ज्यांना जबरदस्तीने विवाह करायला लागत आहेत, ज्यांचं कौमार्य लुटलं गेलं आहे आणि म्हणूनच ज्यांना सतत मृत्यूच्या छायेत राहावं लागतंय अशा स्त्रियांसाठी तिला काम करायचं आहे. तिने आपल्या आयुष्याचं ध्येय पक्कं केलं आहे. आज ती अशा अनेक कुर्दिश स्त्रियांचे प्रेरणास्थान बनते आहे. ती लतिफा अली. अनेक संकटांचा सामान करत आज ती स्वत:च्या घरी परतली आहे, परंतु आजही तिच्यावर मृत्यूची टांगती तलवार आहेच.
कोमल, नाजूक असा जिच्या नावाचा अर्थ आहे, त्या लतिफाला तिच्या फुलायच्या दिवसांत आणि ऐन तारुण्यातच एवढय़ा टोकाचा, तिरस्काराचा, प्रतारणेचा, हिंसाचाराचा आणि संकटांचा सामना करावा लागणं, तोही आपल्याच माणसांकडून, हा केवढा विरोधाभास! आजही ती मृत्यूच्या छायेतच वावरते आहे, परंतु तिने आता तिच्यासारख्या अनेकींसाठी आवाज उठवायचं ठरवलं आहे.
तुर्कस्थान, इराण, इराक आणि सीरिया या प्रांतांत अंदाजे ३९२००० कि.मी. क्षेत्रात विखुरलेल्या आणि कुर्दिस्तान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, राजकीय अशांततेने ग्रासलेल्या प्रांतात लतिफा अलीचा जन्म झाला. तिचे वडील खलिद हे पेशमेरया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुर्दी स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक होते. कुर्दिस्तानच्या डोंगराळ भागाशी ते चांगले परिचित होते. लतिफाच्या आईचं नाव बैआन. पाचूच्या रंगाचे विशाल नेत्र, फिक्कट केस आणि गोरा रंग, यामुळे ती सुंदर दिसे आणि लोकांच्या नजरा तिच्याकडे आपोआपच आकर्षित होत. लतिफाही पुढे तिच्यासारखीच सुंदर दिसू लागली आणि तिचं सौंदर्य हाच बऱ्याच वेळा तिच्यासाठी एक शाप ठरला.
लतिफा अवघी दोन वर्षांची असताना सद्दाम हुसेनने इतर चार कुटुंबांबरोबर खलिदच्या कुटुंबालाही स्वातंत्र्यसैनिक असल्याने जिवे मारण्याच्या काढलेल्या फतव्यामुळे कुर्दिस्तानातील डोंगरदऱ्या ओलांडत, नातेवाइकांकडे मुक्काम करत, सगळं कुटुंब प्रथम तेहरान, नंतर पोलंड आणि मग ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झालं होतं. खलिद एक कुशल कारागीर असल्याने त्यांना ऑस्ट्रेलियात स्थायिक होण्यासाठी मदतच झाली.
प्रथम लिव्हरपूल भागात आणि नंतर चीपिंगनॉर्टन येथे घर घेऊन खलिद आणि बैआन यांनी आपला जम बसवण्याचा प्रयत्न केला. लतिफा कुर्दिश भाषेबरोबरच इंग्रजीही शिकली. तिला एक भाऊ आणि एक बहीण होती. लतिफाचं रूप आईसारखंच मोहक होतं. पण तिच्या आईच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळेच बेत शिजत असल्याचा लतिफाला संशय येई. तिच्या वडिलांनी कष्टाने मिळवलेल्या पैशातील दोन लाख डॉलर्स तिने बँकेतून परस्पर काढून घेतले. पुढे लतिफाला कळलं की तिने ते तिच्या जर्मनीत राहणाऱ्या भावाला पाठवले होते. ऑस्ट्रेलियात असतानादेखील बैआन वरचेवर जर्मनीला जात असे आणि नंतर तर तिने तिथेच स्थायिक व्हायचं ठरवलं. खलिद आणि बैआनचा जोडा विजोड होता. ती दिसायला सुंदर, तर वडील काळसर, बुटके आणि दाढी ठेवणारे. तिच्या जीवनशैलीमुळे त्यांच्यात विसंवाद निर्माण झाला आणि शेवट दोघांनी फारकत घेण्याच्या निर्णयाप्रत येण्यात झाला.
