scorecardresearch

Premium

आरोग्यम् धनसंपदा : रक्तक्षयावर पोषणाचा उपाय

रक्तक्षय टाळण्यासाठी आणि आटोक्यात ठेवण्यासाठी खाण्यापिण्यातले विशेष बदल लक्षात घ्यायला हवेत.

(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

सुकेशा सातवळेकर

दारिद्रयरेषेखाली असलेल्या घरांमध्ये मिळेल त्या अन्नावर गुजराण केली जाते, म्हणून कुपोषण दिसतं. मात्र ज्यांची ऐपत आहे अशा घरांमध्येही चुकीची जीवनशैली आणि अज्ञानामुळे कुपोषणाचं प्रमाण जास्त दिसतं, रक्तक्षयाचं प्रमाणही जास्त आढळतं. स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण १२-१४ टक्क्यांपेक्षा कमी आणि पुरुषांमध्ये ते १४ ते १८ टक्क्य़ांपेक्षा कमी असेल तर रक्तक्षयाचं निदान केलं जातं. केंद्र सरकारने, राष्ट्रीय स्तरावर काही पावले उचलत सप्टेंबर महिना हा ‘पोषण महिना’ म्हणून जाहीर केलाय आणि मार्गदर्शक पंचसूत्रीही जाहीर केलीय. त्यानिमित्त हा लेख..

four couple yoga pose to stay fit together
Couple yoga poses : नाते आणि आरोग्य दोन्ही राहील उत्तम! तंदुरुस्त रहाण्यासाठी हे ४ प्रकार पाहा
how to incorporate almonds in your diet tips
बदाम केवळ बुद्धी तल्लख करण्यासाठी नव्हे, तर पदार्थांची चव वाढवत, उत्तम आरोग्यासाठी खा! कसे ते पाहा
N Biren Singh
अन्वयार्थ: आगपाखडीतून सहानुभूती
moringa benefits
शेवग्याच्या शेंगाचे पाणी प्यायल्यानं रक्तातील साखर कमी होते? मधुमेहींसाठी खरंच ठरते वरदान? तज्ज्ञांकडून जाणून घ्या..

परवा माझ्या काही विद्यार्थिनींनी एक प्रकल्प पूर्ण केला. शाळा, महाविद्यालयामधील मुलं, मुली आणि त्याबरोबरच स्त्रियांमध्ये असलेल्या पोषणविषयक समस्या आणि रक्तक्षयाचं प्रमाण याविषयी त्यांनी माहिती गोळा केली. प्रकल्पानंतर अस्वस्थ आणि गंभीर झालेली एक जण माहिती देताना म्हणाली, ‘‘फक्त निम्न उत्पन्न गटच नाही तर; मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग आणि उच्च उत्पन्न गटातही रक्तक्षयाचं प्रमाण खूप जास्त आहे, कुपोषणाची समस्याही आहे. मोठय़ा प्रमाणावर उपाययोजना करायला हव्यात.’’

मी तिला थोडं शांत आणि आश्वस्त करत सांगितलं, ‘‘आपण आपल्या परीने प्रयत्न सुरू केलेत. आरोग्यदायी आणि पोषणसमृद्ध आहाराची माहिती, सोप्या शब्दांत सामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी आपल्या ‘इंडियन डायबेटिक असोसिएशन’ पुणे विभागाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम आयोजित करतोय. लेखन, व्याख्यानं आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून लोकांना रोजच्या जीवनात सहज करता येतील अशा आरोग्यदायी गोष्टींची माहिती देतोय. केंद्र सरकारनेही, राष्ट्रीय स्तरावर काही पावले उचलली आहेत. सप्टेंबर महिना हा ‘पोषण महिना’ म्हणून जाहीर केलाय आणि मार्गदर्शक पंचसूत्रीही जाहीर केलीय. १) सर्वासाठी योग्य पोषण, २) रक्तक्षय मुक्त भारत, ३) वैयक्तिक स्वच्छता,  ४) आयुष्यातील पहिले १००० दिवस आणि स्तन्यपान ५) पोटाचं आरोग्य संभाळून जुलाब/अतिसार होण्यापासून बचाव अशा पाच सूत्रांवर भर दिला आहे.’’  खरंच, दारिद्रयरेषेखाली असलेल्या घरांमध्ये मिळेल त्या अन्नावर गुजराण केली जाते, म्हणून कुपोषण दिसतं. मात्र ज्यांची ऐपत आहे अशा घरांमध्येही चुकीची जीवनशैली आणि अज्ञानामुळे कुपोषणाचं प्रमाण जास्त दिसतं, रक्तक्षयाचं प्रमाणही जास्त आढळतं. स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण १२-१४ टक्क्यांपेक्षा कमी आणि पुरुषांमध्ये ते १४ ते १८ टक्क्य़ांपेक्षा कमी असेल तर रक्तक्षयाचं निदान केलं जातं. आहारात लोह म्हणजेच आयर्नची कमतरता, हे रक्तक्षयाचं विशेषत्वाने आढळणारं कारण आहे. आपल्या शरीरात लोहाचं कार्य अतिशय महत्त्वाचं असतं, ते म्हणजे हिमोग्लोबिनतर्फे प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजनच्या देवाणघेवाणीला मदत करणं. आपल्याला माहितंय, की प्रत्येक सजीव पेशीला जगण्यासाठी, प्राणवायूचा सतत पुरवठा होत राहणे आवश्यक आहे, पण जर लोह कमी पडलं तर पेशींना पुरेशा प्रमाणात प्राणवायू मिळत नाही.

