जिंतूर, औरंगाबाद आणि मुंबई येथील शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये एकूण ३२ वर्षांच्या शासकीय सेवेनंतर मुंबई येथील शासकीय तंत्रनिकेतन मधून ग्रंथपाल या पदावरून मे २०१६ मध्ये सेवानिवृत्त झालो. आज वयाची साठ वर्षे पूर्ण करून सुखासमाधानाने जीवन जगत असताना मागे वळून पाहिल्यास खाचखळग्यांनी भरलेला जीवनपट नजरेसमोरून आल्याशिवाय राहात नाही. पण ते सारे मागे पडले आहे.

सेवानिवृत्तीनंतर माझ्या आतल्या आवाजाची जाणीव होऊ लागली. योग हा माझा आवडीचा विषय. सेवेच्या काळात योगासाठी पुरेसा वेळ देऊ शकला नव्हतो. आता ती उणीव भरून काढण्याचा विचार पक्का केला. मला लाभलेल्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्यामुळे आज मी आरोग्यपूर्ण जीवन जगत आहे. मॉर्निग वॉक तर पंचवीस वर्षांपासून अखंडित चालूच आहे. त्याला आता जोड मिळाली ती योगाची. त्यामुळेच की काय उच्चरक्तदाब आणि मधुमेह या श्रीमंत रोगांपासून दूर आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर पुढे काय करावे, असा प्रश्न कधी पडलाच नाही. योगाची आवड असल्यामुळे सेवानिवृत्तीनंतर डोंबिवलीच्या प्रगती महाविद्यालयातून योग शिक्षक पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठात एम. ए. (योग) साठी प्रवेश घेतला. आता नियमितपणे सकाळी एक तास योगासने आणि प्राणायाम करण्यास सुरुवात केली आहे. आसनांचा चांगला सरावही झाला असल्यामुळे वसई तालुका कला क्रीडा महोत्सवात योगासनाच्या स्पर्धेत मला द्वितीय पारितोषिक मिळाले. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. बांद्रा उपनगर योग कल्चरल असोसिएशनने आयोजित योगासन स्पर्धेतही मी द्वितीय क्रमांक पटकावला आणि औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत मुंबईचे प्रतिनिधित्व केले. पुणे येथे ‘योगीक डायट’ या विषयावर राज्यस्तरीय सेमिनारमध्ये ‘ऋ तुचर्येनुसार योग साधकांसाठी आहार’ या विषयावर पेपर सादरीकरण केले. जानेवारी २०१८ मध्ये पुणे येथे आयोजित केलेल्या पुणे इंटरनॅशनल योगा फेस्टिवलमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. या आणि अशा अ‍ॅक्टिव्हिटीमुळे प्रत्येक दिवस उत्साहात जातो आणि तब्येतही खूश राहते.

विरार येथील ‘अंबिका योग निकेतन’ या संस्थेत गेल्या दीड वर्षांपासून योगाचे प्रशिक्षण घेत आहे. सोपानराव काळे, संजय चौधरी, डॉ. प्रमोद सावंत आणि डॉ. अक्षर कुलकर्णी हे माझे योगशास्त्रातील आदर्श आहेत. स्वत:साठी जगताना योगाचा सखोल अभ्यास आणि प्रेरणादायी साहित्याचे वाचन चालू आहे. चांगली नाटके, परिसंवाद, नाटय़स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानमाला यांनाही आवर्जून हजेरी लावतो. आम्हा उभयतांना पर्यटनाची जबरदस्त आवड असल्यामुळे भारतातील चार धाम यात्रा पूर्ण करून थायलंड, मलेशिया, सिंगापूर आणि दुबई या चार देशांची पर्यटनवारीही पूर्ण केली आहे.

सेवानिवृत्तीनंतर पैसा कमावण्यासाठी काही करायचे नाही हे अगोदरच ठरवले असल्यामुळे आपणही योगा करायचा आणि आपल्या आसपासच्या लोकांमध्येही योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हातभार लावण्याचा इरादा पक्का आहे.