जर्मनीला स्थायिक होण्यासाठी जायचं ठरवून मुलांसह बैआन ऑस्ट्रेलियातून निघाली, पण तिच्या मनात एक दुष्ट बेत आकार घेत असल्याने लतिफाचे आजोबा खूप आजारी असल्याने त्यांची शेवटची भेट घेण्यास जात आहोत असं सांगून मुलांना घेऊन तिने इराकी कुर्दिस्तान गाठलं. पण गावी पोहोचल्यावर लतिफाला आजोबा ठणठणीत असल्याचं दिसलं आणि त्यानंतर तिच्यावर कोसळणाऱ्या विचित्र प्रसंगांच्या मालिकेला सुरुवात झाली. लतिफाचा पासपोर्ट तिच्याकडून हिसकावून घेतला गेला. तिचे कपडे वेगळे केले गेले. ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीतील तिच्या मित्रमैत्रिणींचे पत्ते असलेली वहीदेखील काढून घेतली गेली. ‘तुला आता कुठेही जायची गरज नाही, तू इथेच राहशील, इथेच तुझं लग्न होईल आणि इथेच तू तुझ्या मुलांना वाढवशील’, असं तिने कठोरने लतिफाला सांगितलं. लतिफाने स्वत:च्या मनगटावर सुरी मारून तिच्या निर्णयात बदल व्हावा म्हणून प्रयत्न केला, पण दगडाला पाझर फुटला नाही.
‘तुझं इथेच लग्न होईल,’ या तिच्या आईच्या शब्दांनी लतिफाला तिचा मृत्यू साक्षात डोळय़ांसमोर दिसत होता, कारण मिखाईल या तिच्या दूरच्या भावाने त्याला बरं नसल्यामुळे सूप बनवून देण्याच्या निमित्ताने तिला घरी बोलावून घेतलं आणि नंतर जबरदस्तीने तिचं कौमार्य लुटलं होतं. नंतर मिखाईल ‘लग्न कर’ म्हणून तिच्या मागे लागला. कौमार्य लुटलं गेलेल्या लतिफाचं दुसऱ्या कोणाशी लग्न होणं कठीण आहे, हे त्याला ठाऊक होतं. कारण लग्नाच्या पहिल्या रात्री प्रत्येक तरुणीला ती कुमारी आहे हे सिद्ध करायला लागायचं. अन्यथा धडगत नसायची. पण तरीही लतिफाने त्याला स्पष्ट नकार देत सांगितलं, ‘आपल्या दोघांत आता कोणत्याही कोमल भावना उरल्या नाहीत.’
लतिफाचे वडीलही ऑस्ट्रेलियातून कुर्दिस्तानला परतले. मात्र स्वत:च्या आईबरोबर वेगळे राहत होते. लतिफाला त्यांच्या घरी पोहोचती केल्यावर बैआन धाकटय़ा बोजीनला घेऊन जर्मनीला निघून गेली. आणि लतिफाला वडिलांबरोबर जुनाट, अंधाऱ्या अशा कडक, काटेकोर नियम लादलेल्या घरात डांबण्यात आलं. तिची खाष्ट, अतिशय मागासलेल्या विचारांची आजी आणि तिच्या आत्या तिचा दुस्वास करीत. लतिफाने हौसेने आणलेल्या तिच्या महागडय़ा, सुरेख कपडय़ांच्या कात्रीने चिंध्या करीत. लतिफाने त्या विरोधात निषेध व्यक्त केला. वडील तिची बाजू घेत तर नव्हतेच, उलट तिच्यावर हात उगारत. तिच्यावर दिवसांतून पाच वेळा नमाज पढण्याची, स्कार्फने पूर्ण डोकं झाकून घेण्याची, आतील कपडय़ांवर वरून एक पायघोळ झगा घालण्याची सक्ती सुरू झाली आणि लतिफाच्या यातनामय आयुष्याला सुरुवात झाली. ती नैराश्याने ग्रासून गेली. आधुनिक विचाराचे वडील आता पूर्णपणे पारंपरिक विचार करायला लागलेले होते. तिला यातून सुटका हवी असते. त्यासाठी तिला इराकमधून बाहेर पडायचे असते. त्यासाठी धडपडत असताना तिला शेवटी तिथून निघण्याचा एक मार्ग सापडला. हदर नावाच्या तिच्या आत्याबरोबर वडिलांच्या संमतीने ती बगदादला गेली. हदर अर्धवेळ शिक्षिकेचं काम करत असे, तर तिचा नवरा अब्दुल्ला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जागतिक अन्न विभागात ड्रायव्हरची नोकरी करत असे. हदर आणि अब्दुल्लाकडे राहत असताना तिथेही लतिफाला अब्दुल्लाने चालवलेल्या तिच्या लैंगिक छळवणुकीला तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ असं सामोरं जावं लागलं, पण सुटका करून घेण्यासाठी त्याची काहीतरी मदत होऊ शकेल, या आशेने लतिफाने सगळं सहन केलं. पण पदरी आली ती निराशाच.
