– शोभना कसबेकर
पालकांनी मुलांकडून केलेल्या अपेक्षा आणि मुलांनी पालकांकडून केलेल्या अपेक्षा हा तर चिरंतन संघर्षाचा विषय, आयुष्यभर चालणारा. लहान असताना मुलांना पालकांकडून अपेक्षा असतात आणि मुलं मोठी झाली की पालकांना मुलांकडून अपेक्षा असतात. आणि ते स्वाभाविकही असतं. नात्याची दुसरी बाजूच अपेक्षा असते, कधी कळत कधी नकळत. ज्याला त्या वेळीच कळतात तो त्यातून तरून जातो.
काही दिवसांपूर्वी मला एके ठिकाणी भाषण देण्यासाठीचं आमंत्रण मिळालं. मी मनातून अगदी सुखावले. विषय होता ‘अपेक्षांविना जगावं का?’ खरं तर चहुकडून येणाऱ्या अपेक्षांसंबंधित कुरबुरी, तक्रारी कानावर पडल्या की, मन चलबिचल व्हायचं. हे आपणच स्वत:हून ओढवून घेतलेलं लोढणंच वाटायचं मला. आपणच दुसऱ्याबद्दल अवास्तव अपेक्षा ठेवायच्या अन् दु:ख ओढवून घ्यायचं. कशाला हवा हा उपद्व्याप? यापेक्षा अपेक्षा न ठेवणंच चांगलं की! पण माझं हे मत दुसऱ्यांना पटवणं दुरापास्तच ठरायचं! मला खूप वाईट वाटायचं अन् रागही यायचा. आज मात्र अनायासे ही संधी चालून आली होती, मन मोकळं करण्याची. याचाच हा आनंद होता. कार्यक्रम छान झाला. वेगवेगळ्या शंकांचं निरसन झालं. विचारांची देवाणघेवाणही झाली. मात्र त्यानंतर अपेक्षांविषयीच्या विचारांचं चक्र अधिक जोरदार फिरू लागलं.
खरं तर अपेक्षा म्हणजे काय? काही तरी चांगलं घडेल याची आशा. त्यातून जगण्याची उमेद निर्माण होते. कशावर तरी त्यामुळे श्रद्धा बसते. आयुष्याबद्दल तर प्रत्येकाला ही आशा असतेच आणि कदाचित यामुळे माणूस अपेक्षा करायला लागतो. खरं तर अपेक्षा न ठेवता जगायला शिकलो, तर किती स्वच्छंदी जीवन जगू शकू ना? पण अपेक्षा ठेवल्या नाहीत, तर जगणार कसं? हेही तेवढंच सत्य. अपेक्षा ही समाधान मिळवण्यासाठी ठेवलेली इच्छा.
मनुष्य जन्माला येतो, ते भावना आणि कल्पनाशक्ती घेऊनच. तो आपल्या भावी आयुष्याचं कल्पक चित्र रंगवतो, नाती जोडतो अन् मग त्यासाठी अपेक्षा ठेवणं आलंच! अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं की आपला आत्मविश्वास बळावतो आणि अपेक्षाभंग झाला की दु:ख वाट्यास येतं. हे मुळी जगण्याचं समीकरणच आहे.
आज जागतिकीकरणामुळे अपेक्षांचं ओझं वाहणं सर्वांनाच कठीण वाटतंय. आजचं युग स्पर्धेचं आहे. त्यात प्रत्येक जण उतरायचा प्रयत्न करतोय कारण अधिक चांगलं आयुष्य त्यातच आहे, असं त्याला वाटतं. ते मिळतंय- सुद्धा काही अंशी, पण या स्पर्धेच्या जगात ताण वाढतोय आणि नात्यांवर परिणाम होतोय, त्याचं काय? परवाचीच गोष्ट. मी काकींना भेटायला गेले होते. गेले काही दिवस काकी अंथरुणाला खिळल्या होत्या. काकांच्या मदतीला त्यांचा एकुलता एक मुलगा माधव जमेल तसा यायचा. काकींची औषधं आणण्याची जबाबदारी त्यानं उचलली होती. रात्री ऑफिसातून दमूनभागून तो घरात शिरतोय तेवढ्यात काकांनी औषधं मागितली. कामाच्या ताणात तो नेमका ती आणायला विसरला, ‘अपेक्षाग्रस्त’ काकांचा पारा चढला. ते जोरात ओरडले. ‘‘आता तुझ्याकडून हीसुद्धा अपेक्षा करायची नाही का?’’ मी बाजूलाच होते, मलाही काय करावं सुचेना. माधवचा रडका चेहरा सर्व काही सांगून गेला. तरी तो चाचरत म्हणाला, ‘‘बाबा, चूक झाली माझी. नेहमी आणतो ना मी!’’ त्याला पुढे बोलवेच ना. शब्दच अबोल झाले होते. ही एक उपेक्षा वाटली असेल त्याला. पण दुसऱ्या बाजूनं विचार करता कदाचित काकासुद्धा काकींच्या दुखण्याने अस्वस्थ असतील, औषधाने तिला बरं वाटत असल्याने कधी आपला मुलगा औषध घेऊन येतोय याची ते वाट पाहात बसले असावेत. आणि अशा वेळी नेमका माधव औषध विसरल्याने काकींच्या तब्येतीची काळजी मोठी झाली आणि ते चिडले असावेत. त्यांनी चांगल्याच मनाने अपेक्षा केली, परंतु ते साध्य झालं नसल्याने त्याचं रूपांतर चिडण्यात झालं आणि मन दुखावलं गेलं. चिडणारा आणि ज्यांच्यावर चिडले तो, दोघांची मने दुखावली आणि नात्यात परका भाव आला. अर्थात ते दोघे विचाराने, भावनांनी परिपक्व आहेत त्यामुळे ते दुखावणं तात्पुरतं राहील. अन्यथा? किती विचित्र खेळ आहे नाही हा भावनांचा! अपेक्षा केल्यावर झालेल्या अपेक्षाभंगाचा.
