|| डॉ. राजन भोसले

डॉक्टर आपटे आणि माझा परिचय मेडिकल कॉलेजमध्ये असल्यापासूनचा. ते माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठे. पुढे आपापली मेडिकल प्रॅक्टिस सुरू केल्यानंतरही आम्ही एकमेकांच्या संपर्कात राहिलो. मुंबईच्या एकाच भागात राहात असल्यामुळे अनेकवेळा आमच्या योगायोगाने गाठीभेटी होत.. कधी कार्यशाळा, परिसंवादांमध्ये तर कधी एखाद्या मॉलमध्ये. भेटल्यावर एकमेकांची विचारपूस करणं, कधी एखादं गॉसिप तर कधी एखादा रुग्ण वा त्याचा आजार यावर चर्चा करणं, कधी गंभीर चर्चा तर कधी थट्टामस्करी करणं असं करत आज बत्तीस वर्ष उलटली.

वीस वर्षांपूर्वी माझं लैंगिक शिक्षणावरचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं आणि त्यानंतर एक एक करून माझी या विषयांवरची सात पुस्तकं प्रकाशित होत गेली. अनेकवेळा भेटणारे मित्र आणि सहकारी पुस्तकांबद्दलच प्रामुख्याने माझ्याशी बोलत. माझ्या पुस्तकांच्या प्रकाशनानंतर डॉ. आपटे मात्र जेव्हा जेव्हा भेटत तेव्हा तेव्हा त्यांचं एकच पालुपद ते पुन:पुन्हा आळवत, ‘‘राजन, मला तुझ्या पुस्तकांची गरज नाही. माझं ऑलरेडी लग्न झालं आहे आणि मला दोन मुलं आहेत.’’ जणू काही लैंगिक शिक्षणाची गरज फक्त ज्यांची लग्न झालेली नाहीत किंवा ज्यांना

मुलं झालेली नाहीत अशांनाच असते असा काहीसा आविर्भाव मला त्यांच्या बोलण्यात जाणवत असे. डॉ. आपटे थोडंफार गमतीने असं म्हणत असतील अशा समजुतीने मी सुद्धा त्यांचं बोलणं फारसं कधी गांभीर्याने घेतलं नाही. पण माझी पुस्तकं म्हणजे केवळ ‘शारीरिक संबंध कसे ठेवायचे’ याची माहिती देणारी पुस्तकं आहेत, असा काहीसा समज त्यांचा असावा, असं माझ्या मनात मात्र नक्कीच येऊन गेलं. याचं कारण लैंगिक शिक्षण या विषयाबद्दल हा असा समज अनेकांचा असतो हे मी अनेक वर्ष ऐकत आणि पाहात आलो आहे. एखाद्या डॉक्टरलाही लैंगिक शिक्षण म्हणजे नेमकं काय, त्यात काय काय अंतर्भूत असतं हे माहिती नसावं ही गोष्ट मात्र खेदजनक होती.

त्यानंतर एके दिवशी अचानक रात्री थोडा उशिराच मला डॉ. आपटेंचा फोन आला. ‘‘काही वैयक्तिक बोलायचंय, कधी भेटू या?’’ असं त्यांनी विचारताच मी त्यांना, ‘‘काही र्अजट असेल तर आत्ता घरी आलात तरी चालेल’’ असं म्हटलं. त्यांच्या आवाजातली चिंतातुर कातरता मला जाणवली होती. मी तत्परता दाखवताच ते तयार झाले. अर्ध्या तासात ते आणि त्यांची डॉक्टर पत्नी माझ्या घरी आले.

सुरुवातीच्या सोपस्कारांनंतर डॉ. आपटे बोलू लागले. मुंबईच्या एका उच्चभ्रू शाळेत शिकत असलेल्या डॉक्टरांच्या १५ वर्षांच्या मुलाला शाळेतून अचानक काढून टाकले गेले होते. डॉक्टरांचा मुलगा शाळेतल्या मुलींना व्हॉट्सअपवर अश्लील छायाचित्रं आणि व्हिडीओ पाठवत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. अनेक मुली व त्यांचे पालक यांनी याची गंभीर दखल घेऊन, शाळेच्या व्यवस्थापकांकडे जोरदार आणि सामूहिक तक्रार केली होती. त्यावर कडक आणि तत्काळ कारवाई व्हावी असा धमकीवजा आग्रहसुद्धा पालकांनी धरला होता. हे प्रकरण शाळेला बदनाम करू शकेल या भीतीने शाळेने डॉक्टरांच्या मुलाबाबत त्याला तडकाफडकी शाळेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता.