वयाची साठी पूर्ण करून एकसष्ठाव्या वर्षांतही मी विद्यार्थीदशेचाच अनुभव घेतो आहे. सेवानिवृत्तीनंतरच्या माझ्या शिक्षणासाठी पत्नीचीही मनोमन साथ आहेच. यापुढे योग विषयाची ‘क्युसिआय’ ही ग्लोबल योगा टीचरची स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करण्याचा आणि योगामध्ये संशोधन करण्याचा मानस आहे.

– किशन रंगराव भवर,  विरार (प.)

 

जगण्याची उमेद कायम

वयाच्या ७७ व्या वर्षी जगण्याची उमेद कायम आहे. वयोमानाने व्याधी आहेत, पण तरीही नवनवीन गोष्टी पाहण्याची, अनुभवण्याची, फिरण्याची हौस आहे. ७ वर्षांपूर्वी पतीनिधन झाले, ते एक वर्ष अत्यंत कठीण गेले परंतु हळूहळू सावरीत आयुष्याच्या संध्याकाळीही पुष्कळ काही करता येते हे जाणून उत्साह आला.

नात पुण्याला शिकण्यासाठी गेली. घरात लँडलाइन फोन होता, पण तो वरच्या मजल्यावर. तेव्हा नातेवाईकांशी, नातीशी बोलण्यासाठी मोबाइल फोन घेतला. इंग्रजी तर कळत नाही तेव्हा मराठीत नावे टाकून घेतली व मोबाइल वापर सुरू केला. फिरण्याचे म्हणाल तर अजूनही बाहेरगावी लग्नकार्य, कार्यक्रमात जाते ते पथ्यपाणी औषधे सांभाळून!

अलीकडे मात्र नातेसंबंध तुटत चालले आहेत. निमित्त कारणांनीच लोक एकमेकांकडे जातात, काम असेल तरच फोन करतात. पूर्वीसारखे सहज जाणे-येणे, खुशालीची पत्रे फोन वगैरे कमी होत आहेत याची खंत वाटते. परंतु काळानुसार होणारे बदल आमच्या पिढीने पचवले असल्याने हे असेच चालणार या वृत्तीने समाधान टिकवते. नव्या पिढीतील नातेवाईक, परिचित, शेजारी वगैरे व्यक्ती जेव्हा एखादा सल्ला मागतात तेव्हा देते परंतु विनाकारण प्रत्येक गोष्टीत लक्ष घालीत नसल्याने मनस्ताप होत नाही. अनेकांचे कौटुंबिक नातेसंबंधांतील समस्या असतात, जुन्या पिढीतील म्हातारी म्हणून सल्ला विचारतात तेव्हा बदलत्या काळाचा अंदाज घेऊन काळानुरूप विचार देते. वेगळे काही उपक्रम नसले तरी घराबाहेरील अंगणात झाडे लावली आहेत. वाचनाची आवड वाचनालयातून पुस्तके आणून जोपासत आहे व कित्येक वर्षांपासून ‘लोकसत्ता’ आहेच! माझ्यासारख्या अल्पशिक्षित गृहिणीलाही वृद्धापकाळी मनातील विचार लिहिता आले हेच पुष्कळ!

– सीमंतिनी काळे, सातपूर गाव, नाशिक

 

अवघे ९४ चे वयमान..

जन्म हा आरंभ बिंदू आणि मृत्यू हा अंतिम बिंदू, या दोन्ही बिंदूना जोडणारी रेषा म्हणजे आयुष्यरेषा. ही रेषा किती घट्ट असते आपल्याला माहीत नसते, परंतु या रेषेवरचा प्रवास हा अपरिहार्य जसा असेल तसा करावाच लागतो. या प्रवासातील ९४ व्या ठिकाणावर मी आता येऊन पोहोचलो आहे. आत्तापर्यंतच्या आयुष्यातील सुखाच्या आयुष्याचा गुणाकार करून ते क्षण द्विगुणित करून आणि दु:खाच्या क्षणांचा भागाकार करून बाकी शून्य करून पुढचा प्रवास सुरू आहे.