पुन्हा वडिलांचं घर. नंतर योगायोगाने लतिफाला तिच्या व्हिआन नावाच्या आत्याच्या ऑफिसात सेक्रेटरीची नोकरी मिळते. बांधकाम व्यवसायचं स्वरूप वरवर दिसत असलं तरी झानाने चालवलेलं ते ऑफिस म्हणजे छुपी हेरगिरीच असते. झाना तिचा तरतरीतपणा, बुद्धिमत्ता पारखून तिला गुप्तपणे गाडी चालवण्याचं, नेमबाजीचं प्रशिक्षण देतो. युनोचा एक प्रतिनिधी, डेव्हिड याच्याशीही लतिफाची जवळीक वाढते. झाना तिला डेव्हिडच्याच बातम्या काढायला सांगतो. लतिफाची द्विधा मन:स्थिती होते, पण कोणीतरी आपल्याला सुटकेचा मार्ग दाखवेल, या आशेने लतिफा दोघांचीही मर्जी राखण्याची तारेवरची कसरत करत असते. पण झानाच्या कंपनीला पाइपलाइनचं काम न मिळाल्याने तिची आत्या सरकारी नोकरी धरते, आणि आत्या आता त्या ऑफिसात नाही, म्हणून लतिफाची नोकरी सुटते. डेव्हिड, झाना दोघांनीही तिची सोडवणूक करण्याचं वचन दिलेलं असतं, पण इथेही तिच्या पदरी निराशाच येते. त्याच दरम्यान तिला भेटतो रूजवन. तिच्या मैत्रिणीकडे आलेला हा मुलगा तिची सुटका करण्याचं आमिष दाखवून तिचे दागिने लुबाडून तिला एका घाणेरडय़ा  माणसाबरोबर शय्यासोबत करायला भाग पाडणार असतो. पण त्याने फसवलंय हे लक्षात आल्यावर ती तेथून पळ काढते. पण तिने कुर्दिस्तानवरून बगदादला पळून जायचा प्रयत्न केला होता, हे समजल्यावर रागाने वेडेपिसे झालेले तिचे वडील तिला जाड केबलने मरेस्तोवर मारतात. इतकं होऊनही लतिफाला शेवटी वडिलांच्याच पायांवर डोकं ठेवून क्षमा मागण्याची वेळ येते.
त्याच सुमारास २००३ मध्ये सद्दामला शोधून काढण्याची जोरदार मोहीम अमेरिकेने चालवलेली होती. त्याचे दोन मुलगे उदई आणि कुसई हे मोसूलमध्ये लपून बसल्याचा सुगावा अमेरिकेला लागल्यावर ते बॉम्बहल्ला करतात, त्यात ते ठार होतात. त्यानंतर १३ डिसेंबर २००३ला विक्रित शहराजवळच्या एका शेतात सद्दामलाही अमेरिकी सैन्याकडून पकडण्यात येते. कुर्दिस्तानात आनंदाचा जल्लोष होतो.
त्याच दरम्यान तिचा अमेरिकेत टेक्सास येथे राहणारा आतेभाऊ वाहेल कुर्दिस्तानात येतो. त्याच्याच ओळखीने तिला ४०६ लिव्हिल अफेअर्स नाव असलेल्या अमेरिकी सैन्याच्या शासकीय विभागात दुभाषाची नोकरी मिळते. आश्चर्य म्हणजे वडिलांनीही तिला परवानगी दिलेली असते. लतिफाचं भाषाप्रभुत्व, तिचा लाघवी स्वभाव आणि तिची जीवघेणी, विचित्र परिस्थिती तिथल्या काही सुस्वभावी अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर ते तिला मदत करायचं ठरवतात. त्यातल्या एका अधिकाऱ्याचा ती ‘मॅट’ म्हणून उल्लेख करते.
