकून देऊन काम कर.’असं सांगत माझा आधारस्तंभ झालेले विजय आणि सरोजा परुळकर आज हयात नाहीत. मात्र आठवणीत दाट आहेत.
तिथेच भेटलेला अरुण होर्णेकर (ऊर्फ बापडू) हा जगन्मित्र, मूळ नाटकातला. तो ‘इंडियन नॅशनल थिएटर’च्या ‘लोककलांचा अभ्यास व त्यावर आधारित नाटक करणं’या प्रकल्पाअंतर्गत अशोक परांजपे लिखित ‘अभक, दुभक, तिभक’ हे पहिलं नाटक दिग्दर्शित करत होता. त्यात तीन राजकन्या होत्या. सौंदर्याचं प्रतीक म्हणून मला घेतलं होतं. सत्तेचं प्रतीक म्हणून उमा लेले (खोब्रागडे) आणि पैशाचं प्रतीक म्हणून मेधा वागळे (जांबोटकर). आमच्या समोर राजपुत्र म्हणून अनंत जोग, विवेक (अनंत) पणशीकर आणि शिरीष आठवले होते. विश्वास कणेकर प्रधानाची भूमिका करत होता. नाटकात वसुंधरा साबळेसुद्धा होती. दादरच्या पाटील-मारुती सभागृहामध्ये तालमी चालत. मी एका
नजाकतीनं, तालात चालणं अरुणला अपेक्षित होतं. डौलदार स्त्रीचं चालणं मला अजिबात जमत नव्हतं. एके दिवशी अरुण मला तसं देखणं चालून दाखवत होता. मी अवाक् होऊन त्याच्या पायाकडे पाहात फिरत होते आणि अचानक मला तो ताल गवसला. मी तशी चालू लागले. चालतच राहिले. अरुण मला म्हणे, ‘‘स्वत:ला सुंदर समजू नकोस. तू जाड आहेस आणि प्रेक्षागृहातून नेमकी बारीक दिसशील म्हणून तुला घेतलं आहे.’’असो.
नाटक ही माझी आवड होती. अर्थात त्याच काळात व्यवसाय म्हणून पत्रकारिताही चालू होती. ‘पत्रकारिता’ आणि त्यातही ‘शोध पत्रकारिता’ मला जरा जास्तच आवडते. पुण्यात शिक्षणासाठी आल्यापासून ‘किर्लोस्कर प्रेस’वर जाणं व्हायचं. विद्याताई बाळ यांच्याशी जास्त गप्पा होत. तसेच ह. मो. मराठे, भा. ल. महाबळ यांच्याशीही बोलणं व्हायचं. ‘किर्लोस्कर’ मासिकासाठी मी ‘रिमांड होम’ला अनेकदा भेटी देऊन तयार केलेला लेख लिहिला होता. ‘स्त्री’ मासिकासाठी केलेलं लेखन, मुलाखती आनंद देणारं होतं. तेव्हा एका लेखक मेळाव्यात भाषण करायला मुकुंदरावांनी (किर्लोस्कर)आमंत्रण दिलं याचं अप्रूपच वाटलं होतं. मुकुंदराव आणि पुढे शांताबाई किर्लोस्करही खूप छान संवाद साधत. सुधीर गाडगीळ तेव्हा ‘मनोहर’मध्ये लिहायचा. त्याच्याबरोबर जास्त टवाळक्या चालत. सुधीरमुळे ‘मनोहर’च्या कव्हरच्या फोटोसाठीही कधी कधी मृदुला (भाटकर) आणि मी उभे राहिलो आहोत.
पत्रकार दिनकर साक्रीकर तेव्हा चालवत असलेल्या ‘पूर्वा’ मासिकाची सह-संपादक म्हणून काम करण्याची संधी मला साक्रीकरांनी दिली. साक्रीकरांकडे गौरी देशपांडे, भाऊ पाध्ये भेटल्याचं आठवतं. तेव्हाच्या चर्चा-गप्पा हा महत्त्वाचा संस्कार होता. याच काळात ‘दिनांक’ साप्ताहिक सुरू झालेलं होतं. लेखक आणि संपादन विभागातल्या पत्रकारांची दर आठवड्याला बैठक होत असे, त्याला मी जात असे. एकदा मंत्रालयात ‘माळीनगर भागात जमिनी चोरीला गेल्या’ अशी एका घोटाळ्याची माहिती मला मिळाली. ‘‘या प्रकरणाचा शोध घ्यायला मी माळीनगर-अकलूज भागात जाऊ इच्छिते.’’ असं मी ‘दिनांक’च्या एका बैठकीमध्ये सांगितलं. तो १९८२-८३ चा काळ.
