‘मला झालेल्या आजारावर आज उपचार उपलब्ध आहेत, पण हा आजार का होतो, यावर संशोधन व्हायला हवं, म्हणजे तो टाळता येईल. माझ्या पश्चात माझ्या देहाचा उपयोग त्यासाठीच्या संशोधनाकरिता केला जावा, अशी माझी इच्छा आहे. म्हणूनच मी देहदान करणार आहे. ’ गेली २७ वर्षे मायस्थेनिया ग्रेव्हिस या अत्यंत दुर्मिळ आजाराने ग्रस्त सदानंदनं सांगितलं. मरण येणारच आहे, परंतु आपल्या मरणाचा दुसऱ्यांना उपयोग व्हावा ही सदिच्छा बाळगणारे थोडेच. सदानंद त्यातलाच एक. मरणाचा अर्थ लावणारा.
गुड मॉर्निग!’.. फोनच्या पहिल्या रिंगमुळे जाग आली आणि फोन कानाला लावून ‘हॅलो’ म्हणण्याच्या आत हे शब्द ऐकू आले.. एक उत्साही, टवटवीत, हास्याची हलकीशी किनार असलेला आवाज.
फोनवर माझा ‘गाववाला’ मित्र होता. सदानंद!.. सदानंद राजवाडे. देवरुखच्या स्टँडवर उतरून मधल्या वाटेनं बांध ओलांडून उडी मारली की सदानंदचं घर. रस्त्यानं चालत गेलं, तर एक वर्तुळाकार फेरी.
रत्नागिरी जिल्ह्य़ात कुठल्याही गावात, राजवाडे आडनावाचा कुणी एखाद्याला भेटलाच तर ‘कोणते राजवाडे?’ असा प्रश्न होतो, आणि पाठोपाठ राजवाडय़ांच्या कोणत्याही घरातील चारदोन जणांच्या ओळखीची, जवळिकीची उजळणी होते. अजूनही.
सदानंद राजवाडे म्हणजे, पेढीवाले राजवाडेंच्या कुटुंबातला. त्याच्या काकांची पेढी होती आणि तिथंच बाजूला सदानंदच्या वडिलांचं स्टेशनरीचं दुकान होतं. पण ते नावालाच. गिऱ्हाईकांनी यावं, मालाची विक्री व्हावी, अशी फारशी अपेक्षाच बहुधा नसायची. घरी बसून कंटाळा येतो, बाजारपेठेत असलं की माणसांत असल्यासारखं वाटतं. चार लोक येतात, गप्पा मारतात, तेवढाच वेळ जातो आणि आसपासच्या बातम्याही समजतात, हाच बहुधा मुख्य उद्देश. आम्हाला या दुकानाची ओळख झाली, तेव्हापासून आमचा असाच समज होता. दुकानात गेलं की ‘काय हवंय’ असं विचारण्याऐवजी ‘काय विशेष’ असा प्रश्न विचारला जायचा. आपल्याकडे सांगण्यासारखं काही विशेष नसेल, तर त्यांच्याकडून काहीतरी समजायचंच.. सदानंदच्या वडिलांचं दुकान हा आम्हा सर्वासकट अनेकांचा टाइमपासचा अड्डा होता. कारण तिथं वयाची अट नव्हती.
तेव्हा, देवरुखही छोटंच होतं. आख्खं गाव एकमेकांना नावानिशी ओळखायचं. तीनचार आळ्यांच्या या गावानं गावकीच्या नात्यानं साऱ्या कुटुंबांनाच एकत्र ठेवलं होतं. त्यामुळे अनेकांशी थेट अगदी घरच्यासारखं नातं असायचं. सणवार, सुखदुख सारं एकत्र साजरं व्हायचं, एकत्र झेललं जायचं.
सदानंदशी आमची मैत्री झाली, ती अशा नात्यातूनच. जमीनदारी असलेल्या या कुटुंबाच्या चेहऱ्यावर चणचणीची चिंता उमटलेली कधीच दिसत नसे. मस्त, हसरं कुटुंब.
सदानंदही त्याच घरातला.
