बंडखोरीचा निर्णय घ्यायला धाडस लागते, विचार आणि कृती हातात हात घालून गेले पाहिजेत. बंडखोरी करणे चांगले पण या बंडखोरीचा आपल्या समाजाला, माणसांना त्रास होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते.. प्रियाची बंडखोरी तशीच होती का?
आमच्या अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर खोत राहतात. नवराबायको आणि नवऱ्याची आई! नवराबायकोचे वय फारसे नव्हते, पस्तिशीच्या आसपास असावे. अधूनमधून दिसायचे. हात वर करून ‘हाय हॅलो!’ होत होते, बोलणे फारसे नव्हते. फ्लॅटसंस्कृतीमध्ये असे असतेच. निमित्ताने भेट होत होती. पण ओळख नव्हती. कधी गप्पाही नव्हत्या. पण छोटेखानी कुटुंब छान होते. मला तरी आवडत होते.
त्याचे नाव रघू होते आणि तिचे नाव बहुधा प्रिया असावे, कारण तो ‘पियू, पियू’ असे म्हणताना ऐकले होते आणि त्या रघूची आई धार्मिक आणि संसारापासून अलिप्त असावी. त्या घरातून कधीही भांडणाचा आवाज आला नाही किंवा सासू-सुनेचा उंचावलेला आवाजही कानी पडला नाही. बहुधा त्यांच्या लग्नाला चार-पाच वर्षे झाली असावीत. पण घरात पाळणा हललेला दिसत नव्हता. दोघेही नोकरी करणारे. त्यामुळे कदाचित प्लॅनिंग केलेले असावे. थोडक्यात काय कुठेही दिसावे असे सर्वसाधारण कुटुंब होते.
पण एक दिवस अचानक त्या मजल्यावरून हंबरडा फोडल्याचा आवाज आला. एक किंकाळीही ऐकू आली. धावाधाव झाल्याचा आवाजही आला. मला वाटले सासू-सुनेत ठिणगी पडली किंवा नवरा-बायकोत भांडणाचा भडका उडाला असावा. त्यामुळे मी दुर्लक्ष केले, पण हा आवाज चालूच राहिला. त्या रडण्याच्या आवाजात दु:ख होते, यातना होत्या आणि त्याला वेदनेची किनार होती. काही तरी अघटित घडले असावे म्हणून मी चौथ्या मजल्यावर धाव घेतली.
खोतांचा दरवाजा उघडाच होता. दरवाजापाशी माणसांची थोडी गर्दी होती. काही जण घरातही शिरले होते. एकदोघे जण मोबाइलवरून बोलत होते. खुर्चीवर रघू डोळे मिटून बसला होता. त्याची आई कपाळावर हात मारून हुंदके देत होती. पियू मात्र एकटक रघूकडे पाहात होती.
एवढय़ात डॉक्टर आले, सगळे बाजूला झाले. डॉक्टरांनी रघूला तपासले. ‘हार्ट अ‍ॅटॅक’ असे म्हणून त्यांनी पियूला ‘सॉरी’ म्हटले. पियूच्या डोळ्यांतून पाण्याचा लोंढा वाहात राहिला. ओठातून रघूचा जप सुरू झाला. सगळ्यांच्याच डोळ्यांत पाणी आले आणि मग व्यवहार सुरू झाला. दोन-चार तासांत रघूचा जीव अनंतात विलीन झाला.
या घटनेला दहा-पंधरा दिवस झाले. दरम्यान पियूकडे अनेक जण सांत्वनासाठी येऊन गेले. तीही धीराने परिस्थिती हाताळत होती. घरीच थांबली होती. सासूची काळजी घेत होती.
साधारणत: महिन्यातच आम्हाला पुन्हा चौथ्या मजल्यावरचे निमंत्रण आले. कारण काय ते कळले नव्हते. मी सावकाश गेलो दुपारनंतर! खोतांच्या घरात पाय ठेवला. मलाही रघूची आठवण आली. पियू ‘या, बसा’ म्हणाली.
‘मला उशीर झाला!’ मी दिलगिरी व्यक्त केली.
‘तरीही वेळेत आलात!’ ती म्हणाली.
सासू नेहमीच्या कोपऱ्यात रघूच्या फोटोजवळ बसली होती. डोळ्यात पाणी नाही. चेहऱ्यावर भाव नाहीत.
‘काका! मी हे घर सोडून जात आहे!’ प्रिया सांगत होती. ‘मी दुसरे लग्न केले आहे!’
