नवीन लग्न झालेली जोडपी कुटुंबनियोजन, संततिनियमन, याबाबतीत उदासीन असतात. पण त्यामुळे लग्नानंतर शारीरिक संबंधांमध्ये ताण वाढू शकतो. गर्भनिरोधकांचे अनेक पर्याय उपलब्ध असतानाही जोडपी यासंदर्भात सल्ला घ्यायला क्वचितच दवाखान्यात जातात. त्यामुळे काही वेळा अनियोजित गर्भधारणेला सामोरं जावं लागतं. म्हणूनच ‘संततिनियमन’ हा विषय जोडप्यांमध्ये आधीच चर्चिला जाणं आणि त्यासाठी अनुभवी डॉक्टरांशी सल्लामसलत करणं आवश्यक आहे.

जय आणि राधा अगदी खुशीत होते. ध्यानीमनी नसताना जयला नवीन नोकरीच्या निमित्तानं लंडनला किमान पाचेक वर्षांसाठी स्थायिक होण्याची संधी चालून आली होती. दोघांचं नवीनच लग्न झालं असल्यानं वय आणि उमेद दोन्ही त्यांच्या बाजूनं होतं. पुढच्या महिन्याभरातच तिकडे जायचं असल्यानं दोघांची आणि दोघांच्याही घरच्यांची अगदी लगीनघाई सुरू होती; पण त्यांच्या आनंदावर अचानक विरजण पडलं, कारण राधाला दिवस गेले. वास्तविक ही त्यांच्यासाठी ‘गुड न्यूज’ असायला हवी होती; पण ती नियोजित गर्भधारणा नसल्यामुळे प्रश्न निर्माण करणारी ठरली होती.

Loksatta chaturang Girlfriend love Family Responsibilities
माझी मैत्रीण : ‘आम्ही मैत्रीवर प्रेम करतो’
Loksatta chaturang life encouraged think Cognitive Science
जिंकावे नि जगावेही: विचारांची सदाबहार फुलबाग
Navratri
सर्जन सोहळा
chaturang jat panchayat
स्त्री-शोषणाचा जातपंचायतीचा विळखा
Loksatta chaturang article about children who think they own their parents money
सांदीत सापडलेले…! मालक कोण?
Loksatta chaturang bhay bhuti Fear of an event in life
‘भय’भूती: भय-भोवरा
chaturang article on Fear
इतिश्री : अशुभाची भीती
histrionic personality disorder
स्वभाव – विभाव : लक्ष वेधून घेण्याची धडपड
Learn to express gratitude, mistakes, gratitude,
सांधा बदलताना : चुकांचा स्वीकार

संततिनियमन हा विषय वाटतो तेवढा सोपा नाही. निरोध की गोळी, सुरक्षित काळातला समागम की त्रुटित संभोग, पुरुष नसबंदी की स्त्रियांची कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया असे यासाठीचे पर्याय आहेत.. मात्र जोडप्याच्या वयानुसार, लग्नाला किती वर्ष झाली आहेत, तसंच त्या त्या वेळच्या प्राधान्यक्रमानुसार कुटुंबनियोजनामागची भूमिका ही सतत बदलत असते. त्या बदलत्या भूमिकांमुळे काही वेळा गोंधळाची, तर क्वचित तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. कुटुंबनियोजनासंदर्भात योग्य माहितीपेक्षा गैरसमजांचा भरणाच अधिक असल्यामुळे हा महत्त्वाचा विषय दुर्लक्षित राहतो.