परवा खूप दिवसांनी त्याचा फोन आला आणि त्याच्या आवाजातला तो जुना हसरेपणाही पुन्हा एकदा मला आठवला.
दिवसाची सुरुवात चांगली झाल्याच्या भावनेनं मीही सुखावलो. मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. ‘काय विशेष’ हा जुना, ‘परवलीचा प्रश्न’ मी नकळत जुन्या सवयीनं टाकला, आणि गावातल्या दोनचार बातम्याही सदानंदनं जुन्याच उत्साहात सांगून टाकल्या.
अशा थोडय़ाशा अवांतर गप्पांनंतर अचानक त्याच्या आवाजातलं हास्य थांबलं. ‘तुला काहीतरी सांगायचंय.. म्हणून मुद्दाम फोन केला..’ तो काहीसा गंभीर आवाजात म्हणाला, आणि मी चरकलो.
..गेल्या पंचवीस-सव्वीस वर्षांपासून सदानंद आजारी आहे. ‘मी मरणोत्तर देहदान आणि नेत्रदान करणार आहे!’.. काही विचारायच्या आधीच सदानंदनं सांगून टाकलं.
देहदान आणि नेत्रदानाच्या निर्णयांचं शहरांमध्ये नावीन्य नाही. शहरी भागात याबद्दलच्या जाणिवा बऱ्यापैकी रुजल्या आहेत. पण देवरुखसारख्या अर्धशहरात मात्र ही संकल्पना फारशी पोहोचलेली नाही. म्हणून मला सदानंदच्या निर्णयाचं आश्चर्य वाटलं.
मग मी काही प्रश्न विचारण्याआधीच सदानंद बोलू लागला..
त्याच्या बोलण्यात ते, लहानपणापासूनचं हास्य नव्हतं. तो गंभीर होता.
..सदानंदचे वडील १९८६ मध्ये गेले आणि त्या हसऱ्या घरावर शोकाची कळा पसरली. त्या दु:खात असतानाच एका सकाळी सदानंद उठला आणि आपल्या शरीराची डावी बाजू शक्तिहीन होतेय असं त्याला वाटू लागलं. एका बाजूच्या हातापायाची शक्ती हरपल्यासारखं झालं होतं. तो भाग इतका दुर्बळ झाला की डोळ्याची पापणीदेखील उघडी ठेवण्याची शक्ती त्या बाजूला नव्हती.. लेंग्याची नाडी बांधण्यासाठी हात उचलणंही अशक्य झालं होतं. सगळी हालचालच थंडावली होती. लगेचच सदानंदला शेजारीच असलेल्या डॉक्टरांकडे नेण्यात आलं. पण देवरुखमध्ये प्रॅक्टिस करताना अशा आजाराचा रुग्ण त्यांनी पाहिलाच नव्हता. त्यांना सदानंदच्या आजाराचं निदान झालंच नाही. मग साहजिकच रत्नागिरी, कोल्हापूर आणि नंतर मुंबई..
मुंबईत हिंदुजा हॉस्पिटलमध्ये सदानंदला दाखल केलं आणि त्याच्या आजाराचं निदान करण्याचा प्रयत्न डॉक्टर करू लागले. काही दिवस केवळ निरीक्षण सुरू होतं. काही दिवसांनंतर हिंदुजामधील डॉक्टरांनी त्याला एक इंजेक्शन दिलं आणि हातापायातली शक्ति येऊ लागल्याचं सदानंदला जाणवलं. डाव्या डोळ्याची पापणी आता तो हलवू शकत होता आणि डाव्या डोळ्याची बुबुळंदेखील जिवंत होऊन हालचाल करू लागली होती.
सदानंदच्या कुटुंबीयांइतकाच आनंद त्या वेळी त्याच्यावर लक्ष ठेवून असलेल्या डॉक्टरांनाही झाला होता. कारण त्याच्या आजाराचं प्राथमिक निदान झालं होतं. फारच दुर्मीळपणे आढळणारा, कदाचित लाखात एखाद्याला होणारा, मायस्थेनिया ग्रेव्हिस नावाचा आजार सदानंदला झाला होता. या आजारात मज्जातंतूची क्षमता कमी होते, असं डॉक्टरांनी त्याला सांगितलं होतं.