माझ्या मैत्रिणीची मुलगी बरेच दिवस थकलेली आणि अनुत्साही दिसत होती, हल्ली तिचा नृत्याचा क्लासही बरेचदा बुडत होता. तिचा चेहराही पांढुरका दिसायला लागला होता. शंका आली म्हणून हिमोग्लोबिन तपासलं, खूप कमी निघालं. आहारातील आवश्यक बदल करून, डॉक्टरांच्या मदतीने तिच्यावर लगेचच उपचार सुरू झाले. कारण रक्तक्षयाचे दुष्परिणाम सगळ्या शरीरावर होतात. हे दुखणं उपचाराविना बराच काळ अंगावर काढलं गेलं तर तब्येतीवर गंभीर परिणाम होऊ शकतात. सर्वच शरीरपेशींना प्राणवायूचा अपुरा पुरवठा होतो. त्यामुळे पेशी अकार्यक्षम होतात. अशक्तपणा, थकवा जाणवतो. धाप लागते. छातीत धडधड होते, श्वसन आणि नाडी जलद होते. त्वचा आणि पापण्यांवरील त्वचा फिकट पांढुरकी होते. चिडचिड, वैचारिक गोंधळ होतो. निद्रानाश होऊ शकतो. डोकेदुखी, कानात घंटानादासारखे आवाज, डोळ्यांसमोर अंधारी येते. पोटात गडबड होऊ शकते. पाचकरसांची निर्मिती कमी झाल्यामुळे अपचन, पोट फुगणं, अवरोध किंवा अतिसार होतो. प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे वारंवार सर्दी, खोकला, जुलाब होतात. वरचेवर तोंड येण्याचा त्रास सुरू होतो. ओठांना चिरा पडतात. भूक मंदावते. नजर अस्पष्ट होते. ऐकण्याची क्षमता मंदावते. काहींच्या हातापायावर, चेहऱ्यावर सूज येते. नखं चमच्यासारखी खोलगट होतात. शौचाचा रंग काळा होतो. रुधिराभिसरण, मज्जासंस्था, मुत्रिपड या सगळ्यांच्या कार्यात अडथळा येतो. औषधोपचाराशिवाय दीर्घकाळ अशी परिस्थिती राहिली तर जीवाला धोका तयार होतो.

आहारातील त्रुटी किंवा दोष हे सामान्यपणे रक्तक्षयाचं प्रमुख कारण असतं. तांबडय़ा रक्तपेशी तयार करण्यासाठी शरीराला काही विशिष्ट अन्नघटकांची आवश्यकता असते. १) मिनरल्स म्हणजेच क्षार – प्रामुख्याने आयर्न, कोबाल्ट आणि कॉपर. २) प्रथिनं ३) व्हिटामिन बी कॉम्प्लेक्स, प्रामुख्याने ‘ब १२’ आणि फॉलिक अ‍ॅसिड. हे घटक जर आहारात अपुऱ्या प्रमाणात असतील किंवा त्यांचं शरीरात अभिशोषण होण्यासाठी आवश्यक ‘क’ जीवनसत्व पुरेशा प्रमाणात नसेल तर रक्तक्षय होतो. या शिवाय या अन्नघटकांचा शरीरात योग्य वापर किंवा विनियोग होण्यासाठी आवश्यक संप्रेरकं आणि पिगमेंट्सचं कार्य योग्य प्रकारे होत नसेल तर हमखास रक्तक्षयाची समस्या उद्भवते.

