उमा बापट – umaajitbapat@gmail.com

प्रत्यक्ष कृतीतून शिकलेलं लक्षात राहण्याचं प्रमाण सगळ्यात अधिक असतं. त्यामुळे मुलांच्या वाढीच्या वयात विविध अनुभव घेणं, हे विकासाच्या कक्षा रुंदावण्यासाठी बेगमी करण्यासारखंच आहे. शाळेच्या अभ्यासक्रमात असणाऱ्या अनेक गोष्टी मुलांनी प्रत्यक्षात पाहिल्या, अनुभवलेल्या असतात का? पालक म्हणून आपण त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतो का? इंटरनेट असो वा टीव्हीवरील माहितीचे कार्यक्रम, त्यातून दिसणारं जग प्रत्यक्ष अनुभवलं तरच मुलांच्या जाणिवा प्रगल्भ होतील. यासाठी जगण्यातले निर्भेळ अनुभव घ्यायला हवेत.

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!

तीन ते सहा वर्षांच्या मुलांना एक गोष्ट वाचून दाखवत होते. गोष्टीत बेडूक, गोगलगाय यांचे उल्लेख आले. गोष्ट ऐकताना मुलं त्यांच्या अनुभवविश्वाशी गोष्टीतले तपशील सहजच जोडतात आणि त्यावर उत्स्फूर्तपणे बोलतात. काव्यानं ‘दोदलदाय’ पुस्तकात बघितली होती, तर ओंकारनं बेडूक टीव्हीवर पाहिला होता. गोष्ट वाचून दाखवताना त्यांचे पालकही तिथे होते. नंतर माझा पालकांशी संवाद झाला. बहुतांश मुलं शहरातली, इंग्रजी माध्यमाच्या पूर्वप्राथमिक शाळांमध्ये जाणारी होती.  पावसातला निसर्ग, बेडूक, गोगलगाय, त्याविषयीची गाणी, हे सारं शाळेच्या अभ्यासक्रमात असल्यानं मुलांना ‘माहिती’ होतं. हळूहळू आमच्या संवादानंतर पालकांना जाणवत गेलं, की अशा अनेक गोष्टी माहितीच्या पातळीवरच होत्या. मुलांनी त्या प्रत्यक्ष पाहिल्याच नव्हत्या. आपण मुलांना ते दाखवायला घेऊन गेलो होतो का हे त्यांना आठवावं लागत होतं. मात्र यापुढे हे आवर्जून करायला हवं याचीही जाणीव त्यांना झाली.

माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचा वारेमाप संचय आणि त्याला तोटक्या अनुभवांची जोड अशी विजोड जोडी व्हायला लागली आहे. त्यातून वेगवेगळ्या वयांत नवीन आव्हानं समोर येत आहेत. पाच वर्षांचा नकुल इंटरनेटवर ग्रहताऱ्यांविषयीची माहिती बघायचा. वयाच्या मानानं त्याला खूप माहिती असली तरी शाळेत जुळवून घेताना त्याला अडचणी येत होत्या. शाळेकडून त्याच्या सहभागाबाबत तक्रारी असायच्या. यासाठी पालक सल्ला विचारायला आले. एककल्लीपणानं एकाच विषयात शिरण्याशिवाय इतर गोष्टी करून बघणं होत नसल्यानं ही अडचण येत आहे हे पालकांना आधी लक्षात आणून द्यावं लागलं. घरातल्या विविध वस्तू सुरक्षितता सांभाळून हाताळणं, त्याच्या वयाच्या इतर मुलांबरोबर खेळणं, याची पुरेशी जोड दिल्यावर नकुल वर्गातल्या उपक्रमांमध्ये हळूहळू सहभागी व्हायला लागला.

नताशा पालक झाल्यापासून    बालसंगोपनाविषयी खूप वाचायची. आहारापासून मेंदूची वाढ, ते मुलाची कलचाचणी! तिनं सर्व विषय समजून घ्यायचा सपाटा लावला होता. समाजमाध्यमांवरील पालकत्वाच्या चर्चामध्ये तर ती हिरिरीनं सहभागी व्हायची; पण मुलाबरोबर प्रत्यक्ष अनुभव किती? ‘‘प्रतिक्रिया नोंदवण्यातच तू मग्न असतेस. प्रत्यक्ष क्रियेचं काय?’’ तिच्या मैत्रिणीनं तिला थेट विचारलं.  शेवटी नताशानं आपल्या दिवसभराच्या वेळेचा चक्क हिशेब मांडला. आता चित्र स्पष्ट झालं. खरोखर रोज प्रत्यक्ष केलेल्या कृती आणि माहितीरूपी जगात गुंतवलेला वेळ यात तिची तिला तफावत जाणवली. भावनिक वाढीबद्दल माहिती गोळा करणं आणि अकस्मात मुलानं टोकाच्या भावना व्यक्त केल्यावर त्याला समजून घेणं हे दोन भिन्न अनुभव आहेत हे तिच्या लक्षात आलं. स्वत: हातानं काम करणं असेल किंवा मुलाबरोबरचा कृतिरूप सहवास म्हणजे अनुभव घेत जगणं, हे तिला उमगलं.