कुर्दिस्तानमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात लतिफाला शेवटी ऑस्ट्रेलियन वकिलातीतील योग्य व्यक्तीबरोबर संवाद साधता येतो. पण ती व्यक्ती तिथे प्रत्यक्ष येणं आवश्यक आहे, हे निक्षून सांगते. पुढे सरकणाऱ्या काळाबरोबर आता लतिफाची स्पर्धा असते. गोष्टी हाताबाहेर चालल्याचं कळल्यावर मॅट लतिफाची ओळख आपत्कालीन अमेरिकन शासनाच्या काळजीवाहू अधिकाऱ्याबरोबर करून देतो. एक दिवस डॅनियल नावाचा अधिकारी तिला तिच्या महत्त्वाच्या वस्तू रोज थोडय़ा थोडय़ा बॅगेत भरून आणायला सांगतो. तिच्यासाठी वाहनाची व्यवस्था केलेली असते. तिचा पाठलाग झाल्यास त्यांना अडवता यावं, यासाठी तीन शस्त्रसज्ज अमेरिकन तिच्यासाठी तैनात करण्यात येतात. ‘मी कुर्दिस्तान आणि इराक माझ्या स्वत:च्या मर्जीने सोडून जात आहे’ असे शब्द तिच्याकडून वदवून रेकॉर्ड करण्यात येतात. रस्त्यावर कुर्दिस्तानची तीन तपासणी केंद्रे असल्याने लतिफाला गाडीत मागच्या सीटवर तोंडावर ब्लँकेट घेऊन झोपावं लागतं.
मोसूल शहराच्या लष्करी विमानतळावर तिला बगदादला नेण्यासाठी हक्र्युलस विमान उभं असतं. पण तिला त्या लष्करी तळावर काही काळ थांबावं लागणार असतं. एका तात्पुरत्या उभारलेल्या इमारतीत तिच्या राहण्याची सोय करण्यात आलेली असते. तिच्या जेवणखाण्याचीही सोय तिथेच असते. ती रात्र लतिफा तेथेच काढते. युद्धाचा काळ असल्याने विमानांची उड्डाणे वेळापत्रकाप्रमाणे नव्हती. त्यामुळे तिसऱ्या दिवशीदेखील तिचा पुढचा प्रवास अधांतरीच असतो. ती पळून जाते आहे हे कळल्यावर तिचे वडील, त्यांचे भाऊ आणि काका तिचा शोध घेण्यासाठी बंदुका, तलवारी घेऊन तळावर हजर झाले होते, ‘मी तिला ठार करेन’ अशा आरोळय़ा देत फिरत होते.
२ जून २००४ रोजी अमेरिका सैन्यातील कर्मचारी आणि काही पत्रकारांसह लतिफा हक्र्युलस विमानाने तिच्या घराच्या वाटेने निघाली होती. ‘सर्व कायदेकानू धाब्यावर बसवून तिला मदत करणाऱ्या, स्वत:चा जीव धोक्यात घालणाऱ्या अमेरिकी लोकांचे मी देणे लागते,’ असं लतिफा मान्य करते.
सिडनी विमानतळावर ती पोहोचली, तेव्हा सूर्योदय झालेला होता. लतिफाच्या आयुष्यातील एक दु:स्वप्न संपलेलं होतं. पण आजही ती मृत्यूच्या छायेत आहे, कारण तिने तिची ही कहाणी ‘ब्रिटेड- इस्केप फ्रॉम इराक’ या पुस्तकाद्वारे प्रकाशित केली आहे. लग्नापूर्वीच आपलं कौमार्य भंग झालंय हे तिनं प्रसिद्ध केलंय. त्यामुळे तिच्या जिवाला धोका आहे हे तिला माहीत आहे. म्हणूनच तिने समोर न येता पडद्यामागून काम करायचं ठरवलं आहे. ज्यांना जबरदस्तीने विवाह करायला लागत आहेत, ज्यांचं कौमार्य लुटलं गेलं आहे आणि म्हणूनच ज्यांना सतत मृत्यूच्या छायेत राहावं लागतंय अशा स्त्रियांसाठी तिला काम करायचं आहे. तिने आपल्या आयुष्याचं ध्येय पक्कं केलं आहे. आज ती अशा अनेक कुर्दिश स्त्रियांचे प्रेरणास्थान बनते आहे.

खुलासा –
१८ जानेवारी च्या चतुरंग मधील ‘माझं मीपण या इथं ठेवून जाईन’ या डॉ. लिली जोशी यांच्या लेखाच्या शेवटी आलेल्या कवितेच्या दोन ओळी- ‘जाता जाता काही तरी.’ दुर्गा भागवत यांच्या नसून  अंजली कीर्तने यांनी दुर्गाबाईंवर केलेल्या कवितेतून उद्धृत केल्या आहेत.
संदर्भ अंतर्नाद दिवाळी अंक