मला एक व्यंगचित्र आठवलं.. त्या गजलमध्ये शोभेल असं. बेगम अख्तरच्या त्या सुरांत सूर मिळविणारं ते व्यंगचित्र होतं, हंगेरीयन व्यंगचित्रकार रेबर यांचं. ..त्या चित्रातली ती म्हातारी आता बेगम अख्तरच्या शेजारी येऊन बसली. चित्र आणि गीताचा अनुभव घेऊ लागलो. ‘जिंदगी कुछ भी नही, फिर भी जिए जाते हैं..’
कलावंताची कलाकृती आपण जेव्हा अनुभवतो, किंवा तिचा आस्वाद घेतो, तेव्हा आपण आपल्या तऱ्हेने ती ज़ाणून घेत असतो. त्या कलाकृतीचा आस्वाद घेताना आपल्या मनात धूसर अशा भावना-विचार, चित्रकृती, आकार, रंग या सगळ्यांचा कल्लोळ जमलेला असतो. हिवाळ्यातल्या धुरांच्या वेटोळ्यांसारखा. अशा वातावरणात ती कलाकृती मग आपल्यासाठी प्रकट-अप्रकट होणारी रचना झालेली असते.
संगीताचा आस्वाद तर अशा अनुभवासाठी अत्यंत जवळचा. गाणं ऐकताना आपण आपोआप त्यात तल्लीन होतो आणि जसजसं तल्लीन होत जातो, तसतसं त्या धुक्यात वावरत जातो.
व्यंगचित्रकला ही केवळ हसविण्याची-रंजनाची कला आहे, असं नसून काही व्यंगचित्रांत आपल्याला विचारांच्या-भावनांच्या त्या धुक्यात घेऊन जायचं सामथ्र्य असतं. उत्तम व्यंगचित्र हे विसंगतीची अनुभुती देतंच आणि विसंगती ही नेहमीच हसविणारी अशी नसते, हे सांगतं आणि व्यंगचित्राचं नातं कवितेशी असतं हेही सांगतं.
हे सगळं सांगण्याचं निमित्त म्हणजे चित्र-संगीताचा आलेला एक अनुभव. कोल्हापूरचे डॉ. प्रकाश चव्हाण आणि नांदेडचा मी; आमचा हा अनुभव. चव्हाण सर हे व्यंगचित्रांचे संग्राहक आणि आभ्यासक, लेखकही. एकदा सरांचा मला फोन आला. बेगम अख्तरची एक गजल त्यांनी ऐकली होती. सुदर्शन ‘फाकीर’ यांची ती गजल-  
जिंदगी कुछ भी नही, फिर भी जिए जाते हैं
तुझपे ऐ वक्त हम अहसान किए जाते हैं
ही गजल ऐकता ऐकता त्या गजलचा शेवटचा शेर त्यांनी ऐकला आणि एका रशियन व्यंगचित्राची त्यांना आठवण झाली. गजलमधला तो शेवटचा शेर
जिंदगी क्या है, कोई चाक-ए-कफन है ‘फाकीर’
उम्र के हाथों से हम जिसको सिए जाते हैं
या शेरच्या अर्थामध्ये चव्हाण सर गुंतून गेले आणि त्यांच्या संग्रहातलं ते रशियन व्यंगचित्र त्यांच्या नजरेसमोर उभं राहू लागलं. दोन म्हाताऱ्या स्त्रिया जवळ बसून स्वेटर विणत आहेत. पण गंमत अशी, की पहिल्या स्त्रीच्या स्वेटरचं एक टोक घेऊन दुसरी विणते आहे, तर दुसरीच्या विणकामातून निसटलेलं टोक घेऊन पहिली विणते आहे. शिवणकाम चालूच आहे..
..आणि गजल आणि चित्राची हकिकत त्यांनी सांगितली. बेगम अख्तरची गजल मला माहीत होती. मात्र ते रशियन व्यंगचित्र काही आठवत नव्हते. मी त्यांना ते चित्र पाठवायला सांगितले. आणि इकडे माझ्यावरही ती गजल अन त्या चित्राचा असर होऊ लागला. ‘यू ट्यूब’वर ती गजल शोधली अन् बेगम अख्तरच्या त्या आवाजात, त्या काव्यात उतरत गेलो..