पालकांनी मुलांकडून केलेल्या अपेक्षा आणि मुलांनी पालकांकडून केलेल्या अपेक्षा हा तर चिरंतन संघर्षाचा विषय, आयुष्यभर चालणारा. लहान असताना मुलांना पालकांकडून अपेक्षा असतात आणि मुलं मोठी झाली की पालकांना मुलांकडून अपेक्षा असतात. आणि ते स्वाभाविकही असतं. नात्याची दुसरी बाजूच अपेक्षा असते. कधी कळत कधी नकळत. ज्याला त्या वेळीच कळतात तो त्यातून तरून जातो. आज पालकांच्या मुलांकडून अवास्तव अपेक्षा असतात. लक्षात घ्या, परिपूर्ण असणं हा सध्याचा भ्रम आहे. कोणीही चूक केल्याशिवाय जगूच शकत नाही मुळी… मुलांकडून कृतज्ञतेची कधीच अपेक्षा करू नका. अपेक्षांचं ओझं व्हायला देऊ नका. मुलांचा आत्मविश्वास गमवायला देऊ नका. त्यांच्या क्षमतेनुसारच अपेक्षा ठेवा, असं सांगावंसं वाटतं. खरं तर अपेक्षा म्हटलं की, माझं मन नेहमीच बुचकळ्यात पडतं. आयुष्यात अपेक्षा ठेवाव्यात की नाही हा प्रश्न मनाला सतावतो. आपण जीवनात अपेक्षा ठेवल्याच नाहीत तर जगू शकू का? म्हणजे मग अपेक्षाभंगाचं दु:ख आपल्या वाट्यालाच येणार नाही. पण ते शक्य नाही. पण हेही तितकंच खरं की अपेक्षा ठेवल्यानं माणूस आसक्त होतो आणि अपेक्षाभंगातून जीवनाचा आनंद गमावतो. कधी कधी तर अपेक्षाभंग हे दु:खाचं दीर्घकालीन कारणही बनतं. कधी कुणी आप्ताकडून ‘तुझ्याकडून आम्ही काही अपेक्षाच केली नव्हती,’ असं ऐकायला मिळतं तेव्हा मन विषण्णं होतं. ती एक उपेक्षा वाटते. हे पचवणं जड जातं. अपेक्षा नसणं हा परका भाव आणि अपेक्षाभंग ही दु:खद भावना. दोन्ही गोष्टी पचायला जड. अशा या अपेक्षांच्या चक्रव्यूहात आपण आज अडकलो आहोत.
अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, तर वास्तव स्वीकारण्याची तयारी आणि क्षमता आपल्यात हवीच हवी. आपण ते निसर्गाकडून शिकायला हवं. पानगळती झाल्यानंतरच झाड जोमानं वाढायला लागतं. याउलट आपण मात्र अपेक्षाभंगानं कोलमडूनच जातो. ‘जीवन कहीसे भी शुरू हो सकता है सिर्फ हौसला चाहिए!’ हे आपण विसरूनच गेलोय. आपण हक्काच्या माणसाकडून अपेक्षा ठेवतो, पण इथंही सक्तीची अट असते. ती अट जगण्याची मजाच घालवून टाकते. सुखात जसं अडकायचं नसतं तसं दु:खात भरकटायचंही नसतं. हे शिकायलाच हवं. आपला ‘अहं’ हेसुद्धा अपेक्षांचंच एक अंग, दोन मनांतलं अंतर वाढवणारं.
आपलं मन सुखाची कबुली द्यायला मनापासून टाळतं, पण दु:खाचा पाढा वाचण्यात मात्र आपण सदैव तयार असतो. गौतम बुद्ध म्हणतात ते लक्षात ठेवायला हवं, ‘ज्या गोष्टी भूतकाळात घडून गेल्या आहेत त्यामध्ये जास्त अडकू नका, तसंच भविष्याची जास्त काळजी करू नका. वर्तमानात जगायला शिका… यासाठी हे लक्षात ठेवायला हवं की, ‘Peace begins when expectations end!’
shobhana.kasbekar@gmail.com