इचलकरंजीमध्ये प्रॅक्टिस करणारे गायनॅकॉलॉजिस्ट डॉ. मंदार देशपांडे सांगतात, ‘‘निमशहरी आणि ग्रामीण भागांत कुटुंबनियोजन ही संकल्पनाच अस्तित्वात नसल्यासारखी स्थिती आहे. लग्नानंतर बहुतेक जोडप्यांना पहिल्या तीन-चार महिन्यांतच गर्भधारणा राहते. यामागे गर्भनिरोधकांविषयीचे अज्ञान, दुर्लक्ष किंवा घरच्यांचा आग्रह यांपैकी कुठलंही कारण असतं. आज सहज अवलंबता येतील इतके गर्भनिरोधकांचे पर्याय उपलब्ध असतानाही क्वचितच जोडपी यासंदर्भात सल्ला घ्यायला दवाखान्यात येतात.’’ लग्नानंतर काही वर्ष कुटुंबनियोजन केलं, तर नंतर गर्भधारणा व्हायला अडचणी येतात, हा एक मोठा गैरसमज समाजात असल्याचं नमूद करत डॉ. मंदार सांगतात, ‘‘गर्भनिरोधकांविषयी अनेक गैरसमज आहेत. विशेषत: स्त्रियांनी गोळय़ा घेतल्या तर त्यांच्या शरीराचं नुकसान होतं आणि नंतर मूल हवं असेल तेव्हाही गर्भधारणा राहण्यात अडचणी येतात, असे परस्पर सल्ले दिले जातात. याउलट ज्या स्त्रियांची पाळी अनियमित आहे त्यांच्या मासिक पाळीचं चक्र सुधारण्याला गोळय़ांमुळे मदत होते. तसंच पाळीदरम्यान तीव्र स्वरूपात रक्तस्राव होत असल्यास तोही आटोक्यात येऊन रक्तातलं हिमोग्लोबिन वाढतं. गोळय़ांव्यतिरिक्त आज इंजेक्शनचाही पर्याय उपलब्ध असून, एकदा इंजेक्शन घेतलं, की तीन महिन्यांपर्यंत गर्भधारणा राहात नाही. तुमच्या प्रकृतीनुसार कोणत्या स्वरूपाची गोळी-इंजेक्शन घ्यायचं, याचा सल्ला डॉक्टरांकडून अवश्य घ्यावा. प्रकृतीच्या किंवा अन्य काही कारणांनी गोळी नको असेल, तर ‘कॉपर टी’ (तांबी), इंप्लांट्स यांसारख्या अन्य पर्यायांचा विचार करता येतो. जोडप्यांनी आणि विशेषत: स्त्रियांनी हे समजून घ्यायला हवं, की गर्भधारणा राहील का, ही भीती मनातून गेली तर समागमातील समाधान वाढू शकतं.’’

स्त्रियांच्या गर्भनिरोधक गोळय़ांसदर्भात (Oral contraceptive pills) एक वेगळं निरीक्षण डॉ. शॉन टॅसोन आणि डॉ. नटाली क्रिंगोडिस लिखित Contraception Deception या पुस्तकात नोंदवण्यात आलं आहे. यानुसार गर्भनिरोधक गोळय़ांचा शोध हा वास्तविक अनियमित मासिक पाळीचा त्रास असणाऱ्या स्त्रियांचं मासिक चक्र नियमित करण्याच्या उद्देशानं लावण्यात आला होता; पण या गोळय़ांच्या चाचण्या सुरू असताना संशोधकांच्या असं लक्षात आलं, की या गोळय़ा घेणाऱ्या स्त्रियांना गर्भधारणा न राहण्याचा ‘साइड इफेक्ट’ मिळत आहे. हे समजताच ही गोळी अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाली. अमेरिकेत ‘एफडीए’नं १९५७ मध्ये या गोळीला मान्यता देतानाही पाळीच्या समस्यांवरील औषध म्हणून तिला मान्यता दिली. त्यामुळे त्या वर्षी पाळीच्या समस्या असलेल्या स्त्रियांचं प्रमाण नेहमीपेक्षा ‘अचानक’ वाढलं. त्यानंतर तीन वर्षांनी- म्हणजेच १९६० मध्ये गर्भनिरोधक म्हणून ‘एफडीए’नं या औषधाला मान्यता दिली. पुढच्या केवळ दोन वर्षांत १२ लाख स्त्रियांनी या गोळय़ांचं सेवन केलं. तर त्यानंतरच्या पाच वर्षांत हा आकडा ६५ लाखांपर्यंत वाढला आणि Oral contraceptive pills हा अमेरिकेतला सर्वात लोकप्रिय गर्भनिरोधक पर्याय ठरला.

पुरुषांच्या बाबतीत विचार करता निरोध (कंडोम) हे प्रभावी गर्भनिरोधक ठरतं; पण त्याच्यामुळे पुरेसं समाधान मिळत नाही, अशी बऱ्याचदा पुरुषांची तक्रार असते. याविषयी बोलताना बीडमधील सेक्सॉलॉजिस्ट डॉ. अनिकेत कुलकर्णी सांगतात, ‘‘कंडोमनं समाधान मिळत नाही यात तथ्य नाही. उलट लग्नानंतर पहिल्या काही दिवसांत अतिसंवेदनशीलतेमुळे शीघ्रपतन होत असेल, तर कंडोममुळे समागमाचा कालावधी वाढवता येतो. ‘ऑरगॅझम’चा आनंद हा अंतिमत: मेंदूत नोंदवला जात असतो, हे समजून घ्यायला हवं.’’ जोडप्यामध्ये दोघांनाही कोणतंही गर्भनिरोधक साधन वापरायचं नसेल तर अपूर्ण संभोग पद्धतीचा वापर प्रचलित आहे. यालाच ‘त्रुटित संभोग’ असंही म्हणतात. यामध्ये संभोग अर्धवट करत वीर्य बाहेर टाकण्याची क्रिया पुरुष करतात. गर्भनिरोधक म्हणून ही पद्धत कशी सुरक्षित नाही हे उलगडताना डॉ. वा. वा. भागवत लिखित ‘कामविज्ञान’ या पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे, की ‘जेव्हा मनुष्याला संततिनियमनासाठी कोणतीही साधनं उपलब्ध नव्हती, तेव्हा किंवा आजही साधनांच्या अभावी जोडपी अपूर्ण संभोग पद्धतीचा वापर करतात. ही क्रिया बिनपैशांची व केव्हाही करता येण्याजोगी असली, तरी त्यामुळे गर्भधारणा राहण्याचा धोका असतोच. कारण वीर्यपतनापूर्वी उत्तेजित अवस्थेत लिंगावर जो स्राव जमा होतो, त्यातही शुक्राणू असतात. प्रत्यक्ष समागमावेळी हे शुक्राणू गर्भाशयात जाऊ शकतात. गर्भसंभवासाठी एकाच शुक्राणूची आवश्यकता असल्यानं त्यानंही गर्भसंभव होण्याचा धोका असतो.’