‘‘का करायचा आहे तुला हा लेख?’’ संपादक जयंत धर्माधिकारीने विचारलं. नकार दिला नाही तरी पूर्ण होकार नाही आहे, हे जाणवलं. एकदम माझ्या लक्षात आलं, एक तरुणी अशा कामासाठी लहान गावात जाणार. हॉटेलमध्ये राहणार… उगाच तिथं काही घडलं तर! याचा ताण होता तो. मीच विचारलं, ‘‘तिथे माझ्यावर अत्याचार होऊ शकतो, ही भीती वाटतेय का तुला?’’ मीच जोरात हसले, म्हणाले, ‘‘मला नाही भीती वाटत.’’ मी ठाम होते. परवानगी मिळाली. मी अकलूज-माळीनगरमध्ये गेले. अनेकांना भेटले. मुलाखती घेतल्या.
जमिनीत फेरबदल करताना हजर असलेले शिपाई मला भेटले. तेव्हा ते खूप वृद्ध झाले होते. लेख छापला. लेखाचं खूप कौतुक झालं. भाईकाका (पुलं) म्हणाले, ‘‘फारच चांगला लेख लिहिला आहेस.’’ मी मात्र अस्वस्थ झाले. त्यांनाच म्हणाले, ‘‘हा ‘पु.ल. देशपांडे यांनी गौरविलेला लेख!’ इतकाच माझ्या करिअरमधला महत्त्वाचा मुद्दा! यातून पुढे काय घडतंय? काहीच नाही.’’ या आणि अशा अनुभवांमुळे लिखित शब्दांना खूप मर्यादा आहेत असं वाटू लागलं. जिथे पोहोचावंसं वाटतं तिथे आपण पोहोचू शकत नाही हे जाणवत राहिलं. वेगळ्या माध्यमातून आपण काही करायला हवं हे मनात रुजलं.
‘दिनांक’च्या एका बैठकीमध्ये जयंतने मला सुचवलं, ‘‘रोजच्या जगण्याच्या चौकटीत असलेली, तुला जाणवणारी पुरुषप्रधानता हा विषय तू छोट्या घटनांमधून तिरकस पद्धतीनं लिहावंस. सदराचं नाव देऊ या ‘पुरुष.’ अर्थात हे सदर लिहिताना विषय सहज मिळत होते. खूपच मजा आली होती. थोर चित्रकार आणि शिक्षक षांताराम पवार, त्यांची विद्यार्थिनी, राणी सबनीसला म्हणाले, ‘‘एक नवीन मुलगी ‘पुरुष’ हे सदर खूप चांगलं लिहीत आहे. तिची माहिती काढ. मला तिला भेटायचं आहे.’’ राणी माझी घट्ट मैत्रीण, सरांची भेट झाली, आयुष्यासाठी पुरून उरली.
तेव्हा ‘कला सरगम ठाणे’ या नाट्यसंस्थेसह मी नाटक करायचे. वसंत आबाजी डहाके यांनी लिहिलेलं ‘श्रीमंत नारायणराव पेशवे यांचा अथवा कोणाचाही खून, संदर्भ-भाऊबंदकी’ हे महत्त्वाचा राजकीय विचार मांडणारं नाटक चांगलंच आठवतंय. आता शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचं नाव असलेला, विजय जोशी त्याचं दिग्दर्शन करत होता. विश्वासने नेपथ्य रचना केली होती. नामदेव ढसाळने ‘नाटक चांगलं पेश करा’, म्हणत नेपथ्यासाठी पैसे उभे करायला विशेष मदत केली होती.
‘स्कॅफोल्डीन’ वापरून मजला असलेला भव्य सेट उभा केला. सेटवरच्या तालमी झाल्या नव्हत्या. थेट नाटकालाच उभे राहिलो. पडदा उघडला. नेपथ्य पाहून टाळ्यांचा कडकडाट झाला. नाटक सुरू झालं. एक कलाकार वरच्या मजल्यावर गेला आणि अख्खा सेट हलू लागला. नाटकात पात्रेही खूप आणि वर ये-जाही खूप. आनंदीबाई पेशवेंच्या भूमिकेत मी वरच्या मजल्यावर प्रवेश केला खरा, पण पडेन म्हणून स्वत:ला सांभाळत बसले. पाचव्या मिनिटाला नाटक कोसळलं. आणि मी ‘आजची’ राजकीय स्त्री होणार होते त्याचे अर्थच संपले. उत्तम विषय हलत्या नेपथ्याने लुप्त झाला.
विविध माणसं, विविध अनुभव… जगण्याचे श्वास सतत नवं काही देतात…नवी ऊर्मी पेरत जातात.
sushama.deshpande@gmail.com