रंगबिरंगी नाती

वाचक प्रतिसाद

(संग्रहित छायाचित्र)
रंगबिरंगी नाती

२६ जानेवारीच्या अंकातील ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या लेखात डॉ. ऊर्जिता कुलकर्णी यांनी नाती या विषयावर नात्यातील उकल फारच उत्कृष्टरीत्या मांडली आहे. नात्याचे प्रकार आणि त्याची परिभाषा सध्याच्या परिस्थितीत एकदम चपखल बसते. खरंच कामपुरते, टाइमपास, स्वार्थी, बळजबरीचे, नावापुरते आणि रक्ताचे नाते आपण दैनंदिन आयुष्यात अनुभवत असतोच. जनुकीय नाते जपण्यास आपण खूप धडपडत असतो, पण अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. बहुतेक नाती जपण्यात एकतर्फीपणा आढळतो, असे म्हणतात. आजच्या काळात नाती आणि त्यातील ओलावा नष्टच झाल्यासारखा वाटतो. वडील/मुलगा, भाऊ /बहीण, पती/पत्नी यांच्या नात्यातील पावित्र्य लोप पावत आहे. दररोजच्या वर्तमानपत्रात आपण खून, बलात्काराच्या घटना वाचतो. त्यात स्थळ, काळ, वय, नाते या गोष्टी जणू अस्तित्वातच नाहीत असे आढळून येते. हल्ली रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते फार उपयुक्त, टिकाऊ आणि सोयीस्कर झाले आहे. पण यात थोडा लहरीपणाही आढळतो. अचानक बोलणे बंद करणे आणि त्याच्यासाठी केलेल्या मदतीचा पूर्ण विसर पडणे, म्हणजे एहसान फरामोश. या नात्यास तकलादू नाती म्हणावी लागतील. ती वृद्धिंगत होत नाहीत. हल्ली अनेक जोडपी त्यांच्या उमेदीच्या दिवसात फक्त आम्ही आणि आमची पिल्ले एवढंच जग सांभाळतात. त्यांचे आणि मुलांचे करिअर हे एकच लक्ष्य. म्हातारपणात दोघेही एकटेच असतात तेव्हा नातेवाईक आठवतात. हे स्वार्थी या नात्यात मोडतात. या लेखात लेखिकेने कमी शब्दात छान मांडणी केली आहे. ती वाचनीय आहे.

– वर्षां प्रभाकर शेकदार, ठाणे.

डोळ्यांत ‘पाणी’ आले.

१९ जानेवारीच्या लेखातील ‘पाणी’ हा लेख अतिशय सुरेख आणि वाचून खरंच डोळ्यांत ‘पाणी’ आले. पाणी मिळवण्यासाठी लोकांना वणवण फिरावे लागत आहे आणि शहरात लाखो लिटर पाणी वाया जाते. आमच्या घरात शक्य तितकं पाणी वाचवतो सगळे; पण रोज विचार येतो मनात, की गावांमध्ये पाणी कसे पोहोचवता येईल. गाईगुरांना, शेताला आमच्यापेक्षा पाणी जास्त लागतंय आणि आम्ही शहरातले लोक काही करत नाही. फेब्रुवारीत ही अवस्था, आता मे महिन्यात काय होईल? कोणी उपाय सुचवेल काय?

– स्मिता कुलकर्णी, भांडुप, मुंबई

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Chaturang loksatta reader response