पाटबंधारे खात्यातून १९८४ मध्ये सेवानिवृत्त झालो. कोयना, पोफळी, तिल्लारीनगर, कोल्हापूर आणि मिरज येथे नोकरी केली. १९६७ च्या कोयनानगर येथील भूकंपातून सर्व कुटुंब बचावले ही आयुष्यातील सर्वात लक्षवेधी घटना. त्या भूकंपाच्या आठवणीने अजूनही अंगावर शहारे येतात. आज माझ्याबरोबरचे अनेक सहकारी निवर्तले आहेत तर काही वयोमानाप्रमाणे होणाऱ्या दुखण्यांमुळे भेटू शकत नाहीत.

निवृत्तीनंतर ‘मिरज तालुका पेन्शनर असोसिएशन’च्या कामात झोकून देऊन काम केले आणि अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवले. त्यानंतर अनेक वर्षे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्षपद सांभाळले आणि या काळातही ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. मिरज येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची इमारत हे त्यातीलच मार्गी लागलेले एक महत्त्वाचे काम. आज हे केंद्र म्हणजे मिरज येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आपुलकीचे ठिकाण बनले आहे. सध्या या केंद्रात मी एक मार्गदर्शक आणि सल्लागार म्हणून आजही भूमिका बजावत आहे. इतर ज्येष्ठ नागरिक हे कार्य उत्तम प्रकारे चालवत आहेत याचा आनंद आहे.

आत्तापर्यंतच्या ९३ वर्षांच्या प्रवासात एखादे किरकोळ ऑपरेशन आणि दोन्ही डोळ्यांची मोतीबिंदूची ऑपरेशन्स सोडली तर अन्य व्याधी नाहीत. अद्यापपर्यंत पाठीच्या असलेल्या ताठ कण्यामुळे सकाळी साधारणपणे दोन कि.मी.पर्यंत जमेल तसे चालणे, थोडासा हलका व्यायाम करणे, संध्याकाळीही थोडे चालणे, दूरचित्रवाणीवरील बातम्या पाहणे, अर्थपूर्ण चर्चा ऐकणे, एखादी ऐतिहासिक मालिका बघणे, दुपारच्या वेळी वामकुक्षी घेणे, थोडेसे लिखाण करणे आणि घरात आलेल्या विविध वृत्तपत्रांमधील विविध प्रकारची सांस्कृतिक, माहितीपूर्ण लेखनाचे वाचन करणे आणि भेटायला येणाऱ्यांशी मनसोक्त गप्पा मारणे, मर्यादित स्वरूपात चहा-कॉफीचे सेवन आणि मर्यादित आहार, देवपूजा, आध्यात्मिक वाचन, व्याख्यानमालांना आणि राजकीय सभांना उपस्थिती हा दिनक्रम असतो. ज्येष्ठ नागरिकांच्या मासिकातून लेख लिहिल्यामुळे काही पुरस्कार देखील मिळालेले आहेत. ज्येष्ठांच्या खेळांच्या स्पर्धेत भाग घेऊन त्यातही बक्षिसे मिळवली आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फक्त दोन प्रकारच्या औषधांच्या गोळ्या चालू आहेत.

सेवानिवृत्तीनंतर पत्नीसोबत चारधाम यात्रा आणि काशीयात्रा केली. वयाच्या ८८ व्या वर्षी मुलगा, सून आणि नातवांबरोबर सिंगापूर, मलेशिया आणि इंडोनेशिया हा अविस्मरणीय प्रवास करण्यास मिळाला. सध्या पैलतीरावर अत्यंत तृप्त असून ‘पांव को रखो गरम (चालत राहा) पेट को रखो नरम (मितहार) सर को रखो ठंड (शांत राहा) और वैद्यजी को (डॉक्टर) मारो डंडा’ या सूत्रीनुसार जीवन जगत आहे. मुलगा आणि सुनेचा उत्तम आधार आहे. सर्वच नातवंडे सतत विचारपूस करत असतात आणि काळजी घेत असतात, त्यामुळे मानसिक स्वास्थ्यही उत्तम आहे. काळजीपोटी त्यांनी दिलेला सल्ला कधीही धुडकावत नाही. परमेश्वर कृपेने मिळालेली ताकद आणि स्थैर्य शेवटपर्यंत राहो अशी प्रार्थना आहे.

– गोपाळ रामचंद्र भाकरे, ब्राह्मणपुरी, मिरज