.. आजाराचं नेमकं निदान झाल्यानंतर त्याचे औषधोपचारही नक्की झाले.
तेव्हापासून गेली जवळपास सत्तावीस वर्षे सदानंद गोळ्या खाऊन जगतोय. एखाद्या दिवशी गोळीचा डोस घ्यायचा राहिला की आपण अजून आहोत, याची जाणीव हा आजार करून देतो. त्यामुळे गेल्या सत्तावीस वर्षांपासून हा माणूस खरंच गोळ्यांवरच जगतोय.. या गोळ्यांचे साइड इफेक्ट्स अधूनमधून सुरू असतात. पण सदानंदचा जगण्याचा विश्वास मात्र वाढलाय.. अलीकडे तो गावातल्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांतही सक्रिय असतो.
वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या कामात त्यानं स्वत:ला गुंतवून घेतलंय. ते दुकान अजूनही आहे, पण पहिल्यासारखंच.. बाजारपेठेत ‘जनसंपर्का’साठी जागा हवी, यासाठीच!
अधूनमधून सदानंदची ख्यालीखुशाली समजायची. मध्यंतरी तो पुन्हा खूप आजारी आहे, असं समजलं आणि त्याचा फोनही आला. भेटावंसं वाटतंय, म्हणून!
पण मला जमलं नाही. त्या आजारातून तो सावरला आणि पुन्हा आपल्या ‘कार्यबाहुल्या’त व्यग्र झाला, असं गावाकडल्या कुणीतरी नंतर सांगितलं.
..त्या दिवशी सदानंदचा फोन आल्यावर पुन्हा बरं वाटलं. देहदान आणि नेत्रदानाचा त्याचा निर्णय ऐकून मी त्याचं अभिनंदनही केलं. पण त्यानं हा निर्णय का घेतला, हे कळल्यावाचून चैन पडणार नाही, असं वाटलं, आणि विचारलं..
सदानंदचं उत्तर मनाला उभारी देणारं होतं, ‘मला झालेल्या आजारावर आज उपचार उपलब्ध आहेत. पण हा आजार का होतो, यावर संशोधन व्हायला हवं. त्या आजाराची लक्षणं आधीच समजायला हवीत, म्हणजे तो टाळता आला पाहिजे.. माझ्यापश्चात माझ्या देहाचा उपयोग त्यासाठीच्या संशोधनाकरिता केला जावा, अशी माझी इच्छा आहे.. माझे डोळे कुणा दृष्टिहीनांना मिळावेत, असं मला वाटतंय. म्हणून मी देहदान करणार आहे’.. सदानंदनं सांगितलं.
देहदानाची चळवळ रुजू घातली गेली आणि समाजात मूळ धरू लागली, ती याच उद्देशानं. मृत्यूनंतर चितेत किंवा मातीत जाणारा देह संशोधनांसाठी वापरला गेला, तर मागे राहिलेल्यांचं जगणं सुखाचं होईल, हा या चळवळीचा हेतू..
गेल्या सत्तावीस वर्षांपासून आजाराशी सामना करणाऱ्या सदानंद राजवाडेनं तो हेतू समजून घेतला होता.. देहदानाच्या निर्णयाविषयी सांगताना त्याच्या बोलण्यातून बाजूला झालेलं हसरेपण पुन्हा उगवलं, आणि ‘गुड डे’ म्हणत त्यानं फोन बंद केला..
संग्रहित लेख, दिनांक 15th Feb 2014 रोजी प्रकाशित
देहरूपी उरावे…
‘मला झालेल्या आजारावर आज उपचार उपलब्ध आहेत, पण हा आजार का होतो, यावर संशोधन व्हायला हवं, म्हणजे तो टाळता येईल. माझ्या पश्चात माझ्या देहाचा उपयोग त्यासाठीच्या संशोधनाकरिता केला जावा, अशी माझी इच्छा आहे.
First published on: 15-02-2014 at 01:15 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Body donation essential for further research on diseases