काही वर्षांपूर्वी मी एक गोष्ट वाचली होती. गोष्ट छोटीशी, पण माझ्या मनात तिने ‘मोठ्ठं’ घर केलंय.
एका इमारतीला खूप मोठी आग लागलेली असते. आग विझविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न चालू असतात. इमारतीच्या बाजूला असलेल्या एका झाडावर एक चिमणी बसलेली असते. आग विझविण्यासाठी आपण देखील प्रयत्न केले पाहिजेत असं तिला वाटतं. आपल्या चोचीत मावेल इतकं पाणी घेऊन ती त्या आगीवर टाकण्याच्या कामाला सुरुवात करते. तिचं ती आग विझविण्याच्या कामातील धडपड त्याच झाडावर बसलेला कावळा पाहात असतो. तो तिला म्हणतो, ‘तुझ्या या चोचीभर पाण्याने आग विझेल असं तुला वाटतं? उगाच तुझी ऊर्जा वाया घालवू नकोस.’ त्यावर ती चिमणी त्या कावळ्याला म्हणते, ‘मला तेवढं कळत नाही असं तुला वाटतं का? भविष्यात या इमारतीला लागलेल्या आगीची जेव्हा चर्चा होईल तेव्हा आग विझवणाऱ्यांच्या यादीत माझं नाव असेल आणि तुझं तमाशा पाहणाऱ्यांच्या.’
मनोविकास प्रकाशने प्रकाशित केलेल्या ‘तिच्या आरोग्यासाठी सर्व काही’ हे पुस्तक वाचकाच्या हाती देताना या गोष्टीतून चिमणीने दिलेला संदेश सतत माझ्या मनात होता. अनेक वर्षांपासून स्त्रियांचं आरोग्य अज्ञान, गैरसमज, अंधश्रद्धा, पुरुषांवर असलेलं परावलंबित्व या रूपाने लागलेल्या आगीत होरपळून निघत आहे. अशा परिस्थितीत स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र तज्ज्ञाचा टेंभा मिरवीत आपण त्या कावळ्यासारखं तमाशा बघत बसावं असं मला वाटलं नाही. स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्येवर मात करणं सोपं काम नाही याची मला जाणीव आहे. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत. अनेकांनी या कारणांसाठी आपलं आयुष्य समर्पित केल्याची नोंद इतिहासात आहे. आजही अनेकजण तळमळीने भगीरथ प्रयत्न करीत आहेत. माझं हे पुस्तक त्या चिमणीच्या चोचीत मावणारं पाणी आहे, असं मला वाटतं.
पुरुषांनी पुढाकार घेतल्याशिवाय आपल्या देशातील स्त्रियांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यविषयक प्रश्न झपाटय़ाने सोडविता येणार नाहीत हे सत्य आहे. पुरुष म्हणजे केवळ नवरा या अर्थाने नव्हे तर एक बाप, भाऊ, मुलगा वगरे नात्याने असा अर्थ अभिप्रेत आहे. स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्यांना केंद्रबिंदू मानून जरी हे पुस्तक लिहिलं गेलं असलं तरी केवळ स्त्रियांनीच वाचावं असं नाही तर पुरुषांनी देखील या पुस्तकात दिलेली माहिती आणि विचार वाचावेत अशी माझी विनंती आहे.
प्रजनन आणि त्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्या पेलण्यासाठी निसर्गाने स्त्रियांची निवड केली या वस्तुस्थितीत आपण बदल घडवून आणू शकत नाही. आम्ही पुरुष गर्भधारणेचा, बाळंतपणाच्या कळांचा अनुभव घेऊ शकत नाही, मासिक पाळीची कटकट आमच्या मागे नाही, प्रसंगी गर्भपाताला आम्हाला सामोरं जावं लागत नाही. या आणि अशा कितीतरी आरोग्यविषयक समस्या, ज्या क्वचितप्रसंगी प्राणावर बेतणाऱ्या देखील असू शकतात. यांचा मुकाबला करीत आजची स्त्री पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात चमकदार कामगिरी करत आहे हे सर्व पुरुषांनी एक ‘समजदार माणूस’ म्हणून लक्षात घेतलं पाहिजे.
स्त्रियांचे शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, लैंगिक आरोग्यविषयक प्रश्न एकत्रितपणे सोडविण्यासाठी एक स्त्रीरोग तज्ज्ञाला संधी मिळत असते. या सर्व प्रश्नांवर या पुस्तकात ऊहापोह करण्याचा प्रयत्न केला आहे आदरणीय र. धों. कर्वे तर डॉक्टर नव्हते तरीही त्यांनी केवळ स्त्रियांच्या सर्व प्रश्नांसाठी आयुष्य वेचलं. मी तर डॉक्टर आहे. नव्हे स्त्रियांचा पण पुरुष डॉक्टर आहे. या बाबतीत माझी जबाबदारी खूप अधिक आहे. ‘रधों’ माझं दैवत आहे. त्यांनी आखून दिलेल्या स्त्री आरोग्य शिक्षणाच्या मार्गावर अखंड चालत राहण्यात मला आनंद आहे. ‘तिच्या आरोग्यासाठी सर्व काही’हे पुस्तक त्या आनंदाचा हिस्सा आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Aug 2013 रोजी प्रकाशित
आस्था स्त्री आरोग्याची
एका इमारतीला खूप मोठी आग लागलेली असते. आग विझविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न चालू असतात.
First published on: 24-08-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व असे शब्द... असे अर्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book tichya arogyasathi sarv kahi