मुलाच्या भवितव्याचे काय?.. याहीपेक्षा असं विकृत वर्तन करणाऱ्या आपल्या १५ वर्षांच्या मुलाबाबत आता आपण काय पवित्रा घ्यायचा? हा विषय कसा हाताळायचा? त्याच्याशी हा विषय कुणी व कसा बोलायचा? त्याला या विकृतीतून कसं बाहेर काढायचं? अशा अनेक गोष्टी डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीला भेडसावत होत्या. एका बाजूला स्वत:च्या नावलौकिकाची चिंता तर दुसरीकडे मुलाबद्दलच्या काळज्या – त्याचं मानसिक संतुलन, त्याच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, त्याच्या लैंगिक वर्तनाबाबतची विवंचना! या सर्वाची सांगड कशी घालायची, या सर्वाचं परिमार्जन कसं करायचं, याबद्दल कसलीही कल्पना डॉ. आपटे किंवा त्यांच्या डॉक्टर पत्नीला नव्हती. डॉक्टर किंवा त्यांच्या पत्नीने कधीही मुलाला लैंगिकतेबाबत कसलंही ज्ञान कधी दिलं नव्हतं. त्याच्याशी लैंगिकतेबाबत कसल्याही पद्धतीची चर्चा कधीही केली नव्हती. आज अचानक हे मोठं संकट त्यांच्या समोर उभं राहिलं होतं.

या प्रकारच्या केसेस हाताळण्यासाठी जी हिस्ट्री घ्यावी लागते ती घेताना मी त्या अनुषंगाने डॉक्टरांकडे त्यांच्या मोठय़ा मुलीबाबत चौकशी केली. साधारण दोन-अडीच वर्षांपूर्वीच तिच्या लग्नाच्या रिसेप्शनला गेलेलं मला आठवत होतं. मोठय़ा मुलीबाबत विचारताच डॉक्टरांचा चेहरा अधिकच पडला. तिचं लग्न मोडलं होतं. तिच्या नवऱ्याने, ती शारीरिक संबंधांना नकार देत असल्यामुळे वाट बघून तिला माहेरी पाठवलं होतं आणि लगेचच घटस्फोटाची मागणी केली होती. मुलगी माहेरी परत येताच तिच्या आईला तिने आपल्याला शारीरिक संबंधाची प्रचंड भीती वाटते हे स्वत:हून सांगितलं होतं. या मुलीलासुद्धा डॉक्टर दाम्पत्याने लग्नानंतरच्या शारीरिक संबंधांबाबत कसलीही माहिती लग्नाआधी कधी दिली नव्हती. पालक म्हणून आपण आपल्या कर्तव्यांमध्ये कमी पडलोय याची पुरेपूर जाणीव डॉक्टर आपटेंना झालेली असल्याचं आता स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावर मला दिसत होतं.

डॉ. आपटेंच्या दोन्ही मुलांच्या बाबतीत जे समोर आलं होतं ते हे की, दोन्ही मुलांच्या जीवनातील समस्या ‘लैंगिकतेशी’ जुळलेल्या आणि लैंगिक अज्ञानातूून उपजलेल्या होत्या. दोन्ही मुलं आपापल्या प्रकारे लैंगिकतेबाबत एकतर अनभिज्ञ होती किंवा अस्वस्थ होती. दोघांना आपल्या लैंगिकतेशी झुंजावं लागलं होतं व दोघेही लैंगिकतेमुळेच बेजार झाले होते. साहजिकच वाढीच्या वयात लैंगिकतेबाबत त्यांची जडणघडण होत असताना त्यांना कुणीही वयानुरूप असं मूल्याधार लैंगिक शिक्षण कधी दिलं नव्हतं हे स्पष्ट दिसत होतं. उलट दोघांचं वर्तन हे लैंगिकतेबद्दलच्या चुकीच्या धारणा, कल्पना व समजुती यांमधून घडत गेलं होतं.