माझ्यासमोर राहणाऱ्या स्मिताची मुलगी खेळाडू आहे, खो खो खेळते. तिचं खाणं-पिणं उत्तम आहे. पण तरी तिचं हिमोग्लोबिन कमी असतं. तिच्यासाठी रक्तक्षयाच्या इतर कारणांची शहानिशा करणं गरजेचं आहे. रक्तस्राव आणि रक्ताचा नाश हेसुद्धा रक्तक्षयाचं महत्त्वाचं कारण आहे. जंतांची लागण झाल्यामुळे, प्रामुख्याने हूकवर्म या जंतांमुळे शरीरातील ८ ते २५० मिलीमीटर रक्ताचा नाश होऊ शकतो. जमिनीवर किंवा शेतात अनवाणी चालण्याने, या जंतांच्या सूक्ष्म अळ्या तळपायाच्या त्वचेतून शरीरात प्रवेश करतात. म्हणूनच लहान मुलं आणि मोठी माणसं, सर्वानीच घराबाहेर हिंडताना पायात चपला किंवा बूट घालावेत. आणि बाहेरून घरात आल्यावर पाय स्वच्छ धुणं खूपच महत्त्वाचं आहे. जगात ७०-९० कोटी लोकांना हूकवर्म जंतांची लागण झाली आहे. या जंतांमुळे निर्माण झालेल्या समस्येमुळे, दर वर्षी ५०-६० हजार मृत्यू होतात. ‘अल बेन्डेझॉल’ या औषधाची ४०० मिलीग्रॅमची एक गोळी आयुष्यात एकदाच घेण्याने या जंतांचं निर्मूलन होतं.

नाकाचा घुळणा फुटून रक्त जाणे किंवा मूळव्याधीत वरचेवर रक्त पडणे किंवा जखमेतून अतिरेकी रक्तस्राव होणे किंवा रक्ताची उलटी होणे यांमुळेही रक्तक्षय होतो. पेप्टीक अल्सर किंवा गॅस्ट्रायटीसमध्ये शरीरांतर्गत रक्तस्राव होतो आणि रक्तक्षय उद्भवतो. स्त्रियांमध्ये  रक्तक्षयाचं प्रमाण जास्त दिसून येतं. मासिक पाळीमध्ये होणारा जास्त रक्तस्राव, वारंवार होणारी गर्भधारणा, किंवा प्रदीर्घ काळ स्तन्यपान करण्यामुळे रक्तक्षयाची शक्यता वाढते. थायरॉइड ग्रंथीचे आजार, पचनसंस्थेचे आजार, किडनी किंवा लिव्हरचे आजार यांमुळे रक्तक्षयाची शक्यता वाढते. काही औषधांचे दुष्परिणाम रक्तक्षयाला कारणीभूत होतात. काही रुग्णांना हृदयविकार होऊ नये म्हणून बराच काळ अ‍ॅस्पिरीन दिले जाते. त्यामुळे पोटात प्रतिदाह होऊन  रक्तक्षयाचा धोका वाढतो. अँटासिड म्हणजेच अ‍ॅसिडचा स्राव कमी करणारी औषधे दीर्घ काळ घेतली तर, लोहाच्या शोषणात अडथळा निर्माण होतो आणि रक्तक्षयाची शक्यता वाढते.

रक्तक्षय टाळण्यासाठी आणि आटोक्यात ठेवण्यासाठी खाण्यापिण्यातले विशेष बदल लक्षात घ्यायला हवेत. लोहयुक्त पदार्थाचा समावेश वाढवायला हवा. माझी मैत्रीण म्हणाली, ‘‘मलाही हल्ली तू सांगतेस तशी रक्तक्षयाची लक्षणं जाणवतायत गं. सायलीबरोबर मलाही सांग काय काय खायला- प्यायला हवंय..’’ तिला म्हटलं, ‘‘अगं, भरपूर लोह देणारे पदार्थ म्हणजे मांसाहारी पदार्थ – अंडी, मांस, मासे आणि चिकन. यांच्यामध्ये ‘हीम आयर्न’ असतं. हे लोह शरीरात चांगल्या प्रकारे म्हणजेच ४० टक्के शोषलं जातं. मासळीमध्ये सिस्टीन असतं, जे ‘रिड्युसिंग एजंट’ म्हणून लोहाच्या अभिशोषणाला मदत करतं. म्हणूनच मांसाहार करणाऱ्यांनी रोजच्या आहारात या पदार्थाचा समावेश केला तर भरपूर लोह मिळेल.’’

जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी सांगायचं तर लोहाचं सर्वात जास्त प्रमाण हळिवात असतं. भिजवलेलं हळीव, गरम किंवा उकळत्या दुधात घालून रोज सकाळी घ्यावं. हिरव्या पालेभाज्यांमधेही लोह असतं. चवळी, लाल माठ, हिरवा माठ, शेपू, चुका, मुळा, अळूमध्ये भरपूर लोह असतं. पालक, मेथी या लोकप्रिय आणि ‘फॅन्सी’ पालेभाज्यांमध्ये मात्र त्यामानाने कमी लोह असतं. पालकमधील फक्त २ टक्के लोह शोषलं जातं. सगळ्यात जास्त लोह, शेवग्याचा पाला आणि बीटच्या पाल्यात असतं. बीट रूटमध्ये भरपूर लोह आहे, असं समजून आहारात बीटचा मारा केला जातो, पण लक्षात घ्या गाजरामध्ये बीटपेक्षा जास्त लोह असतं.

सोयाबीन, मोडाची कडधान्यं, तेलबिया, पोहे, नाचणी आणि गूळ यांतून लोह मिळतं. डाळिंबातही असतं. खारीक, खजूर, जर्दाळू, काळ्या मनुका यांसारख्या सुक्या मेव्यातही भरपूर लोह असतं. रक्तक्षय असणाऱ्यांनी या पदार्थाचा वापर वाढवायला हवा. लोहयुक्त पदार्थ वाढवण्याबरोबरच ‘क जीवनसत्व’ वाढवायला हवं. आहारात आंबट फळं, विशेषत: आवळ्याचा वापर वाढवावा. लिंबू, संत्र, पेरू, टोमॅटोही वापरावा. पालेभाज्या, मोडाची कडधान्यं, सिमला मिरची, कोबी यांतूनही ‘क’ जीवनसत्व मिळतं. दिवसातल्या प्रत्येक जेवणामध्ये यांतील १-२ पदार्थ असावेत. किमान लोहयुक्त पदार्थ आणि सप्लिमेंटबरोबर तरी घ्यावेत. क जीवनसत्वामुळे लोहाचं शोषण २-३ पटींनी वाढतं.

भरपूर प्रमाणात चहा, कॉफी पिणाऱ्यांनी मात्र एक गोष्ट लक्षात घ्यावी. चहा, कॉफीतील टॅनिन आणि कॅफिनमुळे लोहाचं शोषण रोखलं जातं. म्हणून खाण्यापिण्याच्या, जेवणाच्या नुकतंच आधी किंवा नंतर, किंवा जेवणाबरोबर चहा, कॉफी आणि कोला ड्रिंक्स घेऊ नयेत.

पदार्थ लोखंडी भांडय़ात शिजवले तर लोहाचं प्रमाण वाढतं. लोखंडी तवा, कढई, पळी, झारा, उलथनं, फोडणीचं छोटं कढलं वापरावं. तसंच सुरी, विळी, खलबत्तासुद्धा लोखंडीच असावा. पदार्थ खूप जास्त पाण्यात उकळण्यापेक्षा वाफवावेत, लोहाचं शोषण वाढतं. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायला हवी की, कॅल्शियम किंवा झिंकचं सप्लिमेंट, आयर्न सप्लिमेंटबरोबर घेऊ नये; लोहाचं शोषण कमी होतं.

आहारातून आवश्यकतेएवढं लोह उपलब्ध होत नसेल तर ‘आयर्न सप्लीमेंट’ घ्यावं. आपल्या डॉक्टरांना विचारून ३०० मिग्रॅम फेरस सल्फेटची गोळी रोज रात्री जेवणाबरोबर घ्यावी म्हणजे त्याचं शोषण चांगलं होईल. काहींना आयर्न सप्लीमेंटमुळे पोटदुखी/मळमळ/बद्धकोष्ठता/जुलाब असा त्रास होऊ शकतो, पण जेवणाबरोबर घेण्याने तो कमी होतो. सरकारी दवाखान्यांमध्ये आयर्न सप्लीमेंट मोफत उपलब्ध असतं. गरजूंनी त्याचा जरूर लाभ घ्यावा.

प्रत्येकाने वर्षांतून एकदा, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासून घ्यावं. रक्तक्षय असेल तर उपाययोजना करावी, दुर्लक्ष करू नये. रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण सुधारलं की, काम करण्याची क्षमता आणि हृदयाची कार्यक्षमताही वाढते.

dietitian1sukesha@yahoo.co.in

chaturang@expressindia.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Blood clots nutrition malnutrition hemoglobin abn

First published on: 14-09-2019 at 00:09 IST

संबंधित बातम्या

×