मला आश्चर्याचा धक्काच बसला. आतल्या खोलीतून एक तरूण आला. ‘याच्याशी!’ प्रियाने त्याच्याकडे बोट केले.
अभिनंदन कसे करावे असे वाटत असतानाच मी त्याचा हात हातात घेऊन ‘अभिनंदन’ म्हटले. प्रियाच्या चेहऱ्यावर किंचित स्मितरेषा उमटली. तिची बॅग तयार होतीच. तिने बॅग उचलली. दोघेही निघाले. जाण्यापूर्वी दोघेही सासूबाईंच्या पाया पडले. ‘अष्टपुत्र सौभाग्यवती’ त्या सासूने आशीर्वाद दिला ‘सुखी राहा’ असे म्हणून पदराने डोळे पुसले आणि ते दोघे तडक निघून गेले. मीही निघालो.
नवरा गेल्यानंतर महिन्याभरात दुसरे लग्न करणाऱ्या या पोरीला काय म्हणावे? मला सुचेना हा कृतघ्नपणा आहे किंवा अन्याय आहे किंवा निर्लज्जपणा आहे, हेच कळेना. पण मनातून एक आवाज आला अरे, ही बंडखोरी आहे.
समाजप्रवाहाविरुद्ध पोहणारे बंडखोर असतात. पण ही बंडाची भाषा आणि कृती सगळ्यांनाच जमते असे नाही. काही जण प्रवाहाविरुद्ध पोहताना दमतात आणि प्रवाहात वाहून जातात. अशा भरकटलेल्या अवस्थेत वाहून जाण्याची भीती असतेच. पण अशा बंडखोरीला धैर्य आणि निर्भयता लागते ती फार थोडय़ांत असते. त्यासाठी श्रद्धा आणि विश्वास असावा लागतो.
त्या घटनेला दोन महिने झाले होते. मनात विचार आला की, खोतांकडे एकदा जाऊन यावे. त्यांना थोडासा आधार द्यावा. मी चौथ्या मजल्यावर गेलो. सासूबाईंनी दरवाजा उघडला. नेहमीसारखेच घर होते. िभतीवर रघूचा फोटो होता. त्याला भलामोठा हार घातलेला होता.
‘प्रिया अजून आली नाही?’ मी विचारले.
‘ती इथे राहात नाही!’ सासूबाईंच्या त्या शब्दाने मी हादरलो.
‘म्हणजे? तुम्ही एकटय़ाच राहाता?’
‘नाही! माझी एक भाची आहे ती राहाते माझ्यासोबत!’
‘प्रिया गेल्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला असेल नाही?’ मी एकदमच विचारून गेलो.
‘परमेश्वरी इच्छा!’ सोपे उत्तर आले.
‘लग्नानंतर आठ दिवसांनी प्रिया आली होती. हा फ्लॅट तिच्या नावावर होता. तो तिने माझ्या नावावर करून दिला. रघूच्या आठवणी नव्या आयुष्यात त्रासदायक ठरतील म्हणून तिने नव्या घरी संसार थाटला. मला तिथे राहण्याचा आग्रह केला, पण मीच नकार दिला. महिन्यातून एक चक्कर असते. मला पैसे दिले, पण मी घेतले नाही. आता रघूच्या फोटोजवळ दोन हजार ठेवून जाते.’
‘तुम्हाला धक्का बसला असेल!’ मी काही तरी बोललो.
‘धक्का बसला! आणि ओसरलाही! तिने निर्णय घेतला. असा निर्णय घेण्यास धाडस लागतं. तशी गुणी आहे प्रिया!’ सासूबाई बोलत होत्या. कदाचित आणखीही खूप बोलल्या असत्या. पण मीच निघून आलो.
बंडखोरीचा निर्णय घ्यायला धाडस लागते,
विचार आणि कृती हातात हात घालून गेले पाहिजेत. बंडखोरी करणे चांगले पण या बंडखोरीचा
आपल्या समाजाला, माणसांना त्रास होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते. बंडखोरी आपल्या माणसांच्या सुखासाठी असते, दु:ख निवारण्यासाठी असते.
बंडखोरीला कारुण्याचा स्पर्श हवा. बंडखोरीतही माणुसकी हवी. नैतिकताही हवी. बंडखोरीतही परमेश्वराचा साक्षात्कार असतो, हे मला प्रियाने शिकवले.