मुलांना वाढीच्या वयात लैंगिकतेबाबत, वेळोवेळी, वयानुरूप अशी योग्य माहिती व समज देणं गरजेचं असतं हे अनेकांना उमजत नाही व उमजलं तरी पटत नाही व जमतही नाही. त्यामुळेच ही माहिती मुलांना देण्याची जबाबदारी न घेण्याची चूक अनेक पालक करतात. दोघे डॉक्टर असूनही ही चूक आपटे दाम्पत्याने केली होती. असं होण्यामागे अनेकवेळा पालकांचं स्वत:चं अज्ञान, पूर्वग्रह अन् गैरसमज दडलेले असतात. पालकांच्या स्वत:च्या लैंगिकतेबाबतच्या धारणा, दृष्टिकोन व समजुती यातूनच प्राथमिकत: मुलांच्या लैंगिकतेबाबतच्या धारणा, भावना व वैचारिक जडणघडण आकार घेत असतात.

‘‘राजन, मला तुझ्या पुस्तकांची गरज नाही. माझं ऑलरेडी लग्न झालं आहे आणि मला दोन मुलं आहेत,’’ असं मला वारंवार म्हणणाऱ्या डॉक्टर आपटेंना खरंतर हे म्हणण्याची गरज होती की, ‘माझं लग्न होऊन मला दोन मुलं आहेत म्हणूनच मला आवर्जून लैंगिक शिक्षणावरची पुस्तकं वाचायला हवीत.’

जसं मुलांवर प्रेम करण्याची प्राथमिक जबाबदारी ही पालकांचीच असते व तेच मुलांवर प्रेम करण्यात अग्रणी असावेत; तसंच मुलांना मूल्याधार लैंगिक शिक्षण देणं ही जबाबदारीसुद्धा पालकांचीच असायला हवी आणि तेच त्यात अग्रणी असायला हवेत. शाळा, संस्था पुढे त्यात पूरक अशी भर मात्र नक्कीच टाकू शकतात.

योग्य वेळी व योग्य वयात जे डॉक्टर आपटेंनी करायला हवं होतं ते उशिरा का होईना एक डॉक्टर म्हणून मी त्यांच्या मुलांच्या बाबतीत केलं. वेळ गेला पण आज त्यांची दोन्ही मुलं पुन्हा एक आनंदी व निकोप जीवन जगत आहेत. मुलगा मेडिकल कॉलेजमध्ये शिकतोय व त्याला मानसोपचारतज्ज्ञ व्हायचंय तर मुलीचा पुनर्विवाह होऊन तिला आज एक गोड मुलगी झाली आहे.

पालकत्वाची जबाबदारी सांभाळताना चुका सर्वाकडून होतात. चुका केल्या नाहीत असे पालक शोधणे अवघड. आपल्या चुका मान्य करून, त्या सुधारून पुढे मार्ग काढत राहणे हे सजग पालकत्वाचं लक्षण आहे.

जे डॉक्टर आपटेंच्या बाबतीत घडलं ते कमी-जास्त स्वरूपात अनेक घरांमध्ये घडताना मी पाहिलं आहे. पूर्वीच्या पिढय़ांना जे ‘नॉलेज’ थोडं उशिरा देऊन चालत होतं ते आज इंटरनेटच्या युगात खूप आधी आणि लवकर देण्याची गरज निर्माण झाली आहे. कुठल्याही परीक्षेची योग्य पूर्वतयारी केली असेल तर जसं परीक्षा देणं सोपं होतं. तसंच स्वत:ची आणि आपल्या मुलांची याबाबतची पूर्वतयारी करून ठेवलेली असणं हेसुद्धा आज खूप गरजेचं होऊन बसलं आहे.

(वरील लेख हा सत्य घटनांवर आधारित आहे, पण त्यातली नावं व काही तपशील गोपनीयतेच्या उद्देशाने बदललेला आहे.)

rajanbhonsle@gmail.com