कुछ तो हालात ने मुजरीम हमे ठहराया है
और कुछ आप भी इल्जाम दिए जाते हैं
छीन ली वक्त ने उल्फत के गमों की दौलत
खाली दामन है वो ही साथ लिए जाते हैं
शायरच्या त्या शब्दांतून उमटणारी उदासीची ती भावना बेगम अख्तरच्या आवाजातून जणू झिरपत जाऊ लागली. बेगम अख्तरच्या आवाजातून एक प्रकारची विषण्णता जाणवू लागली. हे सगळं वातावरण माझं वय आणखी पुढे घेऊन जाऊ लागलं. केवळ जगत राहाण्याची अपरिहार्य जाणीव ठेवून दिवस-रात्र काढणं, क्षणाक्षणाने जगत राहाणं. चव्हाण यांनी सांगितलेल्या त्या रशियन व्यंगचित्राची कल्पना करता करता मनात त्या चित्राचा मी अंदाज करू लागलो. सोवियत युनियन, स्पुटनिक मासिकांतल्या व्यंगचित्रांच्या फाइल्स माझ्याकडे आहेत. रशियन व्यंगचित्रकार म्हातारी माणसं कशी काढतात ते लक्षात येऊ लागलं- डोळ्यांसाठी बारीक वर्तुळं अन पुढे आलेली हनुवटी.. त्या हिशेबाने चव्हाणांच्या संग्रहातलं ते चित्र डोळ्यांसमोर दिसू  लागलं.
आणि चटकन मलासुद्धा एक व्यंगचित्र आठवलं. या गजलमध्ये शोभेल असं. चव्हाण यांनी सांगितलेल्या चित्राशी नातं सांगणारं. बेगम अख्तरच्या त्या सुरांत सूर मिळविणारं ते व्यंगचित्र होतं, हंगेरीयन व्यंगचित्रकार रेबर यांचं. त्या चित्रातली ती म्हातारी आता बेगम अख्तरच्या शेजारी येऊन बसली. चित्र आणि गीताचा अनुभव घेऊ लागलो. ‘जिंदगी कुछ भी नही, फिर भी जिए जाते हैं..’ या चित्रात ही वृद्धा एकटी बसून आहे. तिने पाळलेला पोपट जवळ िपजऱ्यात आहे. तिचं मांजरसुद्धा जवळ बसून आहे. पण पाहा, मांजर अंतरावर स्वत:त गुरफटून बसलेलं, िपजऱ्यातला पोपट; तोसुद्धा मान खाली घेऊन आपल्यातच गुरफटून बसलेला..
आणि त्यांच्यावरच्या बाजूला िभतीवर मोठे चित्र आहे. माणसांनी भरलेले. मोठय़ा कुटुंबाचे. त्या छायाचित्रावरून लक्षात येते, की एके काळी हे घर मुला- माणसांनी भरलेले होते. गोकुळ. एक एक करून ती सगळी माणसं निघून गेली, दुरावली. सगळी निघून गेली. आता घरात राहिली, ती वृद्धा आणि तो पोपट आणि हे मांजर. हे प्राणीसुद्धा एकेकले. घरात उदास अशी शांतता आणि एकलेपण..         
कुछ तो हालात ने मुजरीम हमे ठहराया है
और कुछ आप भी इल्जाम दिए जाते हैं
..एकलेपणाची ही शिक्षा भोगणारी ही वृद्ध स्त्री. नियतीने कसल्या गुन्ह्य़ाची ही शिक्षा आपल्याला दिली, या विचारात दिवस कंठणारी.
इतके दिवस माझ्या संग्रहात असलेलं हे व्यंगचित्र, माझ्या अत्यंत आवडीचं, यावर मी एकदोन वेळा लिहिलेलंही; पण आज हे चित्र पाहताना पाश्र्वभूमीवर बेगम अख्तरचा आवाज भरून राहिलेला होता. म्हातारीच्या भावना जणू ती बोलून दाखवीत होती.     (पान २ वर)
(पान १ वरून)  ‘तुझपे ऐ वक्त हम एहसान किए जाते हैं..’ या ओळीतली ती अगतिकता. शायरला जे म्हणायचं असतं, ज्या तऱ्हेने सांगायचं असतं, त्यासाठी खरंच का त्याचे शब्द पुरेसे असतात.. की शब्दात न मावणारं आणखी काही त्याला जे सांगायचं असतं ते, राहून गेलेलं असतं अन तो गायक तो संगीतकार त्याची पूर्तता करत असतो, असं होत असतं का..
 मिर्झा गालिबची एक गजल आहे-
     आह को चाहिए इक उम्र असर होने तक
      कौन जिता है तेरी जुल्फ के सर होने तक
..माझी साधीशी इच्छा पुरी होण्यासाठी माझं सगळं आयुष्य मला घालवावं लागतं. आणि इथे तर तुला मिळवायची माझी इच्छा. या जन्मात तर शक्यच नाही.