‘सुरक्षित काळातील संभोग’ ही पद्धतसुद्धा गर्भधारणा टाळण्यासाठी पुरेशी सुरक्षित नसते, असं स्त्रीरोगतज्ज्ञ आणि सेक्स थेरपिस्ट डॉ. नीलिमा देशपांडे यांनी स्पष्ट केलं. त्या सांगतात, ‘‘लग्नाला एखादं वर्ष झालंय आणि मुलाचा आग्रह नसूनही गर्भधारणा राहिली तरी चालेल, असे विचार असलेल्या जोडप्यांना या पद्धतीचा अवलंब करता येतो. यामध्ये पाळीनंतरच्या काही दिवसांत आणि पुढची पाळी येण्याआधी काही दिवसांत गर्भनिरोधकांशिवाय समागम केला जातो. ‘ओव्ह्युलेशन’चा काळ वगळता इतर वेळा संभोग करता येतो. अनियमित पाळी असलेल्या स्त्रियांमध्ये ओव्ह्युलेशनचा निश्चित काळ कळत नसल्यानं ही पद्धत अवलंबता येत नाही. मात्र, अगदी नियमित पाळी असलेल्या स्त्रियांमध्येही गर्भधारणा राहण्याची शक्यता असते. कारण शुक्राणू हे योनीमार्गात सात दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. ’’

इमर्जन्सी काँट्रासेप्टिव गोळय़ांचा वापरही गेल्या काही वर्षांत वाढलाय. याविषयी डॉ. मंदार सांगतात, ‘‘या खरं तर आणीबाणीच्या वेळी वापरायला हव्यात. टीव्हीवरच्या जाहिरातींमुळे हे गर्भनिरोधनाचं नियमित साधन आहे, अशी अनेकांची धारणा झालेली आहे. या गोळय़ा वारंवार घेतल्या तर त्याचा स्त्रियांच्या प्रकृतीवर थेट परिणाम होऊ शकतो, पाळीचं चक्र बिघडू शकतं आणि नको असलेली गर्भधारणाही राहू शकते. हे सगळे धोके जोडप्यांनी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे डॉक्टरांशी सल्लामसलत केल्याशिवाय थेट या गोळय़ा घेऊ नयेत.’’

कुटुंब पूर्ण झालेल्या जोडप्यांना पुरुष नसबंदी किंवा स्त्रियांची यासंदर्भातली शस्त्रक्रिया हे गर्भनिरोधकाचे दोन प्रभावी उपचार उपलब्ध असतात. याविषयी साधारण माहिती असली तरी अनेक कुटुंबांमध्ये ही जबाबदारीही पुरुष स्त्रियांवरच ढकलतात, अशी स्थिती आहे. वास्तविक स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांची नसबंदीची शस्त्रक्रिया ही अतिशय सुटसुटीत असते. बिनाटाक्याची ही शस्त्रक्रिया अवघ्या अर्ध्या तासात पार पडते. त्यामुळे अधिकाधिक पुरुषांनी कुटुंबनियोजनाच्या या प्रभावी साधनाचा गांभीर्यानं विचार करायला हवा.

वंशसातत्य ही कुठल्याही सजीवाची मूलभूत प्रेरणा असली, तरी माणूस सेक्स केवळ गर्भधारणेसाठी करत नाही. आता गर्भनिरोधकांमध्ये असंख्य पर्याय उपलब्ध झाले आहेत. पुरुषांसाठीही गर्भनिरोधक गोळय़ा बाजारात आणण्यासंदर्भात जागतिक स्तरावर संशोधन सुरू आहे. त्यामुळे केवळ अज्ञानामुळे या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं, याची जाणीव प्रत्येक जोडप्यानं ठेवायला हवी. कामजीवनातले हे ताणेबाणे संवादानं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं वेळीच सोडवायला हवेत.

niranjan@soundsgreat.in