मुलांच्या वाढीत विविध अंगांना चालना मिळेल असा क्षितिजाचा प्रयत्न होता. तिनं मुलांसाठी निवडलेली शाळासुद्धा अनुभव घेत शिकण्याला प्राधान्य देणारी होती. शाळेत दहीहंडी साजरी करताना आधी मुलांना घरी दुधाला विरजण लावणं म्हणजे काय करायचं ते करून बघायला सांगितलं. दहीहंडीला खाऊ खाण्यासाठी स्वत: विरजलेलं दही घेऊन मुलं शाळेत आली. दहा वर्षांचा आमोद अभयारण्याविषयीचे बरेच माहितीपट पाहायचा. माहितीपट पाहाताना बाबा त्याला म्हणायचा, की हे खूप मेहनतीचं काम आहे, त्याला चिकाटी लागते; पण म्हणजे काय, हे आमोदला घरी आरामात बसून माहितीपट बघताना कसं कळावं? आपण आमोदला समजावून सांगितलं आहे, त्यामुळे एकाग्रता, कष्ट हे सगळं त्याला कळणार आणि त्याच्यात उतरणार, असंच बाबाला वाटायचं. प्रत्यक्षात मात्र तसं दिसायचं नाही. आपण त्याला एवढे चांगले कार्यक्रम दाखवतो, इतर मुलांसारखं तो कार्टून बघत नाही, याचा बाबाला कोण अभिमान! एकदा आमोद पक्षीनिरीक्षणाच्या छोटय़ा सहलीला गेला. लक्ष एकाग्र करून गर्द झाडीत एखादा पक्षी नजरेस पडतो आहे का याचा वेध घेणं अवघड आहे, हे तो पहिल्यांदाच प्रत्यक्ष अनुभवत होता. ‘माहितीपट पाहाणं आणि स्वत: अनुभवणं यात जमीन-आस्मानचं अंतर आहे,’ या आजीच्या तोंडच्या वाक्प्रचाराचा अर्थही तेव्हा कळला.

शिक्षणशास्त्रात ‘लर्निग पिरॅमिड’ मांडलेला आहे. त्यानुसार वाचन, श्रवण अशा विविध माध्यमांतून शिकलेलं आपल्याला किती ग्रहण होतं, लक्षात राहातं, हे आकृतीतून दाखवलं आहे. त्यात प्रत्यक्ष कृतीतून जे शिकलं जातं, ते लक्षात राहाण्याचं प्रमाण सगळ्यांत अधिक असतं हे चित्र आहे. वाढीच्या वयात विविध अनुभव घेणं हे विकासाच्या कक्षा रुंदावण्यासाठी बेगमी करण्यासारखं आहे. ‘‘आम्ही मुलांना रस्त्यावरील सिग्नलवर भीक मागण्याची वेळ आलेली मुलं दाखवतो. त्यांच्याकडे  खेळणी, खाऊ, कपडे नाहीत ते सांगतो. तरी असं वाटतं मुलांना कसली किंमतच उरलेली नाही,’’ असा बऱ्याच पालकांचा सूर ऐकू येतो. ‘‘काय करायचं?’’ एक जोडपं मला हीच शंका विचारत होतं. आई कर्तव्यतत्पर असल्यानं मुलं घरी यायच्या आधी खायचे पदार्थ तयार असायचे. मुलांनी शिकावं म्हणून पालकांची धडपड होती. रोजच्या दिनक्रमात वेळ पाळणं गरजेचं, पण सुटीच्या दिवशीही एखादा खाद्यपदार्थ मुळापासून बनवणं म्हणजे काय, याची प्रक्रिया मुलांनी या घरात अनुभवलीच नसावी असा माझा अंदाज होता. मदत करणं तर सोडा, पण निदान एखादा पदार्थ घरी बनवला, तर त्याच्या काय पायऱ्या असतात हेच जर मुलांना कधी कळलं नसेल तर त्याची किंमत म्हणजे पैशांपलीकडचं कष्टाचं, नियोजनाचं मूल्य त्यांना कसं कळावं? किमान मला भूक लागली आहे म्हणजे काय? हे कधी तरी अनुभवू देता का, हे त्या पालकांपर्यंत पोहोचवणं असा माझा मुद्दा होता. रंगकामासाठी लागणाऱ्या तेलीखडूंची पहिली पेटी शिल्लक असताना आणि त्याशिवाय दोन वेगळ्या प्रकारचं रंग साहित्यही घरात असताना, मला हवी असलेली एखादी गोष्ट संपली आहे, हा अनुभव तरी मिळेल का?