 ही गजल ‘मिर्झा गालिब’ या चित्रपटात, एक तवायफ मुजऱ्याच्या रूपात म्हणते आणि ती गायली आहे सुरैय्याने. आणि हीच गजल याच नावाच्या टी.व्ही. सीरियलमध्ये जगजीत सिंह यांनी स्वरबद्ध केली आहे, त्यांनी स्वत: ती गायली आहे, ती मात्र अत्यंत वेगळ्या चालीत. गंभीर असं वातावरण त्या गजलमधून उभं राहातं. उलट सुरैय्याच्या त्या नटखट गीतामध्ये हेच शब्द; पण बेफिकिरीने म्हटलेलं ते गाणं. म्हणजे आशय एकच; तो व्यक्त करायच्या तऱ्हा वेगळ्या आहेत.
प्रकाश चव्हाण सरांनी ते व्यंगचित्र आणि त्यासोबत त्यांनी लिहिलेलं टिप्पण मला मेलने पाठविलं. चित्र पाहात बसलो. त्या दोन वृद्ध स्त्रिया- शेजारी बसलेल्या आणि विणकामात गुंतून गेलेल्या.. चित्राखाली, व्यंगचित्रकाराने शीर्षक दिलं आहे- ढी१स्र्ी३४ं’ ट३्रल्ल. दोघींच्याही हातात विणकाम आहे. दोघीही गुंतून गेल्या आहेत. त्या भरात दोघींनाही पत्ता नाही, एकमेकांचे धागे ऐकमेकांत गुंतलेले आहेत. एकीचा धागा गुंततो आहे, तर त्याचवेळी दुसरीचा सुटत जातो आहे. पण खरेच का त्या दोघींना याची जाणीव नाही, ..का या दोघींना याची जाणीव आहे, त्या जाणूनबुजून हा खेळ (?) खेळताहेत.. नाही, तसं नसावं. त्या दोघींनाही याची माहिती नसावी, त्यांचं ते विणत राहाणं सतत चालू आहे, किती वेळ, कोण जाणे; आणि किती वेळ आपलं हे विणणं चालू आहे याची खबर त्यांना नसावी. एकीचं जोडत जाणं, दुसरीचं सुटत जाणं. सुटत गेलेला धागा दुसरीला पूरक ठरत आहे, त्याच वेळी पूरक झालेल्या धाग्याचं विणकाम सुटत जातं आहे, सतत, निरंतर.. कुणासाठी हे विणकाम होत आहे, माहीत नाही. कसलाच हेतू नाही या शिवणकामामध्ये; तरीही हात चालू आहेत. कसलंच प्रयोजन नाही जगायला; तरीही श्वास चालू आहेत.
मात्र गजल आणि चित्रातल्या सांगण्यात एक फरक आहे. शायर म्हणतो आहे नियतीला-  जगण्यासारखं काही राहिलं नाही तरी आम्ही जगत आहोत, आणि अशा प्रकारे काळावर आम्ही उपकार करीत आहोत. पण गंमत अशी, की नियती म्हणत असावी माणसाला, ‘तू म्हण बाबा उपकार वगरे काहीही, उपकार म्हण शाप म्हण.. जगावं तर लागणारच आहे तुला.’ आणि म्हणूनच शायर पुढे म्हणत असावा, का- हालात ने मुजरिम हमे ठहराया है.. दोनही व्यंगचित्रांमध्ये, असं वाटतं की या स्त्रियांना ती एकच धून लागलेली आहे- फिर भी जिए जाते हैं..  
‘जिंदगी कुछ भी नही..’  या गजलसाठी आज या चित्रांच्या दृश्यप्रतिमा डोळ्यांसमोर उभ्या राहू लागल्या. ही गजल ऐकताना पूर्वी अशा कोणत्या प्रतिमा जाणवायच्या का.. नाही. फक्त तो मूड- ती उदास स्थिती जाणवायची, ज्या उदासीला शब्दांचा आधार होता. मग हे जे चित्र होतं रेबर यांचं, माझ्या संग्रहात- ते पाहाताना पूर्वी काय वाटायचं बरं.. डोळ्यासमोर केवळ चित्र राहायचं, तपशिलावरून जसजशी नजर फिरत राहायची, उदास उदास वाटून जायचं. आता, सिनेमातल्या गाण्याला अभिनेत्याच्या सोबत-त्या दृश्यांच्या सोबत अनुभवावे, तसं झालं.
बेगम अख्तरच्या गजलसाठी या दोन चित्रांतली पात्रं जणू काही अभिनय करीत आहेत असं वाटू लागलं.
chaturang@expressindia.com