एका पाहुण्यानं कौतुकानं बाजारात आकर्षक खेळणी म्हणून मिळणारा एक कृतिसंच श्रेयसीला भेट दिला. श्रेयसी एक-दोनदा खेळली आणि तिनं ते सोडून दिलं. आजोबांनी तो संच नीट पाहिला. मुलांनी संचात दिलेल्या सूचनांप्रमाणे जोडणी करणं असा सीमित अनुभव त्यातून मिळणार होता. मुलं मुळापासून निर्मितीचा अनुभव घेऊ शकतील अशी सोय त्यात नव्हती, हे आजोबांच्या लक्षात आलं. त्यांनी श्रेयसीला आपली हत्यारांची पेटी बघायला दिली. हातोडी, पान्हे, पक्कड बघताना तिला उत्सुकता वाटायला लागली. आजोबा खिळा कसा धरतात, कसा ठोकतात, याचं ती निरीक्षण करू लागली.

मुलं स्वत: हातानं काही बनवण्याची प्रक्रिया, टप्प्याटप्प्यानं करू शकतील असे अनुभव पालक आणि शिक्षकांना जाणीवपूर्वक योजावे लागतात. सणासाठी घर सजवणं असो वा स्नेहसंमेलनासाठी नाटकात लागणारे मुखवटे बनवणं असो, नियोजन, कच्च्या सामानाची खरेदी ते निर्मिती, सादरीकरण आणि शेवटी पसाऱ्याची आवराआवरी असा ‘इति ते अंत’ पूर्ण चक्रातून जाण्याचा अस्सल, मूळ आणि पूर्ण अनुभव मुलांनी घ्यायला हवा.

प्रेरणाच्या कुवतीप्रमाणं, तिच्या गतीनं वेगवेगळ्या गोष्टी करून बघण्याचा मोकळेपणा तिच्या घरी आणि शाळेतही होता. मोठी झाल्यावर व्यवस्थापनशास्त्रातलं शिक्षण घेताना लहानपणीचे किती तरी अनुभव प्रेरणा या शिक्षणाशी जोडू शकली. एकदा शाळेत त्यांना शंभर रुपये देण्यात आले आणि त्यात एका छोटय़ा कार्यक्रमासाठी लागणारं साहित्य कसं बसवाल याचं अंदाजपत्रक मांडून मग खरेदीला पाठवलं.  एकदा त्यांच्या घरी प्रेरणा आणि तिच्या भावंडांनी स्वत: वेगवेगळ्या वस्तू बनवून प्रदर्शन भरवलं. नातेवाईकांना बोलावणं, वस्तूंच्या किमती ठरवणं, विक्रीचा हिशेब ठेवणं, हे सगळे बारकावे स्वत: अनुभवले तेव्हा त्यात मजा आली, एवढाच सहज घेतलेला अनुभव वाटत होता. स्वत: व्यवस्थापकीय कामात पडल्यावर आपण काम इतकं सफाईनं का करू शकतो, याची सुरुवात किती आधी झाली होती हे प्रेरणाला आठवू लागलं.

रवीची प्रशासकीय सेवेत छोटय़ा गावात नियुक्ती झाल्यावर त्याला जेवणाचा डबा रखमा आजी द्यायच्या. ‘‘दादा, एक विचारू का, ऐकलं हाय तुमच्या शहरात झुणका भाकर खायाला बी हाटेलमधी जात्यात?’’ आजींचा प्रश्न ऐकू न रवीला हसू आवरेना. वातानुकूलित उपाहारगृहातली पिठलं-भाकरी त्याच्या डोळ्यांसमोर आली. ‘‘आमच्या पाहुण्यांना बोलवायचं का? थेट तुमच्या ओसरीवर बसून झुणका भाकर बनवताना पाहातील आणि खातीलही! ’’ रवीच्या प्रतिसादानं रखमा आजी पदर तोंडावर ओढून हसू दाबू लागल्या.

दिवाळीचे दिवस जवळ आले होते. फराळाचे पदार्थ बनवून मिळणाऱ्या दुकानावरून आम्ही रिक्षातून जात होतो. चकलीच्या खमंग भाजणीचा वास रिक्षातसुद्धा पोहोचला. रिक्षावाला दादा एकदम म्हणाला, ‘‘ताई, हा वास आपल्या घरात यायला पाहिजे ना, तर ती दिवाळी!’’ मी चकित होऊन ऐकत राहिले. शिक्षणशास्त्रात शिकलेलं शिकण्याचं सूत्र एक रिक्षावाला दादा मला इतक्या सहजतेनं सांगत होता. ‘अनुभवावीण मान डोलवू नको रे’ संत सोहिरा यांनी रचलेले हे शब्द आपल्या घरटय़ात अभंग सांभाळूयात. अनुभवसंपन्न घरटय़ात अनुभवोत्सुक राहून निर्भेळ अनुभव घेत जगूयात.